Home महाराष्ट्र कोकण मुंबई सांभाळता येत नाही, ते देश काय सांभाळणार?

मुंबई सांभाळता येत नाही, ते देश काय सांभाळणार?

0

गेली १५ वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र मुंबईकरांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. ज्यांना मुंबई सांभाळता येत नाही, ते राज्य आणि देश काय सांभाळणार, असा सवाल करून खासदार डॉ. निलेश राणे यांनी शिवसेना-भाजपचा खरपूस समाचार घेतला. 

राजापूर – गेली १५ वर्षे मुंबई महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता आहे. मात्र मुंबईकरांना नागरी सुविधा मिळाल्या नाहीत. ज्यांना मुंबई सांभाळता येत नाही, ते राज्य आणि देश काय सांभाळणार, असा सवाल करून खासदार डॉ. निलेश राणे यांनी शिवसेना-भाजपचा खरपूस समाचार घेतला. राजापूर तालुक्यातील ओणी येथे शुक्रवारी आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते.

कोकणातील जनतेने मला प्रश्न आणि समस्या सोडवण्यासाठी, विकासासाठी निवडून दिले. याचे भान ठेवून गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून दिल्लीचे राजकारण न करता तळागाळातील जनतेशी संपर्क ठेवत आपण समाजकारण केले. ज्यांना विकासाशी देणे-घेणे नाही, देवांच्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून ज्यांना राजकारण करत पक्ष वाढवायचा आहे, त्या शिवसेना-भाजपला कोकणातून हद्दपार करण्याची वेळ आली आहे. यासाठी लोकसभा निवडणुकीत पुन्हा एकदा मतदानरूपी आशीर्वाद द्या, असे आवाहनही खासदार डॉ. राणे यांनी केले.

खासदार म्हणून दिल्लीत जाणा-या लोकप्रतिनिधींनी तेथे जनतेचे प्रश्न सोडवायचे असतात. शिवसेनेचे यापूर्वीचे खासदार सुरेश प्रभू यांनी केवळ स्वत:चे नाव मोठे करण्यातच धन्यता मानली आणि कोकणी जनतेच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केले. त्यांना कोकणच्या विकासापेक्षा यूपी-बिहारच्या नद्या जोडण्यात अधिक रस वाटला, अशी टीकाही डॉ. राणे यांनी या वेळी केली. कोकण रेल्वेशी निगडित अनेक प्रश्न आपण मार्गी लावले.

असुर्डे स्थानकाबरोबरच सौंदळ रेल्वेस्थानकासाठीही पाठपुरावा सुरू आहे. हे प्रश्नही मार्गी लागतील, असा विश्वास डॉ. राणे यांनी या वेळी दिला. डॉ. राणे यांनी या वेळी पाच वर्षातील विकासकामांचा आढावा घेतला. सुरेश प्रभूंच्या काळात कोकण विकासापासून वंचित राहिला. त्यामुळे कोकणच्या विविध प्रश्नांसाठी नोकरशाहीशी लढा द्यावा लागला.

मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण रखडले. त्यासाठी आपण पाठपुरावा करून ३ हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून ५२ कोटी रुपयांचा निधी रत्नागिरी जिल्ह्यासाठी उपलब्ध केला. केंद्र सरकारच्या नैसर्गिक आपत्ती पूरहानीचा पैसा कधी कोणाला मिळालाच नव्हता, त्यासाठी आपण प्रयत्न केल्याचे सांगत डॉ. राणे यांनी विकासाचे मुद्दे मांडून प्रभूंच्या कारकिर्दीचाही समाचार घेतला.

युतीने केवळ भावना भडकावून पोळी भाजून घेण्याचे राजकारण केले आणि मराठी माणसाच्या भावी पिढीचे नुकसान केले. मुंबई महापालिकेत अनेक वर्षे सत्ता असताना मुंबईतील दोन कोटी जनतेला पाणीपुरवठा करू शकले नाहीत ते राज्यातील ११ कोटी जनतेला काय सुविधा पुरवणार, असा सवाल खासदार डॉ. राणे यांनी या वेळी केला. मुंबईतील मराठी माणूस उपनगराच्या पुढे हद्दपार झाला आहे.

मराठी माणसाला वा-यावर सोडल्याने शिवसेनेची राजकारणातील पत घसरली आहे. पूर्वी बाळासाहेबांची मर्जी सांभाळण्यासाठी भाजपला कसरत करावी लागत असे. मात्र आता उद्धव ठाकरेंच्या रागरुसव्याला भाजप किंमत देत नाही. महायुतीचे उमेदवार विनायक राऊत यांना त्यांची शैक्षणिक पात्रता सिद्ध करण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते, हे दुर्दैव आहे. देशाचे आर्थिक, शैक्षणिक, औद्योगिक आदींसाठी धोरण ठरते व कायदे बनतात. हिंदी-इंग्रजीचा गंध नसलेली नॉनमॅट्रिक गंगुबाई दिल्लीत जाऊन काय दिवे लावणार, याचा विचार मतदाराने करण्याची गरज आहे. मास्टर डिग्रीसाठी पार्ट-१ व पार्ट-२ पूर्ण करावे लागतात, हे विनायक राऊतना कसे कळणार, असा टोलाही खासदार डॉ. राणे यांनी लगावला. शिवाजी महाराजांच्या नावाने राजकारण करणाऱ्यांना कधी त्यांचे स्मारक उभारावेसे वाटले नाही. मात्र काँग्रेस आघाडी सरकारने शिवरायांचे जगातील सर्वात मोठे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला.

मुंबईतील मराठी माणसाला उद्ध्वस्त केल्यावर आता शिवसेनेने कोकणकडे मोर्चा वळवला आहे. त्यामुळे कोकणी जनतेने नेहमी सावध राहावे. प्रकल्प कोणताही असो, त्याला विरोध करणे आणि मग त्यात कंत्राट मिळवणे ही शिवसेना-भाजपची संस्कृती आहे. जैतापूरमधील अणुऊर्जा प्रकल्पामुळे भविष्यात रोजगारनिर्मिती होईल. तरुणांच्या हाताला काम देणे, कोकणातील जनतेला आर्थिक समृद्ध करणे हेच आघाडी सरकारचे ध्येय आहे, असे खासदार डॉ. राणे म्हणाले.

कोकणी जनतेच्या नावावर केवळ राजकारण करून स्वार्थ साधणा-या शिवसेना-भाजपला कोकणातून हद्दपार करा. विकासासाठी काँग्रेस आघाडीला साथ देऊन पुन्हा एकदा लोकसभेत जायची संधी द्या, असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी नगरविकास राज्यमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते हरीश रोग्ये, प्रदेश सचिव हुस्नबानू खलिफे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस महंमद रखांगी आदी उपस्थित होते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version