Home महामुंबई ठाणे भिवंडी दंगलीचा सूत्रधार युसूफ रजा गजाआड

भिवंडी दंगलीचा सूत्रधार युसूफ रजा गजाआड

1

भिवंडी शहरातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून दंगल घडवणारा मुख्य सूत्रधार तथा रजा अकादमी या संघटनेचा शहर अध्यक्ष मोहम्मद युसूफ मो. इब्राहिम मोमीन ऊर्फ युसूफ रजा यास निजामपूर पोलिसांनी १२ वर्षांनी गजाआड केल्यामुळे मुस्लीम बांधवांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

भिवंडी- भिवंडी शहरातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या बांधकामास विरोध करून दंगल घडवणारा मुख्य सूत्रधार तथा रजा अकादमी या संघटनेचा शहर अध्यक्ष मोहम्मद युसूफ मो. इब्राहिम मोमीन ऊर्फ युसूफ रजा (रा. कोटरगेट) यास निजामपूर पोलिसांनी शनिवारी गजाआड केले. त्यामुळे शहरातील मुस्लीम बांधवांमध्ये प्रचंड खळबळ माजली आहे.

भिवंडी शहरात कोटरगेट येथील वादग्रस्त निजामपुरा पोलीस ठाण्याच्या इमारत बांधकामास ५ जुलै २००६ रोजी विरोध करून युसूफ रजा व सचिव शकील रजा या दोघांनी संगनमताने नागरिकांना भडकावून पोलिसांवर दगडफेक करून दंगल घडवली होती. या दंगलीत एसटी बसेस जाळून तत्कालीन पोलीस उपायुक्त आर. डी. शिंदे यांच्यासह ३९ पोलीस कर्मचा-यांना जखमी केले होते.

तसेच या दंगलीत जमावाकडून दोन पोलिसांचीही निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात मोठी खळबळ माजली होती. या प्रकरणी युसूफ रजा याच्यासह ४०० जणांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. मात्र दंगलीच्या घटनेनंतर युसूफ रजा फरार होता. त्यामुळे त्याच्या अटकेसाठी भिवंडीचे पोलीस उपायुक्त मनोज पाटील यांनी देशातील सर्व एअर पोर्ट प्राधिकरणाला त्याची माहिती दिली होती. या माहितीनुसार युसूफ रजा हा सौदी अरेबिया येथून भारतात येत असून तो मुंबई विमानतळावर उतरणार आहे, अशी खबर मिळाल्याने सहार विमानतळावर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन निजामपूर पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी युसूफ रजा यास अटक करून रविवारी न्यायालयात हजर केले असता त्याला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून त्याची रवानगी तळोजा कारागृहात करण्यात आली आहे.

युसूफ रजा हा मागील बारा वर्षे फरार होता. हा सर्वात मोठा विनोद ठरला असून, या दरम्यान बारा वर्षे तो भिवंडी शहरात मोठय़ा सन्मानाने वावरत असताना पोलीस प्रशासनाने त्यास अटक न करता शांतता कमिटीच्या सभांमध्ये सन्मानाने वागणूकच नव्हे तर कित्येक वेळा त्याचा सन्मान केला. भिवंडीत युसूफ रजा याच्या नेतृत्वाखाली बरीच आंदोलने झाली होती. तर या दंगलीच्या गुन्हय़ातील बरेच आरोपी निर्दोष सुटले आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version