Home महाराष्ट्र कोकण महाराष्ट्रात ‘सिंधुदुर्ग’ विकासाचे मॉडेल!

महाराष्ट्रात ‘सिंधुदुर्ग’ विकासाचे मॉडेल!

1

विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही, व्यक्तिगत द्वेष आणि आकस हेच त्यांच्या निवडणुकीतील प्रचाराचे भांडवल आहे, असा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केला.

कणकवली- काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार डॉ. निलेश राणे यांच्या विजयाने निवडणूक एकतर्फी होणार आहे. शिवसेनेच्या उमेदवाराचे डिपॉझिट या निवडणुकीत जप्त होणार आहे. प्रत्येक धर्माचा, जातीचा आणि सर्वच राजकीय पक्षांच्या व्यक्ती डॉ. निलेश राणे यांनाच मतदान करणार आहेत. कारण, डॉ. निलेश राणे निवडून यावेत ही कोकणची खरी गरज आहे. कोकणी माणसाला विकासासाठी काँग्रेस पक्षच या ठिकाणी आवश्यक आहे. आम्ही विकासाच्या मुद्दय़ावर ही निवडणूक लढवत आहोत. येथील जनतेच्या जीवनामध्ये परिवर्तन करण्याचे काम आम्ही करत आहोत.

महाराष्ट्रात ‘सिंधुदुर्ग’ जिल्हा विकासाचे मॉडेल म्हणून सर्वासमोर आहे. हे यश म्हणजे विकास नाही काय? विरोधकांकडे कोणताही विकासाचा मुद्दा नाही, व्यक्तिगत द्वेष आणि आकस हेच त्यांच्या निवडणुकीतील प्रचाराचे भांडवल आहे, असा आरोप उद्योगमंत्री नारायण राणे यांनी केले.

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन सिंधुदुर्ग जिल्हय़ातील पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी काँग्रेसचे उमेदवार खा. डॉ. निलेश राणे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजन तेली, काका कुडाळकर, सुनील निरवडेकर आदी उपस्थित होते.

विरोधकांना जनताच उत्तर देईल

विरोधकांना आम्ही उत्तर देण्याची गरज नाही. या दोन्ही जिल्हय़ात कोणता विकास केला आणि किती कामे केली हे जनतेला ज्ञात आहे. या ठिकाणच्या मतदारांनाही कामे दिसताहेत त्यामुळे मतपेटीतून जनताच त्यांना उत्तर देईल. दोन्ही जिल्हय़ातील रस्ते, महामार्ग यापूर्वी कोणत्या स्थितीत होते आणि गेल्या २५ वर्षात त्यांची बदललेली स्थिती सर्वज्ञात आहे. राज्यात कुठेही नसेल असे दर्जेदार काम या ठिकाणी झालेले आहे.

महत्त्वाचे असे ४० पूल पूर्ण करून तालुके, गावे, शाळा, रुग्णालये जोडली. शेकडो साकव बांधले गेले. आरोग्यासाठी सुसज्ज अशी हॉस्पिटलं उभारली गेली. ७०० पेक्षा जास्त खाटांची व्यवस्था असलेली रुग्णालये उभी झाली. खा. डॉ. निलेश राणे यांच्या स्वत:च्या फंडातून १०० खाटांचे हॉस्पिटल ओरोस येथे उभे झाले. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग हे महाराष्ट्रातील विकासाचे मॉडेल म्हणून पाहिले जात आहे. या ठिकाणच्या रुग्णालयांमधील स्वच्छता आणि सामाजिक पातळीवर झालेला विकास सर्वानाच महत्त्वपूर्ण वाटू लागला आहे.

जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्यात इंग्लिश मीडियम शाळा, आयटीआय, मालवणला पॉलिटेक्निक, कुडाळला हॉर्टिकल्चर, कणकवलीला डेअरी कॉलेज, कृषी कॉलेज आणि इंजिनीअरिंग कॉलेज, कसाल येथे होणारे मेडिकल कॉलेज, डॉन बॉस्को, उर्सुला इंग्लिश मीडियम स्कूल असे शैक्षणिक जाळे मी गेल्या २४ वर्षात विणले. विरोधकांनी यातील एक तरी गोष्ट केली का? असा सवाल त्यांनी केला.

कोकणाच्या विकासासाठी विरोधकांचा काय अभ्यास आहे? कोणत्या योजना त्यांनी आजपर्यंत आखल्या आहेत का? बागायतदार, मच्छीमार यांचे प्रश्न त्यांना ज्ञात आहेत का? असा सवाल करताना आम्ही आंबा, काजू बोर्ड स्थापन केला. बागायतदारांना अधिकचे पैसे मिळावे म्हणून आमचे प्रयत्न चालू आहेत आणि म्हणूनच वेंगुर्ले आणि कुडाळ येथे हॉर्टिकल्चर कॉलेज सुरू केले. दरडोई उत्पन्न काय? स्थूल उत्पन्न काय? याचा अभ्यास विरोधकांना नाही. आणि म्हणूनच विकासाचे मॉडेल असलेला सिंधुदुर्ग सांगली आणि साता-याशी स्पर्धा करतो आहे. आर्थिकदृष्टय़ा प्रगत होतो आहे.

एक हजार रुपयाने सांगलीपेक्षा पुढे दरडोई उत्पन्नात आपण आहोत. जमिनीचे भाव ४० लाखांपर्यंत गेले, रत्नागिरीत एकरी जमिनीचे भाव वाढले. याला कारण हे जिल्हे विकसित आहेत म्हणून. हे काम शिवसेनेला दिसणार नाही. कारण राजकारणाची कावीळ त्यांना झालेली आहे, असा आरोपही उद्योगमंत्र्यांनी केला.

महामार्ग चौपदरीकरणाचे वाढीव काम पूर्णत्वास नेले

मुंबई गोवा महामार्ग चौपदरीकरणाचा प्रश्न आपण सातत्याने पाठपुरावा करून मंजूर करून घेतला. यामुळे चौपदरीकरणाचा मुद्दा आता पूर्णत्वास गेलेला आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन कोकणातील दळणवळणाची व्यवस्था दर्जेदार होईल. कोकण रेल्वेचा आणखी एक ट्रॅक वाढावा यासाठी आपण मागणी केली होती. रेल्वे संचालकांबरोबर डबल ट्रॅक संदर्भात बैठक झालेली आहे. हा प्रश्नसुद्धा लवकरच मार्गी निघेल आणि कोकणात एकाच वेळी दोन रेल्वेगाड्या धावतील.

विकासात्मक जे जे मुद्दे आपण पुढे आणले आणि सोडविले, हे रत्नागिरी, सिंधुदुर्गमधील जनतेला ज्ञात आहेत. कोकणात जोडधंदे यावेत, यासाठी मी प्रयत्न केले. या सर्व कामांचे श्रेय म्हणून येथील जनता आपल्याला निवडून देईल असा विश्वास खासदार डॉ. निलेश राणे यांनी व्यक्त केला.

खा. डॉ. निलेश राणे उमेदवारी अर्ज २५ मार्च रोजी भरणार

काँग्रेसचे रत्नागिरी-सिंधुदुर्गचे उमेदवार खा. डॉ. निलेश राणे हे आपल्या लोकसभेचा उमेदवारी अर्ज २५ मार्च रोजी भरणार आहेत. या निवडणुकीसाठी काँग्रेसची पूर्ण तयारी यापूर्वीच झालेली आहे. प्रचार सुरू करण्याची गरज फारशी काँग्रेसला भासत नाही. कारण विकास, जनसेवा आणि जनकल्याण हे गेल्या २५ वर्षात मी, खासदार डॉ. निलेश राणे, नितेश राणे, सतीश सावंत, राजन तेली व माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी सातत्याने सुरू ठेवले आहे.

त्यामुळे विकासकामांतून फार मोठ्या प्रमाणात प्रचार झालेला आहे. उमेदवाराचा प्रचार आणखी काही दिवसांनी सुरू होईल. मात्र, जनतेला प्रचाराची गरज भासणार नाही. ते स्वत:हून काँग्रेसचे डॉ. निलेश राणे यांना मतदान करतील. कोकणात विकासासाठी परिवर्तन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. तो येथील जनतेच्या डोळय़ासमोर आहे. आमचे काम या जनतेला ज्ञात असल्यामुळे ती आम्हालाच मतदान करेल, याचा मला विश्वास असल्याचे उद्योगमंत्री राणे यांनी सांगितले.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version