Home मध्यंतर उमंग मासिक पाळी- किशोरवयीन बदल

मासिक पाळी- किशोरवयीन बदल

2

किशोर वय म्हणजे बालपणातून अलगद तारुण्याकडे जाणारे वय. शारीरिक वाढीसोबतच मेंदूत विचारांचे-भावनांचे उमटणारे असंख्य सौम्य तरंग. मात्र ही किशोरी अवस्था खरंच समजतो का आपण? आपल्या शरीरात होणा-या बदलांविषयी खुलेपणाने आज एकविसाव्या शतकातही आपण बोलू शकत नाही हीच खंत आहे.

साधारण वयाच्या नवव्या वर्षानंतर मुलींच्या शरीरात होणा-या इतर बदलांपैकी मासिक पाळीचे आगमन हा महत्त्वपूर्ण बदल असतो. मासिक पाळी येणे म्हणजे एक नैसर्गिक बदल असतो, जे शास्त्रीय सिद्धांतानेही स्पष्ट झालं आहे. मात्र या उघड सत्याला पचवण्याची तयारी खूपच कमी दिसते. मुलींप्रमाणेच मुलांमध्ये देखील शारीरिक बदल होत असतात. मुलांना दाढी-मिशी येणे जेवढे सामान्य आहे, तेवढेच मुलींना मासिक पाळी येणे. प्रत्यक्षात या दोन्ही बदलांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच भिन्न असतो. मासिक पाळीला संकोची वृत्तीने बघण्याची मानसिकता हेच त्याचे कारण आहे.

मुलगा-मुलगी अशी वर्गवारी अगदी सहजतेने समाजात केली जाते. आणि या भेदभावाची पाळंमुळं आपल्या कुटुंबापासून सुरू होत घट्ट मूळ धरू लागतात. दाढी-मिशी येण्याची सुरुवात झाली की बापाची चप्पल आता मुलाच्या पायात येऊ लागली हे पाहून घराची सूत्रेही सहजतेने मुलाच्या हातात एकवटतात. तर दुस-या बाजूला मासिक पाळी आली या कारणाने मुलींवर अनेक मर्यादा येऊ लागतात. बालपणाचे परीघ मासिक पाळीनंतर जटिल होऊन नियंत्रित, मर्यादित आणि सुलटे चालू लागते. व्यक्ती म्हणून असणा-या तिच्या अनेक हालचालींवर कधी प्रत्यक्ष तर कधी अप्रत्यक्षपणे नजर ठेवली जाते. तिचे राहणीमान, हसणे, बोलणे, चालणे, खेळणे, स्वत:ला व्यक्त करणे या सगळ्यांची वर्तणूक तिला घरातूनच शिकवली जाते.

शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षणातही शरीरात होत जाणा-या बदलांबद्दल खुलेपणाने शिकवले जात नाही. आजही परिसर अभ्यासाच्या पुस्तकात मानवी अवयवांची ओळख करून देणा-या चित्रात सर्व अवयवांबद्दल दर्शविले जाते. मात्र लैंगिक अवयवांची वाच्यता केली जात नाही. शाळेत किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळी सत्राचे उपक्रम राबवले जातात. ज्यामध्ये सॅनेटरी नॅपकिन कसे वापरावे, पाळी कशी येते अशी माहिती दिली जाते. पण हा बदल सामान्य असून त्यामुळे आपण कोमेजून न जाता आपले हे वय खुलून जगले पहिजे,असा संदेश देणारे प्रशिक्षण खूप कमी मिळते. लैंगिक शिक्षणाची संकल्पना आजही मान्य केली जात नाही.

अशा परिस्थितीत किशोरवयीन मुलींना त्यांच्या वाढत्या वयात भेडसावणा-या प्रश्नांना, शंकांना घरातून तसेच शाळेतून आवश्यक प्रतिसाद मिळत नाही. अशा वातावरणात मासिक पाळी येणे ही एक गुपित ठेवण्यासारखी बाब आहे, अशी समज किशोरवयीन मुलींमध्ये दृढ होऊ लागते. भारतीय कायदाव्यवस्थेने १२वीपर्यंतचे शिक्षण अनिवार्य केले आहे; मात्र सरकारी शाळेत स्वच्छतागृहांची सोय नसल्याने मुलींचे शाळेतील गळतीचे प्रमाण वाढले आहे. कारण स्वच्छतागृहांची गरसोय असल्याने मुलींना मासिक पाळीदरम्यान कपडा बदलताना, लघुशंकेला जाताना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते.

मुलांचे लग्नाचे वय हे २१ वर्षे आहे तर मुलींचे लग्नाचे वय हे १८ वर्षे आहे. या तफावतीचा विचार केला तर उत्तर थेट मुलींच्या मासिक पाळीच्या प्रक्रियेकडे जाऊन भिडते. १८ वर्षापर्यंत मुलीच्या गर्भाशयाचा विकास पूर्ण होतो. गर्भाशयाचा विकास होणे म्हणजेच मुलीचा विकास होतो असं मानलं जातं. मुलींच्या प्रजनन क्षमतेवर आधारित या कायद्याचे गठन झाल्याचे स्पष्ट होते.

मासिक पाळीत असणा-या मुली-महिलांसाठी अपवित्र, नापाक अशी संबोधणे सहज वापरली जातात. ही मानसिकता मुलींच्या मनावर देखील बिंबवली जाते. त्यामुळे मुली स्वत: ‘मै आज नापाक हूं’, ‘मला प्रोब्लेम आहे’ अशी वाक्यरचना नकळत करताना दिसतात. शिवाय आजपर्यंत एकाही धर्मात धर्मगुरूचे स्थान एकाही महिलेला प्राप्त झाले नाही. धार्मिक ठिकाणी मुली-महिलांचा प्रवेश हा त्यांच्या मासिक पाळीदरम्यान होणार नाही यासाठी उपाययोजना म्हणून मंदिरात स्कॅनर बसवण्याच्या मूर्ख कल्पना मांडल्या जातात. तर कधी ‘नापाक औरतो को अंदर आना मना है’ असे मोठे फलक देखील मस्जीद किंवा मंदिराबाहेर दिसतात. पाळी आली म्हणजे मुलगी मोठी झाली असा जणू समजच प्रचलित आहे. हा समजच मुलींना घरेलूपणाचे प्रशिक्षण घेण्यास बंधनकारक बनवतो. हे प्रशिक्षण कधी प्रेमाने तर कधी चक्कदबावाने आपल्या येथे दिले जाते.

आजही मासिक पाळीदरम्यान किंवा या संकल्पाने अंतर्गत मुली-महिलांच्या वाटय़ाला येणा-या बहिष्कृत वागणुकीला, व्यवहाराला हिंसा म्हणून किंचितच पाहिले जाते. म्हणूनच महिला हिंसेविरोधी होणा-या कोणत्याही नवीन कायद्यात किंवा धोरणात मासिक पाळीसंबंधित हिंसेविरोधी तरतुदीचा उल्लेख आढळत नाही. मग ते बाल अधिकार असो किंवा मग महिला अधिकार. येथे प्रकर्षाने मांडावेसे वाटते की समाजातून मासिक पाळीसंबंधित होणा-या बहिष्कृत व्यवहाराचा आणि वर्तनाचा विचार हक्काधारित दृष्टिकोनातून होणे अगत्याचे आहे. प्रसारमाध्यमांनी देखील मासिक पाळीला केवळ सॅनिटरी नॅपकिनच्या जाहिरातीपुरते मर्यादित न ठेवता या प्रश्नाला आणखी बोलके केले पाहिजे. मासिक पाळी या विशेष बदलाबरोबरच वाढत्या वयात विरुद्ध लिंगी, समलिंगी व्यक्तीबद्दल आकर्षण होणे देखील स्वाभाविकच असते. अशावेळी या नैसर्गिक मानसिक बदलाचा विचार न करता ब-याच वेळा कठोर पावले उचलली जातात. मुलीसोबत तिरस्काराचे, अवहेलनेचे वर्तन घरातून किंबहुना समाजाकडून केले जाते. अशा वेळेस हा बदल नैसर्गिक नसून अपराधिक आहे असा न्यूनगंड जन्म घेतो. मुलींच्या सर्वात जवळ असणा-या पालक आणि शिक्षकवर्गाची ही जबाबदारी होते की, सामाजिक व्यवस्थेमुळे उघडपणे न बोलल्या जाणा-या या विषयाला चर्चेत आणायला हवे. धर्माचा आधार घेऊन रूढ होऊ पाहणा-या चाली-रितींना चिकित्सक आणि शास्त्रीय विचारसरणीची बैठक देणे अनिवार्य आहे. या सा-या गोष्टींना आपण मुलींनीच स्पष्ट नकार द्यायला हवा. परंपरेने जखडून ठेवलेल्या गोष्टींना शास्त्रीय कारण नसतानाही समाजात मानलं जात आहे, तरुणवर्गाने या गोष्टींचा विरोध करायला हवा.

अभ्यासात आलेले काही मुद्दे

माझ्या समाजकार्याच्या अभासक्रमात मासिक पाळी संकल्पना आणि धार्मिक सांस्कृतिक मर्यादा व परिणाम या विषयावर संशोधन प्रकल्प पूर्ण केला होता. संशोधनातील एकूण मुलींपैकी ७५ टक्के मुलींनी मासिक पाळी येणे ही त्यांना लाजिरवाणी बाब वाटते, तर मासिक पाळीदरम्यान कपडय़ाचा वापर करणा-या ७२ टक्के मुलींपैकी ५५ टक्के मुलींनी सांगितले की त्या हे कापड घराच्या मोरीत अंधारात वाळत घालतात. केवळ २८ टक्के मुलीच बाजारात जाऊन सॅनिटरी नॅपकिन विकत घेतात. मासिक पाळीची पूर्वकल्पना फक्त ५७ टक्के मुलींनाच होती. एवढेच नव्हे तर ७७ टक्के मुलींच्या घरात मासिक पाळीविषयी घरात किंवा शाळेत खुलेपणाने बोलले जात नाही. तर ५२ टक्के मुलींना असं वाटतं की मासिक पाळी येणं म्हणजे त्यांचा बालहक्क हिरावल्यासारखं आहे. प्रथम मासिक पाळी येणं म्हणजे ४७ टक्के मुलींच्या घरात चिंतेचे वातावरण होते, तर सर्वात प्रथम मासिक पाळी आली तेव्हा त्याची सूचना ७२ टक्के मुलींनी आपल्या आईस तर २८ टक्के मुलींनी मैत्रीण, शिक्षिकांना दिली. पाळी येण्यास सुरुवात झाल्यानंतर ८३ टक्के मुलींचे अनुभव होते की त्यांच्यावर घरच्या कामाची जबाबदारी वाढली आहे. मासिक पाळीदरम्यान ८० टक्के मुलींना धार्मिक साहित्य व कोणत्याही प्रकारच्या धार्मिक प्रक्रियेपासून सक्तीने दूर ठेवले जाते. एवढंच नव्हे मासिक पाळीनंतर मुलींच्या वर्तवणुकीतही बदल व्हावे अशी त्यांच्या पालकांची इच्छा होती. धार्मिक कारणात विघ्न येऊ नये म्हणून ब-याच वेळी पाळी मागे-पुढे ढकलण्यासाठी गोळ्या खाण्याच्या सूचना अगदी सहजतेने दिल्या जातात.

(लेखिका सामाजिक कार्यकर्त्यां आहेत)

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version