Home महाराष्ट्र कोकण मास्टर शेफ स्पर्धा स्त्रियांना खाद्यव्यवसायासाठी उपयुक्त

मास्टर शेफ स्पर्धा स्त्रियांना खाद्यव्यवसायासाठी उपयुक्त

0

कणकवली मास्टर शेफ-२०१८ स्पर्धेत हजारो महिलांची उपस्थिती, ३९७ महिलांनी सादर केल्या पाककृती, कणकवली मास्टर शेफ ही स्पर्धा म्हणजे स्त्रियांना खाद्य व्यवसायाकडे घेऊन जाणारी योग्य पायरी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले. 

कणकवली – स्त्री कोणत्याही क्षेत्रात कमी नाही. पुरुषाइतकीच स्त्रीही प्रत्येक क्षेत्रात यश मिळवू शकते. आपली खाद्य संस्कृती श्रेष्ठ आहे. कणकवली मास्टर शेफ ही स्पर्धा म्हणजे स्त्रियांना खाद्य व्यवसायाकडे घेऊन जाणारी योग्य पायरी आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केले. आनंदी राहण्याने आयुष्य वाढते आणि तो आनंद अशा विविध उपक्रमांतून मिळतो. असे कार्यक्रम आयोजित करणे हे लोकप्रतिनिधींचे विकासकामाबरोबरचे कर्तव्य आहे, असेही ते म्हणाले.

आमदार नितेश राणे यांच्या संकल्पनेतून स्वाभिमान पक्षाच्या कणकवली शहर शाखेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कणकवली मास्टर शेफ २०१८ स्पर्धेचे उद्घाटन माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी सौ. निलमताई राणे, आमदार नितेश राणे, टी.व्ही.फेम शेफ तुषार प्रीती देशमुख, पक्षाच्या जिल्हा महिला अध्यक्षा प्रणिता पाताडे, समाजकल्याण सभापती शारदा कांबळे, पंचायत समिती सभापती भाग्यलक्ष्मी साटम आदी उपस्थित होते.

नारायण राणे म्हणाले, कणकवली मास्टर शेफ हा आजचा कार्यक्रम अतिशय स्तुत्य उपक्रम आहे. एकाच दिवशी एवढय़ा खाद्यपदार्थाच्या डिश आजपर्यंत मी कधीच पाहिल्या नव्हत्या. त्यातच सुगरण महिला स्पर्धकांच्या सहभागात त्यांच्या चेह-यावर दिसणारा उत्साह पाहिल्यानंतर नितेश राणे आणि त्यांच्या सहका-यांनी योग्य असा उपक्रम हाती घेतला. शहरातील आणि तालुक्यातील स्वाभिमान पक्षाच्या कार्यकर्त्यांचे धन्यवाद मानावे तेवढे कमी आहेत, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.

या ठिकाणी झालेले असे उपक्रम समाजात सातत्याने झाले पाहिजेत. कारण, असा आनंद दिवाळी, गणपती, होळी अशा सणानिमित्तच अनुभवता येतो. याव्यतिरिक्त अशा संधी मिळत नाहीत. त्यामुळे स्थानिक महिला भगिनींना मनोरंजनाची संधी मिळावी. त्यांच्या पाककृती सर्वापर्यंत पोहोचाव्यात यासाठी असे उपक्रम गरजेचे आहेत. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचा बॅनर हे एक निमित्त आहे. मात्र, त्यातून कोणताही राजकीय स्वार्थ नाही. कार्यक्र म समाजासाठी नि:स्वार्थ हेतूने घेतला आहे. कणकवली मास्टर शेफ २०१८ हा कार्यक्रम कणकवलीतील जनतेसाठी आहे. असाच पैठणीचा कार्यक्रम मनापासून आमच्या खिशातील पैसे खर्च करून घेतला. त्यानंतर काहींनी मुंबईत जाऊन त्रास देऊन पैठण्या आणल्या आणि कणकवलीत पैठणीचा कार्यक्रम घेतला आणि तो पुरता फसला अशी टीका नारायण राणे यांनी केली.

जनतेच्या सेवेसाठी सदैव तत्पर राहू – नितेश राणे
समाजातील वेगवेगळय़ा घटकांची सेवा विविध उपक्रमांच्या माध्यमातून करावी, अशी शिकवण राणे साहेबांनी आम्हा कार्यकर्त्यांना दिली आणि त्यांचे कार्यकर्ते म्हणून काम करत असताना तुम्हा जनतेचा लाभलेला उत्स्फूर्त प्रतिसाद आणि उत्साह अनुभवता आला. पैठणीच्या कार्यक्रमांत असाच मोठय़ा संख्येने आशीर्वाद दिला. हा उत्साह पाहून माझ्यासारख्या कार्यकर्त्यांने कणकवलीत मास्टर शेफ कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले.

पापलेटचा रस्सा आणि गाजराचा हलवा
मास्टर शेफ तुषार प्रीती देशमुख यांनी निलमताई बनवत असलेल्या पदार्थापैकी कोणता पदार्थ आपल्याला आवडतो, असे नारायण राणे यांना विचारले असता ते म्हणाले, माशाचे जेवण अधिक आवडते. माशापैकी पापलेटचा रस्सा खूप छान बनवते, असे गौरवोद्गार श्री. राणे यांनी काढले. निलमताई म्हणाल्या की, ३८ वर्षात सहचारिणी म्हणून अनेक प्रकारचे खाद्यपदार्थ बनवून खाऊ घातले. हेच साहेबांच्या तंदुरुस्तीचे रहस्य आहे. नितेश राणे यांनी आईच्या हातचा गाजराचा हलवा खूप छान असतो. तो आवडीने खात असल्याचे त्यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version