Home महामुंबई महापालिका रुग्णालयातील अ‍ॅनेस्थेशिया मशीन चीनचे

महापालिका रुग्णालयातील अ‍ॅनेस्थेशिया मशीन चीनचे

0

मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये भूल देण्याचे यंत्र (इंटिग्रेटेड अ‍ॅनेस्थेशिया मशीन) खरेदी करताना महापालिकेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या विविध रुग्णालयांमध्ये भूल देण्याचे यंत्र (इंटिग्रेटेड अ‍ॅनेस्थेशिया मशीन) खरेदी करताना महापालिकेची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

खरेदी करण्यात येणा-या ५१ मशीन यु. के. येथून वितरीत करण्यात येतील, असे निविदा अटींमध्ये स्पष्ट करताना युनिव्हर्सल ऑरगॅनिक कंत्राटदार कंपनीने ३१ मशीन चीनमधून आणून महापालिकेला वितरीत केल्या आहेत.

याशिवाय एअर इंडियासह, जकातच्या पावत्या बोगस लावून महापालिकेला यु.के.तून आणल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसचे नगरसेवक प्रवीण छेडा यांनी कंत्राटदरांचे बिंग फोडत महापालिकेची झालेली फसवणूक स्थायी समितीच्या लक्षात आणून देत जोगेश्वरीतील बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर सेंटरमध्ये यातील ६ मशीन असल्याची माहिती दिली. त्यानंतर अध्यक्षांनीही या सर्व प्रकरणांची त्वरित चौकशी करून सात दिवसांमध्ये अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

महापालिकेच्या विविध रुग्णालयांकरता इंटिग्रेटेड अ‍ॅनेस्थेशिया मशीन-अ‍ॅनेस्थेशिया वर्कस्टेशन या ५१ मशीन खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला होता. त्यामुळे या मशीनच्या खरेदीअंतर्गत पुरवठा व उभारणी करण्याचे ६ कोटी ४२ लाख ६० रुपयांचे कंत्राट देण्यात आले होते. यामध्ये ३ वर्षाचा हमी कालावधी आणि अधिक ५ वर्षाची देखभाल करण्याचे कंत्राट दिले होते. या कंत्राटातील अटींनुसार सर्व मशीन यु.के.मधील असतील, असे नमुद करण्यात आले होते. प्रत्यक्षात यातील केवळ २० मशीन यु. के.मधून आणल्या आहेत.

उर्वरित ३१ मशीनचा पुरवठा चीनमधून करण्यात आला होता. या मशीनचा पुरवठा करताना कंपनीने बोगस कागदपत्रे आणि पावत्या सादर करत महापालिकेची निव्वळ फसवणूक केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवीण छेडा यांनी हरकतीच्या मुद्दय़ाद्वारे केला. या प्रकरणाबाबत मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाने चौकशी केली असताना यामध्ये संबंधित कंत्राट कंपनीने महापालिकेची फसवणूक केल्याचे म्हणत त्यांना काळ्या यादीत टाकण्याची शिफारस केली आहे.

याशिवाय त्यांची अनामत रक्कमही जप्त करण्यात यावी, अशीही शिफारस केली आहे. परंतु याच महापालिकेच्या ‘टावो’ने केलेल्या चौकशीत या कंपनीला वाचवण्याचे काम केले असून यामागे अतिरिक्त आयुक्तांचाही सहभाग असल्याचा आरोप छेडा यांनी केला. त्यामुळे या प्रकरणाची आयुक्तांच्या स्तरावर चौकशी केली जावी आणि या विरोधात पोलीस आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करावी, अशी मागणी त्यांनी केली.

भाजपाचे मनोज कोटक यांनीही या हरकतीच्या मुद्दय़ाला समर्थन देत भूल देण्याच्या यंत्राऐवजी कंत्राटदाराने महापालिकेला भूलथापा मारण्याचे काम केले असल्याचा आरोप केला. त्यामुळे याची चौकशी केली जावी आणि जे अतिरिक्त आयुक्त या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांचीही चौकशी करून त्यांच्यावरही कारवाई केली जावी, अशी सूचना कोटक यांनी केली.

मध्यवर्ती खरेदी प्राधिकरण हे भ्रष्टाचाराचे आगार बनले असून मुळात हा विभागच बंद करा, अशी सूचना सपाचे रईस शेख यांनी केली. ज्यावेळी सव्वाचार कोटींचे एमआरआय मशीन सव्वा कोटींना खरेदी करण्यात आले, तेव्हाच आपण याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार आपण संबंधित विभागाकडे पत्रव्यवहार करून त्याची कागदपत्रेही मागवून घेतली होती. त्यामुळे या कंत्राटदाराने चायनामेड मशीन देत निव्वळ फसवणूक केल्याचे दिसून आले होते.

परंतु पत्रव्यवहारानंतरही यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही. ‘टावो’ आणि मध्यवर्ती खरेदी प्राधिकरणाच्या चौकशी अहवालाचे विश्लेषण करून त्यातील निष्कर्षाच्या आधारे कारवाई केली जावी, अशी मागणी त्यांनी केली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version