Home मजेत मस्त तंदुरुस्त मधुमेहींच्या आहाराचं वेळापत्रक

मधुमेहींच्या आहाराचं वेळापत्रक

1

एकविसाव्या शतकातला फार झपाटय़ाने वाढणारा आजार म्हणजे ‘मधुमेह’! घरोघरी डायबेटिस आणि गल्लोगल्ली ‘डायबेटिस स्पेशालिस्ट’ अशी परिस्थिती लवकरच येईल. त्यासाठी आहाराचं नियोजन महत्त्वाचं आहे. रक्तातील साखरेचं प्रमाण आणि रुग्णाचा औषोधोपचार लक्षात घेऊनच मधुमेहींसाठी आहार ठरवावा लागतो.

मधुमेह म्हणजेच रक्तातील साखर मर्यादेबाहेर वाढण्याचा विकार. मधुमेहात रक्तशर्करा (ब्लडशुगर) वाढते खरी, पण ती शरीराच्या पेशींमध्ये नीट शिरू शकत नाही. अनियंत्रित साखरेचे दुष्परिणाम होतात. रुग्णाला तहान लागते. तो खा-खा सुटतो. लघवीही अधिक होते. थकवा अथवा चक्कर येऊ शकते.

अनेक वर्षे साखर अनियंत्रित राहिली तर पाय, मेंदू, हृदय, डोळे आणि मूत्रपिंड यांचे रोग उद्भवू शकतात. थोडक्यात रक्तातील साखरसम्राट होणं धोक्याचं आहे. या धोक्यापासून वाचवण्यासाठी एकच मार्ग आहे, आहार नियंत्रण किंवा संतुलित आहार.

मधुमेह हा रोग नसून ती एक कमतरता आहे. जी शरीराला एका विशिष्ट प्रकारच्या कार्बोदकाला वापरण्यापासून किंवा उपयोगात आणण्यापासून परावृत्त करते. आपल्या शरीरातील स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन नावाचं संप्रेरक (हार्मोन) तयार होत असतं. मात्र मधुमेही रुग्णांमध्ये इन्सुलीनची अपुरी आणि अपरिणामकारक मात्रा यामुळे रक्तातील साखरेच्या प्रमाणावरचं नियंत्रण नष्ट होतं.

मधुमेहाची कारणं
अनुवंशिकता, संप्रेरकांमध्ये होणारे बदल, स्थूलपणा, मानसिक ताण, कुठल्याही गंभीर रोगाची लागण.

मधुमेहाचे प्रकार

आयडीडीएम (इन्सुलीन डिपेंडंट डायबेटिक मेलिटस) : या प्रकारचा मधुमेह वेगाने वाढतो. तो गंभीर स्वरूपाचा तसंच अस्थिर असतो. कमी वजनाच्या बाळात या प्रकारचा मधुमेह दिसून येतो. नावावरूनच आपल्या लक्षात येईल की, या प्रकारचा मधुमेह आहारनियंत्रणासोबत इन्सुलीन घेतल्यावरच नियंत्रित होतो. परंतु इन्सुलीनचा डोस आणि प्रकार हा रुग्णांच्या रक्तातील साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असतो.

एनडीडीएम (नॉन इन्सुलीन डिपेंडंट डायबेटिक मेलिटस) : या प्रकारचा मधुमेह हळूहळू वाढतो. साधारणत: कमी तीव्रतेचा असतो. स्थिर असतो. जास्त वजन असलेल्या व्यक्तींमध्ये तो आढळतो. योग्य आहारनियंत्रण आणि सोबत व्यायाम केल्यास ब-याच वेळा हा मधुमेह नियंत्रित होऊ शकतो. उपचारपद्धती तीन भागांत विभागली जाते.

शरीराला पुरेशा प्रमाणात इन्सुलीन पुरवलं जावं, यासाठी आहारनियंत्रण + इन्सुलीन ओरल हायपोग्लॅयसेमिक गोळय़ा आणि आहारनियंत्रण.

साखर, गूळ, मध यातील सिम्पल कबरेदकांवर आहाराद्वारे नियंत्रण ठेवून जास्त प्रमाणात तयार होणा-या ग्लुकोजला आळा घालणं. आणि तेही आहारातून.

थोडक्यात आहारात कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स (कर्बोदकं) समावेश असावा. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स सर्व प्रकारच्या बीन्समधून जसं पापडी, घेवडा, चवळीच्या शेंगा, फरसबी, गवार इत्यादींतून मिळतात. तसंच काही तृणधान्यं, मोड आलेली कडधान्यं,अख्खे मसूर, राजमा, कुळीथ, माका, बार्ली, हरभरे, अख्खी फळं, पालेभाज्या यातूनही कॉम्प्लेक्स कार्बोदकं मिळतात. मधुमेही रुग्णांना हायपर ग्लॅसेमिया म्हणजेच रक्तातील साखरेचं प्रमाण आवश्यकतेपेक्षा कमी होणं आणि हायपरग्लॅसेमिया म्हणजे रक्तातील साखरेचं प्रमाण वाढणं हे टाळण्यासाठी ‘एक्स्चेंज लिस्ट’च्या आधारे आहार ठरवावा लागतो. एक फूड एक्स्चेंज म्हणजे जेवणातील अन्नपदार्थाचं १०० कॅलरीजमध्ये केलेलं वर्गीकरण.
उदा. सीरियल एक्स्चेंज – तृणधान्य : १०० कॅलरीज
यात ब्रेड – २ स्लाईज किंवा ४० ग्रॅम.
फुलके – २ मध्यम आकाराचे.
चपाती – दीड.
भाकरी – १ छोटी.
भात – १ मध्यम वाटीचा.
उपमा किंवा पोहे – १ वाटी.
इडली – २ नग.
मारी बिस्किट्स – ६ नग.
मोनॅको – ४ नग.
दिवसभरात हा आहार सकाळी ६ ते १२ मध्ये घ्यावा. परंतु तो सकाळी ६ ते १२ मध्ये किती घ्यावा हे प्रत्येक रुग्णाचं वय, वजन आणि साखरेच्या प्रमाणावर अवलंबून असतं. याप्रमाणे इतरही एक्स्चेंज आहार आहेत. जसं डाळी आणि कडधान्यं, दूध आणि दुधापासून बनवलेले पदार्थ, भाजी, फळं, मटण, मासे, अंडी, तेल इत्यादी मधुमेही पीडित रुग्णांनी आहारतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार स्वत:ची डायट लिस्ट बनवून घ्यावी.

ग्लायसेमिक इंडेक्स
हायपोग्लायसेमिक रुग्णांत रक्तांतील साखरेचं प्रमाण वाढण्यासाठी आणि हायपरग्लयसेमिक रुग्णांमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण, कमी करण्यासाठी काही अन्नपदार्थाची आवश्यकता असते. हे अन्नपदार्थ रक्तातील साखरेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवतात. असे अन्नपदार्थ म्हणजे ग्लायसेमिक इंडेक्स. प्रत्यक्षात ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे काबरेहायड्रेट्सची प्रतवारी मोजण्याचं परिमाण. ही प्रतवारी एक ते १०० या प्रमाणात मोजली जाते. जे कार्बोहायड्रेट रक्त प्रहावात अतिशय वेगाने संमिश्रित होतात, त्यांना १०० ग्लायसेमिक इंडेक्स ही प्रत दिली जाते. म्हणजेच हायग्लायसेमिक इंडेक्स. उदा. ग्लुकोज रक्तात लागलीच शोषलं जातं. म्हणून त्याचा ग्लायसेमिक इंडेक्स शंभर आहे. कमी किंवा मध्यम ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या कार्बोहायट्रेड्सयुक्त पदार्थ खाण्याने ब-याच काळापर्यंत पोट भरलेलं राहतं. असे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर राहतं. तसंच ते रक्तप्रवाहात हळूहळू संमिश्रित होतात. एकाच प्रकारच्या कार्बोहायड्रेट्सला त्याच्या शिजवण्याच्या प्रक्रियेनुसार वेगवेगळा ग्लायसेमिक इंडेक्स मिळतो. भाजलेल्या बटाटय़ाच्या ग्लायसेमिक इंडेक्स १३४, उकडलेल्या बटाटय़ाचा ८१ तर रताळ्याचा ७० आहे. म्हणजेच रताळय़ामुळे साखरेचं प्रमाण बटाटा खाल्ल्यापेक्षा कमी वाढतं. आख्या मसुरीचा ग्लायसेमिक इंडिक्स सर्वात कमी आहे. म्हणून मधुमेही रुग्णांनी तिचं सेवन करणं चांगलं.
तांदळात बासमती तांदळाचा कमी तर इतर साध्या तांदळाचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त आहे. म्हणून हल्ली जाहिरात करतात की, अमूक अमूक ब्रँडच्या तांदळाचा भात तुम्ही खाल्याने काही अपाय नाही. त्यामुळे तो तांदूळ आहे त्या दरापेक्षा चौपट-पाचपटीने विकतात. तर त्यामागे हे शास्त्रीय कारण आहे. याचा निष्कर्ष असा की, कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेले अन्नपदार्थ जे मधुमेहींनी खाणं चांगलं.

वाटाणा सोडून सर्व मोड आलेली कडधान्यं मधुमेहींनी खावीत. कारण मोड आणण्याच्या प्रक्रियेत ग्लायसेमिक इंडेक्स कमी होतो. तृणधान्यांत बाली, नाचणी ही मधुमेहींसाठी चांगली. फळांत सफरचंद, पीच, चेरी, आलुबुखार, नासपती खाण्यास हरकत नाही. भाज्यांत पालक, कांदापात, मशरुम, ब्रोकोली, टोमॅटो खावे. अर्धवट विरजलेलं दही म्हणजे योगर्टही मधुमेहींच्या आरोग्यासाठी उत्तम मानलं जातं.

1 COMMENT

  1. माधुमेहीसाठी वरीच तांदूळ उपयुक्त आहे का??
    कृपया उत्तर माझ्या मोबाईल नं ९७३०९६१२८३ वर करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version