Home प्रतिबिंब याकूबची तळी उचलणा-या संपादकांवर वाचक त्यांच्याच ब्लॉगवर बरसले!

याकूबची तळी उचलणा-या संपादकांवर वाचक त्यांच्याच ब्लॉगवर बरसले!

3

याकूब मेमनच्या फाशीच्या शिक्षेवर लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी संपादकीय लिहिले होते. या लेखावर लोकसत्ताचे एक वाचक मंदार जोशी यांनी तीव्र शब्दांत आक्षेप नोंदवला. या ब्लॉगची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. मंदार जोशी यांची ही ब्लॉग पोस्ट त्यांच्याच शब्दांत..

आदरणीय, वंदनीय, माननीय, विवेकवादी अंधश्रद्धा निर्मूलनपटू राजमान्य राजश्री श्री. गिरीश कुबेर साहेब,
कोपरापासून नमस्कार.
लोकसत्ता घ्यायचे बंद केल्यापासून आणि ते तुम्हाला कारणांसहित कळवल्यापासून एका वर्षाच्या आत तुम्हाला पुन्हा पत्र लिहायची वेळ येईल, असे वाटले नव्हते. पण तुम्ही तुमच्या असामान्य लेखनप्रतिभेने अप्रतिम संपादकीय अग्रलेख लिहून तुमच्याशी संवाद साधायला भाग पाडलेत, त्याबद्दल तुमचे अभिनंदन.
फाशीबाबत, देहांत शासनाबाबत मतभेद असल्यास गर नाही. मात्र त्याच्या नावाखाली एका देशद्रोह्याचे, दहशतवाद्याचे किती उदात्तीकरण करायचे? सारासार विचार करण्याच्या नावाखाली सामान्य जनतेचा बुद्धिभ्रम करण्याचा किती प्रयत्न करायचा? आपण लेखाच्या सुरुवातीला म्हणता, याकूब मेमन माफीचा साक्षीदार ठरला आणि अपराधी देखील. हे साफ चूक आहे.

तो माफीचा साक्षीदार कधीही नव्हता आणि तो शरणही आला नाही. तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्याने आणि त्याच्या कुटुंबीयांनी भारतात परतण्याचा निर्णयही घेतला नाही. रॉ संस्थेच्या ज्या रमण साहेबांच्या लेखाचा आपण हवाला देता, त्याच रमण साहेबांनी एका लेखात स्पष्टपणे म्हटलं आहे की, पाकिस्तानच्या आय.एस.आय. या गुप्तहेर संघटनेच्या देखरेखीखाली असलेल्या मेमन कुटुंबीयांनी याकूबला ‘भारतात परतणे कितपत श्रेयस्कर’ याचा आढावा घ्यायला नेपाळमध्ये असलेल्या त्याच्या नातेवाइकाशी व एका वकिलाशी सल्लामसलत करायला नेपाळला पाठवलं होतं.

या दोघांनीही त्याला पुन्हा कराचीला परतण्याचा सल्ला दिला. तो कराचीला परस्पर पळून जाण्यासाठी विमान पकडण्याच्या तयारीत असताना नेपाळ पोलिसांनी त्याला ओळखला आणि वेगाने त्याची रवानगी भारतात करण्यात आली. बरं आपण रमण यांचे सोडून देऊ. गेले बिचारे. त्यांची साक्ष काही काढता येत नाही आता.

पण विमानतळावर त्याला पकडणा-या नेपाळी पोलीस अधिकाऱ्याची मुलाखत आपण हे अचाट संपादकीय लिहिण्याच्या आधी बघितली का? माझ्या अंदाजाप्रमाणे नसेलच.
मग त्या कटातला पाकिस्तानचा सहभाग उघड करावा या अटीवर त्याला भारत सरकारने माफीचा साक्षीदार करण्याचा करार केला हे कुठल्या आधारावर लिहिता? मुळात भारतात होत असलेल्या घातपाती कारवायांत आणि दहशतवादी घटनांत पाकिस्तानचा सहभाग आहे हे तोपर्यंत अनेकवेळा सिद्ध झालेले आहे.

पुढे तुम्ही तोडलेले तारे तुम्हाला कदाचित पुढचा मॅगसेसे किंवा गेलाबाजार बुकर पुरस्कारही देऊन जातील. ‘मेमन कुटुंबीय मूळचे गुजरातेतले आणि आद्य व्यवसाय चांदीची तस्करी’. मेमन कुटुंबीयांच्या या स्मगलिंगच्या धंद्याबाबत हे वाक्य तुम्ही इतक्या सहजपणे लिहून जाता, की वाचणाऱ्यांचा समज व्हावा की चांदीची तस्करी म्हणजे एखाद्याचे रस्त्यालगत असलेले सायकलचे पंक्चर काढायचे अनधिकृत दुकान असावे किंवा रेल्वेत सीटखाली सापडलेली दहाची नोट एखाद्या प्रवाशाने खिशात टाकावी इतकी क्षुल्लक बाब!

तुम्ही म्हणता की एका अशक्त व्यवस्थेने दुस-या अशक्ताचा बळी घेतला. खालच्या दोन कोर्टात चाललेले खटले, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, मग याकूबने दाखल केलेले क्युरेटिव्ह पेटिशन, राष्ट्रपतींकडे केलेले दयेचे अर्ज, आणि डेथ वॉरंटवर स्टे आणण्याचे प्रयत्न, हे सगळे सगळे आपल्या न्यायव्यवस्थेने त्याला बचावाच्या पुरेपूर संधी दिल्या याची साक्ष नव्हे काय?

मग तुमच्याकडे तुमच्या ‘वस्तुस्थिती’ व ‘निर्वविाद सत्य’ या शब्दांपलीकडे जाऊन तीन न्यायालयांत, ज्यात अर्थात सर्वोच्च न्यायालय आहेच, जे पुरावे सादर होऊन गुन्हा सिद्ध झाला त्यांच्याहून वरचढ पुरावा आहे का? नसल्यास तुम्ही व्यवस्थेला अशक्त असे संबोधून खालच्या न्यायालयांचाच नव्हे तर फाशी जायच्या दिवशीही पहाटे साडेचार वाजता याकूबचे म्हणणे ऐकून घेणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाही अवमान करत आहात याची तुम्हास जाणीव आहे काय?

हाच अशक्त याकूब एक धंदेवाईक चार्टर्ड अकाऊंटंट होता. म्हणजेच तुमच्या भाषेत सनदी लोकपाल होता. ही परीक्षा किती कठीण असते हे मी तुम्हाला वेगळं सांगायला नको. सनदी लेखपाल म्हणजे अशिक्षित, अडाणी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी नव्हे. इतक्या हुशार असलेल्या या अशक्त याकूबला आपण ज्याच्या ‘चोरटय़ा’ धंद्यांचे पैसे फिरवतो आहोत, लेखापरीक्षण करतो आहोत तो आपला सशक्त थोरला भाऊ टायगर काय धंदे करतो आहे? याची कल्पना नव्हती असे ‘अधिकृत वस्तुस्थिती’च्या नावाखाली तुम्ही ठोकून देताना तुम्ही किती तर्कदुष्ट विधान करत आहात याची तुम्हालाच जाणीव नसावी.

त्याच्याच पुढे तुम्ही म्हणता ‘त्याचे (म्हणजे टायगरचे) चोरटे व्यापार कुटुंबीयांस ठाऊक होते’ आणि मग लगेच ‘परंतु त्यापुढे जाऊन तो दहशतवादी कृत्यात सहभागी आहे हे कुटुंबास ज्ञात नव्हते’, हे म्हणजे ठाणे ते छत्रपती शिवाजी टर्मिनस किंवा बोरिवली ते चर्चगेट रेल्वे प्रवास करणारा एक चाकरमानी साईड बिझनेस म्हणून प्रवासात पाकीटमारीचा धंदा करीत असे आणि ते त्याच्या कुटुंबीयांस ठावुक नसे अशी एखादी सुरस कथा सांगावी अशा प्रकारे आपण सांगता.

तसेच, एकीकडे याकूबला ‘काही म्हणजे काही माहीत नव्हतं हो’ असा टाहो फोडतानाच ‘तो माफीचा साक्षीदार होता आणि आहे. याचा दुसरा अर्थ असा की तो निरपराध नाही.’ असेही म्हणून जाता. कुबेर साहेब, एक पे रेहेना, एक तो काही माहीत न बोलना नतो निरपराध बोलना. लेकीन प्लीजच कोलांटय़ाउडय़ा मत मारना.

पुढचा भाग अधिक मनोरंजक आहे. टायगरचे दहशतवादी धंदे जर त्याच्या कुटुंबीयांस माहीत नव्हते, तर त्याचे वडील पाकिस्तानात आय. एस. आय.च्या कचाटय़ात काय फिरत फिरत चुकून आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून गेले की सहज पर्यटनाला गेले असताना आय.एस.आय.ने त्यांना कचाटय़ात पकडले? म्हणे, ‘बॉम्बस्फोट चौकशीत टायगरचा हात असल्याचे उघड झाले तेव्हा पाकिस्तानात आय. एस. आय.च्या कचाटय़ात असलेल्या त्याच्या वडिलांनी कुटुंबाच्या देखत त्याला चोपले’. आई आई गं. हे वाचून माझे ड्वाले पाणावले हो. कुणीतरी म्हटल्याप्रमाणे भारतात शामच्या आईनंतर थेट टायगरचे बाबाच.

आपण टायगरला पकडू शकत नाही, दाऊदला लटकावू शकत नाही याचा अर्थ आपण हातात सापडलेल्या याकूबला सोडून द्यायला हवा होता? जिथे निर्विवादपणे पाकिस्तानातून आलेल्या दहशतवादी कसाबविषयी देखील अनेकांना माणुसकीचे उमाळे येतात, त्या आपल्या भारत देशात सापडलाय तर ‘लटकावून टाका फासावर’ इतकं सोपं आहे?

आपल्या या अचाट आणि अतक्र्य संपादकीयात याकूबच्या धर्माचा उल्लेख करून तुम्ही योग्य तो खोडसाळपणा केलेला आहेच. भारतात आतापर्यंत फाशी दिलेल्या कैद्यांपैकी किती जण मुसलमान होते ते तपासून बघणार का जरा? त्यातच संजय दत्तचाही उल्लेख करून तुम्ही तुमचा अजेंडा स्पष्ट केलेला आहे आणि त्या तुलनेत याकूबचा गुन्हा चक्क किरकोळ ठरवून काय सुचवण्याचा प्रयत्न केलेला आहे हे न समजण्याइतके आता तुमचे वाचक दुधखुळे राहिलेले नाहीत.

संजय दत्तला सवलती मिळतात, ते कायद्याने. दाऊद व टायगरला परत आणण्यात आपण अयशस्वी ठरलो आहोत ते आपले सरकार अंतर्गत व आंतरराष्ट्रीय कायदे पाळत असल्यानेच. आणि आता याकूब फासावर गेलाय तोही सर्व कायदेशीर बाबी पूर्ण झाल्यावरच. तेव्हा ‘उचलला याकूब, लटकवला फासावर’ हे वाक्य ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ शैलीत आपण बरळू नये, हेच उत्तम.

आणखी एक. बॉम्बस्फोटात मेलेल्या २५७ निरपराध नागरिक आणि शेकडो जखमींची चौकशी करा जरा. आमचा उन्माद जाऊ द्या हो, किमान चाळीसहून अधिक शस्त्रक्रिया झालेल्या आणि अजूनही काचा अंगात असलेल्या आणि ते कमी म्हणून की काय उजवा हातही निकामी झालेल्या माणसाबद्दल किंवा वयाच्या तेराव्या वर्षी आईचा तुकडे तुकडे झालेला मृतदेह बघायला ज्याला लागला त्या व्यक्तीविषयी जरा उमाळा येऊ द्या. पुन्हा एकदा, या संपादकीयाबद्दल लोकसत्ता व तुमचा तीव्र निषेध.

आपला नम्र
मंदार दिलीप जोशी
http://mandarvichar.blogspot.in

 

3 COMMENTS

  1. नावाने कुबेर बुद्धीने दरिद्री.अशा लोकांना मारले तर हात खराब होतील, वरून गुन्हा…

    • कुबेर तुझा काय तो रीश्तेदार होता त्याचा पक्ष घेत आहे नालायक माणसा तुझा फमिली चा व्यक्ती जर त्या ठिकाणी जर मरण पावला असता तर तेव्हा असाच म्हटलं असत का , मला तर वाटते अशा व्यक्ती न फासावर चढवायला पाहिजे मंदार सर तुम्ही अगदी योग्य आहात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version