Home महामुंबई स्थायी समिती सदस्यांच्या खुर्च्या डळमळीत

स्थायी समिती सदस्यांच्या खुर्च्या डळमळीत

0

मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीचे नूतनीकरण सुरू असून येथील महापौर, आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनातील निकृष्ट कामांची चर्चा चांगलीच रंगली आहे.

मुंबई- मुंबई महापालिकेच्या मुख्यालय इमारतीचे नूतनीकरण सुरू असून येथील महापौर, आयुक्त आणि स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनातील निकृष्ट कामांची चर्चा चांगलीच रंगली आहे. स्थायी समिती सभागृहातील सदस्यांना बसण्यासाठी असलेल्या खुर्च्या डळमळीत झालेल्या आहेत.

सभागृहातील आधीच्या खुर्च्याना चाके होती. त्यामुळे सदस्य उठले की खुर्च्या सरकल्या जायच्या. त्यामुळे त्या बदलून लाकडी लेदर कुशनच्या खुर्च्या मागवण्यात आल्या. मात्र अवघ्या महिन्यातच या खुर्च्याचे हात सदस्यांचा हातात येऊ लागले आहेत. त्यामुळे नूतनीकरणाच्या कामांबाबत आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मुंबई महापालिका मुख्यालयाच्या इमारतीचे नूतनीकरणाचे काम हाती घेण्यात आले असून बाहेरील काम हे शानदार कॉन्ट्रॅक्टर आणि अंतर्गत नूतनीकरणाचे काम स्काय वे कन्स्ट्रक्शन या कंपनीला देण्यात आले आहे. स्थायी समिती सभागृह आणि अध्यक्षांच्या दालनाचे काम सहा महिन्यांपूर्वीच करण्यात आले होते. त्यामुळे सभागृहात सदस्यांना बसण्यासाठी काळ्या रंगाच्या सरकत्या खुर्च्या होत्या. परंतु लाकडी फ्लोरिंगवर या खुर्च्या घसरल्या जायच्या.

सदस्यांना बसण्यापूर्वी खुर्ची पकडावी लागत असे. त्यामुळे यावर उपाय म्हणून कारपेट बसवण्यात आले होते. मात्र, हे कारपेट बसवल्यानंतर मागील महिन्यातच नव्याने खुर्च्या खरेदी केल्या गेल्या. अवघ्या एका महिन्यात या खुर्च्या डळमळीत होऊन तुटायला लागल्या आहे.

बुधवारी स्थायी समितीच्या बैठकीत शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर या खुर्चीवर बसताच खुर्चीचा हातच त्यांच्या हातात आला. त्यावेळी त्यांनी कोणताही गाजावाजा न करता शांतपणे खुर्ची बदलली. या प्रसंगातून येथील खुर्च्या निकृष्ट दर्जाच्या असल्याचे स्पष्ट होत आहे.

महापालिका मुख्यालयातील महापौरांच्या दालनाचे काम सर्वप्रथम करण्यात आले. या महापौर दालनातील सिलिंगचे काम निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. तर पार्टीशनही कमकुवत बसवण्यात आलेले आहे. त्यामुळे महापौर दालनातील या कामाबाबत नाराजी व्यक्त केली जात असतानाच मागील महिन्यात आयुक्तांच्या दालनातील एक कपाट खिळ्यांसह खाली कोसळले.

सुदैवाने यात कोणालाही इजा झाली नाही. नेमकी जेवणाची वेळ असल्यामुळे कर्मचारी बाहेर गेले होते. स्थायी समिती अध्यक्षांच्या दालनातील लाद्याही योग्यप्रकारे न बसवल्याची तक्रार आहे. त्यामुळे नूतनीकरणाच्या कामांच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत आहेत.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version