Home टॉप स्टोरी लाचार शिवसेनेला सत्ता सोडवेना!

लाचार शिवसेनेला सत्ता सोडवेना!

1

मुंबई – पालघरमध्ये भाजपकडून झालेल्या पराभवानंतर शिवसेना सत्तेतून बाहेर पडेल, अशा प्रकारची हवा निर्माण केली गेली. पराभवानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत ते सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील, अशा पुडय़ा सोडण्यात आल्या होत्या. मात्र पत्रकार परिषद झाली आणि त्यात त्यांनी सत्तेतून बाहेर पडण्याबाबत कोणताही निर्णय घेतला नाही. भाजपवर टीका करणारी शिवसेना सत्तेसाठी किती लाचार आहे, हेच पुन्हा एकदा समोर आले.

राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारमध्ये राहून शिवसेना सत्तेची फळे चाखत आहे. मात्र त्याचवेळी विरोधी पक्ष करणार नाही इतक्या तिखट शब्दांत भाजपवर टीका करीत आहे. प्रत्येक वेळी सत्तेतून बाहेर पडण्याच्या आरोळ्या ठोकल्या जातात. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते आताच्या पोटनिवडणुकीत सर्वच निवडणुका शिवसेना-भाजप एकमेकांविरोधात लढवितात. प्रचारादरम्यान, एकमेकांवर अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन टीका करतात आणि निवडणुका संपल्या की गळ्यातगळे घालतात. आता पालघरच्या पोट निवडणुकीतही तेच दिसून आले.

शिवसेनेने भाजपचे दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांना आपल्याकडे वळवून सहानुभूतीचा फायदा घेण्याचा प्रयत्न केला. शिवसेनापक्षमुखांनी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारभारावर प्रचारदरम्यान कठेार शब्दांत टीका केली. निकाल घोषित झाल्यानंतर पराभव पत्करावा लागला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद बोलाविली. या पत्रकार परिषदेत ते मोठा निर्णय घेतील, अशी हवा शिवसेनेच्या गोठातून निर्माण करण्यात आली. मात्र केवळ भाजपवर आणि निवडणूक आयोगावर दुगण्या झाडण्याशिवाय कोणतीही घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली नाही. पालघरमध्ये झालेल्या पराभवाचे खापर उद्धव ठाकरे यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर फोडले. ते म्हणाले की, ही संपूर्ण निवडणूक संशयास्पद आहे.

अनेक ठिकाणी मशीन बंद पडल्या. त्याचे कारण उन्हाळा असल्याचे सांगण्यात आले. मग आता उन्हाळा आहे, म्हणून मशीन बंद पडत असतील, तर पुढच्या वर्षी तर सार्वत्रिक निवडणुका आहेत. त्यावेळी तुम्ही काय करणार? असा सवाल त्यांनी केला. मतदान झाल्यानंतर निवडणूक अधिका-याने ४६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. त्यानंतर दुस-या दिवशी मात्र एक लाख मते वाढल्याचे सांगितले. मग ही एक लाख मते कशी वाढली, ती कोणाच्या पदरात पडली, याचा खुलासा झाला पाहिजे, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी केली. योगी आदित्यनाथ यांनी शिवाजी महाराज यांचा अपमान केला.

त्याबाबत भाजपने कोणताही खुलासा केला नाही. त्यावरून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विषयी भाजपचे प्रेम कसे बेगडी आहे, असेही ते म्हणाले. पत्रकार परिषदेच्या शेवटी ते सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय जाहीर करतील, असे वाटले होते. मात्र शेवटपर्यंत तशी घोषणा त्यांनी केली नाही. त्यावरून शिवसेना सत्तेसाठी किती लाचार आहे, हेच पाहायला मिळाले.

1 COMMENT

  1. सत्तेची खीर शिवसेना एकटी चाखू शकत नाही, हे त्यांना माहीत आहे। स्वबळावर लढण्याच्या पुड्या सोडून स्वतःचा वाघ करू पाहताहेत। सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांना कळतं की महाराष्ट्रात स्वबळावर सत्ता येणे शक्य नाही, तरी पण मतदारांचे सर्वोकृष्ठ मनोरंजन करण्याचा त्यांचा प्रयत्न सुरूच असतो।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version