Home संपादकीय अग्रलेख युती तोडणेच भाजपला लाभदायक

युती तोडणेच भाजपला लाभदायक

1

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. अर्थात या यशामध्ये भाजपचा वाटा फार मोठा होता, एवढेच नव्हे तर या निवडणुकीत भाजपला केंद्रात स्वबळावर सरकार स्थापन करता येईल इतके बहुमत मिळाले.

लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला अभूतपूर्व यश मिळाले. अर्थात या यशामध्ये भाजपचा वाटा फार मोठा होता, एवढेच नव्हे तर या निवडणुकीत भाजपला केंद्रात स्वबळावर सरकार स्थापन करता येईल इतके बहुमत मिळाले. इतर राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशातही भाजपचा वाटा शिवसेनेपेक्षाही अधिक व लक्षणीय होता. भाजपचे कार्यकत्रे असे म्हणू लागले की, शिवसेनेला राज्यात एवढे लक्षणीय यश मिळाले, ते केवळ आणि केवळ मोदी व भाजप यांच्या प्रभावामुळेच मिळाले. म्हणजेच शिवसेनेला मिळालेल्या यशात भाजपचा फार मोठा वाटा आहे.

भाजपला झालेल्या या स्वत्वाची जाणीव निवडणुकीच्या निकालापासून दिवसेंदिवस वाढू लागली व आता तर महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेशी असलेली युती तोंडण्याची भाषा केली जात आहे. भाजपच्या अनेक नेत्यांना व कार्यकर्त्यांना राज्यात भाजपला जे अभूतपूर्व यश मिळाले आहे त्यामुळे भाजपने आता विधानसभा निवडणूक शिवसेनेचे लोढणे फेकून देऊन स्वबळावर लढवावी, असे तीव्रतने वाटू लागले आहे. या त्यांच्या विचारांचे पडसाद मुंबईत गुरुवारी झालेल्या विस्तारित कार्यकारिणीत उमटले. या बैठकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी, आता शिवसेनेबरोबर युती नको, ती तोडून पक्षाच्या कार्यकर्त्यांना न्याय द्या, अशी जोरदार मागणी केली.

राज्यातील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्याच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीत शिवसेनाविरोधी पडघम वाजवले गेले. या बैठकीला राज्यातील सर्व बडे नेते उपस्थित असताना शिवसेनेची युती तोडण्याचा व स्वबळावर निवडणूक लढवण्याचा सूर उमटला, हे विशेष. हा सूर लावण्यात केवळ कार्यकत्रेच आघाडीवर नव्हते, तर भाजपचे नेतेही त्याला उघडपणे प्रतिसाद देत होते. शिवसेना-भाजप युती गेली किमान २५ वर्षाची आहे. १९९५मध्ये ही युती महाराष्ट्रात सत्तेवरही आली होती. या युतीमध्ये नेहमी शिवसेनाच वरचढ रााहिली होती. युतीत केव्हाही मतभेद निर्माण झाले की, भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आदी नेते ‘मातोश्री’वर धावून जात आणि बाळासाहेबांची समजूत काढत व प्रकरण मिटत असे. अजूनपर्यंत शिवसेनेची भूमिका मोठया भावाचीच असे व लहान भाऊ असलेल्या भाजपला नेहमी नमते व कमीपणा घेण्याची वेळ येत असे; पण, आता परिस्थितीत बदल झाला आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेनेचा पूर्वीचा करिष्मा राहिलेला नाही. राज ठाकरे यांनी तर आधीच सवतासुभा उभारला होता. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे बाळासाहेबांप्रमाणेच आपला प्रभाव राहील व शिवसेना या पुढेही युतीत मोठया भावाची भूमिका बजावेल, अशा भ्रमात वावरत होते. त्यामुळेच ते भाजपला नेहमी आपल्या दबावाखाली ठेवण्याचा प्रयत्न करत असत. लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपचे नेते नितीन गडकरी यांनी निवडणुकीसाठी राज ठाकरे यांना युतीत आणण्याचा प्रयत्न केला. युती अधिक बळकट व्हावी व त्याचा निवडणुकीत लाभ व्हावा, असा त्यांचा हेतू होता; पण, उद्धव ठाकरे यांना राज ठाकरे यांचे वावडे असल्याने त्यांनी या प्रयत्नांना प्रतिसाद तर दिला नाहीच, उलट ते भाजपशी फटकून वागू लागले. राज्यात भाजपने कुठल्या नेत्याला चच्रेचे अधिकार दिले आहेत ते आधी सांगा, अशी ते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना दमदाटी करू लागले; परंतु, लोकसभेची महत्त्वाची निवडणूक असल्याने भाजपने नमते घेऊन देवेंद्र फडणवीस यांना उद्धव ठाकरेंची समजूत काढण्यासाठी पाठवले. लोकसभा निवडणुकीतील निकालावरून भाजपच्या लक्षात आले की, शिवसेनेकडील मोठया भावाची भूमिका जात असून ती आपल्याकडे येत आहे. शिवसेनेचे वर्चस्व कमी करण्याची व त्याला दबावाखाली ठेवण्याची हीच वेळ असल्याचे भाजप नेत्यांच्या लक्षात आले व त्याप्रमाणे भाजपच्या नेत्यांनी पावले टाकण्यास सुरुवात केली.

केंद्रात मोदींचे सरकार आल्यानंतर नरेंद्र मोदींनी केंद्रीय मंत्रिमंडळ बनवताना महायुतीत महत्त्वाचा सहकारी असलेल्या व महाराष्ट्रात १८ जागा मिळवलेल्या शिवसेनच्या तोंडाला अक्षरश: पाने पुसली. मोदी यांनी शिवसेनेशी कसलीही चर्चा न करता शिवसेनेचे अनंत गिते यांनाच मंत्रीपद दिले व त्यांना अवजड उद्योग हे नगण्य खाते दिले. या खात्याविषयी गिते हे नाराज होते. त्यांनी ठाकरे यांच्याकडे याबाबत तक्रार केली; पण, ठाकरे काही करू शकले नाहीत. ठाकरे यांना भाजपच्या आक्रमक पवित्र्यांसंबंधात अनेकदा मूग गिळून गप्प बसण्याची पाळी येत आहे. अजूनपर्यंत ठाकरे म्हणत होते की, महाराष्ट्रात शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार आहे. पण भाजपची वेगळीच भूमिका असून ते राज्यात आपल्या पक्षासाठी जास्त जागा मागत आहेत. ज्या पक्षाला जास्त जागा मिळतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, अशी भाजपची भूमिका आहे.

आपण राज्यात शिवसेनेपेक्षा वरचढ झालो आहोत व शिवसेनेची दादागिरी सहन करण्याची जरूरी नाही, हे भाजपच्या कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत सर्वाच्या लक्षात आले आहे. त्यामुळेच गुरुवारी झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी शिवसेनेविरुद्ध आवाज उठवताच नेत्यांनीही त्याला प्रतिसाद दिला. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस या बैठकीत कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाले की, राज्यातील सर्व २८८ मतदारसंघात कामाला लागा. ते असेही म्हणाले की, निवडणुकीसाठी जागा वाढवून मिळाव्यात, या कार्यकर्त्यांच्या भावनेचा नक्कीच विचार केला जाईल. या सगळ्याच घटनांबाबत शिवसेनेची प्रतिक्रिया आता गुळमुळीत आहे. सुरुवातीला जागा वाढवून देण्याच्या मागणीनंतर आता युतीच तोडण्याच्या भाषेमुळे आधीच नरमाईचे धोरण स्वीकारलेल्या शिवसेनेची चांगलीच कोंडी झाली आहे. यामुळे कोण काय बोलतो, याकडे आपण लक्ष देणार नाही, तर दोन्ही पक्षांचे नेतृत्व काय ठरवते याकडे आपण लक्ष देणार, असे आता शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे.

महाराष्ट्रातील युतीमधील या दोन्ही पक्षांच्या बलाबलाचे हे बदललेले समीकरण लक्षात घेता भाजप यापुढे आक्रमक पवित्रा घेईल, असेच दिसत आहे. याची प्रामुख्याने दोन कारणे आहेत. याचे एक कारण म्हणजे शिवसेनेचे वर्चस्व व दादागिरी झुगारून देण्याचे बळ भाजपला आले आहे. दुसरी महत्त्वाचे कारण म्हणजे भाजप स्वबळावर निवडणूक लढवू शकतो, याची खात्री झाल्यामुळे भाजपच्या दुस-या फळीतील नेत्यांमध्ये तसेच महत्त्वाकांक्षी कार्यकर्त्यांत विधानसभेची निवडणूक लढवण्याची महत्त्वाकांक्षा निर्माण झाली आहे. या महत्त्वाकांक्षेला वाव मिळायचा असेल तर तो युती वा महायुतीत मिळणार नाही, याची जाणीव भाजपच्या कार्यकर्त्यांत झाल्याने आता त्यांना युतीची अडचण वाटू लागल्यास नवल नाही. ही सर्व परिस्थिती आणि कार्यकर्त्यांची मागणी लक्षात घेऊन भाजपने शिवसेनेशी असलेली युती तोडणेच व्यवहार्य व शहाणपणाचे ठरेल.

[EPSB]

नालेसफाई पाण्यात

मुंबईकरांना दिलासा देणारा हा पाऊस पडला असला तरी या पहिल्याच पावसाने मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली. पहिल्याच पावसाने रेल्वे मार्गावर पाणी साचून रेल्वे सेवा पार विस्कळीत झाली, तर मुंबईतील अनेक रस्ते तुंबून वाहतूक ठप्प झाली.

[/EPSB]

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version