Home महाराष्ट्र ‘लोकमान्य’च्या व्यवहारांची तपासणी सुरूच

‘लोकमान्य’च्या व्यवहारांची तपासणी सुरूच

0

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या बेळगाव येथील प्रधान कार्यालयातील छापासत्र बुधवारीही सुरूच होते.
बेळगाव- लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीच्या बेळगाव येथील प्रधान कार्यालयातील छापासत्र बुधवारीही सुरूच होते. या छापासत्रामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदार व ग्राहकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर लोकमान्य मल्टिपर्पज सोसायटीच्या प्रधान कार्यालयासह महत्त्वाच्या शाखांमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ३६ तासांहून अधिक काळ ही तपासणी सुरू असल्याने बेळगावात विविध चर्चा रंगल्या होत्या. सोसायटीच्या बेळगाव येथील प्रधान कार्यालयासह महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा या तीन राज्यांतील शाखांवर प्राप्तिकर विभागाच्या पथकांनी धाड टाकल्याचे वृत्त बुधवारी प्रसिद्ध होताच ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली. आपल्या ठेवींबाबतची विचारणा करण्यासाठी ग्राहकांनी लोकमान्य सोसायटीच्या स्थानिक कार्यालयांमध्ये धाव घेतली. मात्र, सर्वपित्री अमावस्येनिमित्त शाखा बंद असल्याने ठेवीदारांचा भ्रमनिरास झाला.

दरम्यान, लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांच्या मोठया प्रमाणात स्थावर मालमत्ता असल्याचे पुढे आले असून त्यात त्यांनी गुंतवणूक केलेला पैसा कोठून आला याबाबतचा तपास प्राप्तिकर अधिका-यांच्या माध्यमातून सुरू आहे. या प्रकरणात अनेक बेनामी व्यवहार झाल्याचेही पुढे येत आहे. मात्र, ठाकूर हे सीमावर्ती भागातील मोठे प्रस्थ असल्याने याबाबत प्राप्तिकर विभागाचे अधिकारी अत्यंत गोपनीयरीत्या तपास करीत आहेत. तसेच सोसायटीमधील मोठे गुंतवणूकदार, ठेवीदार व भागभांडवलदार यांची यादी तयार करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

देशात तब्बल १५१ शाखांचे जाळे असलेल्या व ठाकूर संस्थापक अध्यक्ष असलेल्या लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप सोसायटीच्या महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यातील शाखांवर मंगळवारी प्राप्तिकर खात्याच्या अधिका-यांनी छापे टाकले. या छाप्यात मोठया प्रमाणात कागदपत्रे हस्तगत करण्यात आली आहेत. बेनामी जमीन खरेदी विक्री व्यवहारांची अनेक प्रकरणे यामुळे बाहेर पडण्याची शक्यता प्राप्तिकर खात्याच्या अधिका-यांनी व्यक्त केली आहेत. उपलब्ध माहितीनुसार या सोसायटी व अन्य मालमत्तांची संख्या मोठी असल्याने हा तपास पूर्ण व्हायला विलंब लागणार असल्याची माहितीही पुढे आली आहे.

ठेवीदारांची धावाधाव

लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष किरण ठाकूर यांनी गेल्या काही वर्षात बेळगाव-कर्नाटकसह महाराष्ट्र व गोव्यातही सोसायटीच्या शाखा सुरू करण्याचा धडाकाच लावला होता. बुधवारी छापासत्राची माहिती मिळताच ठेवीदारांची धावाधाव सुरू होती. कणकवली येथील शाखेतूनही लाखोंची रक्कम ग्राहकांनी काढली असून प्राप्तिकर खात्याच्या कारवाईचा परिणाम ग्राहकांवरही झाला आहे. लोकमान्यची विश्वासार्हता डागाळू लागल्यामुळे ग्राहकांनी आपल्या ठेवी काढून घेतल्या. कणकवली शाखेत सकाळीच ग्राहकांनी हजेरी लावली.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version