Home विदेश महिला पत्रकारांचेही मोठ्या प्रमाणात शोषण

महिला पत्रकारांचेही मोठ्या प्रमाणात शोषण

0

प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातच काम करणा-या जवळपास दोन तृतीयांश महिलांना शोषणाला, छळाला किंवा धमक्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे. 
विविध कार्यालयांमध्ये काम करणा-या महिलांचा छळ होत असल्याच्या बातम्या अनेकदा वृत्तपत्र व वृत्तवाहिन्यांमध्ये येत असतात. पण या प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रातच काम करणा-या जवळपास दोन तृतीयांश महिलांना शोषणाला, छळाला किंवा धमक्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे दिसून आले आहे. प्रसारमाध्यमांच्या क्षेत्रात काम करणा-या महिलांवर होणा-या अत्याचाराबाबत करण्यात आलेल्या एका जागतिक सर्वेक्षणातून ही बाब उघड झाली आहे.

वॉशिंग्टनस्थित इंटरनॅशनल वुमन्स मीडिया फाउंडेशन (आयडब्ल्यूएमएफ) आणि लंडनस्थित इंटरनॅशनल न्यूज सेफ्टी इन्स्टिट्यूटतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत ८२२ महिलांची मुलाखत घेण्यात आली. या मुलाखतीत ६४.६८ टक्के म्हणजे दोन तृतीयांश महिलांनी त्यांना पुरुष वरिष्ठांकडून तसेच सहकारी कर्मचा-यांकडून धमकी, धाक, दहशत व महिलांकडे बघून टोमणे मारणे यांसारख्या घटनांना सामोरे जावे लागत असल्याचे दिसून आले, अशी माहिती आयडब्ल्यूएमएफच्या कार्यकारी संचालक एलिसा लीस मुनोज यांनी दिली. यातील धक्कादायक बाब म्हणजे ज्या महिलांनी या सर्वेक्षणात भाग घेतला होता त्यापैकी निम्म्याहून अधिक महिलांनी त्यांना या ना त्या प्रकारे शोषणाचे अनुभव येत असल्याचे सांगितले होते.

मात्र, तरीही त्यातील अनेक महिलांनी त्यांचा वरिष्ठ अधिका-यांकडून छळ होत असल्याची कल्पना असूनही त्या प्रकाराची तक्रार कुठेही केली नव्हती.

या सर्वेक्षणात ८२ टक्के वार्ताहर होत्या व त्यापैकी ४९ टक्के वृत्तपत्रामध्ये काम करणाऱ्या महिला, नियतकालिकांमधील २४ टक्के, टीव्ही वाहिन्यांवरील २१ टक्के आणि १६ टक्के रेडियोवर काम करणाऱ्या महिलांचा समावेश होता. तसेच या महिलांमध्ये २९ टक्के महिला या आशिया आणि पॅसिफिक, २१ टक्के उत्तर अमेरिका, १९ टक्के युरोप, १३ टक्के आफ्रिका आणि पाच टक्के अरब राष्ट्रांमधील महिलांचा समावेश होता. या सर्वेक्षणाला युनेस्कोचे सहकार्य लाभले होते तर ऑस्ट्रेलिया सरकारकडून आर्थिक निधी पुरवण्यात आला होता.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version