Home रिलॅक्स ‘वाडा चिरेबंदी’ माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग!

‘वाडा चिरेबंदी’ माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग!

1

प्रसिद्ध नाट्यदिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी वीस वर्षापूर्वी मराठी रंगभूमीवर एक आगळावेगळा प्रयोग केला होता. आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नाटककार महेश एलकुंचवार यांची ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ ही तीन नाटकं त्रिनाट्यधारेच्या रूपात रंगभूमीवर आणली होती. सलग आठ तासांचा हा नाट्यानुभव प्रेक्षकांना नाट्यसमृद्ध करणारा होताच, पण एक दिग्दर्शक म्हणून कुलकर्णी यांनाही तेवढाच समृद्ध करणारा होता. हे अभिजात नाटक कुलकर्णी यांच्या आयुष्याचाच एक भाग झालं. याच त्रिनाट्यधारेतलं ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटक त्यांनी पुन्हा रंगभूमीवर आणलं आहे. या निमित्ताने या नाटकाने त्यांच्यावर कसा प्रभाव टाकला, त्यांच्या दृष्टीने या नाटकाचं अभिजातपण कशात आहे आणि त्याची निर्मितीप्रक्रिया कशी साकारली याविषयी चंद्रकांत कुलकर्णी यांनी मांडलेलं मनोगतरूपी स्वगत.

‘वाडा चिरेबंदी’ माझ्या जीवनात पहिल्यांदा कसं आलं, हे सांगायचं तर मी विजया मेहता यांनी बसवलेलं ‘वाडा चिरेबंदी’ पाहिलं होतं, पण त्यावेळी मी वयाने फार मोठा नव्हतो. इम्प्रेशिबल म्हणतात तशा वयात असेन. सगळ्यात मोठा मुद्दा असा होता की, मी मूळचा मराठवाडय़ातला. आमच्या घरी, आजोळी एकत्र कुटुंबं होती. मी ती जवळून पाहिली होती. हे नाटक मला भिडण्याचं मूळ या सगळ्यात आहे. मी तेव्हा नाटक शिकत, करत होतो, नाट्यशास्त्राचा अभ्यासही करत होतो. या काळात मी ‘वाडा चिरेबंदी’ पाहिलं तेव्हा मी त्याच्याशी घट्ट जोडलो गेलो. कारण एखादं वास्तवादी नाटक जेव्हा आपण लिहितो तेव्हा ते क्राफ्टेड म्हणजे रचित वाटतं, पण तसं न वाटता मला ‘वाडा चिरेबंदी’ हे नाटकच वाटलं. मला असं वाटलं की, हे नाटक म्हणजे मी पाहिलेल्या आयुष्याचा हा एक तुकडा आहे. मी अनुभवलेल्या जीवनाचा हा एक भाग आहे. तीच माणसं इथे वावरताहेत, त्यांचं ते नाटक आहे. असं काहीतरी या नाटकाचं इम्प्रेशन माझ्या मनात होतं. नाट्यशास्त्राच्या दृष्टीने बघायचं तर ते आयडियली लिहिलेलं नाटक आहे. म्हणजे एखादा लेखक आत्मपर लिहितो, तेव्हा तो आपलं आत्मचरित्र लिहीत असतो, असं नाही. ‘वाडा चिरेबंदी’ हे काही एलकुंचवारांचं आत्मचरित्र नाही. ही काही त्यांच्या घरात घडलेली गोष्ट नाही. ते स्वत: खेडय़ातून शहरात स्थलांतरित झालेले आहेत. एकत्र कुटुंबपद्धतीत राहिलेले आहेत. त्यांचे वाडे, त्यांचे अनुभव, त्यांच्या आजूबाजूचे लोक यातून हे नाटक आलं आहे. त्यांच्या पुस्तकात, नंतरच्या भाषणांत, त्यांनी सुरेख लिहिलंय की, लोक विचारतात, तुमच्या वाडय़ात असं घडलं आहे का, तर अजिबात नाही, हा सगळा इथॉस आहे. तो सगळा माझा आहे. त्याच्याशी मी असोसिएट करतो. त्यांनी हे जे शब्द वापरलेत ते मला फार महत्त्वाचे वाटले. नाटक आणि खरं आयुष्य, रिअॅलिटी आणि फिक्शन यांचं एवढं बेमालूम मिश्रण मला दुसरं सापडलं नसतं. म्हणून या नाटकाशी माझं स्वत:चं एक नातं आहे.

कट टू १९९२-९३. मी मुंबईत आलो. माझी एलकुंचवारांशी प्रत्यक्ष भेट झालेली नसली तरी मी रंगभूमीवर जे काही करत होतो,हे ते बघत होते. हळूहळू मी अॅक्टिव्हिटीजमध्ये सहभागी होत गेलो. मुंबईत नाटक करायला लागलो. माझं प्रायोगिक आणि व्यावसायिक नाटक एलकुंचवारांनी बघितलं. त्याच काळात डॉ. लागू, पुष्पा (भावे) ताई, दीपा (लागू)ताई यांच्याबरोबर माझ्या अनेकदा भेटी होत होत्या. या दरम्यान दीपा लागूंनी एकदा मला सांगितलं की, ‘आमच्याकडे महेश एलकुंचवार त्यांच्या नाटकाचं वाचन करणार आहेत. तू ये.’ मी त्या वाचनाला गेलो. एलकुंचवारांनी तिथे सांगितलं की, ‘मी वाडा चिरेबंदीचा दुसरा भाग लिहिला आहे.’ १९८० ते ९० दरम्यानचा कालावधी त्यांनी या नाटकात घेतला होता. ‘वाडा चिरेबंदी’नंतर लिहिल्यानंतर दहा वर्षानंतरचा काळ होता. एखाद्या लेखकाला आपल्या कलाकृतीचा सिक्वल लिहावासा वाटण्यातली गंमत मला तेव्हा भावली. त्यांचं नाटक ऐकल्यावर मला ते प्रचंड आवडलं. मी खूप प्रभावीत झालो. मी त्यांना म्हटलं की, मला हे नाटक करायची इच्छा आहे, पण त्यांनी माझ्यासमोर एक पेच टाकला. ते म्हणाले, ‘माझी अशी इच्छा आहे की, हे नाटक पहिला आणि दुसरा भाग असं एकत्र करावं.’ पण मी त्यांना म्हटलं, ‘अहो, ही वेळ कशी जुळणार. दोन्ही मिळून साडेचार-पाच तासांचं नाटकं कोण बघणार? नाटक करायची वेळही विचित्र असणार.’ पण ते म्हणाले, ‘माझी ही अट आहे.’ मग मीही ते आव्हान स्वीकरालं. मग त्यांनी मला विचारलं की, ‘तुला या नाटकात काय आवडलं?’ मग मी त्यांना माझे अनुभव सांगितले. त्या नाटकातल्या जागा सांगितल्या. त्यानंतर मी त्या नाटकाच्या तयारीला लागलो आणि ‘आविष्कार’ नाट्यसंस्थेतर्फे १९८४ साली मी नाटकाची रिहर्सल करायला घेतली. या दरम्यान त्यांनी ‘वाडा’चा तिसराही भाग लिहिला. त्यामुळे या नाटकाची ट्रायोलॉजी तयार झाली. ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ अशी तीन नाटकं. प्रत्येक नाटकाच्या दरम्यान दहा-बारा वर्षाचा कालावधी होता. म्हणजे एकूण तीन नाटकांत मिळून पस्तीस वर्षाचा काळ, अशी ही वेगळ्याच प्रकारची त्रिनाट्यधारा होती. तिच्यात देशपांडे नावाच्या विदर्भातील एका खेडेगावातील कुटुंबाची कथा असली तरी ती कुठल्याही एका कुटुंबाची गोष्ट नाहीय. हे नाटक सगळं सिंबॉलिकल आहे. खेडं आणि शहर यातलं अंतर, एकत्र कुटुंब पद्धती, जुन्या परंपरा, रीतीरिवाज यांचं आपल्यावर असलेलं दडपण, अंतर्गत नातेसंबंधाचं बिघडत जाणं, आजूबाजूच्या परिसराचं बदलणं हे सगळं या नाटकात अतिशय सुंदर पद्धतीने आलंय. प्रत्येक प्रसंगाला एक अर्थ आहे. प्रत्येक पात्राला एक सिंबॉल आहे. हा सगळा खूप धरून ठेवणारा प्रकार होता. शंभर दिवस आम्ही सगळे झापाटून काम करत होतो, ‘आविष्कार’सारखी संस्था आमच्या मागे उभी होती. त्यातून ही त्रिनाट्यधारा वीस वर्षापूर्वी साकार झाली.

आता बदलत्या काळात माझ्या असं लक्षात आलं की, हे नाटक आजही तितकंच प्रभावी आहे. दुसरीकडे असंही जाणवलं की, एका नटांचा चांगला मोठा संच आपल्या हातात आहे. प्रेक्षकांच्या बदललेल्या दोन पिढय़ा आपल्या हातात आहेत आणि मराठी नाटकांबाबत नेहमी म्हणतो की, चांगले विषय येत नाहीत, पृष्ठभागावरचे वरवरचे विषयच हाताळले जातात, बंदिस्त असं नाटक नसतंच बहुधा. म्हणून मग मी माझी संस्था ‘जिगिषा’तील सहका-यांशी, प्रशांत दळवीशी चर्चा करून असं ठरवलं की, दरवर्षी आपण जुन्या क्लासिक नाटकांचा, केवळ नॉस्टॅल्जिया म्हणून नाही तर ते नाटक महत्त्वाचं आहे आणि आजही लागू होतंय, जे करण्यात आजही आव्हान आहे, म्हणून अशा कुठल्याही लेखकाचं नाटक निवडून ते करूया. वेगळ्या शब्दांत सांगायचं तर या नाटकाची पुनर्भेट घेऊया. यातून त्याचं समकालीन मूल्यही आपल्याला तपासून घेता येईल. म्हणून ‘जिगिषा’ आणि ‘अष्टविनायक’तर्फे आम्ही यंदा ‘वाडा चिरेबंदी’चा पहिला भाग निवडला. पुढे-मागे मला त्याचा दुसरा भाग करायला मला आवडेल, पण मी मुद्दाम पहिला भाग केला, कारण त्याची आपल्याला नीट रचना करता येईल. याला आणखी एक छोटीशी जोड मिळाली ती अशी की, एलकुंचवार यांना यावर्षी ऑक्टोबर महिन्यात ७५ वर्ष पूर्ण झाली. म्हणून माझ्या डोक्यात असा विचार आला की, त्यांची ‘वाडा चिरेबंदी’सारखी उत्तम कलाकृती, जिची अभिजात नाटक म्हणून गणना होते, ती आपण का करू नये? आजवर अनेक भाषांत या नाटकाचा अनुवाद झाला आहे. मी भारतीय रंगभूमीवर पहिल्यांदा ही ट्रायोलॉजी केल्यानंतर बंगाली, हिंदीत दोन भाग झाले आणि फ्रेंच भाषेत ते ट्रायोलॉजीच्या स्वरूपात सादर झालं. ते अभ्यासक्रमात आहे. अनेक जण या नाटकाच्या संदर्भाने एलकुंचवार यांच्यावर पीएच.डी. करत आहेत. इतकं ते महत्त्वाचं नाटक आहे. माझा वैयक्तिक सहभाग या नाटकात असला तरी नाटक म्हणून ते अभिजात आहे. दुसरी गोष्ट म्हणजे ते प्रत्येकासाठी आव्हान आहे. नेपथ्यकाराला, प्रकाशयोजनाकाराला, वेशभूषाकाराला आव्हान आहे. अभिनेत्यांसाठी तर यात खूपच मोठं काम आहे. कारण काही जणांच्या तोंडी यात वैदर्भीय बोली आहे, काही जणांच्या तोंडी प्रमाण भाषा आहे. कुठल्याही पद्धतीने ‘आता बघा कसं परिणामकारक करतो मी नाटक’, अशा आविर्भावात ते लिहिलेलं नाही. ते त्याच्या त्याच्या संथलयीत जातं आणि तुम्हाला वाडय़ामध्ये गुंतवून टाकतं. तुम्ही झपाटल्यासारखा त्याचा भाग बनून जाता. कारण ते घटनाप्रधान नाटक नाही. त्यात घटना अजिबात घडत नाहीत. आपल्याकडे असं म्हणतात की, मरणाला आणि तोरणाला एकत्र यायला पाहिजे. अशी एकत्र कुटुंबाची, गावगाडय़ाची रीतच असते. त्यानुसार आपल्या वयस्कर वडिलांच्या निमित्ताने यातलं कुटुंब एकत्र आलंय. तसं बघितलं तर या पूर्ण नाटकाचा कालावधी केवळ आठ ते नऊ दिवसांचा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर पाचव्या दिवशी मधला मुलगा मुंबईहून गावी येतो आणि चौदाव्या दिवशी तो निघून जातो, या दरम्यान ते नाटक घडतं, पण त्याला इतके कंगोरे आहेत, त्यात इतके सुंदर नातेसंबंध आहेत, त्यात इतकी सुंदर भाषाशैली आहे, रचनाबंध आहे, अंधाराचा अवकाश आहे की, ते मला सगळं झपाटून टाकणारं होतं. यातली अनेक पात्र प्रत्यक्ष रंगमंचावर येत नाहीत. मग तो घराबाहेरचा गावातला बन्सिलाल नावाचा सावकार असो की काम सोडून गेलेला गजा घरगडी असो, मुलीचा शिक्षक असो की, घराबाहेरचा जुना ट्रॅक्टर असो, ही पात्रं रंगमंचावर न येताही आपल्याला दिसायला लागतात. इतकं हे नाटक जिवंत लिहिलं आहे. त्यामुळे आपल्याला समोर एक मोठाच्या मोठा सिनेमाच दिसतो, इतका त्याचा पैस मोठा आहे. आपल्या मराठी नाट्यपरंपरेतले विजय तेंडुलकरांनंतरचे एलकुंचवार हे महत्त्वाचे नाटककार आहेत. ते राष्ट्रीय पातळीवरचे नाटककार आहेत. म्हणून मला त्या दृष्टीनेही या नाटकाकडे बघावंसं वाटतं.

मी वीस वर्षापूर्वी जसं हे नाटक केलं होतं, त्यात मी काहीही बदल केलेला नाही. कारण मला तोच काळ उभा करायचा आहे. पहिल्या भागात पूर्ण नाटकात कंदिलाचा प्रकाश आहे. दुस-या भागात घरात वीज आलेली आहे. यातला गाव बदललाय, पात्रं बदललीत. नाटकात पराग नावाच्या मुलाचं पात्र आहे, तो दुस-या भागाचा नायक आहे. तो कसा बदल करतो, ही माणसं त्याला कशी रिअॅक्ट करतात, हे सगळं दुस-या भागात आहे. तिस-या भागात सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. वाडाही पडलेला आहे. गावही बदललंय. मी या तिन्ही भागांकडे अभिजात कलाकृती म्हणून बघतो. मी नेहमी म्हणतो की, या त्रिनाट्यधारेला कादंबरीचा आवाका आहे, कवितेची तरलता आहे आणि नाटकाचा अवकाश आहे. या तिन्ही गोष्टी एलकुंचवारांनी एकत्र बांधल्या आहेत. त्यांची शैलीही तिन्ही भागानुसार बदलत गेली आहे. म्हणजे पहिल्या भागाची शैली आणि तिस-या भागाची शैली यात फरक आहे. प्रतिकांमध्ये फरक होत गेला आहे आणि हे फार छान पद्धतीने आलं आहे. घरातला अंधार, गावातलं तळं, घरातले दागिने या छोट्या छोट्या रूपकांचा वापर एलकुंचवारांनी अतिशय छान केला आहे. तिस-या भागात त्यांनी माणसाला थेट निसर्गाशीच जोडलं आहे आणि ग्रह ता-यांपर्यंत पोहोचवलं आहे. त्यात पराग म्हणतो की, ग्रह-तारे आपल्यापासून इतके लांब आहेत आणि आपण सृष्टीचा किती किरकोळ भाग आहोत. स्वत:च्या अस्तित्वाच्या प्रश्नांपर्यंत त्यांनी ते नाटक पोहोचवलं आहे. म्हणूनच मला आनंद वाटतो की, त्रिनाट्यधारा सलग करणारा मी पहिला नाटककार ठरलो. या नाटकाने मला समृद्ध केलंय. हे नाटक माझ्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मी या नाटकासाठी दुस-या पिढीचेही नट घेऊ शकलो, त्यांच्याकडून पुन्हा वाडा जिवंत करू शकलो आणि आज दुस-या, तिस-या पिढीचे प्रेक्षक ते बघतात, हे विशेष आहे. ३५ वर्षात ‘वाडा चिरेबंदी’ तीनदा लोकांनी पाहिलं. ते फ्रान्समधील प्रेक्षकांनी पाहिलं, दिल्लीतील लोकांनी पाहिलं आणि बंगालमध्येही पाहिलं गेलं. म्हणजे भारताच्या पातळीवर ते नाटक पोहोचवताना ते महाराष्ट्रातही आपण रुजवू शकलो, ही मोठी गोष्ट आहे.

या नाटकातल्या प्रत्येक पात्राचं एक म्हणणं आहे. त्याचं एक व्यक्तिमत्त्व आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यात काळ्या-पांढ-या व्यक्तिरेखा नाहीत. आपण जशी माणसं असतो, तशी ती माणसं आहेत. आपणही आतून थोडे लबाड असतो. या नाटकात पूर्णपणे वाईट कुणी नाही, परिस्थितीला रिअॅक्ट होणारी ही माणसं आहेत. त्यांचं होणारं मतपरिवर्तन आपल्याला नाटकात दिसतं. म्हणजे मुंबईहून आलेला मुलगा आणि त्याची पत्नी जाताना परत एकदा त्या घराशी घट्ट जोडले जातात. हा सगळा प्रवास आहे तो महत्त्वाचा आहे. त्याला पुन्हा भेट देणं ही माझ्यासाठी खूप सुखद अनुभूती आहे.
या नाटकातल्या कलाकाराकंडे बघितलं तरी लक्षात येतं की, ज्यांनी कधी असं काम केलं नाही, असे कलाकार घेऊन मी हे नाटक केलंय. उदाहरणार्थ, वैभव मांगलेची बाहेरची इमेज वेगळी आहे, पण त्याने या नाटकात अत्यंत ताकदीने मोठय़ा भावाची भूमिका केली आहे. निवेदिता सराफचं आतापर्यंतचं काम आणि या नाटकातलं काम पूर्णपणे वेगळेपण आहे. मी नटसंचही असा घेतला की, तो होमोजिनयस नाही. प्रदीप मुळ्ये यांचं नेपथ्यातलं योगदान खूप मोठं आहे. त्यांनी तो वाडा अक्षरश: आपल्या डोळ्यांसमोर जिवंत केलाय. पडदा उघडल्यावर सगळ्यात आधी टाळ्या या वाडय़ाला म्हणजे नेपथ्याला पडतात. तिथून हे नाटक खरं वाटत जातं आणि काही वेळाने ते नाटक उरत नाही, तुम्ही त्याच्यात इतके गुंतून जाता. भावभावना किती सार्वकालिक असतात, हे या नाटकातून दिसतं. म्हणजे विदर्भातील हे खेडं विदर्भातील राहत नाही, कोकणातल्या आणि मराठवाडय़ातल्या माणसांना आपलं गाव आठवतं. आपली मुळं आठवतात. आपण कुठून आलो, आपली काय कनेक्टिव्हिटी आहे, हे सगळं जागं करणारं हे नाटक आहे. अगदी त्या घरातले दागिने, अंधार, काळेवेळेचं भान नसणारी त्या घरातली वयस्कर आजी हे सगळं प्रतिकात्मक आहे. या सगळ्यातून दोन तासांत एक समृद्ध नाट्यानुभव मिळतो.

हे नाटक सुगम संगीतासारखं नाही ते शास्त्रीय संगीतासारखं आहे, असं मला वाटतं. त्याला अंतर्गत लय आहे. ती सांभाळावी लागते. विनाकारण द्रुतगतीत जाऊन त्याचा आनंद घेता येत नाही. ते जिथे टोकदार आहे, तिथे टोकदार आहे आणि काही ठिकाणी संथही आहे. हे नाटक म्हणजे एखादा राग आळवण्यासारखं आहे. एलकुंचवारांच्या लिखाणाचं वैशिष्टय़ म्हणजे त्यात त्यांनी कुठे अलंकारिक भाषा वापरलेली नाही. कुठे अनावश्यक विशेषणं नाहीत. उलट यातली पात्रं अत्यंत वास्तववादी बोलतात. मग त्यातले अपशब्द असतील, शिव्या असतील, बोली भाषा असेल, काव्य असेल, ते पूर्णपणे नैसर्गिक वाटतं, त्यांचं वाटतं. ही पात्रं आपण आपल्या आजूबाजूला बघत असतो. म्हणूनच प्रेक्षकांनाही हे नाटक आपल्या घरात घडतंय असंच वाटतं. सगळ्या घरात हेच चालू असतं. कारण सगळीकडे तशाच भल्याबु-या प्रवृत्ती असतात. कशाच्या निमित्ताने आपण एकत्र येतो आणि आपल्याला साक्षात्कार होतो.

हे नाटक करत असताना माझ्यावर खूप ताण होता. हे नाटक जरी चांगलं असलं तरी आताच्या काळात चालेल का, असा माझ्या मनात प्रश्न होता. आता पहिला भाग केल्यावर आजही मला हा प्रश्न पडतो आहे की, मी उद्या ट्रायोलॉजी केली किंवा दोन भाग सलग केले तर सहा तासांचं नाटक बघायला प्रेक्षक येतील का? १९९४ मध्ये टीव्ही नव्हता. कामाची गती वेगळी होती. प्राधान्यक्रम निराळे होते. त्यामुळे तेव्हा जसा प्रतिसाद मिळाला तसा आता मिळेल का, असं मनात येतं, पण अशी आव्हानं घ्यायला मला आवडतात. प्रेक्षकही चांगलं असलं की येतात. चांगलं दुलक्र्षित राहत नाही. हे आपल्या मराठी रंगभूमीच्या ऊर्जेचं महत्त्वाचं लक्षण आहे. आज जे दोन प्रयोग झालेत, त्याला मिळणारा प्रतिसाद विशेषत: तरुण पिढीचा प्रतिसाद पाहून लक्षात येतं की, पस्तीस वर्षापूर्वी एका नाटककाराने लिहिलेलं, महाराष्ट्रातल्या एका कुटुंबात घडणारं हे नाटक त्यांच्यापर्यंत पोहोचतं आहे. नुसतंच पोहोचत नाही, तर त्यांना भिडतंही आहे. याचा अर्थ ते काळाच्या कसोटीवर उतरलेलं नाटक आहे.

आज मी असं म्हणू शकेन की, आय एम मोर दॅन हॅप्पी. मी आता ते माझ्या परीने हे नाटक महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचवणार आहे. आता याचे पुढचे दोन भाग मी करेन, पण मी नेहमी सांगतो की, ही त्रिनाट्यधारा म्हणजे अट्टहास नाही. ती अपरिहार्यता आहे. एखाद्या नाटककाराला दहा वर्षानंतर आपल्या नाटकातील पात्रांचं काय झालं हे मांडावंसं वाटतं तेव्हा ते इंटरेस्िंटग असतं आणि त्यात वेगवेगळा प्रवास आहे. पुढच्या भागात देशपांडे कुटुंबातला मुंबईच्या भावाचा अभय नावाचा मुलगा धरण भागात येतो. त्याचा पुन्हा मुळापर्यंत जाण्याचा प्रवास आहे. हे खूप रंजक पद्धतीने मांडलं आहे आणि हा नाटकाचा फुलस्टॉप आहे. हे नाटक म्हणजे महाराष्ट्राचा पस्तीस-चाळीस वर्षाचा इतिहास आहे. ते या काळात माणसांत, मूल्यव्यवस्थेत, समाजव्यवस्थेत होणारे बदल सांगतं. हे नाटक माझ्या दृष्टीने नेहमी महत्त्वाचं राहील. पहिला भाग झाल्यावर आता एलकुंचवारांनी मला सांगितलंय की, दुसरा भाग करण्यापूर्वी मला या नाटकाच्या काही भागांचं पुनर्लेखन करायचं आहे. आता त्यांच्या डोक्यात नेमकं काय आहे ते कळलेलं नाही. त्यातून कदाचित वाडय़ातलं आणखी काही रंजक पाहायला मिळू शकतं, पण हे सगळं नंतरच कळेल. कारण सध्या तरी ते केवळ एलकुंचवारांच्या मनात आहे.

1 COMMENT

  1. नमस्कार ,
    वशिला हे नाटक पहिले “एक निखळ सत्य “प्रत्ययास आले . प्रत्येक पात्र योग्य ,निवेदिता सराफ यांनी वाहिनीची
    भूमिका मनापासून पार पाडली ,त्यांचा उत्कृष्ट अभिनय ,सोज्वलता ,कोठेही त्या स्वार्थी वाटत नाही . पोटभर
    खाऊ घालणारी अन्नपूर्णा वाहिनीच म्हणावेसे वाटते . वाडा संकृती आता पार लयाला गेली आहे.
    प्रभाच्या प्रतिभेचा कोंडमारा ,प्रदीप मुळे यांचे उत्तम नेपथ्य ,इतर कलाकाराचा अभिनय ,तसच रात्रीचे रातकिड्यांचे आवाज ,
    वाहिनीने घातलेले घराण्याचे सर्वे दागिने ,(वरून पडणारी धुळ दाखवता आली असती तर)हा प्रसंग विजया ताईंच्या झिम्मा यात
    वाचण्यात आला . मराठी मासिकासाठी मी वाडा चिरेबंदी बद्दल लिहित आहे . योग आल्यास नाटकात काम करण्याची इच्छा आहे.
    तुमच्या पुढील वाटचालीस मनापासून सुभेच्छा . “व्यंकटेशा ‘आजी व राबणारा नंदू मनाला भावलेली पात्र आहेत .
    साहित्य भूषण सौ . अनघा कुलकर्णी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version