Home मध्यंतर सुखदा महिला बचत गट.. एक संधी

महिला बचत गट.. एक संधी

1
संग्रहित छायाचित्र

प्रत्येक वेळी नशीब मदत करेल अशा गैरसमजात न राहता स्त्रियांनी आर्थिक सक्षमीकरणासाठी संधी शोधणे आवश्यक आहे. गावागावांतील बचत गट हे महिलांना आर्थिकदृष्टया सबल बनवण्यासाठी उत्तम संधी आहेत. रोजगार आणि आत्मसन्मान या दोन्ही चांगल्या गोष्टी बचत गटाच्या माध्यमातून एखादी स्त्री कमावू शकते. संघभावनाही यातून जोपासली जाऊ शकते.

महिला बचत गट ही केवळ कागदावरील शासकीय योजना नसून महिला सबलीकरण, सक्षमीकरण आणि सशक्तीकरणाची एक सुप्त क्रांतिकारी चळवळ आहे. महिला बचत गटामुळे कित्येक स्त्रियांना आत्मसन्मान मिळाला आहे. भारतात १९९२च्या दरम्यान बचत गटाच्या चळवळीला खरा वेग आला. बचत गटांमुळे महिलांमध्ये संघटनशक्ती, स्वविकास व सामाजिक विकासाची जाणीव निर्माण झाली.

बांगलादेशात नोबेल पुरस्कार विजेते व बचत गटांच्या चळवळीचे जनक डॉ. महंमद युनूस यांनी राबविलेल्या बचत गटाच्या प्रयोगाला बांगलादेशात अभूतपूर्व यश मिळाले. महिलांमध्ये बचत गटाच्या माध्यमातून कमालीचा आत्मविश्वास निर्माण झाला. या यशातून प्रेरणा घेऊन भारतानेही बचत गटांच्या माध्यमातून लघुत्तम उद्योगांना चालना देण्यास सुरुवात केली.

बचत गट म्हणजे केवळ पैशांची बचत करणे एवढेच बचत गटाचे उद्दिष्ट नसून त्यांच्या हातांना काम मिळवून देणे आणि स्वमिळकतीतील आत्मसन्मान मिळवून देणे हे आहे.

बचत गटांच्या स्थापनांमुळे बचतीच्या सवयीबरोबरच स्वयंरोजगार करण्याची प्रेरणा महिलांना मिळाली आहे. चूल आणि मूल इतकेच विश्व असणा-या महिला आज बचत गटाच्या माध्यमातून बाह्य जगाच्या संपर्कात आल्या आहेत.

आज महिलांनी अनेक उद्योग-व्यवसाय बचत गटाच्या माध्यमातून उभारले आहेत व त्यांनी तयार केलेल्या उत्पादनाला बाजारपेठ मिळावी म्हणून शासनही प्रयत्नशील आहे. महिलांमध्ये असणारे संवादकौशल्य, वेळेचे नियोजन, अर्थकारणाची सांगड, जबाबदारीची जाणीव, जोखीम स्वीकारण्याची वृत्ती, परिस्थिती हाताळण्याची कला, त्यामध्ये यशस्वी होण्याची क्षमता, नेतृत्व गुण, कामातील नीटसपणा, चोख व्यवहार या उपजत उद्योजकीय गुणांचा वापर करून बचत गटातील महिला उद्योग क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध करू शकतात; परंतु आम्ही गृहिणी उद्योगिनी बनणे कसे काय शक्य आहे, असा हा प्रयत्न करण्याआधीच भीतीचा गोळा आपल्या पोटात उभा राहतो आणि या भीतीनेच ब-याचशा महिलांच्या आकोंक्षा सुरुवात करण्याआधीच चुरडल्या जातात.

महिला बचत गटांची स्थापना हा महिलांच्या सक्षमीकरणाच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे केवळ बचत करणे व कर्ज वाटणे एवढयापुरतीच बचत गटांच्या कार्याची व्याप्ती नाही, त्यामुळे बचत गटांच्या माध्यमातून विविध सामाजिक प्रश्न, विषय याबाबत चर्चा होणे आवश्यक आहे व त्यासाठी बचत गटामार्फत सामूहिकपणे काही कृती करता येईल काय, याचाही विचार झाला पाहिजे.

महिला बचत गटांच्या माध्यमातून काही तत्त्वांची जोपासनाही महिलांनी केली पाहिजे.उदा. – बचत गटाचा व्यवहार प्रामाणिकपणे व लोकशाही तत्त्वावर आधारित चालवणे. गटामध्ये सर्व महिलांनी सक्रिय सहभाग घेणे. (वेळेवर सभा घेणे, सभेत विषय मांडणे, त्यावर चर्चा करणे, इतिवृत्तांत लिहिणे, हिशेबाच्या वह्या व्यवस्थित ठेवणे, गटांच्या निर्णयाचे मनापासून पालन करणे.

कोणत्याही बचत गटाच्या सक्षमतेचे लक्षण म्हणजे त्यांची नियमितता. सभासदांची शंभर टक्के उपस्थिती व बैठकीच्या कामकाजातील सक्रिय सहभाग हे गटाच्या कार्यक्षमतेच्या दृष्टीने आवश्यक असते. सामुदायिक पातळीवरील चर्चा व लोकशाही पद्धतीने घेतलेले निर्णय यामुळे बचत गटाच्या कार्याला अधिक बळ प्राप्त होऊ शकेल. हिशेबाच्या वह्या व सभासदांची पासबुके यातील नोंदी बैठकीत सर्व सभासदांसमोर कराव्यात. यातून गटाचे व्यवहार पारदर्शक राहण्यास मदत होऊन परस्परांवरील विश्वास अबाधित करण्यास पूरक ठरेल. बचत गटाची सभा ही आपल्यातील सुप्त नेतृत्व गुण विकसित करण्यासाठीची मोठी संधी आहे, असे मानून प्रत्येक सभासदाने बैठकीची पूर्वतयारी, विषय पत्रिका लिहिणे, पासबुक भरणे, सभेचे संचालन करणे, बँकेचे व्यवहार पाहणे हे केले पाहिजे.

नशिबालाही संधीची गरज असते. अशी ही संधी माणसाच्या आयुष्यात अधूनमधून डोकावते. महिला बचत गटाच्या स्वरूपात मिळालेल्या या संधीचा फायदा करून घेऊन महिलांनी आपला विकास साधला पाहिजे.

1 COMMENT

Leave a Reply to SHG for Disabled Cancel reply

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version