Home कोलाज मुलामुलींमध्ये संशोधक वृत्ती जागविणारी कार्यशाळा

मुलामुलींमध्ये संशोधक वृत्ती जागविणारी कार्यशाळा

2

मुलामुलींमधील जिज्ञासूवृत्ती वाढावी, त्यांच्यातील कृतिशीलता व निरीक्षण क्षमता वाढावी, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानजागृती व्हावी यासाठी कराडमध्ये १ जुलै २००६ पासून शासनमान्य नोंदणीकृत ‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ सुरू झाले.

मुलामुलींमधील जिज्ञासूवृत्ती वाढावी, त्यांच्यातील कृतिशीलता व निरीक्षण क्षमता वाढावी, वैज्ञानिक दृष्टिकोन, विज्ञानजागृती व्हावी यासाठी कराडमध्ये १ जुलै २००६ पासून शासनमान्य नोंदणीकृत ‘डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र’ सुरू झाले.

केवळ विज्ञान दिनाच्या वेळी विज्ञानविषयक उपक्रम ठिकठिकाणी घेतले जातात, पण या केंद्रात रोजचा दिवसच विज्ञान दिन असतो. दर रविवारी दोन तास इ. ४ थी ते पदवीपर्यंतची मराठी व इंग्रजी माध्यमातील मुले एकत्र येतात. आणि विज्ञान व तंत्रज्ञान वेगळ्या पद्धतीने शिकतात.

या विज्ञान केंद्राच्या उपक्रमामध्ये पक्षी निरीक्षण, आकाश निरीक्षण, वनस्पतींची ओळख, विज्ञान प्रतिकृती तयार करणे, खेळणीतून विज्ञान, माहिती तंत्रज्ञान, विज्ञान सहली, शास्त्रज्ञांची व्याख्याने, चर्चासत्रे, विज्ञान प्रश्नमंजूषा, विज्ञान, पर्यावरणविषयक चित्रपट, नाटके, विज्ञानविषयक, ग्रंथालय, जंगलभ्रमंती, गडकिल्ले भ्रमण, औद्योगिक क्षेत्रांना भेटी, आधुनिक शेती केंद्रांना भेटी, इ.चे आयोजन केले जाते.वर्षभरातील ५२ रविवार आणि इतर सुट्टीचे दिवस यामध्ये हे उपक्रम होतात. दिवाळीच्या सुट्टीत मुक्कामी सहलीचे आयोजन केले जाते.

विज्ञान केंद्रातील मुले दर रविवारी आतुरतेने वाट पाहतात. इतर दिवशी विज्ञान केंद्र आणि फक्त रविवारी शाळा असावी, असे इथे येणा-या प्रत्येक विद्यार्थ्यांला वाटते. इथे ठरावीक अभ्यासक्रम नाही, कोणतीही परीक्षा नाही, त्यामुळे विद्यार्थी कोणतेही टेन्शन न घेता विज्ञान केंद्रात येतात.

प्रत्येक रविवारी नावीन्य असते. स्लाईड शो, माहिती, मॉडेल बनवणे यामुळे विद्यार्थी रमतात. एखाद्या रविवारी येता आले नाही तर मुलांना चुकल्यासारखे वाटते.

आजच्या काळात पालकांनी मुलांना तू अमूक एक कोर्स कर, ही साईड घे, असे सांगण्यापेक्षा मुलांनी आता स्वत: ठरवायचे आहे मला काय आवडते आणि त्यानुसारच त्यांनी शिक्षण घ्यायला हवे. कारण आवडीचे काम मिळाले तर ते अधिक चांगले होते. नोकरी किंवा व्यवसाय आवडीशी संबंधित असेल, तर त्यातून उत्पन्नाबरोबरच समाधानही मिळते.

आणि आपली ही आवड ओळखण्यासाठी मदत करते आमचे डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र. दार उघडायचा प्रयत्न केव्हा होतो ते दिसते तेव्हा. पण जर दारच दिसले नाही तर? अशी दारे दाखवण्याचे काम करते आमचे डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र.

विषय शिकवण्याची पद्धतही नावीन्यपूर्ण विज्ञान केंद्रातील मुले एखाद्या विमानाची प्रतिकृती तयार करणार असतील तर त्याआधी ही मुले विमानबांधणीशास्त्र, वायुगतीशास्त्र यांच्या संकल्पना समजून घेतात.

त्यासाठी जाणकार अभ्यासक, वैमानिक यांना बोलावले जाते. रिमोटच्या विमानाच्या सहाय्याने, दुर्मीळ चित्रफितींच्या सहाय्याने मार्गदर्शन केले जाते. आणि जेव्हा विमान म्हणजे काय? हे समजते तेव्हा हे विद्यार्थी विमानाची प्रतिकृती तयार करतात.

आकाश निरीक्षण करण्यापूर्वी तज्ज्ञ मार्गदर्शक बिग बॅन थिअरी, ग्रहांची निर्मिती, आकाशगंगा, तारे यांची माहिती स्लाईड-शोच्या साह्याने देतात. आणि नंतर कराडच्या स्टेडियमवर पूर्ण ब्लॅक आऊट करून नुसत्या डोळ्यांनी नक्षत्रे, तारे, ग्रह यांची ओळख करून देतात.

हे सर्व पुन्हा ७ इंची, ४ इंची दुर्बिणीमधून दाखवले जाते. यात पालकांचा देखील सहभाग असतो. शनीचे कडे, त्याचे उपग्रह दुर्बिणीमधून पाहिल्यानंतर शनीबद्दलच्या अंधश्रद्धा नक्कीच दूर होतात.

कराडच्या प्रीतीसंगम बागेत अनेक प्रकारची झाडे आहेत. संस्थेचे उपाध्यक्ष, वनस्पतीशास्त्र डॉ. सी. बी. साळुंके प्रत्येक झाडाजवळ जाऊन झाडाची ओळख करून देतात. यामुळे मुलांना झाडाची प्रचलित नावे, इंग्रजी नावे, शास्त्रीय नावे, त्यांचे औषधी उपयोग यांची माहिती मिळते.

कराड परिसरातील १४७ पक्ष्यांची चेक-लिस्ट विज्ञान केंद्राचे उपाध्यक्ष व पक्षीमित्र डॉ. एस. एस. पाटील यांनी तयार केली आहे. इतर वेळी मुले लवकर उठणार नाहीत, पण पक्षीनिरीक्षणाच्या वेळी पहाटे ५.३० वाजता ठरलेल्या ठिकाणी पालकांसोबत हजर.

कराडच्या मिलिटरी बॉईज हॉस्टेल परिसर आणि कृष्णाकाठाने या मुलांना पक्षीनिरीक्षक डॉ. एस. एस. पाटील, डॉ. सुधीर कुंभार, अमृत करमरकर घेऊन जातात. पक्ष्यांची ओळख करून देतात, जंगलवाचन कसे करावे हे शिकवतात.

मानवी शरीराचे विविध अवयव आणि त्यांची कार्ये ही विज्ञान केंद्रात उपलब्ध असणा-या मानवी शरीराच्या प्रतिकृतींवरून आणि सॉफ्टवेअरच्या साह्याने शिकवतात. संस्थेचे अध्यक्ष डॉ. शंतनू कुलकर्णी आणि सदस्या डॉ. सौ. शैलजा कुलकर्णी आणि त्यानंतर मुले मानवी शरीराची प्रतिकृती तयार करतात.

विमाने, रॉकेट, क्षेपणास्त्रे, स्पेसशटल, उपग्रह यांबद्दल सखोल माहिती देतात. संस्थेचे सचिव श्री. संजय पुजारी आणि नंतर त्यांच्या प्रतिकृती मुलांकडून तयार करून घेतात. विज्ञानकथा, विज्ञानातील गमतीजमती सांगण्याचे काम करतात.

संचालिका सौ. नेहा पुजारी पाणी शुद्धीकरण, पाण्याचे महत्त्व याचे मार्गदर्शन करतात. संस्थेचे सदस्य श्री. सुहास इनामदार हे कराड नगरपालिकेत पाणीपुरवठा विभागात अभियंता आहेत. यांनीच डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्राचे प्रेरणागीत लिहिले आहे. विद्युतशक्ती, विद्युतजनित्र, विद्युत मोटार याविषयची प्रात्यक्षिके दाखवतात.

प्रा. आर. डी. कदम आणि नंतर मुले स्वत: एक डीसी मोटार त्यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करतात. अशाप्रकारे तऱ्हेतऱ्हेचे नावीन्यपूर्ण विषय मुलांसमोर मांडले जातात.

शाळेच्या पाठय़पुस्तकातले काही शिकवले जात नाही, पण सर्व विषय त्याला पूरक मात्र असतात. संस्थेमार्फत कधी एका दिवसाच्या तर कधी मुक्कामी अभ्यास सहली आखल्या जातात.

पावसाळ्यात मुलांना एखाद्या घाटात नेऊन दिसेल त्या झाडाची, पक्ष्यांची, सापांची, कीटकांची, दगडांची माहिती दिली जाते. संस्थेचे उपाध्यक्ष श्री. एस. एस. पाटील यांनी तर मुलांना दहा/पंधरा प्रकारचे गांडूळ पकडून दाखवले, त्यांची वैशिष्टये सांगितली.

नुकतीच दिवाळीच्या सुट्टीत इतिहास- पर्यावरणासंबंधी रायगड ट्रीप आखली होती. श्री. के. एन. देसाई सर बरोबर होते. त्यांनी पाचशेवेळा रायगड पाहिला आहे. महाराष्ट्रातील सर्व किल्ले त्यांना तोंडपाठ आहेत. सरांनी विद्यार्थ्यांना, पालकांना किल्ल्याचा इतिहास तर सांगितलाच, पण किल्ला पाहवा हे देखील सांगितले.

दरवर्षी २८ फेब्रुवारी या विज्ञान दिनी जगातली सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण (जीएमआरटी) नारायणगाव, खोडद येथे अभ्याससहल आखली जाते. रेडिओ दुर्बीण म्हणजे काय? तिचे काम कसे चालते, त्यामार्फत अवकाशनिरीक्षण कसे केले जाते. याची माहिती मुलांना मिळते.

याशिवाय दर महिन्याला नामवंत शास्त्रज्ञांच्या व्याख्यानाचे आयोजन केले जाते. श्री. मोहन आपटे सरांची सूर्यमालेतील सृष्टीचमत्कार, स्पेस शटल ते स्पेस स्टेशन, चंद्रलोक ही व्याख्याने आयोजित केली होती. डॉ. पंडित विद्यासागर यांनी कॉम्प्युटर व ब्रेन याविषयी सुंदर व्याख्यान दिले.

विज्ञान लेखक श्री. रघुवीर साखवळकर यांनी सोपे प्रयोग सोप्या भाषेत मुलांसमोर मांडले. अमेरिकेत जेनेटिक्सवर काम करणारे शास्त्रज्ञ डॉ. विपुल राणा, डॉ. अपर्णा राणा यांनी आपल्या संशोधनाविषयी माहिती दिली.

इस्रेमध्ये चांद्रयान प्रकल्पावर काम केलेले श्री. सुरेश नाईक सर यांनी चांद्रयानासंबंधी स्लाईड-शो सह व्याख्यान दिले. माधव खरे यांनी विमानविषयी दुर्मीळ फिल्मस दाखवल्या. विमानाचा इतिहास, सध्या चालू असलेले अद्ययावत संशोधन, विमान क्षेत्रात असणा-या करिअरच्या संधी याविषयीही मार्गदर्शन केले.

डॉ. कल्पना चावला यांचे वडील श्री. बनारसीलाल चावला यांनी आतापर्यंत दोन वेळा संस्थेला भेट दिली आहे व संस्थेच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले आहे. त्यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम संस्थेने आयोजित केला होता.

संस्थेतील मुलांना पुणे विद्यापीठात जाऊन शास्त्रज्ञ श्री. जयंत नारळीकर यांची भेट घेण्याची, त्यांना प्रश्न विचारण्याची तसेच श्री. अरविंद गुप्ता यांच्याकडून विविध प्रयोग शिकण्याचीही संधी ट्रीपच्या आयोजनामुळे लाभली आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमातही संस्था मागे नाही. संस्थेने डॉ. शरद भुथाडिया यांचा ‘आईन्स्टाईन- एक सापेक्षता सांगणारा माणूस’ हा नाटय़प्रयोग आयोजित केला होता.

मे २००८ मध्ये ‘धमाल विज्ञानाची’ हा ३४ बालकलाकारांचा सहभाग असलेला विज्ञान कथेवर आधारित बालचित्रपट तयार केला. यात न्यूटन, एडिसन व गॅलिलिओ हे तीन शास्त्रज्ञ मुलांना भेटतात व आपले प्रयोग करून दाखवतात, अशी कल्पना आहे. यात अपारंपरिक ऊर्जेचे महत्त्व व या उपकरणांचे चित्रण आहे. यात दोन विज्ञान गीतांचाही समावेश आहे.

मा. हेमंत मोने यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी व पालकांसाठी आकाशनिरीक्षण कार्यशाळा घेण्यात आली. तसेच मुंबई विद्यापीठातील भौतिक शास्त्राचे प्राध्यापक बी. डी. चक्रदेव यांनी विज्ञानातील मनोरंजक प्रयोग अनेक विज्ञानप्रेमी विद्यार्थी, पालकांसमोर सादर केले. प्रा. सुनील कुलकर्णी यांनी खेळणीतून विज्ञान हा एक विद्यार्थ्यांचा कृतीयुक्त सहभाग असलेला उपक्रम सादर केला.

विज्ञान केंद्राचे स्वतंत्र ग्रंथालयही आहे. विज्ञानासंबंधी दोन हजार पुस्तके आहेत. यात नासा, डिस्कव्हरी चॅनेल यांची अनेक पुस्तके डॉ. कल्पना चावलाच्या मोठया भगिनी सुनीता दीदी यांनी दिली आहेत. ग्रंथालयात निसर्ग, पर्यावरण, विज्ञान, तंत्रज्ञान, शास्त्रज्ञांची चरित्रे, विश्वकोश, लहान मुलांचे विज्ञानविषयक कोश उपलब्ध आहेत.

रोज पुस्तकांची देवाणघेवाण केली जाते. वर्षभरात कोणी किती पुस्तके वाचतो यावर वाचक स्पर्धा घेतली जाते. आणि त्यांना त्यांच्या आवडीचे ग्रंथ भेट दिले जातात. यामुळे मुलांमध्ये वाचनाची आवड वाढू लागली आहे व टीव्ही पाहण्याचे प्रमाणही लक्षात यावे इतके कमी झाले आहे. असा अनेक पालकांचा अनुभव आहे. विज्ञान केंद्रातील मुलांच्या वाढदिवसाला देखील विज्ञानविषयक पुस्तके भेट दिली जातात.

याचबरोबर सी.डी., डीव्हीडीचा देखील मोठा संग्रह आहे. यामध्ये नासा, इस्रे, विज्ञान प्रसार केंद्र, नॉयडा, दिल्ली, बालचित्रवाणी, डिस्कव्हरी चॅनल, अ‍ॅनिमल प्लॅनेट यांच्या निसर्ग, पर्यावरण, अवकाश, खगोलशास्त्र, मानवी शरीररचना, प्राणी, पक्षी, वनस्पती या विषयीच्या फिल्म उपलब्ध आहेत. तसेच विज्ञान, तंत्रज्ञान विषयाचे विविध देशांचे चित्रपट देखील आहेत. अधून मधून डी. एल. पी. प्रोजेक्टच्या साह्याने एखादी फिल्म मोठया पडद्यावर दाखवली जाते, नंतर प्रश्नोत्तर पद्धतीने त्यावर चर्चा केली जाते.

विविध प्रकारचे विज्ञानविषयक प्रयोगांचे साहित्यदेखील उपलब्ध आहे. ध्वनी, प्रकाश, उष्णता, यांत्रिकी, न्यूटनचे गतीविषयक नियम, एडिसनचा ग्रामोफोन, प्लाईमा स्थिती, गॅलिलिओचे लंबकाचे प्रयोग, विविध प्रकारचे कॅमेरे, आकाशनिरीक्षणाच्या दुर्बिणी असे अनेक प्रकारचे प्रयोगाचे साहित्य आहे.

शाळेत विद्यार्थी संख्या जास्त असल्याने प्रत्येक मुलाला प्रयोगाचे साहित्य हाताळायला मिळते, असे नाही. शिक्षक दिग्दर्शक पद्धतीने विज्ञानाचे प्रयोग दाखवतात. मग विज्ञान केंद्रातील विद्यार्थ्यांना प्रत्येक प्रयोग हाताळायला दिला जातो. वेगवेगळ्या पद्धतीने एकच प्रयोग कसा करता येईल याचे मार्गदर्शन केले जाते.

प्रयोगाच्या साहित्याबरोबरच राईट बंधूंच्या विमानापासून विविध प्रकारच्या विमानांचा संग्रह, प्रतिकृतींचा संग्रह, रॉकेट, मिसाईल, उपग्रह, स्पेशशटल यांच्या प्रतिकृतीदेखील विज्ञान केंद्रात उपलब्ध आहेत.
अल्पावधीतच विज्ञान क्षेत्रात कराडचे डॉ. कल्पना चावला विज्ञान केंद्र लोकप्रिय झाले आहे. विद्यार्थी, पालक, नागरिक यांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. इस्लामपूरच्या आदर्श विद्यामंदिरातही शाखा सुरू झाली आहे. लवकरच स्वत:ची जागा घेऊन संस्था विज्ञानप्रयोगशाळा, तारांगण, बोटॅनिकल गार्डन उभे करण्याच्या प्रयत्नात आहे.

डॉ. कल्पना चावलाच्या विचाराने प्रेरित होऊन संस्थेचे काम सुरू आहे. ‘स्वप्नाकडून’ सत्याकडे जाणारा मार्ग अस्तित्वात आहे. तो शोधण्याची जिद्द आणि धैर्य तुमच्याकडे असले पाहिजे! यासाठी विज्ञान केंद्राचे प्रेरणागीत प्रत्येकाला नेहमी प्रेरणा देत असते.

‘ज्ञानयोगी होऊन आम्ही, विज्ञानाचे पंख करू,
तारे सारे मोजून येऊ, सूर्यालाही थक्क करू,
अष्टग्रहांना जिंकून घेऊ, भव्य ही संकल्पना,
आदर्श आहे कल्पना, अन् प्रेरणा ती कल्पना.’

2 COMMENTS

  1. खुप चांगला उपक्रम आहे. प्रत्येक शहराने कराड चा आदर्श घेवून अशी केंद्र सुरू करावे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version