Home संपादकीय अग्रलेख ‘‘लढाई जिंकून तहात हरणारे ’’

‘‘लढाई जिंकून तहात हरणारे ’’

1

आपणच मेहनतीने काढलेल्या सुंदर रांगोळीवर आपणच फस्कन पाय मारून ती रांगोळी विस्कटून टाकावी, तसे गोव्यातील काँग्रेस पक्षाने केले आहे. काँग्रेसवाल्यांना काय झाले आहे ते कळत नाही. शेतात चांगले पीक आलेले आहे. ज्वारीची कणसं मनगटासारखी आहेत. त्यात ज्वारीचे दाणे सकस आहेत आणि ते उभे पीक कोणा पेंढा-याने कापून न्यावेत आणि शेताच्या मालकाने गुमान ते बघत बसावे, तशी काहीशी अवस्था गोव्यातील काँग्रेस पक्षाची झालेली आहे.

ज्या पक्षाला मतदारांनी भरभरून पाठिंबा दिलेला आहे. ४० जणांच्या विधानसभागृहात बहुमतासाठी २१ जागा हव्या आहेत, १९ जागांवर काँग्रेस पक्षाचे उमेदवार निवडून आलेले आहेत. राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचा एक उमेदवार विजयी झाला आहे. त्याने काँग्रेसला पाठिंबा दिलेला आहे.

नैसर्गिक न्यायाने काँग्रेस पक्षाने आपल्या २० जणांची यादी राज्यपालांकडे सादर करण्यापूर्वी चार अपक्षांपैकी एका सदस्याला काँग्रेसच्या बाजूला आणून राजभवनवर परेड करणे, आपले बहुमत दाखवणे, नावांची यादी सादर करणे, मुख्यमंत्रीपदाचा नेता निश्चित करणे या सर्व गोष्टींसाठी काँग्रेसला सगळ्यात कमी वेळ लागला असता, कारण निवडून आलेले पक्षाचे १९ आमदार, पाठिंबा दिलेला राष्ट्रवादीचा एक आमदार अशा २० जणांचा ताफा राजभवनजवळ जाऊन उभा राहिला असता, तर ‘हा आमचा उद्याचा नेता आहे यांना शपथ द्या’ असे स्पष्ट करून गोवा विधानसभा सभागृहाचा नेता म्हणून काँग्रेसने एकाचे नाव दिले असते, तर सरकार बनविण्याची पहिली संधी काँग्रेस पक्षाला देण्याशिवाय राज्यपालांना पर्यायच राहिला नसता आणि एकदा का मुख्यमंत्रीपद हातात आले की, एक अपक्ष काय, चारही अपक्ष काँग्रेस पक्षाकडे धावत आले असते. हे काल्पनिक स्वप्न नाही.

व्यवहारात सहज घडणारी गोष्ट होती; परंतु गोव्यातील काँग्रेस नेत्यांच्या आपसातील मतभेदांमुळे, मुख्यमंत्रीपद कोणाला, या वादामुळे आणि काँग्रेस पक्षाने पाठविलेले प्रभारी द्विगविजयसिंग यांना द्विगविजय न गाजवता आल्यामुळे काँग्रेस पक्षाला हात चोळीत बसावे लागले आणि १३ सदस्य निवडून आलेल्या भाजपाने निवडणुकीत हरल्यावर तहामध्ये काँग्रेसला गारद केले. सगळ्यात मोठी चूक हीच आहे की, जिंकली असताना काँग्रेस गोव्यात राजकारणाच्या डावपेचात कमालीची कच्ची राहिली.

द्विगविजयसिंग यांच्यासारखा अनेक मैदान मारलेला दिग्गज राजकारणी गोव्याचे ऑपरेशन करण्याकरिता पाठवल्यानंतरही ऑपरेशनच्या टेबलावरच पेशंटने प्राण सोडावा, तशी गोव्यातील काँग्रेसची अवस्था झाली आणि चलाख गडकरींनी १३ जणांच्या पाठिंब्यावर आणखी आठ जणांना ओढले. २१ ची संख्या राज्यपालांना दाखवली, आणि मैदान मारून ते नागपूरला निघून गेले. केवळ आणि केवळ डावपेचात कमी पडल्यामुळे, आपला मुख्य शत्रू कोण आहे हे न समजल्यामुळे, काँग्रेसमधल्या ३-४ जणांना मुख्यमंत्रीपदाची हाव सुटल्यामुळे काँग्रेसने आपल्याच हाताने आपला खेळ बिघडवून घेतला आहे. त्यामुळे गोव्यात जे काही घडले, त्यात भाजपाला कोणताही दोष देता येणार नाही.

वेळ फुकट न घालवता चलाखी करून त्यांनी राज्यपालांना गाठले, जे काँग्रेसला करणे अधिक सोपे होते, भाजपाला आठ जणांची जमावाजमव करायची होती, काँग्रेसला फक्त एकाची गरज होती. त्या एक आमदारालासुद्धा आपल्या बाजूने उभी करण्याची राजकीय चलाखी ज्या नेत्यांना गोव्यात करता आली नाही, तेच नेते काँग्रेसच्या गोव्यातल्या या पराभूत नाटय़ाचे खलनायक आहेत, असेच म्हणावे लागेल. आता आपण १९ जण निवडून आलो आहोत, आपल्यालाच संधी मिळणार, अशा गोड संभ्रमात काँग्रेसवाले संध्याकाळी कुठे बसले माहीत नाही.

संध्याकाळही फुकट घालवली, राजकारणात एक रात्र फार महत्त्वाची असते. त्या रात्रीत जगातली सारी उलट-पलट राजकारणी लोक करू शकतात. दिल्लीमध्ये तर रात्र पडली की राजकारण सुरू होते. गोव्यामधील ११ तारखेची रात्र काँग्रेसने फुकट घालवली. १२ तारखेला सकाळीच राज्यपालांना गाठले असते तर आज सगळा विषय वेगळा झाला असता. जवळपास बहुमताच्या वेशीला हात लावलेल्या काँग्रेसला १३ संख्येने मागे खेचले आहे. हातात एक्का असावा आणि हुकमाच्या एक्क्याला मारावे तशी गोव्यातील काँग्रेसची अवस्था झाली. ‘‘आपुलीच प्रतिमा होते, आपुलीच वैरी’’ अशी काँग्रेसची अवस्था झाली आणि त्याचा दोष अन्य कोणाचाही नसून, फक्त काँग्रेसचाच आहे.

जी लढाई राजभवनवर लढायला हवी होती, ती लढाई काँग्रेस पक्षाने कारण नसताना सर्वोच्च न्यायालयात नेली आणि तिथे गेल्यावर काँग्रेस नेत्यांच्या लक्षात आले की, आपण लढाया गमावल्या आहेत. राजकीय लढाई ज्या चातुर्याने लढायची ती लढता आली नाही, त्यामुळे राजभवनवर काँग्रेसवाले पोहोचण्याच्या अगोदर गडकरींनी पर्रिकर यांचे तिकीट कन्फर्म करून टाकले, आणि काँग्रेसची तिकीट वेटिंगवर राहिले. ही पहिली लढाई हरले, मग सर्वोच्च न्यायालयात धावले तिथे न्यायमूर्तींनी तीन प्रश्न विचारले..

१) काँग्रेसला पाठिंबा देणा-या आमदारांची यादी तुम्ही राज्यपालांना दिली होती का?

२) तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री कोण होणार? त्याला वीस सदस्यांच्या पाठिंब्याचे पत्र तुम्ही राज्यपालांना दिले होते का?

३) तुम्ही राज्यपालांची भेट मागून त्यांच्याकडे काँग्रेस पक्षाच्या बहुमताचा दावा केला होता का? त्या संबंधीचे कागदपत्रं तुमच्याकडे आहेत का?

या तीनही प्रश्नांपैकी एकाही प्रश्नाचे उत्तर सर्वोच्च न्यायालयाच्या समोर काँग्रेसने उभ्या केलेल्या वकिलाला देता आले नाही, तेव्हा नामदार न्यायमूर्ती महाराजांनी काँग्रेस पक्षाला जे सुनावले ते कडईत तापलेले तेल, कानात घालण्यासारखेच होते.

न्यायमूर्ती म्हणाले की, तुम्ही या सर्व तयारींनी इथे आमच्यासमोर आला असतात तर तुमच्या बाजूने निकाल देऊन पर्रिकरांच्या निवडीला स्थगिती द्यायला आम्हाला १० सेकंदही लागले नसते. तुम्ही जिथे लढाई लढायची, तिथे न लढता तयारीविना येथे आलात, आणि म्हणून तुमची याचिका स्वीकारणे शक्यच नाही.

एखाद्या लहान मुलाला गुरुजींनी समजावून सांगावे, इतक्या सोपेपणाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीनी पक्षकाराची समजूत घातली, त्यामुळे लढाई जिंकलेले, तहात कसे हारू शकतात आणि किती छान हारू शकतात, त्याचा एक चांगला वस्तुपाठ देशातल्या सर्व प्रांतामधल्या सर्वपक्षीय नेत्यांपुढे आता कायमचा कोरून ठेवला आहे.

सत्ता हातात येऊ शकत असताना, ती कशी गमवावी याचे प्रशिक्षण कोणाला हवे असेल, तर गोवा-काँग्रेस नेत्यांची शिकवणी लावायला अजिबात हरकत नाही आणि आता तर सरकार न बनल्यामुळे गोव्यातले काँग्रेस नेते सुशिक्षित बेकारच आहेत.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version