Home क्रीडा रेआल माद्रिदने जिंकली ‘एल क्लासिको’

रेआल माद्रिदने जिंकली ‘एल क्लासिको’

0

रेआल माद्रिदने शनिवारी एका गोलाची पिछाडी भरून काढत बार्सिलोनाला ३-१ नमवले आणि प्रतिष्ठित एल-क्लासिको जिंकली.

माद्रिद – रेआल माद्रिदने शनिवारी एका गोलाची पिछाडी भरून काढत बार्सिलोनाला ३-१ नमवले आणि प्रतिष्ठित एल-क्लासिको जिंकली. या विजयामुळे रेआल माद्रिदला ला-लिगामध्ये अव्वल स्थानी असलेल्या बार्सिलोनाची आघाडी कमी करता आली आहे.

बार्सिलोनाचा हा ला-लिगा हंगामातील पहिलाच पराभव ठरला. आता २२ गुणांसह ते अव्वल स्थानी असले तरी रेआल माद्रिद एका गुणानेच खाली म्हणजे २१ गुणांवर आहेत. या लढतीत सर्वाचे विशेष लक्ष असलेला स्टार लिओनेल मेसी गोल करण्यात अपयशी ठरला. प्रतिस्पर्धी सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डो समोर असताना ला-लिगा इतिहासात सर्वाधिक गोलांची बरोबरी साधण्यात मेसीला अपयश आले. वादग्रस्त लुइस सुआरेझचे ला-लिगा पदार्पणही अपयशी ठरले. वर्ल्डकपमध्ये चार महिन्यांची बंदी घालण्यात आल्यानंतर सुआरेझ प्रथमच स्पर्धात्मक लढतीत खेळला.

त्याला गोल करता आला नाही मात्र त्यातले त्यात त्याच्या पासवर नेयमारने चौथ्या मिनिटाला गोल केला. हा गोल बार्सिलोनाला सुरुवातीलाच दमदार १-० आघाडी देणारा ठरला. मात्र अर्धातासच बार्सिलोनाचा आघाडीचा आनंद टिकला. कारण ३५व्या मिनिटाला यजमान रेआल माद्रिदला पेनल्टी बहाल करण्यात आली. पेनल्टी एरियात बार्सिलोनाचा बचावपटू गेरार्ड पिकेचा बॉलला चुकून हात लागल्याने रेफ्रींनी तातडीने यजमानांना पेनल्टी बहाल केली. त्यावर रोनाल्डोने गोल नोंदवला.

याबरोबरच रोनाल्डोचे ला-लिगामधील ८ सामन्यांत सर्वाधिक १६ गोल झाले. १-१ बरोबरीत पहिले सत्र संपले. मात्र दुस-या सत्रात यजमानांनी बार्सिलोनाला फारशी संधीच दिली नाही. बार्सिलोनाच्या बचावपटूंच्या समन्वयाच्या अभावाचा फायदा घेत त्यांनी आणखी दोन गोल केले. पेपे (५०वे मिनिट) आणि करिम बेन्झेमा (६१वे मिनिट) यांचे गोलसाठी मोलाचे योगदान ठरले.

त्यातच दुस-या सत्रात मेसीचे काही प्रयत्न गोलकीपर इकेर कॅसियासने हाणून पाडले. सुआरेझच्याजागी ६८व्या मिनिटाला बदली देण्यात आला. एकंदरीत १-३ पिछाडीतून सावरणे नेयमार, मेसीच्या बार्सिलोनाला शक्य नव्हते. रेआल माद्रिदचा हा सर्व स्पर्धामधील मिळून सलग नववा विजय ठरला.


सॅँचेझचे दोन गोल; आर्सेनलचा विजय
आर्सेनलने शनिवारी अ‍ॅलेक्सिस सॅँचेझच्या दोन गोलांच्या जोरावर संडरलॅँडचा २-० पराभव केला. संडरलॅँडच्या बचावपटूंच्या समन्वयाचा अभावाचा फायदा घेत सॅँचेझने गोल नोंदवले.

या हंगामात आर्सेनलशी करारबद्ध झाल्यापासून सॅँचेझने आठ लढती खेळताना आतापर्यंत एकूण पाच गोल नोंदवले आहेत. याबरोबरच या हंगामातील निराशा आर्सेनलने ९ सामन्यांतील तिसरा विजय नोंदवत भरून काढली. त्यांनी आता १४ गुणांसह पाचवे स्थान मिळवले.

साउथम्टपन दुस-या स्थानी
साउथम्पटनने घरच्या मैदानावर शनिवारी स्टोक सिटीचा १-० पराभव केला. सॅडियो मॅनेने ३३व्या मिनिटाला केलेला गोल यजमानांच्या विजयात मोलाचा ठरला. २२ वर्षीय मॅनेचा हा प्रिमियर लीगमधील पहिला गोल ठरला. मॅँचेस्टर सिटीच्या शनिवारी झालेल्या पराभवामुळे आणि येथील विजयामुळे साउथम्पटनने ९ सामन्यांतून सहा विजयांसह दुसरे स्थान (१९ गुण) मिळवले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version