Home महामुंबई ठाणे भिवंडीतील यंत्रमागधारकांची महावितरणवर धडक

भिवंडीतील यंत्रमागधारकांची महावितरणवर धडक

0

वीजबिल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शेकडो यंत्रमाग चालक-मालकांनी खासदार सुरेश टावरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता (नोडल अधिकारी) कार्यालयावर धडक दिली.

भिवंडी – राज्य सरकारने यंत्रमाग चालक-मालकांचे कंबरडे मोडणारी वीजबिल दरवाढ केल्याच्या निषेधार्थ शेकडो यंत्रमाग चालक-मालकांनी खासदार सुरेश टावरे यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता (नोडल अधिकारी) कार्यालयावर धडक दिली.

आधीच कापड व्यवसायात आलेल्या मंदीमुळे यंत्रमाग कारखाने बंद पडत आहेत. त्यात आता राज्य सरकारने ५० टक्के वीजदर वाढवून यंत्रमाग चालक-मालकांना वेठीस धरले आहे. हे वीजबिल भरणे डोईजड झाल्याने शहरातील यंत्रमाग चालक-मालकांनी ६ नोव्हेंबरपासून यंत्रमाग बंद ठेवून आंदोलन सुरू केले आहे.

त्यानंतरही सरकारने डोळेझाक केल्याने यंत्रमाग चालक-मालकांनी कल्याण रोडवरील अधीक्षक अभियंता कार्यालावर धडक दिली. या मोर्चात सहभागी झालेल्या भिवंडी पद्मानगर पावरलूम विवर्स असोसिएशन, हालारी पावरलूम विवर्स असोसिएशन, भिवंडी बिममजुरी ओनर्स आणि विवर्स असोसिएशन, शांतीनगर पावरलूम विवर्स असोसिएशन, नालापार पावरलूम विवर्स आणि ओनर्स असोसिएशन आदी यंत्रमाग चालक-मालक संघटनांनी राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

दरम्यान, आनंद दिघे चौकातून गोपालनगर माग्रे निघालेला हा मोर्चा वीज कंपनीच्या गेटवर पोलिसांनी अडवल्याने मोर्चेक-यांनी भरस्त्यात बैठक मारली. त्यानंतर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे अधीक्षक अभियंता बी. बी. जाडकर यांना निवेदन देण्यात येऊन राज्य सरकार वीजदरवाढ जोपर्यंत मागे घेत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार केला.

तर सोमवारी कल्याण रोड येथील राजीव गांधी चौकात धरणे आंदोलन करून रास्ता रोको करणार असल्याची माहिती भिवंडी पावर संघर्ष समितीचे संयोजक मन्नान सिद्दिकी यांनी दिल्याने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस उपायुक्त एम. के. भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

या मोर्चात आमदार रशीद ताहीर मोमीन, आमदार रूपेश म्हात्रे, भिवंडी पावर संघर्ष समितीचे संयोजक अब्दुल मन्नान सिद्दिकी, इस्तियाक अहमद अन्सारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष श्याम पाटील, सपाचे शहराध्यक्ष कलीम खान आदी सहभागी झाले होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version