Home शिकू आनंदे मैफल रानभाज्यांची

मैफल रानभाज्यांची

0

बीज अंकुरे अंकुरे
ओल्या मातीच्या कुशीत
जसे रुजावे बियाणे
माळरानी खडकात..

माळरान अन् खडकात बियाणे रुजविण्यासाठी माणसाला जरा जास्तच मेहनत घ्यावी लागते. पण, त्या कष्टातून मिळालेले फळ हे लाजवाब असते. हे झाले मानवाच्या बाबतीत, पण आपण जर विचार केला तर निसर्गामध्ये विविध झाडे आहेत. या झाडांच्या बिया कळत नकळत मातीत पडतात किंवा त्या मातीत रुजतात आणि नवीन झाड येते. पावसाळ्यामध्ये मातीच्या गर्भातूून अनेक वनस्पती पालवतात. या वनस्पती खुरटय़ा असतात. काटेरी असतात आणि यातीलच काही वनस्पती मानवाला उपयुक्त असतात. तर, काही मानवाला हानिकारक असतात. सध्या पावसाळा सुरू आहे. माळरानावर शेतांच्या बांधावर तसेच डोंगरपायथ्याला रानभाज्या उगवू लागल्या आहेत. या रानभाज्यांची माहिती किंवा ओळख आदिवासी मंडळींना किंवा आपल्या मागच्या पिढीला होती. सध्या निसर्गाच्या जवळ राहणा-या आदिवासींना  भाज्यांची परिपूर्ण माहिती असते.

मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये उदा. विरार, मुरबाड, पनवेल, कल्याण, कर्जत या ठिकाणी अशा प्रकारच्या रानभाज्या मिळतात. अशा भाज्या पिकवल्या जात नाहीत. तर, त्या माळरानावर मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध असतात. हल्ली काही आदिवासी बांधव या भाज्या विक्रीसाठी घेऊन येतात; परंतु आपल्यातीलच काही लोकांना या रानभाज्यांची ओळख नसल्याने आपण घेणे टाळतो आणि पाल्यांनाही माहिती देणे लांबच राहते. अशा भाज्या ठरावीक ऋतूमध्ये उपलब्ध असल्याने, याविषयी अधिक माहिती नसते. पालकांना याविषयी माहिती नसल्याने ते आपल्या पाल्यांना वळ, कुर्डू, घोळ, तेरा, तेभ्रे, मोहफुले व फळे तेलपट, कोळू, लोत, भोकर, मोखा, भारंगी, काटे, माठ, कुसरा, कुळू या भाज्यांची माहिती कशी देणार?

‘पर्यावरण मंडळ, रोटरी क्लब ऑफ यंग डोंबिवली आणि नूतन ज्ञानमंदिर कल्याण (पू) यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही माहिती मिळावी म्हणून ‘नूतन मंदिर’ येथे रानभाज्या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन डॉ. श्रेया भानप यांनी केले. यावेळी रोटरी क्लब ऑफ यंग डोंबिवलीच्या तिवारी मॅडम, शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षी गागरे उपस्थित होत्या. पर्यावरण दक्षता मंडळाच्या ललिता अष्टेकर आणि रूपाली शाईवाले यांनी प्रदर्शनाची मांडणी केली. तसेच विद्यार्थी व पालकही मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

रानभाज्यांचा शरीराला होणारा उपयोग, त्यांचे महत्त्व यांची ओळख, औषधी गुणधर्म याबाबत परिपूर्ण अशी माहिती देऊन डॉ. श्रेया भानप यांनी त्यांच्या शंकांचे निरसन केले. एका वृक्षाविषयी माहिती सांगितल्यानंतर विद्यार्थ्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. सध्याची आपली जीवनशैली धावपळीची आहे. आपले स्वास्थ्य चांगले ठेवायचे असेल, तर शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढली पाहिजे यासाठी अशा भाज्यांचे सेवन करणे आवश्यक आहे.

पर्यावरण दक्षता मंडळाने त्या भाजीचे शास्त्रीय नाव, कूळ, संस्कृत नाव, वनस्पती कशी ओळखावी, त्यांचे औषधी गुणधर्म व ती भाजी बनविण्याची पाककृती इत्यादी माहितीही दिली. त्यामुळे पालकांना ती भाजी बाजारातून आणल्यावर कशी करावी हा प्रश्न पडणार नाही. आमच्या या प्रदर्शनातील रानभाज्या या मामनोली परिसरातून आणल्या गेल्या. रानभाज्या सुभाष इसावे यांनी संकलित केल्या. हे मामनोलीचे पर्यावरण मंडळाचे प्रकल्प समन्वयक आहेत. पावसाळ्यात मिळणा-या रानभाज्या जास्त रुचकर तर असतातच, शिवाय यामध्ये खनिजे, जीवनसत्त्वे असल्याने शरीरास पौष्टिक देखील असतात. या रानभाज्या निसर्गाची देणगी आहे.

मानवाचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य निरोगी राहण्यासाठी आपणास अशा भाज्यांविषयी लोकजागृतीची फार आवश्यकता आहे. या रानभाज्यांचा आहारात जास्तीत जास्त वापर करावा यासाठी आमच्या शाळेने केलेला हा प्रयत्न आहे आणि दरवर्षी अशा प्रकारचे पावसाळी रानभाज्यांचे प्रदर्शन भरवून जास्तीत जास्त लोकांपर्यंत या रानभाज्यांची माहिती पोहोचविण्याचा आमचा मानस आहे. हा कार्यक्रम शाळेतील विज्ञान मंडळातर्फे आयोजित करण्यात आला होता. शाळेतील सर्व शिक्षक कार्यक्रमांस उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. आंबेरकर यांनी केले, तर शाळेतर्फे?आभार भामरे यांनी मानले. यात सौ. चौधरी, सौ. वैद्य, सौ. आपटे सहभागी होत्या.

यामध्ये महत्त्वाचे म्हणजे जैवविधतेचा एक भाग असलेल्या या रानभाज्या ज्या जंगल परिसरातून आपल्याकडे येतात, ते जंगल जपण्यासाठी शहरी आणि ग्रामीण भागातील लोकांनी कटिबद्ध असायला हवे. तरच या रानभाज्यांची चव पुढील पिढीस चाखता येईल.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version