Home क्रीडा रिव्हर्स स्विंग रिव्हर्स स्विंग – १८ जून २०१३

रिव्हर्स स्विंग – १८ जून २०१३

0

क्रिकेटच्या इतिहासातील रंजक घडामोडी 

१८९४
ओव्हल येथे सरे आणि इसेक्स यांच्यात झालेल्या सामन्यात ७० मिनिटांचा खेळ होऊ शकला. पण दमट हवामानामुळे त्यावरही टॉम रिचर्डसन यांनी वर्चस्व गाजवत ४५ धावांत १० विकेट्स मिळवल्या. दोन दिवसांनंतर त्यांनी दुस-या डावात आणखी पाच विकेट्सची भर घातली.


१९१५
इंग्लंडचे सलामीवीर आर्थर फाग यांचा जन्म. १९३८मध्ये इसेक्सविरुद्ध केंटचे प्रतिनिधित्व करणा-या फाग यांनी एकाच सामन्यात दोन द्विशतकी खेळी झळकावण्याचा मान पटकावला. नंतर त्यांनी कसोटी पंच म्हणून काम पाहिले.


१९७१
न्यूझीलंडचे संयमी सलामीवीर ब्लेअर पोकॉक यांचा जन्म. १९९३-९४मध्ये पर्थ कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करताना पोकॉक यांनी ११८ चेंडूत ३४ आणि ९६ चेंडूत २८ धावा फटकावल्या. कसोटी कारकीर्दीत त्यांना २९.८च्या सरासरीने धावा करता आल्या. १५ कसोटीत त्यांना एकही शतक झळकावता आले नाही. मात्र अखेरच्या नऊ कसोटीत त्यांनी सहा अर्धशतकी खेळी केल्या.


१९७५
वनडे क्रिकेटच्या इतिहासात असामान्य गोलंदाजी कामगिरीची नोंद. पहिल्यावहिल्या वर्ल्डकपमधील उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने यॉर्कशायरच्या चाहत्यांसमोर यजमान इंग्लंडचा धुव्वा उडवला. स्पर्धेतील पहिला सामना खेळणारे डावखुरे वेगवान गोलंदाज गॅरी गिलमोर यांच्यासमोर इंग्लंडच्या आघाडीच्या फलंदाजांना तग धरता आला नाही. पहिल्या सातपैकी त्यांनी सहा विकेट्स मिळवल्या. त्यामुळे इंग्लंडची ७ बाद ३७ अशी दारुण अवस्था झाली. तरीही त्यांना ९३ धावा करता आल्या. गवत असलेल्या हेडिंग्लेच्या खेळपट्टीवर इंग्लंडनेही ऑस्ट्रेलियाची ६ बाद ३९ अशी स्थिती केली. मात्र गिलमोर यांच्या नाबाद २८ धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने चार विकेट्सनी हा सामना जिंकला.


१९७९
दुस-या वर्ल्डकपमध्ये असोसिएट संघाला एकमेव सामना जिंकता आला. तीन दिवस चाललेल्या या सामन्यात सुनील वेट्टीमुनी, रॉय डायस आणि दुलीप मेंडिस यांनी ओल्ड ट्रॅफर्डच्या खेळपट्टीवर अर्धशतकी खेळी करत श्रीलंकेला २३८ धावांवर आणून ठेवले. दुस-या दिवशी विश्रांती घेतल्यानंतर तिस-या दिवशी भारताने सकारात्मक सुरुवात केली. मात्र गुंडप्पा विश्वनाथ २२ धावांवर धावचीत झाल्यानंतर भारताने शेवटच्या सात विकेट्स ५९ धावांत गमावल्या अन् श्रीलंकेने ४७ धावांनी विजय साकारला.


१९८३
भारताचे महान क्रिकेटपटू कपिलदेव यांनी कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी. झिम्बाब्वेविरुद्ध त्यांनी रचलेल्या नाबाद १७५ धावांच्या स्फोटक खेळीमुळे भारताला उपांत्य फेरीसाठी पात्र ठरता आले. सात दिवसांनंतर अंतिम फेरीत बलाढय़ वेस्ट इंडिजवर विजय मिळवून भारत पहिल्यांदा विश्वविजेता ठरला. ५ बाद १७ अशी बिकट अवस्था असताना कपिल यांनी झिम्बाब्वेच्या गोलंदाजांच्या चिंधडय़ा उडवत १६ चौकार आणि सहा षटकारांच्या साहाय्याने भारताला ८ बाद २६६ अशा स्थितीत आणून ठेवले. झिम्बाब्वेला २३५ धावांवर रोखत भारताने हा सामना ३१ धावांनी जिंकला.


१९८५
हेडिंग्ले येथील पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला पाच विकेट्सनी हरवत इंग्लंडने मोसमाची दणक्यात सुरुवात केली. पहिल्या डावात १७५ धावा फटकावत टिम रॉबिन्सनने कसोटी कारकीर्दीला थाटात सुरुवात केली. जॉन एम्बुरी यांनी दुस-या डावात ऑस्ट्रेलियाचे पाच विकेट्स मिळवल्या. विजयासाठीचे १२३ धावांचे उद्दिष्ट इंग्लंडने पाच विकेट्सच्या मोबदल्यात पार केले.


१९८६
आयसीसी ट्रॉफी सामन्यात पापुआ न्यू गिनी संघाने जिब्राल्टरवर ३६९ धावांनी मात केली. ६० षटकांत पापुआ न्यू गिनी संघाने ९ बाद ४५५ धावा करून जिब्राल्टरला ८६ धावांत गुंडाळले.


२००५
‘ऑस्ट्रेलियाच्या क्रीडा इतिहासातील सर्वात मानहानिकारक पराभव’, अशा मथळ्याखाली ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे वृत्त सिडनीतील ‘डेली टेलिग्राफ’ने दिले होते. जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाला नॅटवेस्ट मालिकेतील पहिल्याच वनडे सामन्यात लिंबूटिंबू समजल्या जाणा-या बांगलादेशकडून पराभूत व्हावे लागले. फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियाला निर्धारित षटकांत ५ बाद २४९ धावाच करता आल्या. मोहंमद अश्रफुलच्या पहिल्या शतकी खेळीमुळे बांगलादेशला पाच विकेट्सनी विजय मिळवता आला. शेवटच्या षटकांत सात धावांची गरज असताना आफताब अहमदने जेसन गिलेस्पीला उत्तुंग षटकार ठोकला. पुढील चेंडूवर एक धाव काढल्यामुळे ऑस्ट्रेलियाला पराभवाचा सामना करावा लागला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version