Home मध्यंतर भन्नाट राजबिंडा राजगड!!!

राजबिंडा राजगड!!!

0

शिवरायांचे प्रमुख राजकीय केंद्र म्हणजे राजगड. बुलंद, बळकट असा हा राजगड आजही हिंदुस्वराज्याची ग्वाही देत उभा आहे. छत्रपती शिवरायांनी १६४५ साली किल्ला जिंकून त्यावर बांधकाम केलं आणि त्या गडाला राजगड असं नाव देण्यात आलं. अशा या राजगडावर जाणं म्हणजे एक अभिमानास्पद गोष्ट.
‘राजियांचा गड अन् गडांचा राजा’ अशी बिरूदावली अभिमानाने मिरवणा-या राजबिंडय़ा राजगडाचं स्थान हे दुर्गवेडय़ांच्या आणि भटकंतीच्या विश्वात मानाचं तर आहेच, तसंच ते इतर सर्व दुर्गापेक्षा वेगळंदेखील आहे. अशा या किल्ल्याचं रांगडं, रूबाबदार रूप पाहण्यासाठी कित्येक दुर्गयात्रींचे पाय या ठिकाणी कायमच वळतात. कितीही गड किल्ले पाहिले तरीही या गडाची बातच न्यारी! याचा इतिहास तर रंजक आहेच, शिवाय येथला भूगोलही आपल्यासारख्या पांथस्थांच्या डोळ्यांचे पारणे फिटवणारा आहे. त्यामुळे येथे का यायचं यासाठी कारणांची गणतीच न केलेली बरी!

वारकरी ज्या भावनेने पंढरपूरच्या विठुरायाची वारी दरवर्षी नित्यनेमानं न चुकता करीत असतात. अगदी त्याच भावनेनं अस्सल दुर्गयात्री या देखण्या राजगडाची मोहीम नेहमीच आखत असतात. म्हणूनच राजगडाला आवडीनं भटक्यांची पंढरीसुद्धा म्हटलं जातं. दुर्गभ्रमंतीची आवड आहे, पण राजगड अजुन पहायचाय.. असा दुर्देवी फिरस्ता तुम्हाला शोधूनही सापडणार नाही आणि सापडलाच तरीही त्याच्यासारखा दुर्दैवी दुसरा कोणीही नसेल. त्यामुळेच ‘राजगड पाहिलास का?’ हा प्रश्न एकमेकांना विचारण्याऐवजी ‘तू, राजगड किती वेळा पाहिलास’ हा प्रश्न आपोआपच विचारला जातो. मग या अशा प्रश्नाचं उत्तरही असंच दिलखुलासपणे दिलं जातं. ‘राजगड ना.. मी दहा वेळा पाहिलाय.’ असे दर्दी उत्तर क्षणांचाही विलंब न लावता समोरच्याकडून मिळतं. कधी-कधी तर ‘मी, राजगडला दरवर्षी तीनही ऋतुत जात असतो.’ असेही उत्तरं मिळतात. असं असतानासुद्धा काही साहसी मंडळी गडावर जाण्यासाठी वेगवेगळ्या वाटा शोधतात आणि नंतर त्यांनी केलेला पराक्रम गडावर येऊन सांगतात.

अस्सल दुर्गवेडय़ा मंडळींना तर राजगडावर जाण्यास कुठलीही वेळ आडवी येत नाही. ही मंडळी पौर्णिमेच्या पिठुर चांदण्यात तरी निघतील, नाहीतर अमावस्येच्या काळ्यारात्रीतही पाठीवर सॅक अडकवून या गडाची माती कपाळाला लावण्यासाठी घराबाहेर पडतील. त्यामुळेच कितीही रखरखतं ऊन असो, धो-धो पाऊस असो वा हाडे गोठावणारी थंडी असो. या सा-या अडचणींवर सहजपणे मात करत गडभेटीचा आनंद द्विगुणीत करणारे बरेचजण या गडावर दिसतील. काही हौशी मंडळी तर येथे दिवाळीत रांगोळ्या काढायला येतात. तर काहीजण दीपोत्सव साजरा करायला येतात. काही जण १५ ऑगस्ट, २६ जानेवारी असे राष्ट्रीय दिनसुद्धा उत्साहात साजरे करतात. लहान मुलांचं बोट धरून राजगड चढणा-या पालकांना आणि वडीलधा-या मंडळींना पाहून तर अगदी भारावल्यासारखंच वाटतं. एकदा तर आम्ही गडावर जात असताना अंध व्यक्तींचा ग्रुप गडावर आला होता. त्यांचा उत्साह पाहून हे स्पष्ट होतं की, त्यांच्या मनात राजगडासाठी किती प्रेम आहे. यातल्याच एका व्यक्तिनं सांगितलं की, आम्ही राजगड अनेकवेळा ऐकला, पण मन भरलं नाही. त्यामुळेच याला स्पर्शाने अनुभवण्यासाठी आम्ही आलो आहोत. खरोखरच आमच्यापेक्षा या अंध व्यक्तिंनीच हा राजबिंडा गड अनुभवला असेल यात शंका नाही.

राजगडची वाट धरणा-यांना हा गड काही निराश करत नाही. स्वराज्यासाठी अहोरात्र झिजणा-या या गडाचं भौगोलिक स्थानही तेवढंच आकर्षक आहे. पुणे जिल्हय़ातील वेल्हे तालुक्यात स्थित असणारा हा दुर्ग अनेक वाटांनी आपल्याला बोलवत असतो. एकदा का गडावर जायचं म्हटलं की पायथ्याच्या गुंजवणे गावातून, गुंजवणे दरवाज्यातून वा चोरदरवाज्यातून, भूतोंडेवरून अळू दरवाजातून, पाली गावातून, पाली दरवाजातून या सा-या वाटा आपली आतुरतेने वाट पाहत असतात. प्रत्येक वाट ही वेगळा आनंद आपल्या गाठीशी बांधत असते. जी गोष्ट वाटांची तीच ऋतुंची. येथे येण्यासाठी कुठलाही ऋतू निवडा. या गडाचं रूप प्रत्येक ऋतुत वेगळंच भासतं आणि हवहवसंदेखील वाटतं. उन्हाळ्यात जेवढा हा गड आव्हानात्मक वाटतो, तेवढाच तो हिवाळयात रोमहर्षक वाटतो. पावसाळ्यातली तर बातच न्यारी. हिरवागार गालीचा पांघरलेला हा गड पाहताना आपण कधी शब्दवेडे होतो ते कळतदेखील नाही.

हे सारे सोपस्कार पार पाडत.. एकदा का आपण या गडावर आलो की मग या वेगळ्याच विश्वात अगदी हरवून जातो. नक्की काय-काय पहायचं आणि किती पहायचं.. या सर्वानी आपण अगदी गोंधळून जातो. गडाची एकेक सुंदर बाजू अशी समोर येत जाते.. अन् आपण यात अलगद गुंतत जात असतो. गडाच्या पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या माच्यांवर तर जीवच ओवाळून टाकावसं वाटतं. नागिणीसारख्या सळसळत दुरवर गेलेल्या या माच्यांचे चिलखती बांधकाम तर अगदी पाहतच राहावेसे वाटतात. विशेषत: संजीवनी माचीचे डोळे विस्फारणारे बांधकाम पाहून महाराजांची दुर्ग बांधणी किती प्रगत होती याचा अंदाज येतो. या अभेदय माच्या पाहून औरंगजेबाचा समकालीन साकी मुस्तैदखान म्हणतो की, ‘‘या माच्या म्हणजे एक प्रकारे दुसरे किल्लेच आहेत. यातच या माच्यांचं श्रेष्ठत्वं समोर येतं. या माच्या पाहण्यास एखादा दिवसही अपुरा पडेल. इतकं यात स्थापत्य दडलेलं आहे.’’

शिवकाळात मोठी धामधूम असलेल्या या गडावर बांधकामे आता शाबूत राहिली आहेत कुठे? तरीपण पद्मावती माचीवरील सदरेचे, वाडय़ाचे, अंबारखाना, घोडय़ाच्या पागा आदींचे पडके अवशेष पाहून नकळतपणे आपलं मन अगदी भारावून जातं. या पडलेल्या बांधकामांवरच आपल्या कल्पनेचे अंदाज बांधत मन शिवकाळात न्यायचं. यातून बाहेर पडलो की मग वाट धरायची ती थेट बालेकिल्ल्यावरच!

अत्यंत उभ्या चढणीचा हा बालेकिल्ला म्हणजे आपल्या सा-या भटकंतीचा उत्कर्षबिंदूच! हाराकिरीची चढाई करून येथे आल्यावर सर्वप्रथम आपण ‘स्व’च गमावून बसतो. येथून दिसणा-या तीनही माच्यांचे वर्णन शब्दात करणं मोठं कठीण काम! तीन दिशेला तीन माच्या आणि यांच्यावर हा बालेकिल्ला! ही रचना जर आकाशातून पाहिली तर एखाद्या गरूडाप्रमाणेच भासेल. येथून दिसणारा सहय़ाद्री जर पाहिला तर ती आयुष्यभराची शिदोरी ठरेल.

खरोखरं ‘राजगड’ हा सर्वार्थाने भाग्यशाली गड म्हटला पाहिजे. शिवरायांनी त्यांच्या हयातीतील साधारण पंचवीस वर्षे या गडावरून स्वराज्याचा कारभार पाहिला. त्यामुळे महाराजांचे कर्तृत्त्व ख-या अर्थाने अनुभवलं, पाहिलं ते या गडाने! किती-किती प्रसंग या गडाने अनुभवले असतील. स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचा उत्कट प्रसंग येथेच घडला. इथल्याच भिंतींनी अफजलखानाच्या आणि शायिस्तेखानाच्या पाडावाची खलबते ऐकली. एवढेच नव्हे तर अफजलखानाचे शिरही याच गडाने पाहिलं. महाराज आग्य्राला निघाले असता हाच गड शहारला असेल आणि आग्य्राहून परतल्यावर याचे आनंदाश्रू क्वचितच कुणी पाहिले असतील. इतकंच नव्हे तर छत्रपती राजारामांचा जन्म आणि महाराणी सईबाईंचा दु:खद प्रसंगही येथेच घडला.. यांसारख्या कित्येक घटना येथे उगम पावल्या. म्हणून आजही राजगडाच्या मातीला हात लावला तरी स्पर्शाने या घटना कदाचित आपल्याला जाणवतीलही.. फक्त भावना मनात हवी.

असो, या गडावर लिहिण्यासारखं बरंच आहे. त्यामुळेच कित्येक दुर्गवेडय़ांची, इतिहासकारांनी, सहय़ाद्रीवर प्रेम करणा-यांनी या गडावर शब्दांची अक्षरश: उधळण केली आहे. या सर्वाच्या लेखणीतून उमटलेली शब्दांची फुले ही या गडाच्या प्रेमालाच अर्पण झाली आहेत. म्हणूनच सहय़ाद्रीच्या या देव्हा-यात उधळलेली फुले वेचण्यासाठी आणि पाहण्यासाठी का हाईना या गडावर एकदा तरी या. या फुलांचा सुगंध तुमच्या आमच्या मनात आयुष्यभर दरवळत राहील!

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version