Home संपादकीय अग्रलेख ‘मनु’चे बाप..!

‘मनु’चे बाप..!

1

नागपुरात ११ एप्रिल रोजी झालेली सभा प्रचंड होती. लोक काँग्रेससोबत आहेत आणि काँग्रेससोबत राहतील, याची तळपत्या उन्हात लोकांनी ग्वाही दिली.

७ डिसेंबर २०१५ रोजी नागपूर विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाने शेतक-यांच्या प्रश्नावर आयोजित केलेल्या महाप्रचंड मोर्चाने भाजपाच्या पायाखालची जमीन हादरून गेली होती. त्यानंतर चार महिन्यांत पुन्हा एकदा संघाच्या बालेकिल्ल्यात घुसून काँग्रेसने केवळ राजकीय शक्तिप्रदर्शन केले नाही तर पुरोगामी विचारांचे प्रदर्शन केले. या देशाच्या सर्वधर्मसमभावाच्या संकल्पनेला कुणी धक्का लावणार असेल तर काँग्रेस ते करू देणार नाही, हा महत्त्वाचा विचारही काँग्रेसच्या कालच्या सभेने व्यक्त केला.

वृत्तपत्रांनी अशी हवा तयार केली होती की, विदर्भाच्या कडक उन्हात सभेला लोक येणार नाहीत. शिवाय हा संघाचा बालेकिल्ला आहे. राजकीय परिस्थिती काळानुरूप बदलत असते. पण विदर्भ हा संघाचा बालेकिल्ला कधीच नव्हता आणि नाही. १९६९ साली इंदिरा गांधींनी काँग्रेस पक्षाचा वेगळा कार्यक्रम आणि धोरण जाहीर केले. तेव्हा इंदिराजींना पहिली साथ विदर्भाने दिली.

१९७७ साली आताच्या मोदी लाटेसारखी ‘जनता लाट’ आली होती. त्यात इंदिरा गांधी यांचा पराभव झाला होता. संजय गांधींचा पराभव झाला होता. अवघ्या दोन – अडीच वर्षात पुन्हा एकदा चित्र बदलले आणि विदर्भातील विधानसभेच्या ६६ जागांपैकी ६४ जागा इंदिरा काँग्रेसने जिंकल्या. लोकसभेच्या जागांपैकी नागपूर शहर (जांबुवंतराव धोटे), भंडारा (केशवराव पारधी), चिमूर (विलास मुत्तेमवार), चंद्रपूर (शांताराम पोटदुखे), वर्धा (वसंत साठे), अमरावती (उषा प्रकाश चौधरी), यवतमाळ (सदाशिवराव ठाकरे) अशा विदर्भातील लोकसभेच्या सर्व जागा काँग्रेस पक्षानेच जिंकलेल्या होत्या. २२ महिन्यांपूर्वी जरी मोदी लाट आली तरी आता ती लाट पूर्ण ओसरली आहे. विदर्भात अजून इंदिरा गांधींची सावली वावरते आहे. ११ तारखेच्या सभेने दाखवून दिले की, पुन्हा एकदा सर्वधर्मसमभावाच्या बाजूने विदर्भातील जनता ठाम आहे.

त्या सभेतील राहुल गांधी यांचे भाषण जबरदस्त झाले. घसा साथ देत नसतानाही सोनिया गांधींनीही अतिशय तळमळीने भाषण केले. या देशाशी त्या इतक्या एकरूप झाल्या आहेत की, त्यांच्यावरील सर्व आक्षेप फोल ठरले आहेत. राहुल गांधींनी ज्या ‘मनुवादा’चा उल्लेख केला तो ‘मनु’ ज्या काळात होता, त्याने जो चातुर्वण्र्य निर्माण केला आणि तो निर्माण करताना ‘गुण, कर्म विभागश:’ हे सूत्र त्यांनी सांगितले. तिथून देशात ‘मनुवाद’ रुजला. कारण उच्चवर्णीयांना तो सोयीचा होता. त्या काळातही ‘मनुवादा’ला विरोध झालेला आहे.

गुणवत्तेनुसार माणसाच्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचे तत्त्व ‘मनु’ने नाकारले. पण ते काळाने स्वीकारले. जाती-पाती रुजवल्या, त्या समाजातील त्यावेळच्या मूठभर लोकांनी. आताचे भाजपाचे सरकार नुसतेच ‘मनुवादी’ नाही तर ‘मनु’चा बाप आहे. ‘मनु’ने काही जणांना व्यापार करायला सांगितला, काही जणांच्या हातात तलवार दिली. काही जणांच्या गळय़ात जानवे घातले आणि काही जणांच्या हातात स्वच्छतेचा झाडू दिला. ही ‘मनु’ची विभागणी होती. आता त्याचे बाप जे सत्तेत बसलेले आहेत, त्यांना ही व्यवस्था राबवतानासुद्धा या व्यवस्थेत संघाचा कोण, भाजपाचा कट्टर कोण, उच्चवर्णीय कोण, याची तपासणी करूनच ते नेमणुका करत आहेत. म्हणून उच्चवर्णीय भागवत आरक्षणाच्या विरोधात बोलले. ते ‘मनु’च्या बापाच्या थाटात बोलले आहेत. पण ते अंगाशी आल्यानंतर त्यांना सारवासारव करावी लागली आहे. ही ‘मनु’व्यवस्था संघ, जनसंघ आणि भाजपा यांनी जाणीवपूर्वक जपली. त्यामुळेच १९२५ साली स्थापन झालेल्या संघाचा सरसंघचालक आजपर्यंत तरी दलित होऊ शकला नाही. या पक्षाने ‘मनुवाद’ इतक्या पद्धतशीरपणे जपलेला आहे की, आज सत्ता हातात आल्यानंतर सर्व महत्त्वाच्या जागांच्या नेमणुका या ‘मनुवादी’ विचारातून होत आहेत आणि या प्रवृत्तीला विरोध करणारे कोणी असोत, त्यांचा पानसरे करण्याची यांची तयारी आहे. जे विरोध करतील त्यांच्यावर हल्ला करायचा, मारझोड करायची. कारण विचारांची लढाई लढण्याची भाजपावाल्यांची कुवत नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना कधी जवळचे होते? तर कधीच नव्हते.. पण मतांच्या राजकारणात आता ही मंडळी बाबासाहेबांची प्रशंसक बनली. राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात अतिशय परखडपणे हा मुद्दा मांडला.

आजच्या समाजव्यवस्थेत दोनच पक्ष आहेत. एक पक्ष ‘मनुवादा’चा आणि दुसरा पक्ष ‘मनुवादा’ला विरोध करणारा. या देशातील कट्टर संघीय, जुने जनसंघीय, इकडून तिकडून घुसलेले भाजपावाले हे सगळे ‘मनुवादा’चे प्रवर्तक आहेत. त्याला विरोध करण्यासाठी देशातील जे पुरोगामी प्रतीक असलेले पक्ष आहेत, त्यात कम्युनिस्ट आहेत, सगळय़ा समाजवादी विचारधारा आहेत आणि मुख्य म्हणजे तगडा काँग्रेस पक्ष आहे. आताच्या घडीला या देशावरील सर्वात मोठे संकट ‘मनुवादी’ भाजपा आहे. जे वरून ११ लाखांचा कोट घालतात आणि आतून ‘मनुवादा’ची घोंगडी यांनी पांघरलेली आहे. त्या प्रवृत्तीविरुद्ध देशातील सगळय़ा पुरोगामी विचारांनी हल्लाबोल करण्याची, कधी नव्हे एवढी, निकड आता आज या तारखेला आहे. राहुल गांधी यांनी जो दुसरा पक्ष सांगितला तो संविधानाला, लोकशाहीला मानणारा, विविध जातीधर्माना एकत्र घेऊन चालणारा, हा दुसरा पक्ष आहे.

संकुचित, जातीय आणि धर्मीय विचार करणारे जिथे साक्षात प्रभू रामचंद्राला फसवायला कमी करत नाहीत. त्याचे मंदिर बांधतो, म्हणून सांगत त्यालाही यांनी फसवले. देवाची पर्वा न करणारे माणसांची पर्वा काय करणार?.. ‘मनु’ काळाबरोबरच संपला. पण त्याचे बाप आज जिवंत आहेत. आणि समोरचा शत्रू परवडला पण हे छुपे कारस्थानी आणि देशाचे संविधान तोडू पाहणारे शत्रू हिंदुराष्ट्राचा उद्घोष करतील. संघाच्या प्रार्थनेमध्येच दुसरी ओळ अशी आहे की.. ‘त्वया ‘हिंदू’ भूमे सुखम् वर्धितो अहम्..’ तेव्हा हिंदू राष्ट्र ही संकल्पना संविधान नष्ट करणारीच आहे. ज्या डॉ. बाबासाहेबांच्या १२५व्या जयंतीनिमित्ताने हा सोहळा नागपुरात काँग्रेसने आयोजित केला, त्या बाबासाहेबांच्या घटनेची तोडफोड करणे, हाच भाजपावाल्यांचा मोठा कार्यक्रम आहे.

बाबासाहेबांनी जे जे सांगितले आहे ते यांना कधीही पटणारे नाही. परंतु नाईलाजासाठी ही भाजपाची मंडळी चैत्यभूमीवर जातील, दीक्षा भूमीवर जातील, माथा टेकतील, फोटो काढतील, तो छापून आणतील (आणि खासगीत बोलताना बाबासाहेबांच्या अनुयायांना जयभीमवाले म्हणतील). बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितले होते की, ‘राजकीय लोकशाहीतून सामाजिक लोकशाही निर्माण करण्यासाठी झटले पाहिजे..’ सामाजिक लोकशाही म्हणजे काय? सामाजिक लोकशाही म्हणजे स्वातंत्र्य, समता आणि बंधुता.. यातील प्रत्येक गोष्ट वेगवेगळी नाही तर एकत्र आहे.

स्वातंत्र असेल तर समता असलीच पाहिजे आणि समता असेल तर बंधुत्व निर्माण झालेच पाहिजे. समतेपासून स्वातंत्र्याला अलग करता येत नाही आणि स्वातंत्र्यापासून समतेला अलग करता येणार नाही. हा बाबासाहेबांचा विचार म्हणजेच ‘मनुवादा’ला विरोध. सामाजिक विषमता राहिली, जाती जातीत भेद राहिला, उच्च-नीच कल्पना राहिल्या, ‘मनु’नी ज्यांच्या हातात झाडू दिला त्यांच्यात बुद्धिमत्ता आणि गुण असेल (आणि आहेही). त्याला संधी न देणे हा ‘मनुवाद’ झाला. आणि अशी ही जातीय व्यवस्था ठोकरून समाजातील सगळय़ा घटकांना त्यांच्या त्यांच्या गुणवत्तेप्रमाणे, व्यक्तीचा आणि समष्टीचा विकास करण्याचे स्वातंत्र जिथे अधोरेखित होते त्याचे नाव ‘मनुवादा’चा विरोध. राहुल गांधी म्हणाले, त्याप्रमाणे आजचे संघवाले, आजचे भाजपावाले आणि ५६ इंच छातीवाले हे सगळे ‘मनुवादी’ एका पारडय़ात बसलेले आहेत. त्याला विरोध करण्याकरिता सर्वधर्मसमभाव जपणारी, जात-पात न बघता समान संधीचा विचार करणारी आणि देवाधर्माला राजकारणात न आणणारी विचारधारा हे ‘मनुवादा’चे खरे विरोधक आहेत. एकवेळ त्यावेळच्या ‘मनु’विरुद्धची लढाई कदाचित सोपी असेल.. पण ‘मनुचे बाप’ असलेल्या या लोकांविरुद्धची लढाई अवघड आहे. कारण त्यांना सत्तेचा माज आहे. आम्ही काही करू शकतो या भ्रमात ते आहेत. हाणा, मारा ठोका या भूमिकेत ते आहेत. लोकशाही आणि संविधान याचे त्यांना काही पडलेले नाही. त्यामुळे ११ तारखेला नागपुरात कस्तुरचंद पार्कवर जी सभा झाली ती सभा एकटय़ा काँग्रेस पक्षाची नव्हती. या देशात जे जे पुरोगामी आहेत, त्या प्रत्येकाची ती सभा होती.

प्रतिनिधित्व काँग्रेसने केले असेल, सोनियाजी किंवा राहुल प्रतिमात्मक बोलले असतील. पण या देशाच्या काना-कोप-यात सर्वधर्मसमभावाचा आणि समतेचा झेंडा घेऊन लढणारे जेवढे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाची भावना राहुल गांधींच्या मुखातून काल व्यक्त झाली आणि म्हणून पुढची लढाई ‘मनुचे बाप’विरुद्ध संविधानाचे ‘पुरोगामी सुपुत्र’ यांच्यात लढली जाणार आहे. त्या लढाईत २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत ‘मनुच्या बापा’चा पराभव करण्याची जबाबदारी या पुरोगामी सुपुत्रांवर आहे.

1 COMMENT

  1. एकदम कडक सभा झाली असाच कार्यक्रम सुरु राहिला पाहिजे तेव्हाच २०१९ ची लोकसभा मनु वाद्यांच्या तावडीतून सुटेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version