Home महामुंबई ठाणे राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या सोसायटीत काँग्रेसच्या प्रचाराला मज्जाव

राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या सोसायटीत काँग्रेसच्या प्रचाराला मज्जाव

0

कोपरखैरणे सेक्टर बारामधील बालाजी गार्डन या आलिशान इमारतीमध्ये ऐरोली विधानसभेचे काँग्रेस उमेदवार रमाकांत म्हात्रे यांना प्रचार करण्यास मज्जाव करण्यात आला. 
नवी मुंबई – विधानसभा निवडणुकीचा प्रचार ऐन रणरणत्या उन्हातही जोरदारपणे सुरू आहे. रविवारची पर्वणी साधून कोपरखैरणे सेक्टर बारामधील बालाजी गार्डन या आलिशान इमारतीमध्ये ऐरोली विधानसभेचे काँग्रेस उमेदवार रमाकांत म्हात्रे यांना प्रचार करण्यास मज्जाव करण्यात आला.

या इमारतीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार आमदार संदीप नाईक तसेच बेलापूर विधानसभा विभागाचे राष्ट्रवादीचे उमेदवार गणेश नाईक हे वास्तव्यास असल्याने या आलिशान सोसायटीमध्ये विरोधकांना प्रचार करण्यास विरोध केला जात आहे. याविरोधात काँग्रेस उमेदवार रमाकांत म्हात्रे यांनी नाईक यांच्या हुकूमशाहीविरोधात जोरदार घोषणाबाजी करून आपला निषेध व्यक्त केला.

रविवार असल्याने ऐरोली व बेलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी प्रचार फेरीवर भर दिला. सकाळी काँग्रेस उमेदवार रमाकांत म्हात्रे यांनी माजी नगरसेवक अंकुश सोनावणे, कोपरीतील नगरसेवक विलास भोईर तसेच निवडक कार्यकर्त्यांना घेऊन प्रचार फेरीचे आयोजन केले होते.

मात्र ही प्रचार फेरी कोपरखैरणे सेक्टर १२मधील बालाजी गार्डन या आलिशान सोसायटीच्या प्रवेशद्वारावर आल्यावर सुरक्षारक्षकाने ती अडवून धरत सोसायटीच्या आवारात येण्यास मज्जाव करून प्रवेशद्वार लावून घेतले. याबाबत उमेदवार म्हात्रे यांनी आत येऊन प्रचार करण्यास परवानगी देण्याची मागणी केली. मात्र राजकीय दबाव असल्याने सुरक्षारक्षकाने ही प्रचार फेरीला आत येऊ देण्यास नकार दिला.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी समंजस भूमिका घेऊन प्रचार फेरीचा मोर्चा फाम सोसायटीच्या दिशेने वळवला. मात्र तत्पूर्वी बालाजी गार्डन सोसायटीत वास्तव्यास असलेल्या माजी पालकमंत्री गणेश नाईक व संदीप नाईक यांच्या दबावामुळेच प्रचारास विरोध केला जात असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात घोषणा देऊन निषेध व्यक्त केला.

लोकसभा निवडणुकीत बालाजी गार्डन सोसायटीमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार व गणेश नाईक यांचे सुपुत्र संजीव नाईक यांना अवघ्या तीन मतांचीच आघाडी मिळाली होती. त्यांचा पराभव झाल्यानंतर आता नाईक कुटुंबीय अधिक काळजी घेत आहेत. यामुळे अन्य पक्षांच्या उमेदवारांना या ठिकाणी फिरकूही दिले जात नाही.

याच इमारतीमध्ये गणेश नाईक त्यांचे दोन पुत्र संदीप नाईक व संजीव नाईक यांच्यासह पुतणे महापौर सागर नाईक हे वास्तव्यास आहेत. बालाजी गार्डन सोसायटीमध्ये बाराशेपेक्षा अधिक मतदार आहेत. प्रचार फेरीला आक्षेप घेतल्याप्रकरणी निवडणूक आयोगाला तक्रार करणार असल्याचे काँग्रेस उमेदवार रमाकांत म्हात्रे यांनी सांगितले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version