Home कोलाज यशाची आधारसूत्रं

यशाची आधारसूत्रं

0

संघर्षावर मात करून यश कसं प्राप्त करता येईल, यासाठी लेखकाने पारंपरिक पुस्तकाप्रमाणे केवळ शाब्दिक मार्गदर्शन न करता काही सूत्रं सांगितली आहेत. केवळ त्यांचं आचरणात आणणंही माणसाला यशाकडे नेणारे आहे. ही सारी सूत्रं अतिशय सोप्या भाषेत सांगून त्यांचं विवेचनही केलं आहे.

विचार करा मोठा!
मूळ इंग्रजी लेखक : रयुहो ओकावा
मराठी अनुवाद : वसु भारद्वाज
जयको पब्लिशिंग हाऊस
पानं : १९६
किंमत : १७५ रुपये

या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकालाच विविध प्रकारच्या अडथळ्यांना तोंड द्यावं लागतं. हे अडथळे जणू काही एखाद्या संकटाप्रमाणे असतात. पण या संघर्षाला तोंड देता देता आपल्यापैकी कित्येक जणांना हे जग विविध प्रश्नांनी ग्रासलेलंच आहे असं वाटतं आणि मग मनामध्ये न्यूनगंड तयार होत जातो. मग न्यूनगंड आणि आत्मविश्वास या दोन टोकांमध्ये आपली मानसिकता दोलायमान होत राहते. मात्र यावर मात करण्यासाठी एक वेगळा दृष्टिकोन विकसित करणं आवश्यक असतं. हाच दृष्टिकोन विकसित करून आयुष्यातील संघर्ष हा संघर्ष न राहता त्याचं रूपांतर जीवन जगण्याच्या कलेमध्ये रूपांतरित करण्याचं काम ‘विचार करा मोठा’ हे पुस्तक करत आहे. एक आध्यात्मिक मार्गदर्शक समकालीन द्रष्टे आणि हॅप्पी सायन्सचे संस्थापन रयुहो ओकावा यांच्या ‘थिंक बिग’ या इंग्रजी पुस्तकाचा हा मराठी अनुवाद आहे. ओकावा यांनी आपलं आयुष्य चिरंतन सत्यासाठी आणि लोकांना आनंदाचा मार्ग सांगण्यासाठी वेचले. कायदा, अर्थशास्त्र यांचे अभ्यासक असलेले ओकावा हे मूळातच तत्त्ववेत्ते आहेत. आयुष्यात प्रचंड मिळवूनही मानवजातीविषयीच्या असीम करुणेपोटी त्यांनी केलेला हा लेखप्रपंच म्हणजे त्यांचं पुस्तक ‘थिंक बिग’. तुमच्या स्वप्नांतील यशाला प्रत्यक्षात तुमच्यासमोर साकारण्यासाठी हे पुस्तक तुम्हाला मार्गदर्शक ठरेल. अशा या पुस्तकाचा अनुवाद वसु भारद्वाज यांनी ‘विचार करा मोठा’ या पुस्तकातून अगदी सहज सोप्या शब्दांत केला आहे.

संघर्षावर मात करून यश कसं प्राप्त करता येईल, यासाठी लेखकाने पारंपरिक पुस्तकाप्रमाणे केवळ शाब्दिक मार्गदर्शन न करता काही सूत्रं सांगितली आहेत. केवळ त्यांचं आचरणात आणणंही माणसाला यशाकडे नेणारे आहे. ही सारी सूत्रं अतिशय सोप्या भाषेत सांगून त्यांचं विवेचनही केलं आहे. उदाहरणच द्यायचं झालं तर ‘एक स्वप्नं बाळगा आणि ते सत्यात उतरत नाही तोपर्यंत त्याला चिकटून राहा’, ‘सकारात्मक विचार करा’, ‘विश्वास हे भीतीविरुद्ध वापरण्याचं मोठं शस्त्र आहे’, ‘धाडसी बना आणि तुमच्या प्रश्नांना तोंड द्या’, ‘विचार करण्याचा मार्ग हा अतिशय प्रभावी आहे’, ‘तुम्ही काय साध्य करणार आहात हे तुमच्या विचारांच्या दिशेवरून कळते’, ‘मोठी महत्त्वाकांक्षा ठेवा आणि सरळ कामाला लागा’, ‘आपण ज्याचा सातत्याने विचार करतो, तेच आपण बनतो’, ‘ज्ञान हीच शक्ती आहे’, ‘वेळ हेच धन आहे आणि धन हेच वेळेप्रमाणे आहे’, ‘अवघड प्रश्नांना तोंड देण्यासाठी त्यांचं विभाजन करा’, ‘आव्हाने स्वीकारा आणि अपयशाचं भय बाळगू नका’, ‘तुम्ही तुमचं धैर्य शंभरपटीने वाढवू शकता’. ही सारी वचनं म्हणजे केवळ फलकावर लिहिण्याचे सुविचार नव्हेत, तर योगातील नियमांप्रमाणे सहजासहजी आचरणात आणण्यासाठीची ‘आधार सूत्रं’ आहेत.

थोडक्यात काय कोणतीही गोष्ट करताना सर्वप्रथम आपण पहिलं पाऊल टाकणं अत्यंत महत्त्वाचं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सतत पुढे जात राहणं आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे निर्मितीक्षमता आणि वैचारीक अस्सलपणा वापरणं गरजेचं असतं. या गोष्टींचा वापर कसा करायचा हे सांगायचा प्रयत्न केला आहे. जो आजच्या तरुणांना अतिशय मार्गदर्शक ठरेल यात काही शंका नाही.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version