Home शिकू आनंदे भाषांतरामधील करिअर संधी

भाषांतरामधील करिअर संधी

1

भारतासारख्या अठरापगड जातींच्या व त्याचबरोबर शेकडो भाषांच्या देशात भाषांतरकारासाठी अनेकविध संधी उपलब्ध आहेत. अनुवाद किंवा भाषांतर करणं हे सोपं काम नाही. परंतु उत्तम अनुभव व शिक्षणाच्या सहाय्याने तुम्ही उत्तम भाषांतरकार होऊ शकता.
मुळातच जागतिकीकरणानंतर भाषांतराला खूप जास्त महत्व प्राप्त झालं आहे. वेगवेगळ्या देशांच्या संस्कृतीच्या किंवा सामाजिकतेच्या सीमा ओलांडून नवनवीन ज्ञान प्राप्त करणे हा कुठेतरी सर्वासाठी उत्सुकतेचा किंवा ज्ञानाचा विषय ठरला आहे. एखाद्या विशिष्ट भाषेमधून दुस-या भाषेमध्ये जो काही आशय किंवा मजकूर असेल, त्याला त्या विशिष्ट भाषेतील लोकांना कळेल अशा शब्दांमध्ये गुंफून त्या आशयाची बांधणी करणे म्हणजेच भाषांतर होय. ज्या दोन भाषांमध्ये ही प्रक्रिया घडते त्या दोन्ही भाषांवरती भाषांतरकाराचे प्रभुत्त्व असणे आवश्यक असते. मात्र याखेरीज प्रत्येक भाषेची स्वत:ची काही बलस्थानं असतात. तसंच भाषा ही प्रभावी असते. तिचं इत्यंभूत ज्ञान भाषांतरकाराला असणे आवश्यक असते. काही शब्द नव्याने विशिष्ट भाषेमध्ये सामील होतात तर काही शब्द हे प्रचलनातून बाद होतात. मात्र तरी तो त्या भाषेचा ठेवाच असतो. या दोन्हींचे ज्ञान भाषांतरकाराला असणे आवश्यक असते.

भाषांतरकाराला काय काय संधी असतात त्या आपण बघूया.

विविध दस्तावेज किंवा कागदपत्रांचे भाषांतर : प्रशासकीय कार्य हे एका विशिष्ट भाषेतून चालते मात्र इतर भाषांमध्येसुद्धा त्याचं भाषांतर करण्याची गरज भासते. भारताचाच विचार केला तर भारतात विभिन्न राज्यांमध्ये भिन्न भिन्न भाषा बोलल्या जातात आणि त्या त्या राज्याचे कार्य त्या त्या भाषेतून होत असते. केंद्रसरकारचं काम हिंदी किंवा इंग्रजी या भाषांमधून होते तर राज्य सरकारचं उदाहरणार्थ महाराष्ट्र राज्याचा विचार केला तर शासकीय कार्य हे मराठीतून होतं. मग अशा वेळेला वेगवेगळे कागदपत्र , दस्तावेज याचं भाषांतर करण्याची गरज भासते. अनेकवेळा सरकारी कचेरीमधून म्हणजेच कोर्टकचेरीमधून सुद्धा भाषांतराची गरज भासत असते. विविध कायद्यांची अंमलबजावणी करत असताना त्या कायद्यांचं रुपांतर त्या विशिष्ट भाषेमध्ये करून मगच ते लोकांपर्यंत पोहोचवतात. त्यामुळे शासकीय अनुवाद हा एक महत्वाचा भाग आहे आणि त्याला प्रशासकीय अनुवादाची जोड आहे.

भाषांतरामधला सर्वात जास्त चíचत व लोकांना माहित असलेलं भाषांतर म्हणजे पुस्तकांचं भाषांतर होय. गेल्या दोन दशकांमध्ये विभिन्न देशांतल्या गाजलेल्या पुस्तकांचं किंवा गाजलेल्या लेखकांच्या प्रसिद्ध साहित्यकृतींचं भाषांतर करण्याची जणू काही स्पर्धाच लागली आहे. असे बाजारात असलेल्या एकूण पुस्तकांमधून दिसते. भारताचा विचार केला तर अमेरिका, युरोप, रशिया, जर्मनी इथल्या पुस्तकांचे अनुवाद आपल्याकडे उपलब्ध होताना दिसतात. याखेरीज भारतीय भाषांमधले भिन्न भिन्न भाषांमधल्या गाजलेल्या कादंब-या, कथासंग्रह, कविता यांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते. ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त पुस्तकांचे भाषांतर तर हमखासच होते. याखेरीज अत्यंत गाजलेल्या आणि चच्रेत असलेल्या पुस्तकांचेसुद्धा भाषांतर होताना आपल्याला दिसते. आणि त्यामुळे भाषेची मर्यादा ओलांडून त्या त्या विषयातील साहित्यप्रेमींनाहा पुस्तकांचा ठेवा प्राप्त होतो. यात वेगवेगळ्या प्रकाशन संस्था लेखकाला मानधन देतात. हे मानधन त्या लेखकाच्या लौकीकाप्रमाणे बदललेले असू शकते. मात्र भाषांतरकाराचे मानधन हे भाषांतरकाराचे स्वत:चा दर्जा किंवा त्याला असलेला लोकाश्रय यावरती ठरत असते. भिन्न भिन्न भाषांतरकार हे गाजलेले आहेत असे आपल्याला दिसते. गाजलेले भाषांतरकार हे या कामात चांगलं मानधन प्राप्त करतात. मात्र प्रकाशक हा व्यावसायिक दृष्टीकोन समोर ठेऊन भाषांतर करतो हे देखील तितकेच महत्वाचे. काही वेळा संशोधनपर पुस्तकांचं, भिन्न भिन्न इतिहास- भूगोल अशा विषयांवरील पुस्तकांचे सुद्धा भाषांतर होत असतं. तेव्हा त्या त्या विषयातील तज्ज्ञ लोक भाषांतर करताना आपणास दिसतात. सर्वसामान्य भाषांतरकार सुद्धा भाषांतर करत असेल तरी या भाषांतरकाराला प्रत्येक पानाप्रमाणे दर ठरलेले असतात. हे दर ५० रुपयांपासून ते पुढे २०० रुपयांपर्यंत असे साधारणत: आहेत. या खेरीज माध्यमांमधून भाषांतराची संधीही असते. विविध माध्यमं लोकरुचीनुसार त्यांना मजकूर पुरवीत असतात. यामध्ये वृत्तपत्रे, सिनेमा, रेडिओ , टेलीव्हिजन या सर्वच माध्यमांचा समावेश होतो. यात सगळ्यात महत्वाचे म्हणजे आशय, त्याचं बिनचूक भाषांतर करावं लागतं. मात्र त्याच बरोबर त्या त्या मालिका किंवा चित्रपटाप्रमाणे त्यात काही बदल केले जातात, म्हणजेच मूळ इंग्रजीतल्या किंवा दक्षिण भारतीय भाषेतल्या चित्रपटांसाठी सबटायटल्स किंवा डबिंग ज्या वेळेला हिंदीमध्ये केलं जातं तेव्हा त्यात हिंदीतील काही गाजलेली उदाहरणं टाकावी लागतात हा याच्यातील फरक आहे. मात्र वृत्तपत्रासाठी किंवा वास्तववादी कार्यक्रमांसाठी भाषांतर केलं जात असताना त्यामध्ये मूळ आशयाला धक्का न लागता ते भाषांतर केलं जातं. दूरचित्रवाणी किंवा चित्रपट यासाठी भाषांतर करत असताना मानधन सुद्धा खूप मोठय़ा प्रमाणावर घेतलं जातं किंवा खूप चांगलं मिळतं. दिवसेंदिवस वाढत जाणारी माध्यमांची संख्या, माध्यमांना कमी पडत जाणारा मजकूर किंवा कार्यक्रम यानुसार या क्षेत्रामध्ये भाषांतराच्या खूप संधी आहेत.

जाहिरातींचे भाषांतर :

बहुराष्ट्रीय कंपन्यांनी भारतामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांच्यासाठी बाजारपेठ विस्तारण्यासाठी किंवा स्वत:चे उत्पादन लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीचा एक महत्वाचं माध्यम म्हणजे जाहिरात होय. त्यामुळे जाहिरातींमध्ये सुद्धा भाषांतराची नवीन संधी उपलब्ध झाली आहे. जाहिरातींचं भाषांतर करत असताना त्यात त्या त्या कल्पना म्हणजे जाहिरात जशी मुळात सृजनात्मक असते, ती सृजनशीलता दुस-या भाषेमध्ये जशीच्या तशी येणे आवश्यक असतं. त्यामुळे पटकन लोकांच्या मनाचा ठाव घेणारी, लोकांना चटकन उच्चारता येणारी, त्यांना पाठ होणारी अशी जाहिरात तयार करावी लागते. वेगवेगळ्या जाहिरातींच्या टॅगलाईन किंवा कॅचलाईन यांचं इतर भाषांमध्ये भाषांतर करत असताना खूप कसरत करावी लागते. अर्थातच यामध्ये अत्यंत विचार करून आणि मगच कोणत्यातरी एखाद्या निष्कर्षापर्यंत किंवा विशिष्ट भाषांतरापर्यंत यावं लागतं. जाहिरातीचे भाषांतर करत असताना त्यात आणखीन महत्वाचा भाग असतो तो म्हणजे मसुदा लेखन होय . म्हणजेच कॉपी रायटिंग होय. एखाद्या जाहिरातीसाठी जे काही मसुदा लेखन केले जाते. त्या मसुदा लेखनाचे भाषांतर आज काल आवश्यक झाले आहे. हे भाषांतर करत असताना त्यामध्ये खूप जास्त सावध राहणे आवश्यक आहे. भारताचा विचार केला तर इंग्रजीमधील जाहिराती या मराठी, गुजराथी, हिंदी, पंजाबी, तमिळ, बंगाली, कानडी ,तेलगु, मल्याळम ओरिया अशा भाषांमध्ये भाषांतरीत कराव्या लागतात. त्यामुळे भाषांतरकाराला मसुदा लेखनाचे भाषांतर हे एक महत्त्वाचा पर्याय उपलब्ध आहे. विभिन्न प्रादेशिक भाषांमध्ये ज्यांनी आपली पदवी घेतली आहे. त्यांना भाषांतराची संधी उपलब्ध असते अर्थात त्यासाठी त्यांना ज्या भाषेतून भाषांतर करायचे ती भाषा आणि ज्या भाषेत भाषांतर करायची ती भाषा यावर प्रभुत्त्व असणे आवश्यक असते. महाराष्ट्राचाच विचार केला तर मराठीतून बीए, बीएमएम करणारे अशा पदवीधारकांना भाषांतराचे हे माध्यम उपलब्ध आहे. इतर भाषांवर असलेले प्रभुत्त्व, संगणकीय ज्ञान, इतर कौशल्य, इतर भाषांमधील पुस्तकांचे वाचन हे जर व्यवस्थित असेल. तर ती व्यक्ती आणखीन जास्त चांगल्या पद्धतीने भाषांतर करू शकते. एकूणच भाषांतरासाठी अशी बरीचशी दालनं आत्ता उपलब्ध आहेत.

1 COMMENT

  1. मी स्वतः इंग्रजी-मराठी भाषांतरे करीत असतो.यासंदर्भात उपलब्ध असलेल्या संधींबद्दल माहिती मिळू शकेल काय? माझा भ्रमणध्वनी-९५६१०१२३५७ असा आहे.
    शशिकांत ओहळे,
    पत्रकार, अमरावती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version