Home मध्यंतर उमंग पैसा झाला मोठा!

पैसा झाला मोठा!

1

पैसा हे १००% समस्यांवरचं उत्तर नाही हे खरं असलं तरी हेही खरं की आजच्या जगात पैसा हे ९९% समस्यांचं उत्तर नक्कीच आहे ! यावर विश्वास ठेवणारी तरुण मंडळी आज बहुसंख्य आहेत. पैसा असला की जगातल्या ब-यापैकी सगळ्या सुखसोयी अनुभवता येतात, असा अनेकांचा समज असतो. म्हणूनच शिक्षण पूर्ण होण्याआधीपासून व त्यानंतरही अहोरात्र मेहनत घेऊन काही जण पैसा कमवण्याच्या मागे लागतात. परंतु यामुळे आयुष्य पुढे नेताना आपण खरोखर आयुष्य किती जगत आहोत? तरुण पिढीने याचा विचार करण्याची खूप गरज आहे.

या जगात मानवाची जसजशी उत्क्रांती होत गेली तसतशी माणसाने समाज बांधणीसाठी लागणारी आवश्यक ती सगळी व्यवस्था हळूहळू आपल्या बुद्धीप्रमाणे केली. यात दळणवळण, समाज नियम, सामाजिक व सांस्कृतिक देवाणघेवाण हे तर सगळं होतंच. परंतु यात एक गोष्ट होती जी माणसाच्या राहणीमानात कायमचा आमूलाग्र बदल घडण्यास कारणीभूत ठरली. ही गोष्ट आहे व्यापार! पुढे अशी एक गोष्ट आली जिने व्यापाराचंच नाही तर अख्या मानवजातीचं भविष्य बदलून टाकलं. ती म्हणजे पैसा! आता हा लेख काही ऐतिहासिक विषयावर बेतलेला नाही आहे. परंतु पैसा या गोष्टीशी निगडित जरूर आहे. पैसे असणं आणि पैसे नसणं यात काय फरक आहे हे आजच्या तरुणांना चांगलंच माहीत आहे आणि या दोन्ही परिस्थितीत आपल्याला काय फरक पडतो हेही त्यांना माहीत आहे. पैशाला अनन्यसाधारण महत्त्व आहेच! त्यात शंकाच नाही. हवा आणि पाणी यानंतर जगात सगळ्यात जास्त काही वाहत असेल तर तो म्हणजे पैसा! आणि हे महत्त्व समजायला अगदीच १८ र्वष पूर्ण होण्याची काही अट वगरे नाही. अगदी बालपणापासून एक रुपया दिला की चॉकलेट मिळेल नाहीतर ‘नाही’, हे मुलांना समजलेलं असतं. मूल लहान असतानाच त्यांच्या पालकांनी ते मूल मोठं झाल्यावर कोण होणार डॉक्टर/ इंजिनीअर वगरे ठरवून टाकलेलं असतं. आता या निश्चयामागे त्या पाल्याचा त्या तत्सम पेशातून मिळणारं अमाप ज्ञान आणि समाजातलं स्थान आपल्या मुलाला मिळावं हा हेतू असतो की त्यातून त्याला मिळणारं अमाप पैसा हा हेतू असतो हा ज्याचा त्याचा प्रश्न. कारण

दोन्ही पर्याय आपापल्या जागी योग्य आहेत, त्यात चूक किंवा बरोबर असं काही वाटत नाही. आपल्या पाल्याने आयुष्यात सुस्थिर व्हावं हाच काय तो पालकांचा ध्यास !

पुढे तरुणपणात जेव्हा प्रत्यक्षात पैसा कमावण्याची वेळ येते तेव्हा आपल्या आवडत्या छंदाना वेळ द्यावा की नोकरी किंवा उद्योग करत फक्त पैसाच जपावा हे कोडं पडतं. ‘‘आता काम करू, मग पुढे तर आयुष्यात मजाच करायचीये’’ असे सल्ले आपण स्वत:ला किंवा इतर कोणीतरी आपल्याला देत असणं हे सवयीचं झालेलं असतं. या भयंकर सल्ल्याची सुरुवात होते ती खरंतर शाळेपासूनच. तेव्हा मोठी माणसं १० वीतल्या विद्यार्थ्यांला म्हणतात, ‘‘आता भरपूर अभ्यास कर रे बाबा, पुढे तर मजाच करायची आहे !’’ मग तोच विद्यार्थी कमीत कमी मौजमजा आणि जास्तीत जास्त अभ्यास करून २ वर्षानी १२ वी ला गेला की पुन्हा तोच सल्ला, ‘‘आता थोडा जास्त अभ्यास कर हो, पुढे तर मजाच करायचीये !’’आणि हा सल्ला जसजसे आयुष्यातले एक एक टप्पे वाढत जातात तसा प्रत्येक टप्प्यावर मिळत जातो ! पण मग हेतू जरी चांगला असला तरी या सल्ल्यातली ही ‘पुढची’ मजा साधारणत: किती पुढे गेल्यावर करायची, असा प्रश्न नक्कीच विचारून घ्यावा! कारण शिक्षण संपवून नोकरी सुरू झाल्यावर मात्र हा सल्ला आपण स्वत:च स्वत:ला द्यायला लागलेलो असतो! कारण तेव्हा आपल्या कामाचे मार्क नाही, तर पैसे मिळणार असतात! आणि मार्काचं काय, थोडे कमी आले किंवा फार जास्त जरी नाही आले तरी त्या वयात एक वेळ चालून जातं, पण पैसे कमी कमी होत गेले तर फार काळ चालत नाही. ते जितके जास्त कमवता येतील तितके जास्त प्रयत्न आपण करत राहतो; परंतु असे प्रयत्न करून करून किती करणार याला सुद्धा मर्यादा आहेच! आपल्या नोकरीच्या पसा-यात आपण इतके अडकून जातो की आपलं कौटुंबिक आणि सामाजिक जीवन हे आपल्या आíथक जीवनापुढे किंबहुना जगण्याच्या रेटय़ात हरवून गेलेलं आहे, हे आपल्याला फार उशिरा कळतं.

आपल्या आयुष्यात वेळ, पैसा आणि आरोग्य या तीन गोष्टी आपल्याला हवं ते सुख मिळवून देऊ शकतात इतकी ताकत त्यांच्यात आहे. पण यात थोडी गफलत आहे ! या तिघांचं एकमेकांशी फारसं पटत नाही, त्यामुळे हे तिघं फार क्वचित एकत्र येतात! बाल्यावस्थेत माणसाकडे वेळ असतो, आरोग्य असतं, पण पैसा नसतो, त्यामुळे त्यावेळी आनंद हा पैसा ज्यांच्याकडे आहे अशा पालकांवर अवलंबून असतो. पुढे तारुण्यात पैसा असतो, आरोग्य असतं, पण आता वेळ नसतो! कामाचा व्याप, कौटुंबिक, सामाजिक, आíथक जबाबदा-या आणि असे अनेक वजनदार शब्द आपल्या आयुष्यात भरपूर वजन घेऊन आता आलेले असतात. वर्षभरात एखाद्या पावसाळी किंवा हिवाळी पिकनिकला जाऊन यायचं, एवढाच काय तो मोकळा वेळ! आणि मग वृद्धावस्थेत पैसा कमवण्याची हौस भागल्यावर वेळही असतो आणि पैसाही ब-यापैकी जमलेला असतो. पण आता आरोग्य साथ देत असेलच याची शाश्वती नाही. त्यामुळे तीर्थयात्रा/भजनी मंडळ, नातवंड, हास्य क्लब, ज्येष्ठ नागरिक म्हणून समाजातला आदर आणि ट्रेन आणि एस.टी.चा सवलतीचा पास, हे असे इतके आनंद आयुष्यात राहिलेले असतात.

वास्तविक तरुणांना पैसा कमावताना वेळ आणि पैसा यांची सांगड घालणं जमलं पाहिजे. जे प्रत्येकालाच जमेल असं नाही. रॉबर्ट कियोसाकी या अमेरिकन अर्थशास्त्रज्ञाने त्याच्या एका पुस्तकात म्हटलं आहे की, जगाची अर्थव्यवस्था चार भागांत विभागलेली आहे. नोकरदार, स्वयं रोजगार, उद्योजक आणि गुंतवणूकदार. जगातील ८०% लोक हे पहिल्या दोन म्हणजेच नोकरदार, स्वयं-रोजगार या प्रकारात येतात. यात काही शंका नाही! आणि फक्त २०% लोक हे पुढच्या दोन म्हणजेच उद्योजक आणि गुंतवणूकदार या प्रकारात येतात. यातही काही शंका नाही! पण जगातील एकूण पैशापैकी ८०% पैसा हा उद्योजक आणि गुंतवणूकदार यांच्याकडेच आहे आणि उर्वरित २०% पैसा हा नोकरदार, स्वयं-रोजगार प्रकारातील मंडळींकडे फिरत राहतो. आता यापैकी कोणता मार्ग तुम्हाला निवडायचा आहे हा तुमचा प्रश्न. मात्र आयुष्यातील काही आनंदी क्षणांचा बळी देऊन या मार्गावर जाणं निश्चितच योग्य नाही. नेहमीच पुढल्या क्षणांची वाट न पाहता आता आहे तो क्षणही आनंदात साजरा करण्याची कुवत आपल्याकडे असली पाहिजे. त्यासाठी आवड आणि पैसा यांना समतोल प्रमाणात ठेवून त्यांचं महत्त्व समजून घ्या.

एखादा उद्योग, व्यवसाय हे काही पर्याय असू शकतात जे आपल्यावरील आíथक ताण थोडा हलका करू शकतील आणि आपल्या मोकळ्या वेळेत किंचित का होईना भर घालू शकतील. कधीही उत्पन्नाच्या एकाच मार्गावर फार काळ अवलंबून राहू नये. एकापेक्षा जास्त मार्ग सतत शोधत राहिले पाहिजे. आणि ते अवलंबले सुद्धा पाहिजेत. अर्थात ते मार्ग झटपट श्रीमंती देणारे नसतीलच. शॉर्टकट हा यशाला कधीच नसतो. कारण झटपट तर या जगात आपण स्वत: आलो नाही तर पैसा तरी कसा येणार? थोडा वेळ, लक्ष आणि बुद्धी यांचा वापर करून आपण पैसे येण्यासाठी लागणारा हा वेळ कमी मात्र करू शकतो. कोणतीही स्कीम, फंड, कर्मकांड हे आपल्या यशाचे गमक बनूच शकत नाही. एखाद्या नव्या सुरुवातीसाठी जोपर्यंत आपण स्वत: मैदानात उतरत नाही तोपर्यंत सिक्स किंवा फोर मारणार तरी कसा? नोकरी जरी करत असलो तरी वाईट नाही, फक्त त्यासोबत किमान अजून एखादा नवीन मार्ग शोधून तो अमलात आणल्यास त्याचा फायदा आपला ताण हलका करण्यासाठी नक्कीच होतो. पैशाच्या मागे न धावता आपल्या स्वप्नांच्या मागे धावलं तर मार्ग सापडू शकतात. फार मोठा व्यवसाय उभारावा हे काही प्रत्येकाला एका दमात शक्य नाही, पण जे शक्य आहे असे इतर सोपे छोटे मार्ग, व्यवसाय देखील सापडतात. त्यातले बरेच तर नोकरी सांभाळून घरबसल्या किंवा कुटुंबाच्या सहाय्याने देखील करता येऊ शकतील असे असतात. गंगा कितीही मोठी असली तरीही तिची सुरुवात किंवा उगम हा एका हिमालयातील एका छोटय़ा िबदूपासूनच झाला आहे हे तर ठाऊक आहेच. त्यामुळे वेळ असताना एखादी छोटी सुरुवात पुढे हक्काचा मोठा व्यवसाय बनण्याची शक्यता नाकारता येत नाही. एक मात्र नक्की की, उगम झाल्यानंतर गंगेला खाच-खळग्यातून, दरी-खो-यातून मार्ग काढत मोठं व्हावं लागलं आहे. त्यामुळे मार्ग सुकर असतीलच असं नाही, पण मोठं झाल्यावर त्याचं समाधान मिळतं. आता ते मार्ग आपल्या आणि एकूणच आपल्याशी निगडित समाजाच्या हितासाठी चांगले असावेत. जेणेकरून ताण कमी होण्याऐवजी वाढणार नाहीत. आपल्यातली एखादी कला आपण उत्तम प्रकारे सादर करू शकत असू तर त्याचाही मोबदला म्हणून पैसे मिळतात. त्यामुळे आपल्या कला जोपासण्यात हलगर्जीपणा करून एखादी मोठी संधी आपण हुकवत तर नाही ना हे पाहायला हवं.

1 COMMENT

  1. प्रहारमध्ये येणारे रोहित कोर्लेकरचे लेख मी नियमित वाचत असतो. विविध विषयांचा त्याचा व्यासंग, कठीण विषय सोप्पा करण्याची त्याची हातोटी वाखाण्याजोगी. रोहितने याचबरोबर नियमित लेखनाकडे वळावे. मराठीला एक चांगला लेखक मिळवून दिल्याचे श्रेय “प्रहार”ला…..श्याम कुवळेकर, मुबई.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version