Home टॉप स्टोरी ‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’

‘लेक वाचवा, राष्ट्र वाचवा’

1

‘एकीकडे स्त्रीला दुर्गा, सावित्री, लक्ष्मी म्हणून पूजायचे आणि दुसरीकडे ‘मुलगी नको’ म्हणत गर्भातच तिची हत्या करायची, तिचा जन्म घेण्याचा अधिकार नाकारायचा या वृत्तीने मुलींचा जन्मदर घटला आहे. 
‘एकीकडे स्त्रीला दुर्गा, सावित्री, लक्ष्मी म्हणून पूजायचे आणि दुसरीकडे ‘मुलगी नको’ म्हणत गर्भातच तिची हत्या करायची, तिचा जन्म घेण्याचा अधिकार नाकारायचा या वृत्तीने मुलींचा जन्मदर घटला आहे. त्यामुळे अनेक सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

मुलगी शिकली तर तीही कुटुंबाचा आर्थिक आधार होऊ शकते, ही भावना समाजात रुजली तर जन्माला येण्यापूर्वीच भ्रूणहत्या होणार नाही,’ अशा शब्दांत महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्री, स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या सुकन्या सौ. पंकजा मुंडे-पालवे यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

दैनिक ‘प्रहार’ने जागतिक महिला दिनानिमित्त आयोजित केलेल्या विशेष पुरवणीचे स्वागत करून श्रीमती पंकजा मुंडे यांनी या महिला दिनासाठी समस्त महिलांना शुभेच्छा दिल्या. दैनिक ‘प्रहार’ने महिलांसाठी विशेष पुरवणीचे आयोजन केल्याबद्दल आणि त्या पुरवणीमध्ये कष्टकरी महिलांना प्राधान्य दिल्याबद्दल पंकजा मुंडे यांनी ‘प्रहार’चे अभिनंदन केले.

आपल्या विशेष चर्चेमध्ये मत व्यक्त करताना श्रीमती पंकजा यांनी सांगितले की, जग कितीही पुढे गेले असले तरी महिलांच्या प्रश्नांबाबत मोठय़ा प्रमाणात जनजागृती केली पाहिजे. वृत्तपत्रांनी यासाठी पुढाकार घ्यावा.

महाराष्ट्रातल्या आजच्या भीषण दुष्काळात सर्वाधिक त्रास महिलांना होतो, याची जाणीव असलेल्या पंकजाताईंनी सांगितले की, ‘दुष्काळात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. तो कमी करण्यासाठी जलसंधारणाच्या माध्यमातून पावसाचे जास्तीत जास्त पाणी जमिनीत जिरवून पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मंत्री म्हणून आणि माझ्याकडचे खाते म्हणून मी प्राधान्य देणार आहे.

भाजपाचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची मुलगी पंकजा मुंडे या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात प्रमुख मंत्री आहेत. त्यांच्याकडे विविध चार खात्यांचा पदभार आहे. महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर दैनिक ‘प्रहार’शी बोलताना पंकजा मुंडे म्हणाल्या, ‘अनादिकालापासून समाजव्यवस्थेत महिला दुर्लक्षित राहिल्यामुळे क्षमता असूनही त्यांना कर्तृत्व सिद्ध करण्याची संधी मिळाली नाही.

अलीकडच्या काळात सर्वच क्षेत्रात महिला संधी मिळताच कर्तृत्व सिद्ध करतानाच समाजाला दिशा मिळेल, असे काम अनेक महिलांकडून होत आहे. तरीही पारंपरिक रूढी, अंधश्रद्धा, परंपरातून वंशाचा दिवा म्हणून मुलाचा हट्ट धरला जात असल्याने स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार सुरू झाले. यातून मुलींची संख्या कमी झाल्याने सामाजिक प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत.

सामाजिक संतुलन कायम ठेवण्यासाठी मुलांबरोबरच मुलींची संख्या आवश्यक असल्याने ‘स्त्रीभ्रूण हत्ये’च्या घटनांकडे शासन म्हणून कठोरपणे कारवाई केली जाईल. मात्र त्याचबरोबर मुलगी शिकली तर तीही कुटुंबाचा आर्थिक आधार बनू शकते, ही भावना समाजात रुजवणे आवश्यक आहे. महिला बालकल्याण विभागाच्या वतीने महिलांना आर्थिकदृष्टय़ा सक्षम करण्यासाठी बचतगटाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.

कुपोषित बालकच जन्माला येऊ नये, यासाठी महिलांच्या सकस आहारासाठी आपले प्राधान्य राहणार आहे. मंत्री म्हणून काम करताना अनेक महिला विविध समस्या घेऊन आपल्याकडे येतात. त्यावेळी एकविसाव्या शतकातही समाज रूढी आणि परंपरेत अडकल्याचे जाणवते. शासनस्तरावरून प्रयत्न होत असले तरी सामाजिक जागृती महत्त्वाची आहे. स्त्रीला समाजात दुर्गा, सावित्री, लक्ष्मी म्हणून पूजले जात असताना दुस-या बाजूला मात्र मुलगी परक्याचे धन म्हणून तिचा जन्मच नाकारायचा.

हा समाजाचा दुटप्पीपणा कमी होणे आवश्यक आहे. लग्नात हुंडा घ्यायचा, त्यातही इतरांपेक्षा जास्त घेऊन मोठेपणा मिरवायच्या मानसिकतेतूनही मुलगी म्हणजे परक्याचे धन ही भावना बळावत गेल्याने आधुनिक तंत्रज्ञानाचा चुकीच्या पद्धतीने वापर करत गर्भिलग निदान करून स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार वाढले.

पाच वर्षापूर्वी या प्रकरणांमुळे माझे मन व्यथित झाले आणि राजकारणाच्या पलीकडे जाऊन ‘वैद्यनाथ सर्वागीण विकास संस्थेच्या’ वतीने मराठवाडा विभागात माझी कन्या भाग्यश्री हिच्या नावाने योजना सुरू केली.

दुस-या क्रमांकाच्या मुलीच्या नावाने संस्थेच्या वतीने दीड हजार रुपयांची ठेव ठेवून त्या रक्कमेच्या व्याजावर मुलीचे लग्न व्हावे आणि पालकांना चिंता लागू नये आणि स्त्रीभ्रूण हत्येपासून लोक परावृत्त व्हावेत हा हेतू आहे. मराठवाडय़ात अशा पद्धतीने जन्मलेल्या मुलींच्या नावाने ठेव ठेवण्यात आली. ‘लेक वाचवा राष्ट्र वाचवा,’ ही भावना महिलांनी स्वीकारली पाहिजे. यासाठी मोठय़ा प्रमाणावर जनजागृतीही केली पाहिजे. आता मंत्री म्हणून या विषयावर जास्तीत जास्त काम करण्याचा आपला मानस आहे.

एक मुलगी अनेक नाते निर्माण करते. अनेक कुटुंबांना जोडते, असे असले तरी मुलीकडे पाहण्याचा दृष्टिकोन सकारात्मक नाही ही खेदाची बाब आहे. ग्रामीण भागात दुष्काळी परिस्थितीतही सर्वाधिक झळ महिलांनाच पोहोचते. पाण्यासाठी महिलाच वणवण भटकताना दिसतात. त्यामुळे जलसंधारण विभागाच्या माध्यमातून ‘जलयुक्त शिवार’ ही योजना आपण जाणीवपूर्वक हातात घेतली आहे. पावसाचे पाणी जमिनीत जिरवले तर पाण्याचा प्रश्न कमी होईल.

यासाठी सरकारने टप्प्याटप्प्याने गावे दुष्काळमुक्त करण्याचा आराखडाच तयार केला असून याचा महिलांना फायदा होणार आहे. योजना राबवताना महिला हा घटक केंद्रिबदू मानून काम करण्याचा मनोदय व्यक्त केला, तर गावपातळीवर काम करणा-या अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन वाढवण्याचाही निर्णय याच भावनेतून घेतला आहे. कोणतेही राष्ट्र संख्येने पन्नास टक्के असलेल्या स्त्रीशक्तीला दुर्लक्षित ठेवून प्रगती करू शकत नाही. त्यामुळे केंद्र सरकारची ही योजना राज्यात प्रभावीपणे राबवण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मी प्रयत्न सुरू केले आहेत.

किशोरवयीन, महाविद्यालयीन मुलींचेही प्रश्न आहेत. मात्र समाजाची मानसिकता ही निव्वळ कायद्याने बदलणार नाही. ती प्रबोधनातूनच बदलली जाऊ शकते. यासाठी मुलगी शिकली तर ती आपल्या घराचा आर्थिक आधार बनू शकते ही भावना समाजात रुजवण्यासाठी सर्व घटकांनी या जनजागृतीत सहभाग नोंदवला पाहिजे.

मुलाखत संपवताना पंकजा मुंडे यांना आपले पिताश्री गोपीनाथराव मुंडे यांची आठवण होणे स्वाभाविक होते. ‘बाबांनी मला शिक्षणासाठी, सामाजिक कामासाठी आणि नंतर राजकारणात येण्यासाठी नुसताच पाठिंबा दिला नाही तर तसा आग्रह धरला. त्यामुळे मी पंकजा आज जी काही आहे, ती माझ्या बाबांनी मला घडवलं म्हणून आहे.’

1 COMMENT

  1. आग रामेश्वरी बंब सोमेश्वरी.दोन मुलान्चावर मुल झाल्यास sarkari सवलत बंद होते नोकरीत बढती मिळत नाही. nivadnuk लढवता येत नाही.pahila मुलगा झाल्यास दुसरा कोणीही चालतो.पण पहिली mulgi झाल्यास दुसरा मुलगाच pahijena.sarkari kayde badala mulinchi sankhaya vadhel

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version