Home संपादकीय अग्रलेख मुख्यमंत्र्यांचे आकडेशास्त्र!

मुख्यमंत्र्यांचे आकडेशास्त्र!

1

भाजपवाल्यांची डोकी फार विलक्षण आहेत. त्यांच्याजवळील प्रचार यंत्रणाही गोबेल्स तंत्राला मागे टाकील, अशी आहे. त्यांच्याकडील ‘थिंक टँक’ ज्या गोष्टी सुचतात, त्या व्हॉट्सअ‍ॅपवर लगेच पडतात. प्रचारात ते आघाडीवर असतात आणि खोटय़ा प्रचारात पहिल्या क्रमांकावर असतात.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४६ महानगरपालिकांचा निकाल लागल्यानंतर प्रदेशाध्यक्ष दानवे यांना पेढा भरवला. पेढा भरवतानाची छायाचित्रे सर्वत्र झळकली. दानवे यांना पेढा काही गोड लागला असेल असे वाटत नाही. शिवाय पेढा भरवण्याकरिता मुख्यमंत्र्यांनी जो माणूस निवडला तो पण प्रदेशाध्यक्ष, ज्याने सगळा जालना जिल्हा गमावला आणि भोकरदन या दानवे यांच्या गावात भाजपाला सपाटून मार पडला. त्याच दानवे यांच्या तोंडात पेढा कोंबून मुख्यमंत्र्यांनी त्यांना तो खायला लावला. दानवेही असे हुश्शार की, ‘पडलो तरी नाक वर’ या थाटात त्यांनी एक नाही तर दुसरा पेढा मागवून घेतला आणि तोही खाल्ला. दानवेंना पेढा भरवताना मुख्यमंत्र्यांनी एक टिपण्णी केली. ती टिपण्णी अशी आहे की, ‘नगरपालिकांचा निकाल म्हणजे नोटाबंदीला कौल..’ आता मुख्यमंत्र्यांच्या या निवेदनानंतर त्यात प्रसिद्ध झालेले आकडे मुख्यमंत्र्यांनी जर पाहिले तर त्यांना गणित कळते का? हा प्रश्न विचारावा लागेल. १४६ नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भाजपाचे निवडून आलेले नगरसेवक ८९३ आहेत. त्यात एकटय़ा विदर्भातील भाजपा नगरसेवकांचा आकडा ४४९ आहे. म्हणजे भाजपाला जे यश मिळाले आहे, त्यातील ५० टक्के यश हे विदर्भातील आहे. विदर्भाचा आकडा वजा केला तर उर्वरित महाराष्ट्रात फक्त ४४५ जागांवर भाजपाचे नगरसेवक निवडून आलेले आहेत आणि उर्वरित महाराष्ट्राचा हिशेब केला तर शिवसेनेचे ४१६ नगरसेवक बाजूला ठेवले, तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या उर्वरित महाराष्ट्रातून निवडून आलेल्या नगरसेवकांची संख्या १०२५ आहे. आता जर मुख्यमंत्र्यांना असे वाटत असेल की, ४४५ नगरसेवक उर्वरित महाराष्ट्रात निवडून आल्यानंतर त्यांच्याविरोधात १०२५ नगरसेवक निवडून आले असताना हा नोटाबंदीला मिळालेला कौल आहे. तर हा कौल नोटाबंदीच्या विरोधातील आहे. आकडे आणि त्याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना कळत असेल. १०२५ नगरसेवक जिथे निवडून येतात त्यांच्या विरोधात भाजपाचे फक्त ४४५ नगरसेवक आहेत. तेव्हा मुख्यमंत्र्यांच्या आकडेशास्त्रांची कीव करावीशी वाटते. ते कुठल्या कॉलेजमध्ये शिकले आणि गणित विषय घेऊन शिकले माहिती नाही, पण साधे शेंबडे पोरही सांगू शकेल की, विदर्भ सोडला तर महाराष्ट्राने भाजपाला नाकारलेले आहे. शिवसेनेची भूमिका नोटाबंदीच्या विरोधातच आहे. ते म्हणताना म्हणत असले की, नोटाबंदीला विरोध नाही. पण या निर्णयाच्या विरोधात त्यांनी मोदींची सालटी काढलेली आहेत. त्या शिवसेनेला विदर्भ वगळून ४१६ जागा मिळालेल्या आहेत. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १०२५ + शिवसेनेच्या ४१६ या १४४१ जागा भाजपाच्या विरोधात उर्वरित महाराष्ट्रात निवडून आल्या. म्हणजे बरोबर १००० जागांनी उर्वरित महाराष्ट्रात मागे आहे. तरी मुख्यमंत्री सांगत आहेत, हा नोटाबंदीचा कौल आहे.

आता विदर्भ धरून आकडेवारी पाहिली तर काँग्रेसचे नगरसेवक ७२७ जागांवर विजयी झालेले आहेत आणि राष्ट्रवादीचे ६१५ जागांवर विजयी झालेले आहेत. म्हणजे विदर्भातही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने १३४२ जागा मिळवलेल्या आहेत आणि भाजपाच्या नगरसेवकांची एकूण संख्या (विदर्भ धरून) ८९३ आहे. म्हणजे काँग्रेस-राष्ट्रवादी दोन्ही पक्ष एक झाले असते, तर भाजपाची धुळधाण उडाली असती. पण मुख्यमंत्री खुशीत आहेत. हा विजय नोटाबंदीचा विजय आहे, असे त्यांना वाटते आहे. अर्थात या समजुतीत मुख्यमंत्री आहेत ही चांगलीच गोष्ट आहे आणि त्या भ्रमातच त्यांनी राहावे.

नगर परिषदांच्या दुस-या टप्प्याचे मतदान १४ डिसेंबरला आहे. म्हणजे १५ दिवसांवरच दुसरा टप्पा आहे. या दुस-या टप्प्यात पुणे जिल्ह्यातील दहा आणि लातूर जिल्ह्यातील चार नगर परिषदांच्या ३२४ जागांसाठी मतदान आहे. सध्या भाजपाचा गड असलेला विदर्भ वजा केला तर उर्वरित महाराष्ट्रात भाजपाची ताकद नेमकी किती, हे आता या १४ नगरपालिकांत दिसेल. तळेगाव-दाभाडे, लोणावळा, आळंदी, बारामती, दौंड, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड आणि शिरूर या पुणे जिल्ह्यातील नगर परिषदा आणि लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, उदगीर अहमदपूर या चार नगर परिषदा अशा चौदा नगर परिषदांमध्ये मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेल्या नोटाबंदीचा कौल आता याच १४ नगर परिषदांमध्ये कसोटीला लागेल. काँग्रेस-राष्ट्रवादीने थोडा शहाणपणा केला तर पुणे जिल्ह्यातील बहुसंख्य नगर परिषदा राष्ट्रवादी जिंकू शकेल आणि लातूर जिल्ह्यातील चारही नगर परिषदा काँग्रेस जिंकू शकेल. नोटाबंदी झाल्यानंतर जनतेला झालेला त्रास आणि हाल याचे प्रतिबिंब पाहायचे असेल तर ते कुठेही पाहता येईल.

या चौदा नगर परिषदांची जबाबदारी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दोन्ही नेत्यांनी अतिशय व्यवस्थित आखणी करून अंगावर घेतली, तर पहिल्या टप्प्यातील निवडणुकीत भाजपाला जे काही यश मिळाले आणि त्याचे जे ढोल वाजत आहेत, तो ढोल या चौदा नगर परिषदांच्या निवडणुकांत दोन्ही बाजूने फुटेल, इतकी या नगर परिषदांत काँग्रेस-राष्ट्रवादीला अनुकूल परिस्थिती आहे. जर एकमेकांच्या उरावर बसून एकमेकांना पाडण्याचा कार्यक्रम करायचा असेल तर मग काँग्रेस-राष्ट्रवादीला कोणीच वाचवू शकणार नाही.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version