वाघ तो वाघच

1

ब-याच दिवसांपासून आळसावलेले महाराष्ट्राचे राजकारण ढवळून निघाले आहे. वृत्तपत्रांना हेडलाइन मिळाल्या, वृत्तवाहिन्यांवर ब्रेकींग न्यूज धडकत आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेले कोकणचे वादळ सुसाट सुटले आहे. विरोधकांच्या पोटात धडकी भरली आहे. वाघ शांत झाला म्हणून कुणी डिवचायला गेले तर आपली शक्ती दाखवतो. कोकणचा वाघ म्हणून ओळखल्या जाणा-या नारायण राणे यांच्या झंझावाती कोकण दौ-याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वाघ तो वाघच असतो हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे राजकारण काहीसे आळसावल्यासारखे झाले होते. युती-आघाडय़ांची जमावाजमव लोकसभेच्या वेळीच झालेली असल्याने त्यात काही नवीन घडत नव्हते. लोकसभेत सपाटून मार खाल्यानंतरही काँग्रेसचे पाणी काही हलले नव्हते. इतका मोठा पराभव झाल्यानंतर राज्यात काही बदल होतील, असे कार्यकर्त्यांना वाटत होते. मात्र तसेच काही घडले नाही. विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होईल, अशी परिस्थिती असताना महाराष्ट्राचे राजकारण मात्र एकदम शांत होते. रोज रोज काय हेडलाइन्स द्यायच्या, याचा विचार करून वृत्तपत्रांच्या संपादकांच्या मेंदूचा पार भुगा होत होता. ब्रेकींग न्यूज काय चालवायच्या, यासाठी वृत्तवाहिन्यांच्या संपादकांना डोके खाजवत बसावे लागत होते. असे सर्व वातावरण सुस्तावलेले असताना कोकणच्या वादळाने अचानक उसळी घेतली आणि सर्वाचेच प्रश्न सुटले. वृत्तपत्रांना हेडलाइन्स मिळाल्या, वृत्तवाहिन्यांना ब्रेकींग न्यूज मिळाल्या. उद्योगमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने महाराष्ट्राचे राजकारण पुन्हा ढवळून निघाले. त्यानंतर त्यांनी काढलेल्या कोकण दौ-याने तर विरोधकांच्या छातीत धडकी भरली.

नारायण राणे म्हणजे एक झंझावात. कोणत्याही प्रश्नाविरोधात पेटून उठलेला धगधगता अंगार. परंतु गेल्या दोन वर्षापासून ते एकदम शांत होते. ब-याचदा पत्रकारांना त्यांच्या या शांततेचे आश्चर्यही वाटायचे. त्याबद्दल पत्रकार त्यांना विचारायचे तेव्हा नारायण राणे म्हणायचे, ‘वाट पाहा. पुन्हा तोच झंझावात तुम्हाला पाहायला मिळेल.’ कोकण दौ-याच्या निमित्ताने तो पाहायला मिळाला. लोकसभा निवडणुकीच्या काळात देशातील सर्व समीकरणे बदलली. नरेंद्र मोदी यांच्या नियोजनबद्ध प्रचाराने देशात मोदी लाट आली. त्याचा परिणाम कोकणातही झाला आणि काँग्रेसचे उमेदवार निलेश राणे यांना पराभव पत्करावा लागला. तेव्हा राणे यांच्या विरोधकांना उसणे आवसान आले. कधीही तोंड न उघडणारेही गुरगुरू लागले. वाघ शांत असतो तेव्हा कोल्हे-लांडगेही गुरगुरू लागतात तेव्हा वाघाला एखादी डरकाळी फोडावी लागते. राणे यांचा झंझावाती कोकण दौरा म्हणजे ब-याच काळानंतर वाघाने फोडलेली ही डरकाळी आहे. त्यांच्या या डरकाळीने अंधारात दगड फेकणा-यांना चळकाप सुटला असेल, गुपचूप पोस्टर फाडणा-यांच्या पोटात धडकी भरली असेल आणि कोकण भयमुक्त करण्याच्या वल्गना करणा-यांची दातखिळी बसली असेल.

ओठात एक आणि पोटात एक असे राजकारण नारायण राणे यांनी कधी केले नाही. जे असेल ते रोखठोक आणि खणखणीत. आपली भूमिका मांडताना त्याचे परिणाम काय होतील, त्यातून राजकीय फायदा होईल की तोटा होईल, याचे हिशेब ते मांडत बसत नाहीत. सद्सद्विवेकबुद्धीला जे पटेल ते दणकून मांडणे, हा त्यांचा स्वभाव. म्हणून कोकणच्या दौ-यात त्यांनी आपली भूमिका अत्यंत खणखणीत शब्दात मांडली. राणे यांच्या राजकीय वाटचालीची कुंडली मांडणा-यांना जसे त्यांनी चोख उत्तर दिले तसे ते काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर काय निर्णय घेतील, हे सांगणा-यांना त्यांनी सुनावले. इतकेच नव्हे तर त्यांचा इतर कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय झालेला नसताना त्यांना भाजपमध्ये घेऊ नये, असे सांगणा-या उद्धव ठाकरे यांचाही त्यांनी आपल्या खणखणीत भाषेत समाचार घेतला. भविष्यात आपल्या विरोधात वक्तव्य केल्यास संपूर्ण वस्त्रहरण करण्याचाही इशारा दिला आणि शिवसेनापक्षप्रमुखांचे शब्द आपोआपच मवाळ झाले. विरोधी पक्षातील विरोधकांचा समाचार घेतला असताना त्यांनी ते ज्या विद्यमान काँग्रेस पक्षात आहेत. तिथे त्यांना मिळालेल्या वागणुकीवरही बोलण्यासाठी ते कचरले नाहीत. ‘मी नऊ वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये आलो तेव्हा मला सहा महिन्यांत मुख्यमंत्री करू, असे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप पाळले गेले नाही. आता लोकसभा निवडणुकीनंतर जरी मुख्यमंत्रीपद मिळाले असते तरी आपण सत्ता आणून दाखवली असती,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. केवळ आपल्या एकट्याच्या पदाचा विचार त्यांनी मांडला नाही, तर आपल्यासोबत आलेल्यांवर झालेल्या अन्यायालाही त्यांनी वाचा फोडली. काँग्रेससारख्या पक्षात असे धाडस करणे खूप अवघड असते. मात्र, जे अवघड असते ते करतात त्यांनाच तर नारायण राणे म्हणतात. म्हणून त्यांच्या राजीनाम्याच्या घोषणेने काँग्रेसमध्येही खळबळ उडाली आणि काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते पतंगराव कदम, बाळासाहेब थोरात, जनार्दन चांदुरकर आदींनी राणे यांनी काँग्रेस सोडू नये, अशी भावना व्यक्त केली. नारायण राणे ही एक शक्ती आहे, अशी शक्ती गमावून काँग्रेसला चालणार नाही. म्हणून त्यांच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, ज्येष्ठ काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी तातडीने दिल्लीत जाऊन पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली.

कोकणचा झंझावाती दौरा अनेक अंगांनी यशस्वी झाला. नारायण राणे यांचे कोकणी माणसावर किती प्रेम आणि विश्वास आहे, हे जसे दिसून आले तसेच कोकणी माणसाने त्यांच्यावर प्रेम असल्याचेही दिसून आले. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग असा मोटारीने प्रवास करीत ते कणकवली येथे पोहोचले. खरे तर या दौ-याची कोणतीही पूर्वतयारी केलेली नव्हती. अचानक दौरा जाहीर केलेला होता. तरीही या संपूर्ण पाचशे-साडेपाचशे किलोमीटरच्या प्रवासात प्रत्येक शहरात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत झाले. कोकणी माणसाने आपल्या नेत्यावरील प्रेमाची दिलेली ती पावती होती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात जाऊन त्यांनी आपल्या माणसांशी संवाद साधला. त्यात कोकण, कोकणी माणूस, त्याचा विकास याची त्यांना किती काळजी आहे, हे दिसून आले. कोकणी माणूसही त्यांना कसा जीवापाड प्रेम करतो, हे दिसले. म्हणूनच कणकवलीच्या शेवटच्या सभेत नारायण राणे हे भावूक झाले. नारायण राणे यांचा आक्रमकपणा सर्व महाराष्ट्राला माहीत आहे. मात्र जे त्यांच्या जवळ गेले त्यांना नारायण राणे यांच्यातला प्रेमळ माणूस पाहायला मिळाला. आजारी माणसाला उपचार, बेरोजगाराला नोकरी, विद्यार्थ्यांना शिक्षण घेताना अडचणी आल्या तर सोडवण्यासाठी राणे यांचा दानशूर हात पुढे कसा येतो, हे अनेकांनी अनुभवले आहे. या संपूर्ण दौ-यामागील त्यांची भूमिका सांगताना कोकणी माणूस, इथली माती आणि देवदैवतांवर असलेला विश्वास त्यांनी बोलून दाखवला. ते म्हणाले, ‘मला जीवनात कोणताही निर्णय घ्यायचा असतो तेव्हा मी कोकणातील जनतेला विश्वासात घेतो. कोकणी माणूस, इथल्या देवदैवता आणि माझ्या कर्तृत्वावर माझा विश्वास आहे. हतबलता ही माझ्या स्वभावात नाही. लढत राहणे आणि त्याच्या बळावर यशस्वी होणे, ही माझी कार्यपद्धत आहे.’ त्यांचा दांडगा आत्मविश्वास आणि जिद्द हीच त्यांची खरी शक्ती आहे.

आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर कोकणचा यशस्वी दौरा करून ते परतले आहेत. सोमवारी आपला राजीनामा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, यासाठी काँग्रेसमधील अनेक नेते प्रयत्नशील आहेत. राजीनाम्यानंतर ते आपली पुढील दिशा जाहीर करणार आहेत. ते नेमके काय बोलणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. जो निर्णय घ्यायचा तो ते बेधडकपणे घेतील आणि त्याला धाडसाने सामोरे जातील. कारण वाघ हा शेवटी वाघच असतो.

[EPSB]

भारताची शांतता हरवली कुठे?

इन्स्टिटयूट ऑफ इकॉनॉमिक्स अ‍ॅण्ड पीस या संस्थेने अलीकडेच शांतताप्रिय देशांची यादी जाहीर केली आहे. या यादीत भारताचा क्रमांक १४३वा आहे. भारतामध्ये कोणत्याही छोटया छोटया कारणांमुळे जनमानस प्रक्षुब्ध होऊ लागले आहे आणि त्याचा परिणाम हिंसाचार वाढण्यात होऊ लागला आहे.

[/EPSB]

1 COMMENT

  1. माननीय दादा
    मी एकाच शब्दात बोलतो. तुम्ही वाघ आहे वाघ होता आणि वागच राहणार…!
    वाघाच्या एका ‘डरकाळी’ विरोधकांनी ( उद्धव, केसरकर, नाईक आणि अनेक) शेपटी आत घालून घेतली आहे.
    आणि वाघाचे छावे पण वाघच आहे. नेहमी साहेबांच्या नावा वर जगणारा दुसर्यांना काय शिकवणार राजकारण.
    उद्धव फक्त खुबड्यान वर जगतो एक म्हणजे साहेब आणि दुसरी मोदी. तो थोडी स्व:ताच्या पायावर उभा आहे.
    काय झाल कि साहेबांच्या नावाचा वापर करायचा. हि कुठली आहे मर्दाची गोष्ट.
    जय महाराष्ट्र!
    सिद्धेश ता. बावकर
    शिवडी परेल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version