Home टॉप स्टोरी शिवसेना काकुळतीला भाजपकडून दुर्लक्ष

शिवसेना काकुळतीला भाजपकडून दुर्लक्ष

1

भाजपकडून प्रस्ताव आला तरच विचार करू म्हणणा-या शिवसेनेच्या नेतृत्वाने आता महाराष्ट्रातील नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपचे केवळ पाय धरणेच बाकी ठेवले आहे.

मुंबई – भाजपकडून प्रस्ताव आला तरच विचार करू म्हणणा-या शिवसेनेच्या नेतृत्वाने आता महाराष्ट्रातील नव्या सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी भाजपचे केवळ पाय धरणेच बाकी ठेवले आहे.

‘हवे तर छोटा भाऊ म्हणा पण सत्तेत घ्या, दोन-पाच मंत्रिपदे तरी द्या’ अशी याचना करण्यासाठी दिल्लीत गेलेले शिवसेनेचे दूत अपमानित होऊन परतल्यानंतरही शिवसेनेची आशा संपलेली नाही. यामुळेच झालेला अपमान गिळून शिवसेनेचे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या चहापानाला रविवारी उपस्थित राहिले होते.

इतकेच नव्हे तर महाराष्ट्रात शिवसेना – भाजपचे सरकार यावे, अशी अपेक्षा या खासदारांनी व्यक्त केली. भाजपने शिवसेनेला बरोबर न घेता सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू केल्यावर तर शिवसेना पार काकुळतीला आली आहे. तर, सत्तेसाठी गुडघे टेकणा-या शिवसेनेकडे भाजपने साफ दुर्लक्ष केले आहे.

निवडणूक काळात शिवसेनेने वापरलेल्या प्रत्येक विखारी शब्दांचा, शेलक्या विशेषणांचा भाजपकडून हिसाब चुकता केला जात आहे. निकालानंतर भाजपचे गाडे १२३ वर अडकल्यानंतर आपल्याशिवाय पर्याय नाही, अशा भ्रमात राहून शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अडवणुकीची भूमिका घेतली होती.

भाजपकडून पर्याय आल्यानंतर आपण विचार करू, असे ठाकरे यांनी जाहीर केले होते. मात्र त्याच वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आणि शिवसेनेची हवाच गूल झाली. प्रस्ताव आल्याशिवाय चर्चेला जाणार नाही, असे म्हणणा-या शिवसेनेला महाराष्ट्रातील भाजप नेते दाद देत नाहीत, असे पाहिल्यानंतर शिवसेनेचे दूत अनिल देसाई आणि सुभाष देसाई दिल्लीला जाऊन आले.

मात्र तेथेही त्यांना कोणी हिंग लावून विचारले नाही. वेळ निश्चित न करता आल्यामुळे साधी भेटही दिली नाही. ‘कोणत्याही अटीशिवाय पाठिंबा द्यायचा असेल तर द्या’ असा निरोप मात्र या दुतांच्या तोंडावर मारला. इतके नव्हे तर शिवसेनेला दोनच मंत्रीपदे देण्यात येतील, अशा बातम्या पसरवून खिजविण्यात आले. इतका अपमान झाल्यानंतरही शिवसेनेने सत्तेसाठी लाचारी सोडलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या चहापानाला शिवसेनेचे खासदार गपगुमान उपस्थित राहिले.

शिवसेनेकडून सरकारच्या तंबूत घुसण्यासाठी अशी केविलवाणी धडपड सुरू असताना भाजपने मात्र त्याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे. त्यावर प्रतिक्रिया द्यावी इतकीही किंमत भाजपच्या गोटातून शिवसेनेला मिळेनाशी झाली आहे. सरकार स्थापनेसाठी भाजपने सर्व तयारी केली असून शिवसेनेच्या सहभागाशिवाय शपथविधी सोहळा उरकून घ्यायचा आणि त्यानंतर सहज आली तर शिवसेना नाही तर राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन बहुमत सिद्ध करायचे असे धोरण भाजपने अवलंबीले आहे.

शिवसेनेला जितके अपमानित करता येईल, तितके करण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. शिवसेना आणखी किती लाचार होते, ते येत्या काही दिवसांत दिसेल.

शिवसेना खासदारही घायकुतीला
केंद्रामध्ये एनडीएचे सरकार स्थापन झाल्यानंतर आज पहिल्यांदा सर्व घटकपक्ष एकत्र येत आहेत. एनडीएचे सरकार आहे, असे आज वाटू लागले आहे, अशी कोपरखळी शिवसेना खासदार गजानन किर्तीकर यांनी मारली. तर केंद्रात आम्ही भाजपसोबत आहोत. महाराष्ट्रातही शिवसेना – भाजपचे सरकार यावे, अशी अपेक्षा चंद्रकांत खरे यांनी व्यक्त केली. अशाच आशायचे मत ठाण्याचे खासदार राजन विचारे यांनीही व्यक्त केले आहे.

1 COMMENT

  1. ” खोट्यानाट्या बातम्या पसरवून शिवसेनेला बदनाम करण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. ज्या कुणास हे उद्योग करायचे आहेत त्यांचा आनंद औटघटकेचा ठरल्याशिवाय राहणार नाही. शिवसेनेच्या वाघाला डिवचू नका. तूर्त इतकेच! “——
    आजच्या ‘ सामना ‘च्या अग्रलेखातील हा इशारा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version