माझी आई

1

समाजवादी नेत्या मृणाल गोरे यांची आज तिसरी पुण्यतिथी.  कन्या अंजली गोरे यांनी त्यांच्या काही आठवणी सांगितल्या…
माझ्या जीवनातील पहिली २२ वर्षे गेली ती गोरेगाव येथील आबा करमरकरांच्या टोपीवाला बंगल्यात. वरच्या मजल्यावर मी व आई, आम्ही दोघीच राहत असू. खालच्या मजल्यावर शोभाताई दाबके व आशाताई गव्हाणकर यांची कुटुंबे राहत असत. मी अगदी लहान असतानाच बाबा गेल्याने त्यांची आठवण धूसर आहे. गच्चीत मला बाबा हवेत उंच उडवत आहेत असे अंधूक आठवते. थोडक्यात काय, तर माझे लहानपणाचे विश्व म्हणजे मी व आई.

इयत्ता पहिली ते चौथी मी प्रेमाताईच्या अभिनव शाळेत जात असे. घरी आल्यावर आई नसेल तर मी खालीच असायची. रात्री उशीर होणार असेल, तर आई माझी पोळी-भाजी खालीच ठेवत असे. मग मला दाबकेंचे अर्धी वाटी आंबट वरण मिळे. मी अनेकदा तिथेच झोपी जात असे. आई घरी आल्यावर मला वर नेई व मग कपडे बदलून जेवत असे. आईचे काम व माझा अभ्यास वाढत होता. घरात कोणीतरी असण्याची गरज होती. मग आईने चोवीस तासांची बाईच ठेवली. आई जरी तेव्हा नगरसेवक होती तरी तिने कधी स्वत:साठी विशेष सवलतींची अपेक्षा ठेवली नाही. मला इयत्ता पाचवीत अ. भि. गोरेगावकर शाळेत प्रवेश घेतला तो इतरांप्रमाणे रांगेत उभे राहूनच!

आई खूपच धीट. महापालिकेत व विधानसभेत आई लोकलनेच जात असे. एकदा गोरेगावला उतरताना आई घसरून पडली. तिचा पाय गाडी व प्लॅटफॉर्मच्या मध्ये गेला व गाडी सुरू झाली. आईच्या भोवती लोक जमले व वेगवेगळे सल्ले देऊ लागले. कुणी म्हणत होते- पटकन पाय काढा, तर कुणी म्हणत होते- तसाच ठेवून द्या. आईच्या प्रसंगावधान व बुद्धिमत्ता यामुळे ती स्वत:च्या निर्णयावर ठाम असे. तिने ती संपूर्ण गाडी जाईपर्यंत पाय तसाच धरून ठेवला. अगदी शेवटी थोडा लवकर पाय काढल्याने थोडी जखम झाली. ती तडक घरी आली. मी दरवाजा उघडला व रक्ताने भरलेली साडी बघून खूप घाबरले. तिला सोडण्यास आलेल्या सद्ग गृहस्थाकडून मला तो किस्सा कळला. मी खूप रडले. अशा गोष्टी घडल्या की, मी खूप घाबरत असे. आईला काही झाले तर आपले कोण?

टोपीवाला बंगल्यात मी व आई एकत्र खाली गाद्या घालून झोपत असू. एकदा इंग्लंडची राणी मुंबई भेटीस आली होती. तिला काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा कार्यक्रम होता. रात्री आईचा सेक्रेटरी तेलंग घाईने घरी आला आणि म्हणाला, ‘आई व इतर बायकांना पकडून नेले आहे. आईचे कपडे दे.’ मी घाईत कपडे भरून दिले. घरी बाईही नव्हती. मी एकटीच होते. मला खूप भीती वाटली. टोपीवाला बंगला तसा खूपच मोठा होता. एका टोकास संडास-बाथरूम. मी एकटीनेच झोपायचे ठरवले. खोपी आतून लावून घेतली व झोपून गेले. दुस-या दिवशी आल्यावर आई म्हणाली, ‘या पुढे कधीही एकटी राहण्याचा प्रसंग आल्यास तू घाबरणार नाहीस.’

आईच नाव खरे चमकले ते १९७२ च्या निवडणुकीपासून. आई गोरेगाव-मालाडमधून विधानसभेच्या जागेसाठी निवडणूक लढवत होती. अ‍ॅड. माधवराव परांजपेंसारखे ख्यातनाम वकील काँग्रेसने समोर उभे केले होते. त्यांचे ऑफिस टोपीवाला बंगल्यासमोर अशोक राजमध्ये होते. त्यांच्याकडे प्रचारांच्या गाडय़ांचा ताफा होता, तर टोपीवाला बंगल्यावर कार्यकर्त्यांचा राबता होता. माझी ‘बीएससी’ची फायनल परीक्षा होती. घरात तर निवडणुकीचे ऑफिस होते. हॉल संपूर्ण दिवसभर लोकांनी भरलेला असे. थोडी थोडी निवडणुकीची कामे व थोडा अभ्यास असे दिवस जात होते. आई निवडून आली व समोरचे ऑफिस नाहीसे झाले. खूप मजा आली. ती विधानसभा आईने खूप गाजवली. महागाई विरोधात लाटणे मोर्चा, घंटा नाद, ठिय्या आंदोलन असे नवे नवे पण अतिशय प्रभावी कार्यक्रम तिने यशस्वी करून दाखवले. विधानसभेत जरी सर्व मंत्रीही तिला घाबरत असत तरी वैयक्तिक जीवनात सा-यांनी तिचे कौतुकच केले. माझ्या लग्नालाही तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्यासह सर्व मंत्री येऊन गेले.

माझे लग्न १९७५च्या फेब्रुवारीत झाले. दिलीप वर्तक हा माझा पाटकर कॉलेजमधील सर्वात जवळचा मित्र. व्यक्तिस्वातंत्र्यावर पूर्ण विश्वास असलेल्या आईने, आम्ही लग्न करण्याचे ठरवल्यावर विरोध केला नाही. वर्तक कुटुंबातील हा पहिला आंतरजातीय विवाह होता. वर्तक कुटुंबातील सर्वानीच आईला शेवटपर्यंत प्रेम दिले. माझी सून दीपा हिच्या माहेरच्यांनीही आईला भरभरून प्रेम दिले. १९७८ साली विक्रम व १९८१ साली मानसीचा जन्म झाला. आई म्हणून माझ्याशी खेळायला तिला पुरेसा वेळ मिळाला नाही; पण नातवंडांमध्ये ती भरपूर खेळत असे. ते दिवस खूप छान होते. मुले मोठी झाल्यावर आम्ही वेगळे राहत होतो; तरीसुद्धा आई कधीही माझ्याकडे आली तरी ती घरी निघाल्यावर माझ्या सासूबाई आवर्जून निरोप देण्यास गाडीजवळ यायच्याच. बहुतेक दिवाळीत आई वसईला असे. आमचा सर्वाचा दिवाळीत एकत्र फराळ असे. तिला करंज्या व चकल्या खूप आवडत. आई स्वत: करंजा खूप छान भरत असे. आई सुगरण होती. मासे, मटण हे तिच्या आवडीचे पदार्थ.

जनता पक्षाची स्थापना झाली व आई उत्तर मुंबई (गोरेगाव ते पालघर) मतदारसंघातून लोकसभेच्या निवडणुकीला उभी राहिली. निवडणुकीचा इतका प्रचंड उत्साह प्रथमच पाहिला. सकाळपासूनच टोपीवाला बंगला लोकांनी फुलून जाई. चहापेक्षा अधिक कशाचीही लोकांची अपेक्षा नसे. एकाच व्यक्तीकडून निवडणुकीसाठी मोठा निधी घेण्यापेक्षा अनेक लोकांकडून थोडेसे पैसे घेतले जात असत. सर्वाचा सहभाग आईच्या दृष्टीने जास्त महत्त्वाचा होता. निवडणूक प्रचाराच्या व विजयानंतरच्या सर्व सभा मला ऐकायला मिळाल्या, हे माझे भाग्य म्हणावे लागेल. जॉर्ज फर्नाडिस यांच्यासारख्या अनेक वक्त्यांची मंत्रमुग्ध करणारी भाषणे ऐकली. आईची जोशपूर्ण व मनाच्या सच्चेपणामुळे हृदयाला भिडणारी भाषणे ऐकली, तर बाबूरावांची अभ्यासपूर्ण शांत भाषणेही ऐकली. मुंबईतील मतदारसंघातून सर्वाधिक मतांनी ती निवडून आली; पण लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊनसुद्धा ती हुरळून गेली नाही. १९८१ साली जनता पक्ष सोडल्यावर झालेल्या निवडणुकीतील पराभवाने खचूनही गेली नाही. स्वत:च्या मतांवर ठाम राहून ती सर्व निर्णय घेत असे. त्यामुळे ती असे वागू शकत होती. १९८५ साली आई पुन्हा विधानसभेवर निवडून आली. त्या कार्यकालात तिने विरोधी पक्ष नेतेपद भूषवले. आई निवडणूक जिंकली काय किंवा हरली काय, तिची लोकप्रियता कधी कमी झाली नाही.

आईला ६०व्या वर्षी जेव्हा ब्रेस्ट कॅन्सर झाला तेव्हा मी खरी हादरले; पण प्रभुभाई संघवी यांच्या खटपटीने डॉ. कामत यांच्यासारख्या निष्णात डॉक्टरांकडून तिचे ऑपरेशन झाले. आईने स्वत:च्या प्रकृतीकडे हवे तितके लक्ष दिले नाही, ही वस्तुस्थिती आहे. ती झपाटल्यासारखे काम करीत असे. त्या काळी आईच्या डायरीची पाने कधीही कोरी नसत. मी दिवाळीची सुट्टी किंवा कार्यक्रमाच्या दिवसावर ‘अंजू’ असे लिहून ठेवत असे, ही अगदी खरी गोष्ट आहे. खाण्या-पिण्याच्या वेळा कधी पाळल्या गेल्या नाहीत. परिणामी आईला मधुमेहाला सामोरे जावे लागले. प्रख्यात मधुमेहतज्ज्ञ डॉ. आजगावकर यांनी एक डॉक्टर व स्नेही या नात्याने शेवटपर्यंत आईवर उपचार केले. मध्यंतरीच्या काळात आईला अर्धागवायू व हृदयरोग अशा रोगांनाही सामोरे जावे लागले. या मोठय़ा आजारांनीही ती खचली नाही.

वयाच्या ७५ वर्षानंतर आई थकली तरी केशव गोरे स्मारक ट्रस्ट, नागरी निवारा परिषद, स्वाधार व अंगणवाडी कर्मचारी सभा यांचे काम ती करीत होती. महाराष्ट्रभरातून तिला कार्यक्रमांची आमंत्रणे येत असत; पण डॉक्टरांनी बाहेरगावी जायला बंदी घातल्याने तिने या मर्यादा घालून घेतल्या होत्या. या काळात आई वसईला ब-याच वेळा येत असे. थोडे दिवस राहिल्यावर तिला गोरेगावची आठवण येई. गोरेगाव हाच तिचा आत्मा होता. १७ जुलै २०१२ ला थोडे तापाचे निमित्त झाले. तिला हॉस्पिटलला नेले; पण काही उपयोग झाला नाही. तिची प्राणज्योत मालवली. आईच्या अंत्यदर्शनासाठी झालेली गर्दी व ट्रस्टच्या आवारातील ती सरकारी मानवंदना अजूनही डोळय़ासमोरून जात नाही. तिचा संपूर्ण जीवनपट सर्वाना स्फूर्तिदायक ठरेल, असाच आहे.

1 COMMENT

  1. अंजली गोरेंचा माझी आई हा ह्रदयस्पर्शी लेख वाचला. मृणालताई या दिनदुबळ्या , गरीब, पिडीत अश्या सा-या समाजाच्या आई होत्या. त्यांच्यावर अंजलीताईंनी एखादं पुस्तक लिहावं जेणेकरून समाजातील अनेकांना प्रेरणा मिळू शकेल. – विजय कुडतरकर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version