Home क्रीडा मुंबई इंडियन्स पुन्हा ‘चँपियन्स’

मुंबई इंडियन्स पुन्हा ‘चँपियन्स’

1

फलंदाजीच्या जोरावर सातत्याने विजय आणि जेतेपद मिळवू शकतो, हे मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दाखवून दिले.

नवी दिल्ली- फलंदाजीच्या जोरावर सातत्याने विजय आणि जेतेपद मिळवू शकतो, हे मुंबई इंडियन्सने पुन्हा एकदा दाखवून दिले. फिरोजशा कोटलावर रविवारी झालेल्या अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सला ३३ धावांनी हरवत मुंबईने चँपियन्स लीग टी-२० लीगमध्ये बाजी मारली. त्यांचे या स्पर्धेतील हे दुसरे जेतेपद आहे. आयपीएलनंतर त्याच वर्षी चँपियन्स लीग जिंकणारा मुंबई पहिला संघ ठरला.

दोन्ही संघांची फलंदाजी मजबूत असल्याने फलंदाज सामन्याचा निकाल ठरवणार, हे निश्चित होते. त्यात मुंबईचे फलंदाज सरस ठरले. धुवाँधार फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने सहा बाद २०२ धावा आव्हानात्मक धावसंख्या उभारली. सलामीवीर ड्वायेन स्मिथ (३९ चेंडूंत ४४ धावा), कर्णधार रोहित शर्मा (१४ चेंडूंत ३३ धावा), ग्लेन मॅक्सवेल (१४ चेंडूंत ३७ धावा) आणि अंबाती रायडूच्या (२४ चेंडूंत २९ धावा) फटकेबाजीमुळे राजस्थानच्या गोलंदाजीची धुलाई करत मुंबईला द्विशतकी मजल मारता आली. सहका-यांनी खूप धावा दिल्या तरी लेगस्पिनर प्रवीण तांबेने (१९-२) अचूक मारा केला.

प्रत्युत्तरादाखल राजस्थानचा डाव १८.५ षटकांत १६९ धावांत संपला. खराब सुरुवातीनंतरही सलामीवीर अजिंक्य रहाणे (४७ चेंडूंत ६५ धावा) आणि ‘वनडाउन’ संजू सॅमसनने (३३ चेंडूंत ६० धावा) दुस-या विकेटसाठी ६७ चेंडूंत १०९ धावांची झटपट भागीदारी करत सामन्यात रंगत आणली. मात्र त्यानंतर ऑफस्पिनर हरभजन सिंग (चार विकेट) आणि किरॉन पोलार्डच्या (तीन विकेट) प्रभावी मा-यासमोर राजस्थानची मधली फळी कोसळली आणि मुंबईचे जेतेपद नक्की झाले.

 सचिनला विजयी निरोप

 यंदाची चँपियन्स लीग जिंकून मुंबई इंडियन्सने विक्रमवीर सचिन तेंडुलकरला विजयी निरोप दिला. गेल्या वर्षी झालेल्या सहाव्या मोसमानंतर आयपीएलमधून निवृत्ती घेणा-या सचिनची मुंबईतर्फे ही शेवटची टी-२० लीग होती. शेवटच्या टी-२० लीगमध्ये त्याने सर्वप्रकारच्या क्रिकेटमधील विक्रमी ५० हजार धावांचा टप्पा पार केला. हा टप्पा गाठणारा तो आशियातील पहिला क्रिकेटपटू ठरला. सचिनप्रमाणे ‘द वॉल’ राहुल द्रविडचीही शेवटची लीग होती. मात्र त्याला विजयी निरोप देण्यात राजस्थान रॉयल्सच्या क्रिकेटपटूंना अपयश आले.

 ‘द्रविडचा उत्तराधिकारी वॉटसन’

 राहुल द्रविडचा उत्तराधिकारी म्हणून शेन वॉटसनचे नाव आघाडीवर असल्याचे सूतोवाच राजस्थान रॉयल्सचे मुख्य प्रशिक्षक पॅडी अप्टन यांनी केले आहे. 

‘‘वॉटसन हा सुरुवातीपासून राजस्थानचे प्रतिनिधित्व करत आहे. त्यांचे सर्व संघसहका-यांशी पटते. युवा क्रिकेटपटूंशी चांगले संबंध आहेत. राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत राजस्थानला कर्णधार म्हणून एका चांगल्या क्रिकेटपटूची आवश्यकता आहे. राजस्थानने वॉटसनला करारबद्ध केल्यास कर्णधारपदासाठी तोच प्रबळ दावेदार असेल,’’ असे अप्टन यांनी सांगितले.

राहुल द्रविडची ही शेवटची टी-२० लीग होती. मात्र भविष्यात राजस्थान फ्रँचायझी त्याला सांघिक प्रक्रियेत सामावून घेण्याची शक्यताही अप्टन यांनी वर्तवली. ‘‘राहुल महान क्रिकेटपटू आहे. आयपीएलमध्ये राजस्थानसाठी कर्णधार आणि क्रिकेटपटू म्हणून त्याने सर्वतोपरी योगदान दिले. युवा क्रिकेटपटूंना अधिक संधी दिली. भविष्यातही संघाला त्याचा फायदा व्हावा म्हणून फ्रँचायझी प्रयत्नशील राहील,’’असा विश्वास अप्टन यांनी व्यक्त केला.

 रोहित म्हणतो, तिन्ही प्रकारांत सलामीला येण्यासाठी तयार सर्व तिन्ही प्रकारांच्या क्रिकेटमध्ये सलामीला येण्यास तयार असल्याचे मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने सांगितले.

‘‘विद्यमान क्रिकेटमध्ये अमुक याच स्थानावर खेळण्याचे तुम्हाला निश्चित करता येत नाही. सर्व प्रकारांत कुठल्याही स्थानावर खेळण्यास तयार असल्याचे मी गेल्या सहा वर्षापासून सांगत आहे. तशी योग्य वेळ आणि संधीची मी वाट पाहत आहेत,’’असे रोहितने म्हटले. रोहितच्या नेतृत्वाखाली मुंबईला आयपीएलपाठोपाठ चँपियन्स लीग जिंकता आली. दोन्ही टी-२० लीग जिंकून देणारा रोहित मुंबईचा पहिला कर्णधार ठरला. मुंबईच्या चाहत्यांना आमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात अपयश आले, असे रोहितने म्हटले. ‘‘प्रेक्षकांच्या अपेक्षा असल्याने आमच्यावर खूप दडपण होते. मात्र दडपण झुगारत आम्ही चांगला खेळ केला,’’असे तो म्हणाला.

 अजिंक्यला ‘गोल्डन बॅट’ पुरस्कार

 राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर अजिंक्य रहाणेने ‘गोल्डन बॅट’ पुरस्कार पटकावला. लीगमधील सर्वोत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजाचा पुरस्कार अनुक्रमे सलामीवीर ड्वायेन स्मिथ (मुंबई इंडियन्स) आणि लेगस्पिनर प्रवीण तांबेने (राजस्थान रॉयल्स) मिळवला.



1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version