Home मजेत मस्त तंदुरुस्त मधुमेद घातक महामाया!

मधुमेद घातक महामाया!

0

आपल्याकडे भारतात आढळणारा मधुमेह हा ‘मधुमेद’ या प्रकारात मोडतो. ‘मधुमेद’ म्हणजे स्थूलता आणि मधुमेह. मधुमेहाचे मुख्य प्रकार दोन. यांना आजपर्यंत अनेक नावं ठेवण्यात आली; पण कुठलंच नाव चपखल बसेना. शेवटी यांना ‘टाइप वन’ आणि ‘टाइप टू’ अशी सुटसुटीत नावं दिली गेली.

यातील ‘टाइप वन’ हा साधारण लहान वयात होतो. या प्रकारात शरीरात इन्सुलीनच्या विरुद्ध काम करणारी रसायनं तयार होतात. इन्सुलीन तयार व्हायचं कमी होत जाऊन शेवटी त्याची निर्मिती बंद होते. त्यामुळे रुग्णाला सतत बाहेरून इन्सुलीन घेत राहावं लागतं. या उलट ‘टाइप टू’मध्ये इन्सुलीन तयार तर होतं; पण त्याचं कार्य व्यवस्थित होऊ न देणारी रसायनं शरीरात तयार होतात. त्यामुळे साखर नियंत्रणात राखण्यासाठी खूप जास्त इन्सुलीन पाझरत राहतं. काही काळाने स्वादुपिंडाच्या पेशी थकून जातात आणि पुरेशा प्रमाणात इन्सुलीन तयार करू शकत नाहीत. त्यातून मधुमेह दिसू लागतो.

हे दोन महत्त्वाचे प्रकार सोडले तर इतर काही प्रकारचे मधुमेह असतात; पण अत्यल्प. उदा. गरोदर असताना दिसणारा मधुमेह. पण मधुमेह म्हटलं की, दोन मुख्य प्रकार टाइप वन आणि टाइप टू. यातील भारतात प्रामुख्याने आढळणारा प्रकार टाइप टू. या ‘टाइप टू’मध्ये इन्सुलिनचं काम व्यवस्थित होत नाही. हे काम बिघडवणारी महामाय म्हणजे स्थूलता. स्थूलतेमुळे शरीरातील चरबीच्या पेशींचा आकार आणि पेशींची संख्या वाढत जाते. या भरलेल्या चरबीच्या पेशींमधून चरबीचे कण रक्तात सतत येत राहतात. असे वाहते चरबीचे कण, स्नायू आणि इतर पेशींच्या आत शिरतात. या कणांना तिथून हुसकावून लावणं किंवा त्यांचा इंधन म्हणून वापर करणं हे पेशींना शक्य होत नाही. मग हे घुसून राहिलेले चरबीचे कण इन्सुलिनच्या कामात अडथळे आणू लागतात. एखाद्या देशात किंवा प्रदेशात बाहेरून आलेल्या लोंढय़ांमुळे जी परिस्थिती उद्भवते तीच आपल्या शरीरात तयार होते. मग साखरेचं नियंत्रण नीट व्हावं, म्हणून जास्त प्रमाणात इन्सुलीन तयार करावं लागतं. असं जास्तीचं इन्सुलीन बघितलं की, जास्त चरबी तयार होऊ लागते आणि साठू लागते. मग हे दुष्टचक्र चालू होतं. शेवटी शरीर मधुमेहाने पोखरून निघतं.
यात आणखी एक गुंतागुंत अशी की, रक्तात फिरणारे अतिरिक्त चरबीचे कण. ते कण इन्सुलीन तयार करणाऱ्या पेशींना मारक असतात. म्हणजे एकीकडे इन्सुलीनची गरज वाढवायची आणि दुसरीकडे ते जास्ती तयार होऊ द्यायचं नाही, अशा दुहेरी मार्गाने चरबी मधुमेह जन्माला घालते आणि वाढवते. एकदा का रक्तातील साखर वाढती राहिली की त्या साखरेमुळे शरीरातील लहानमोठ्या रक्तवाहिन्यांच्या भिती ओरबाडल्या जाऊ लागतात. अशा ओरबाडल्या जागी मग जखमा भरून काढण्यासाठी सूक्ष्म अशा रक्ताच्या गाठी तयार होतात. या गाठींमधेही चरबीचे कण शिरून बसतात. ते कण गाठी वितळण्याची प्रक्रियाच गोठवून टाकतात. मग रक्तवाहिन्यांचा लवचिकपणा कमी होत जातो. अशा कठीण आणि या पक्क्या गाठींमुळे आकुंचित होत जाणाऱ्या रक्तवाहिन्या पुरेसा रक्तप्रवाह टिकवून ठेऊ शकत नाहीत. कधी अचानक यातील एखादी गाठ सुटी होऊन पुढे सटकते आणि पुढील छोटय़ा रक्तवाहिनीला बंद करते. या अशाच कारणाने मधुमेहामध्ये ‘हार्ट अ‍ॅटॅक’ येतो किंवा पॅरालिसीस होतो. त्यातून माणसाच्या जगण्याची रयाच हरवून जाते. मूत्रपिंड, डोळे या अवयवांनासुद्धा याचा फटका बसतो.

या वर्णनावरून आपल्या लक्षात येईल की, मधुमेह आणि चरबी यांचा किती घनिष्ठ संबंध आहे ते. दुर्दैवाने मधुमेह म्हटलं की सर्वाचं लक्ष फक्त साखरेवर असतं. पण यातून खरा शत्रू मोकाट राहतो. मधुमेह नियंत्रणात आणणं म्हणजे साखरेसोबत चरबीकडेही तितकंच लक्ष पुरवायला हवं.

बरेचदा मधुमेह नियंत्रणात आणण्यासाठी कमी खा आणि खूप व्यायाम करा असं सांगितलं जातं. व्यायामाने साखर जळते असाही एक गोड गरसमज आहे. खरंतर मधुमेहामध्ये साखर स्नायूंच्या आत पोहोचत नाही किंवा खूप कष्टाने पोहोचते. अशा वेळी जर सावकाश आणि माध्यम प्रतीचा व्यायाम न करता, धडाक्यात व्यायाम केला तर स्नायूंना पुरेशा वेगात साखर न मिळाल्याने स्नायू स्वत:च स्वत:ला जाळून उर्जा निर्माण करतात. म्हणजे थंडी घालवण्यासाठी जर मी शेकोटी पेटवली आणि इंधन म्हणून जर घरात शिरू न शकणारा ओंडका आणला, तर शेवटी घराचे वासे जाळून शेकोटी पेटती ठेवण्याचा प्रकार झाला हा. त्यामुळे मधुमेहामध्ये डाएट आणि व्यायाम हा काळजीपूर्वक ठरवावा लागतो.

‘टाइप टू’ हा प्रकार जरी मोठय़ा वयात होत असला तरी हल्ली मुलांचं खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यात चरबीयुक्त खाण्याचंही प्रमाण खूप वाढलं आहे. त्या उलट शारीरिक श्रम सोडाच; पण शरीराच्या हालचालीही फारशा होत नाहीत. त्यामुळे लहानलहान मुलांमध्ये स्थूलता आणि मधुमेह दिसून येऊ लागला आहे. त्यासाठी युद्धपातळीवर काही तरी करण्याची गरज आहे.

गेल्या वर्षी टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर ‘फूड बॉम्ब’ दाखवला होता. त्यात म्हटलं होतं की-अमेरिकेला स्वत:ची संपत्ती वाढवण्यासाठी आणि इतर देशांचं खच्चीकरण करण्यासाठी शस्त्र, युद्ध किंवा मुत्सद्देगिरीची गरज नाही. फक्त देशोदेशीच्या मुलामाणसांना जंक फूडचं वेड लावलं की काम झालं. पिढीच्या पिढी आळशी आणि ऐदी होईल. त्यांचं शरीर वेगवेगळ्या रोगांचं माहेरघर बनेल. यातच त्यांची सर्व शक्ती, वेळ आणि अर्थात पैसा हा स्वत:च्या रोगांशी सामना करण्यात फुकट जाईल. रोगी देशाला पुन्हा औषधं आणि इतर वैद्यकीय उपकरणं विकून पैसाही कमवता येईल. मुख्य म्हणजे ‘फूड बॉम्ब’मुळे रक्ताचा थेंबही न सांडता आणि युद्ध न करता इतर देशांना शरण यायला भाग पडता येईल. लेखकाने ‘हे मी विनोदाने म्हणतो आहे’, असं म्हटलं असलं तरी आपल्या आजूबाजूला वाढणारी स्थूलता नि मधुमेह पहिला आणि त्याची कारणं पहिली की, तो विनोद आपण किती गांभीर्याने घ्यायला हवा याची कल्पना येऊ शकेल.

या सर्वाशी सामना करण्यासाठी लागणारी ज्ञान आणि साधनं आपल्या देशात आहेतच. आजारावर योग्य सल्ला देऊ शकणारे तज्ज्ञही आहेत. मग आपण सुरुवात करू लढायला; या स्थूलतेशी आणि मधुमेहाशी!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version