Home मध्यंतर सुखदा रसिक पण कर्तव्यकठोर दादा

रसिक पण कर्तव्यकठोर दादा

0

दादा म्हणजे माझे सासरे. दादांशी कोणत्याही विषयावर चर्चा करावी, त्यांना अडचण सांगावी ते ऐकून झाल्यावर काही तरी उपाय सांगत. गाणं, नाटक, दूरदर्शन हे सर्व त्यांना आवडे. घरातील माणसांना सुख लाभावे म्हणून नव्याचा हव्यास असला तरी जुन्या चालीरीतींची जोपासना करणारा, अंधश्रद्धा न पाळणारा कमालीचा हौशी माणूस. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणाची त्यांना आवड होती. प्रत्येक गोष्ट त्यांची अतिशय चोख असे. कामातही आणि घरातही सगळं कसं नीटनेटकं. मृत्यूही त्यांना कोणाला त्रास न देताच आला.

माझं सासर नात्यातच असलं तरी लग्नापूर्वी मी त्या घरात फारशी कधी गेले – वावरले नव्हते, त्याचं कारण ‘ते’ घर तारकर्लीला आणि मी राहायला मालवणला. शिवाय माझ्या आत्याच्या बिऱ्हाडी कुणीच राहत नव्हतं. यांची एक बहीण दुस-या गावी तर बाकी सर्व मुंबईत. त्यामुळे तारकर्लीला आमच्या मूळ घरी (काकांकडे) किंवा बहिणीकडे जात असले तरी रोगेंच्या घरी जाणे-येणे नव्हते. माझे वडील मंडल अधिकारी असल्याने आमच्या मालवणच्या घरी खूप लोक कामानिमित्त येत असत. त्यात वर्षाकाठी एखाद-दुसरी वेळ कधीतरी काही कामानिमित्त दादाही (दादा म्हणजे यांचे मोठे काका कै. हरिश्चंद्र रोगे) येत. ते अर्धा पाऊण तास बसत. त्या अध्र्या पाऊण तासांत त्यांना कधी भेटले असेन तेवढेच. बाकी त्यांच्याशी माझं जास्त बोलणं असं झालंच नव्हतं. आमचे भाऊ (म्हणजे माझे वडील) त्यांना खूप मान देत. लग्नानंतर जेव्हा सासरी गेले तेव्हा रोगेंच्या घरातच नव्हे तर त्या काळी गावातील सर्वात ज्येष्ठ व आदरणीय व्यक्ती आमचे दादाच आहेत हे लक्षात आलं. दादांचा रंग गोरापान, निर्मळ, नितळ त्वचा, मध्यम उंची, डोक्यावर थोडेसे काळे-पांढरे (कालांतराने फक्त पांढरे) विरळ केस, सफेद, स्वच्छ धोतर आणि हाताची बनियान घातलेले दादा खूप वेळा ओटय़ावरच्या आरामखुर्चीत किंवा दारात मंडप असेल तर मंडपात बसलेले असत. माझ्या लग्नानंतर यांच्या बोलण्यातून दादांना हे खूप मानतात हे माझ्या लक्षात आलं. त्यांच्या बोलण्यातून दादांबद्दलचा आदरभाव नेहमी दिसतो. त्यांनी दादांचे मला माहीत नसलेले व इतरांमध्ये नसलेले अनेक गुण सांगितले. दादा मालवणी बोलत असले तरी आणि कुणावर चिडले तरी ते कधीही शिव्या देत नव्हते. दादांशिवाय असा माणूस दुसरा कुणीही नाही. मासे विपुल प्रमाणात मिळणा-या गावात जन्म आणि हयात जाऊनही मांस-मच्छीपेक्षा शाकाहारी गोड-धोड जेवणाचीच त्यांना खूप आवड होती.

पूर्णत: निव्र्यसनी म्हणजे अगदी सुपारीचे खांडही तोंडात टाकले नाही त्यांनी. वयाच्या ४०-४२ व्या वर्षी पत्नीचं निधन होऊनही कोणत्याही व्यसनाच्या आहारी न जाता, दु:खात न कंटाळता, रागात न जगता आपली कर्तव्यं चोखपणे पूर्ण करत, जबाबदारीने, आनंदाने, कृतार्थपणे कसं वागावं हे दादांकडून शिकावं. कुणाच्या मदतीची अपेक्षा न करता एकटय़ाने २४-२५ खोल्यांच्या घराची डागडुजी करणे, घर सांभाळणे तेही ५० र्वष हे काम दादाच करू जाणोत. दादांशी कोणत्याही विषयावर चर्चा करावी, त्यांना अडचण सांगावी ते ऐकून झाल्यावर काहीतरी उपाय सांगत. गाणं, नाटक, दूरदर्शन हे सर्व त्यांना आवडे. नाहीतर काही वयोवृद्ध माणसे रेडिओ, टीव्ही लागल्यावर बंद करायला सांगतात. त्यांना ती कटकट वाटते. दादांचं तसं नव्हतं. त्या काळी मालवणला आलेली व्यावसायिक नाटके ते शक्यतो चुकवत नसत. हिंडाफिरायला ते नेहमी तयार असत. त्यांना नाटकाची आणि पर्यटनाची फार आवड होती. पुढय़ात दिलेल्या ताटातील पदार्थ खारट, अळणी, तिखट असला तरी तक्रार न करता सर्व पदार्थ संपवत असत. आपल्या घरात सर्व वस्तू असाव्यात, घरातील माणसांना सुख लाभावे म्हणून नव्याचा हव्यास असला तरी जुन्या चालीरीतींची जोपासना करणारा, अंधश्रद्धा न पाळणारा कमालीचा हौशी माणूस. स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणाची त्यांना आवड होती. दादा गावाबाहेर कुणाच्या मयताला वगरे गेले तरच धोतर व शर्ट असा पेहराव करीत नाही तर तारकर्लीची वेस ओलांडून कधीही कुठे गेले तरी पांढरे स्वच्छ धोतर, पांढरे शर्ट, त्यावर काळा कोट व डोक्यावर गांधीटोपीच्या आकाराची पण क्रीम रंगाची कडक टोपी, अशा वेशात जात त्यामुळे इतर माणसांपेक्षा ते उठून दिसत, त्यांची छाप पडे.

प्रत्येक गोष्टीचा बारीक विचार करून ते आपली मतं मांडत. वयाच्या ७२ ते ७५ वर्षापर्यंत त्यांनी ख-या अर्थाने एकहाती घर सांभाळले. मी त्यांच्या मुलींपेक्षा लहान, त्यांच्या मोठय़ा नातीपेक्षाही लहान आणि नात्यातील, त्यामुळे ओळखीची पण नात्याने सून असल्यामुळे घरातील इतर सर्व जण मला माझ्या नावाने हाक मारत असले तरी दादा मात्र मला ‘सुने’ अशीच हाक देत. कधी कधी चार-आठ दिवसांसाठी आमच्याकडे ठाण्याला राहायला असले की नाटय़संगीत, भक्तिगीते, भावगीते लावल्यावर तल्लीन होऊन ऐकत. दूरदर्शनवरील मालिकाही ते रोज पाहत, त्यांना ब-याच मालिकांबद्दल माहिती होती. मी मध्येच कोणत्याही मालिकेतील पात्राविषयी सांगायला गेले की म्हणायचे, ‘सुने माका म्हायत हा’ आणि त्या मालिकेबद्दल ते मलाच सांगत. दोन वेळचे जेवण मात्र त्यांना वेळेवर लागे. बाकी त्यांना काही लागत नसे. काही वृद्ध माणसे अनेक बाबतीत समजून घेत नाहीत, वाद करतात पण दादा सर्वानाच सांभाळून घेत. पहिल्यापासूनच त्यांच्याकडे समजूतदारपणा असल्यामुळे गावातील न्याय निवाडय़ाचे, भांडण-तंटय़ातून मार्ग काढण्याचे काम काही वेळा त्यांच्याकडे येत असे. ७० वर्षापूर्वी गावात आíकटेक्ट (वास्तुरचनाकार) नसतानाही आपल्यासह तीन भावंडांची बिऱ्हाडे मुलाबाळांसह एकाच घरात सुखाने राहतील एवढं मोठं घर मोठय़ा कल्पकतेने बांधून घेतलं. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आमच्या घरात काही तास वास्तव्य करून गेले म्हणजे मालवण पोलिसांनी मुख्यमंत्र्यांसाठी आमचे घर निवडले यातच सर्व काही आले. वयाच्या ९३-९४ वर्षापर्यंत दादांना कोणताही गंभीर आजार नव्हता. पूर्वी एक-दोन वेळा ते मोठय़ा आजारातून सावरले होते असे सांगतात. पण संपूर्ण आयुष्यात आपल्यामुळे कुणाला त्रास होईल, कुणाची गरसोय होईल असे ते वागले नाहीत आणि जगाचा निरोप घेतानासुद्धा दादांनी तेवढय़ाच शांतपणे घेतला. २२ डिसेंबर २००६ला दुपारी जेवणानंतर ते रोजच्या प्रमाणे वामकुक्षीसाठी पहुडले ते अलगद मृत्यूच्या स्वाधीन झाले. मृत्यूसमयीही कटकट नाही, कुणाची धावपळ नाही. सगळे कसे शांतपणे दादांच्या इतर कामांप्रमाणे नियोजन केल्यासारखे. मला सुने असे म्हणणारे एकटेच दादा, माझ्या चिरंतन लक्षात राहतील. दादांचा सहवास काही वर्षे तरी मला लाभला हे मी माझे सद्भाग्य समजते.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version