Home मध्यंतर भन्नाट प्रचितगडाची प्रचिती

प्रचितगडाची प्रचिती

3

संगमेश्वर तालुक्यातील शृंगारपूर या ऐतिहासिक गावाजवळ प्रचितगड आहे. समुद्रसपाटीपासून किल्ल्याची उंची २९०० फूट आहे. किल्ल्याच्या उंचीवरूनच तो चढणं किती जोखमीचं आहे याचा अंदाज येतो. चांदोली अभयारण्यातून वाट काढत पुढं गेल्यावर प्रचितगड समोर उभा ठाकतो. प्रचितगडला जाताना तुमच्यासोबत वाटाडया हवाच, असं सांगितलं जातं. असं का म्हटलं जातं त्याचं उत्तर आम्हाला तेव्हा उमगलं नसलं तरी या प्रचितगडला जाऊन ते शोधण्याचा आम्ही निर्णय घेतला. खरं तर जीवघेणा ट्रेक असला तरी तो आम्ही यशस्वीपूर्ण पार केला. पण तो कसा पार पाडला त्याची ही कहाणी..
कंधार डोहचा जीवघेणा खेळ संपल्यानंतर कानाला खडा लावला आणि पुन्हा ट्रेक करायचा नाही असं ठरवलं होतं. कंधार डोहचा ट्रेक झाल्यानंतर संगमेश्वर येथील एका मित्राकडे रात्री आम्ही मुक्काम केला. दुस-या दिवशी सरळ मुंबईला परतण्याचं ठाम झालं होतं. सकाळी उठल्यावर कंधार डोहच्या त्या आठवणी उगाळल्यानंतर ‘इथपर्यंत येऊन प्रचितगडला गेलो नाही तर काय फायदा? आपण उद्या जाऊया का?’ असा प्रश्न मधेच योगेश ठाकूरने प्रचितगडला जाण्याच्या उत्सुकतेने टाकला. खरं तर योगेशला असलेली उत्कंठा आम्हा सगळ्यांनाच होती. पण, त्या रात्रीच्या थरारक अनुभवानंतर सगळेच जरा घाबरले होते म्हणून बोलण्याचं धाडस कोणीच केलं नाही. योगेशच्या या प्रश्नाला विचार करत का होईना सगळ्यांनीच होकारार्थी उत्तर दिलं. कारण, ट्रेकिंगचं खूळ सगळ्यांच्याच डोक्यात होतं. फक्त हे कोणीतरी बोलण्याची गरज होती. बस.. ठरलं. पटापट फ्रेश झालो. सकाळचा ब्रेकफास्ट केला आणि प्रचितगडला भेट द्यायला निघालो.

संगमेश्वर तालुक्याला सह्याद्रीच्या एका टोकावरून दुस-या टोकाकडे जाता यावे यासाठी शिवरायांनी प्रचितगड आणि कुंडीजवळचा महिमानगड हे दोन किल्ले बनविल्याचे सांगितले जाते. कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी प्रचितगड केला होता असा समज आहे.

प्रचितगडावरून कोयना, पाटण, सातारा यांचं रमणीय दृश्य आपल्याला बघायला मिळतं. सह्याद्रीच्या रांगांवर विसावलेल्या या अद्भूत प्रचितगडाचं दृश्य आम्हाला अनुभवता येईल या आशेने आम्ही आमची पावलं प्रचितगडाच्या दिशेने टाकली होती. प्रचितगडाची चढण जेवढी कठीण होती तेवढंच तिथून उतरणं जोखमीचं होतं. अवघड वाट, घनदाट जंगल हे अंतर कापण्यासाठी आम्हाला अनुभवी वाटाडयाची गरज होती. आम्ही पुन्हा विनायक म्हस्के यांच्या साथीने जाण्याचं ठरवलं. त्यांनी आम्हाला लगेच होकारही दिला. विनायक हे आमच्याबरोबर होतेच, पण योगेश ठाकूर, संजय कासले, विशाल सावंत, अभिजीत शेट्टे यांच्यासारख्या अनुभवी ट्रेकर्सची साथही आम्हाला लाभली होती.

प्रचितगड चढण्यासाठी किमान सहा ते सात तास लागतात. तिथे जाण्यासाठी दोन मार्ग आहेत आणि दोन्ही मार्ग तसे धोक्याचे, पण कंधार डोहपेक्षा जास्त कठीण नसणार या विश्वासाने आम्ही गेलो. नेदरवाडीतून खिंडीमार्गे जाण्याचा एक मार्ग होता. दुसरीकडे डोंगरकडयाचा आधार घेत एका बाजूला दरीची भीती मनात ठेवून प्रचितगड गाठायचा होता. आम्ही जाताना खिंडीमार्गे गेलो. आमचा जातानाचा प्रवास सुखद होता. डोक्यावर आलेल्या उनामुळे सगळ्यांचीच थोडी चिडचिड होत होती. पण, प्रचितगडचा ट्रेक व्यवस्थित पार करण्याचा अट्टहास आम्ही केला होता.

ऊनाचे चटके लागत असले तरी विपुल प्रमाणात असणा-या पाण्यामुळे थोडा गारवाही जाणवत होता. मी आणि संतोष कदम चालत असताना काही मित्र आमच्या पुढे गेल्याचं आमच्या लक्षात आलं. आम्ही पाय पटापट उचलले. कारण, वाटाडयाही आमच्यासोबत नव्हता. त्याक्षणी आम्हाला वाटलं झालं.. आम्ही वाट चुकलो आहोत पण, तसं झालं नव्हतं. थोडयाच अंतरावर आमचा ग्रुप आम्हाला दिसला. कारण, बोलत बोलत आम्ही चार तासांचं अंतर पार करून चांदोली अभयारण्यात जाऊन पोहोचलो होतो. राष्ट्रीय उद्यान म्हणून जाहीर झालेलं चांदोली अभयारण्य म्हणजे घनदाट जंगल.

सगळीकडे हिरवळ अशा निसर्गाच्या सुंदर वातावरणात गेल्यावर सगळ्याच सुख-दुखांचा विसर आम्हाला पडला होता. हो! पण या गर्द झाडीत प्राण्यांचेही आवाज आम्हाला येत होते. अशा घनदाट जंगलातून वाट काढत आम्ही जांभ्या कातळाच्या सडयावर येऊन पोहोचलो. या सडयातून दोन तासांच्या पायपिटीनंतर आम्ही प्रचितगडावर जाऊन पोहोचलो. कंधारडोहच्या अयशस्वी ट्रेकिंगनंतर प्रचितगडाला पोहोचल्याचं समाधान आमच्या सगळ्यांच्याच चेह-यावर स्पष्ट दिसून येत होतं. योगेशला तर काय करू आणि काय नको असं झालं होतं. गडाच्या प्रवेशद्वारातून शिरताना एका महालात आल्यासारखं वाटतं. खरं तर, कित्येक वर्षापूर्वीच असल्यामुळे काही गोष्टी संपुष्टात आल्या असल्या तरी गडाचं ते दृश्य पाहताना डोळे तृप्त होत होते.

गडाचं अद्भुत दृश्य न्याहाळताना आम्ही गडाच्या मध्यभागी असणा-या भवानी देवीच्या मंदिराकडे जाऊन पोहोचलो. ‘जय शिवाजी जय भवानी’ असा गजर करत आम्ही एक उतार उतरून गडाच्या पूर्व बाजूस आलो. तेथे जलमहाल दिसला. थंडगार पाण्याची टाकी म्हणजे जलमहाल. जलमहालाची खोली किती असेल याचा अंदाज बांधता येत नसला तरी तो पाहताना शिवकाळात गेल्यासारखं वाटत होतं. त्या शिवरायांच्या काळातला तो गड पाहून आम्ही धन्य झालो होतो. या गडाचे बारकावे डोळ्यात आणि कॅमे-यात बंदिस्त करून आम्ही तो उभा प्रचितगड उतरायला सुरुवात केली. खाली उतरण्याची इच्छा आम्हा कोणाला नव्हती पण उतरणं गरजेचं होतं. चढताना आम्ही खिंडीच्या मार्गाने आल्यामुळे आम्हाला सहा-सात तास लागले. चढल्यामुळे आमचं शरीरही थकून गेलं होतं. म्हणून आम्ही दुस-या मार्गाने उतरण्याचं ठरवलं. कारण, त्या मार्गाने आम्हाला फक्त दोन ते तीन तास लागणार होते. खरं तर, तिथून उतरणं धोक्याचं होतं कारण एकीकडे उभा डोंगर, दुसरीकडे खोल दरी यातून मार्ग काढून आम्हाला खाली उतरायचं होतं. पण वेळ कमी असल्यामुळे आम्ही तिथून जाण्याचा निर्णय घेतला. आमचा हा निर्णय चुकीचा होता असं म्हणायला हरकत नाही.

मी, संजय कासले, विशाल सावंत, सचिन तोरसकर, श्याम शेट्टी हळूहळू पावलं टाकत होतो. आमच्या मागे संतोष, अभिजीत किरवे, प्रशांत पुजारी, केशवर केलावाला हे मित्र घाबरत येत होते. थोडं अंतर कापल्यानंतर प्रचितगडाचं एक वळण आलं जिथे आम्ही सगळेच घाबरलो. कारण, इंग्रजीतल्या ‘यू’ अक्षरासारखं ते वळण होतं, त्यात फक्त एक ते दीड फूटच रुंद असणारी पायवाट होती आणि तिची लांबी किमान चार ते पाच फुटांची असावी. त्या वळणावरून जाताना एखाद्याचा पाय घसरला तर त्याचे अवशेषही मिळतील की नाही याची शंकाच होती. या सगळ्या गोंधळात श्यामने हिंमत दाखवली आणि तो पहिला पुढे गेला. तो अशा प्रकारे उभा राहिला की त्याच्या हाताला धरून सगळे जातील आणि कोणीच घाबरणार नाही. त्याच्या या हिंमतीचं जेवढं कौतुक करावं तितकं कमीच आहे. नकळत त्याच्यामुळे सगळ्यांनाच हिंमत आली. त्याला धरून एक एक करून सगळे त्या वळणावरून पुढे गेले. सगळे व्यवस्थित पोहोचल्याची खात्री करून श्याम पुढे आला. म्हणतात ना ‘दोस्ती के लिए जान भी हाजीर है’. खरंच आज श्यामने ते करून दाखवलं होतं. आता थोडा काळोखही झाला होता. पण काळोख जास्त होण्याअगोदर आम्हाला काही टप्पे पार करायचे होते. कारण, काळोख झाल्यानंतर ती वाट उतरणं शक्यच नव्हतं. खाली उतरण्यासाठी आम्ही रोप टाकले. रोप टाकण्यातच आमचा बराच वेळ गेला आणि आता चांगलाच अंधार झाला होता. आम्ही रोपच्या मदतीने खाली उतरत होतो. योगेश आणि श्याम हे दोघे उतरले. त्यांच्या मागोमाग अभिजीत आणि संजय आला. संजय उतरल्यानंतर मी उतरलो. आता उतरण्याची वेळ होती ती संतोषची. अंधार वाढल्यामुळे संतोष चांगलाच घाबरला होता. आम्ही सगळेच जण त्याला बोलत होतो की अरे, खाली उतर, पण तो उतरायलाच तयार नव्हता. तो म्हणायला लागला, मला रोपवर विश्वास आहे पण माझ्या हातांवर नाही. तो तसाच काही वेळ तिथे थांबून राहिला. आता मात्र खूपच उशीर झाला होता, म्हणून आम्ही त्याला ओरडू लागलो.

पण तो ऐकायलाच तयार नाही. आमच्यातलं कोणीही पुन्हा वर चढू शकत नव्हतं म्हणून सगळेच शांत उभे राहिले. आम्ही खाली बसलो होतो, तेवढयात काही तरी खाली आल्याचा आवाज आला. आम्हाला वाटलं संतोषचा तोल गेला की काय? कारण, जर त्याचा तोल गेला तर तो आम्हाला पुन्हा कधीच दिसला नसता. पण तो संतोष नसून संतोषने फेकलेली बॅग होती. ती बॅग सुदैवाने माझ्याच हाती लागली. आमच्या जीवात जीव आला की तो आमचा संतोष नाही.

पुन्हा आम्ही संतोषला हाक मारली. संतोष बोलला, ‘मी उतरतो आहे, तुम्ही मला पकडा’. आम्ही हो म्हणालो. रोपवरून उतरताना तो पडला असता तर आम्ही त्याला पकडू शकलो नसतो. फक्त त्याचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी आम्ही त्याला हो म्हणालो. काही वेळाने संतोष उतरला. त्याला बघून आम्हाला खूप बरं वाटलं. या दोन थरारक अनुभवानंतर पुढचा मार्ग तसा व्यवस्थित होता. आम्ही कुठेही न थांबता रात्रीच खाली उतरलो. रात्र झाल्यामुळे गावक-यांना वाटलं ही मुलं गेली कुठं? त्या गावक-यांशी आमचं कोणतंही नातं नसताना फक्त माणुसकीच्या नात्याने ते आम्हाला शोधत होते. वाटेतच ते आम्हाला भेटले. त्यांना आम्हाला बघून खूप बरं वाटलं असावं, असं त्यांच्या डोळ्यातून दिसत होतं.

जीवावर बेतलेल्या कंधार डोहाने आमचे डोळे चांगलेच उघडले होते. तरीही पुन्हा आम्ही प्रचितगडाच्या जीवघेण्या वाटेवरून आलो होतो. गावकरी म्हणायला लागले की भर दिवसादेखील त्या वाटेनं येणं कठीण असतं आणि तुम्ही रात्री आलात म्हणजे मोठीच गोष्ट आहे. काहीही असो, पण ते क्षण आमच्या आयुष्यभर लक्षात राहण्यासारखे आहेत. प्रचितगडाला जाऊन माणुसकी आजही जिवंत असल्याची प्रचिती मला श्याम आणि त्या गावक-यांमुळे आली होती.

शब्दांकन : श्रद्धा कदम – पाटकर

3 COMMENTS

  1. गड चढणे सोपे आहे. मी आणि माझा मित्र रवी जगधने आम्ही कोणाला बरोबर न घेता गडावर जाऊन माघारी आनंदात आलोत. घाबरठ लोकांच काम नाही ते. तुमच्या सारखी घाबरठ लोकं दुस-यांना पण घाबरवतात.

    • हो खरच थोड़ी भीती वाटल्य शिवाय ट्रैक कसा होनार है फक्त तोच समजु शकोत जो ट्रैकर आहे आनी
      (please save the animal & natur )
      thanks to इन्फो

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version