Home संपादकीय विशेष लेख रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे

रुपक त्रिपुरारी पौर्णिमेचे

1

आपल्याकडे साज-या होणा-या प्रत्येक सण, उत्सवांमागे रुपक दडलेले आहे. हे रुपक सामाजिक सलोख्याचे, मानवी नातेसंबंधांचे, दुष्ट शक्तींच्या निर्दालनाचे आहे. आज समाजात भ्रष्टाचारासारखे भस्मासूर वाढले आहेत. अशा समाजविघातक गोष्टींच्या निर्दालनासाठी सगळ्यांनी एकत्र आले पाहिजे. अशा समाजहितविरोधी त्रिपुराला जाळून टाकण्याचे व्रत त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने प्रत्येकाने घ्यायला हवे. असे सामाजिक सलोखा बिघडवणारे त्रिपूर जाळले जातील तेव्हाच त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केल्याचा आनंद आपण घेऊ शकू.

भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सण आणि उत्सव साजरे केले जातात. या प्रत्येक सणामागे एक रुपक दडलेले आहे. हे रुपक शोधण्याची आज गरज आहे. हे रुपक मांडणारी एक सुंदर पुराणकथा किंवा लोककथा आहे. या पुराणकथा का निर्माण झाल्या आहेत याचाही विचार होण्याची गरज आहे. या कथांमधील तत्त्वे किंवा भान समजून घेण्याची आवश्यकता आहे. त्रिपुरारी पौर्णिमेलाही अशीच कथा आहे. त्रिपूर नावाचा एक असुर होता.

प्रयागतीर्थाच्या ठिकाणी एक लाख वष्रे त्याने तपश्चर्या केली. या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग, असे म्हणाले. त्यावर देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे, असा वर त्याने मागितला. याचाच अर्थ त्याला मरण नको होते. त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटले. असा वर मिळाल्यानंतर मात्र त्या असुरातील उन्मत्तपणा वाढला.

या असुराची आकाश, संचारासह तीन पुरे होती. त्यामुळे त्याला त्रिपूर असे नाव देण्यात आले. मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो. पण या असुराने तसे केले नाही. तो देवदेवतांसह सा-यांनाच त्रास द्यायला लागला. त्याचा उपद्रव व्हायला लागला तेव्हा सर्व देवांनी शंकराला प्रार्थना केली. शंकराने त्याची तिन्ही पुरे जाळून टाकली आणि या राक्षसाचा नायनाट केला. हा दिवस काíतकी पौर्णिमेचा होता. त्यामुळे कार्तिकी पौर्णिमेला त्रिपुरी पौर्णिमा किंवा त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी प्रदोषकाळी शिवाने त्रिपूर राक्षस राजाचा वध करून देवदेवतांची त्रासातून सुटका केली. म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने हिंदू धर्मात साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्रिपूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी केली जाते. घरोघरी, शिवमंदिरातून आणि इतर देवालयांमधून दीपोत्सव साजरा करतात.

या दिवशी कार्तिकेय यांचे दर्शन घ्यावे, गंगास्नान करावे आणि ब्राह्मणांना दीपदान करावे, असे शास्त्रात सांगण्यात आले आहे. मत्स्यावतारही याच दिवशी झाला. दुष्टांचा संहार याच दिवशी झाला म्हणून कार्तिक पौर्णिमेला आनंदोत्सव साजरा केला जातो. भगवान शंकराने त्रिपुराबरोबर त्याची तिन्ही पुरे उद्ध्वस्त करून टाकली आणि त्याच्याबरोबर युद्ध करून कार्तिकी पौर्णिमेला प्रदोषकाळी त्रिपुरासुराला ठार मारले. त्याची आठवण म्हणून कार्तिकी पौर्णिमेला दीपप्रज्वलन केले जाते. दिवाळीत दिव्यांची रोषणाई करून परिसर प्रकाशमान केला जातो त्याचप्रमाणे त्रिपुरारी पौर्णिमेलाही मंदिरातील दीपमाळेवर दीप लावण्यात येतात. हा एक प्रकारचा आनंदोत्सवच आहे. ज्या ज्या वेळी असुरशक्ती वाढली त्या त्यावेळी दैवी शक्ती प्रकट होते आणि असुर प्रवृत्तीचा नायनाट करते अशा प्रकारच्या कथा आपल्या संस्कृतीत आहेत. त्रिपुरारी पौर्णिमेलाही अशाच प्रकारची कथा आहे. सज्जनांचे रक्षण करून दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी दैवी शक्ती कशा उपयोगी असतात याचे चित्रण या कथांमधून दिसते. दुष्ट प्रवृत्तींचा नायनाट केल्याच्या आनंदाचा भाग म्हणून आपल्याकडे विविध उत्सव साजरे केले जातात. त्रिपुरारी पौर्णिमाही यापैकीच एक आहे. दुष्ट प्रवृत्ती वाढल्या की त्यांचा कशा प्रकारे विनाश होतो हे या कथांमधून दिसून येते.

त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी शंकराने त्रिपुरासुराचा वध केला असल्यामुळे त्याच्या मंदिरासमोरील त्रिपूर वातींनी उजळला जातो. पूर्वी प्रत्येक मंदिरासमोर एक दीपमाळ असायची. आताही जुन्या मंदिरांमधून ती दिसून येते. या दीपमाळेमध्ये वाती लावून त्या उजळल्या जातात. दुष्टांचा -हास कशा प्रकारे होतो याची आठवण राहावी म्हणून या दीपमाळा उजळल्या जातात. दिवाळीनंतर येणारी ही पौर्णिमा असते. या दिवशी देवस्थानातील दीपमाळा उजळतात त्याचप्रमाणे नदीच्या पात्रात प्रज्वलित दीप सोडण्याचीही प्रथा आपल्याकडे आहे. ‘त्रिपूरज्वलन व्रत’ नावाचे व्रत या दिवशी करतात. शिवापुढे वाती लावणे, दीपपात्री दान करणे, शिवाची पूजा करणे असा या व्रताचा विधी शास्त्रात सांगितला आहे. कार्तिक पौर्णिमेला तुलसी विवाहाची समाप्ती होते. कार्तिक शुद्ध एकादशी ते पौर्णिमेपर्यंत पाच दिवस चालणा-या तुलसी विवाहाची सांगता पौर्णिमेला होते. म्हणूनही दीपोत्सव साजरा केला जातो. उत्तर भारतात त्रिपुरारी पौर्णिमा स्कंद जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी स्कंद मूर्ती देवतेची पूजा करणे, दीप पेटवणे आणि आनंदोत्सव साजरा करणे असे उत्सवाचे स्वरूप आहे. दक्षिण भारतातील राज्यांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमेला कृतिका महोत्सव साजरा करतात. या दिवशी भक्तगण शंकराची पूजा करतात, दीपदान करतात आणि अग्नी प्रज्वलित करून मोठ्या थाटाने हा उत्सव साजरा करतात.

मंदिरासमोरील उंच स्तंभावर दीपप्रज्वलन करणे हासुद्धा या महोत्सवाचाच एक भाग आहे. कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षात नरकासुर, त्रिपुरासुर आणि इतर राक्षसांचा देवादिकांनी वध केला. म्हणून दीपावलीपासून दीप प्रज्वलन करण्याची परंपरा आपल्याकडे सुरू झाली. त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. इतर राज्यांप्रमाणे गोव्यातही त्रिपुरारी पौर्णिमेचा उत्सव परंपरेनुसार केला जातो. मंदिरातील दीप मंदिराजवळच्या तळीच्या पाण्यात किंवा नदीकिनारी असलेल्या मंदिरातून नदीच्या प्रवाहात सोडणे, मंदिरातील देवदेवतांची विधिवत पूजा करून पालखीतून देवतांची मिरवणूक काढणे अशा प्रकारे तेथे हा उत्सव साजरा केला जातो. गोव्यातील साखळी येथील विठ्ठलापूर हे प्रति पंढरपूर समजले जाते. वाळवंटी नदीकिनारी पंढरपूर येथे कार्तिकी एकादशीला दीपदान करण्याची जी परंपरा आहे त्याचप्रमाणे येथेही ही परंपरा पाळली जाते. तेथे गेल्या ३० वर्षापासून रंगवलेल्या होड्या नदीच्या पात्रात सोडण्याची परंपरा सुरू झाली. तेथे १५ वर्षापूर्वी साखळी दीपोत्सव समिती स्थापन करण्यात आली. त्यामुळे त्रिपुरारी उत्सवाचे स्वरूप आता आणखी विकसित झाले आहे. या उत्सवाला आता राजकीय पातळीवरील उत्सव म्हणून मान्यता मिळाली आहे. या दिवशी घरात, देवळात दिवे लावावेत, असे सांगण्यात आले आहे. दीपावलीतील दीपोत्सवाप्रमाणेच आज दीपोत्सव साजरा केला जातो. आपल्या मनातील अंधार घालवून मनाची दीपज्योत प्रज्वलित करावी, असा या उत्सवांचा हेतू आहे. आपल्या मनाची सद्बुद्धी दीपज्योतीसारखी जागवा, असे या उत्सवांचे सांगणे आहे. आज समाजात भ्रष्टाचारासारखे भस्मासूर उभे ठाकले आहेत. हे असुर जाळून टाका, असे या उत्सवांतून आवाहन करण्यात आले आहे. समाजविरोधी मूल्यांचा नायनाट करा, हा यामागील यथार्थ आहे. आज अशा उत्सवातील रुपके बाजूला पडतात आणि त्यातील कर्मकांडच फक्त शिल्लक राहते. त्यामुळे त्रिपुरारी पौर्णिमेमागील रुपक आपण समजून घेण्याची आवश्यकता आहे.

1 COMMENT

  1. पूर्वोत्तर भारतात ‘त्रिपुरा’ नावाचे राज्य आहे… त्याचे नांव या राक्षसाच्या नगरावरूनच पडले, की त्याचीही काही कथा आहे, कृपया विशद करावी… _/\_

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version