Home कोलाज वाढदिवस आणि एकट्याने साजरा?

वाढदिवस आणि एकट्याने साजरा?

1

परवा एका ई-मेलमध्ये एकाने प्रश्न विचारला होता, ‘‘माझ्या २४ व्या वाढदिवसाला मी कामानिमित्त अनोळखी शहरात आहे, आपलं असं कुणीच नाही. कसा सेलिब्रेट करू? माझा आज वाढदिवस आहे, हे कुणाला माहिती नाही. मी सुट्टी काढून माझ्या जिवाभावाच्या माणसांत जायला हवं होत का?’’
एक क्षणभर माझ्या मनात विचार आला होता,‘‘वाढदिवस आहे ही महत्त्वाची गोष्ट. पण तो आपल्या माणसांजवळ राहून साजरा करायचा नाही तर मग काय उपयोग?’’

पण प्रत्येक वेळी हातातलं काम टाकून, वाढदिवस आहे म्हणूून नात्याची, प्रेमाची माणसं एकमेकांकरता धावून येणं शक्य आहे का? नोकरी, व्यवसाय वा मुलांच्या, घरातील वृद्ध, आजारी व्यक्तीच्या व्यापात व्यग्र आहेत अशी माणसं आपण पाहतो. डॉक्टरसारखे अनेक व्यवसाय आहेत की, ज्यात इच्छा असूनही माणसं एकमेकांसाठी पुरेसा वेळ काढू शकत नाहीत. अशा योग्य कारणामुळे जीवलग व्यक्तीपासून दूर राहावं लागलं तर मग वाढदिवस वा इतर सणवार साजरे करण्याला काही अर्थ नाही, असं म्हणायचं का?

काही प्रसंग वेळेआधी वा तो दिवस उलटून गेल्यावर साजरे करण्यात काय हशील? माझ्या पाहण्यात आपण उद्या एकत्र नाही म्हणून आज वा नंतर वाढदिवस साजरा करणारी माणसं आहेत. मी स्वत: नोकरीनिमित्त दुस-या शहरात राहायचे तेव्हा एक-दोनदा असं आधीच वाढदिवसाचं सेलिब्रेशन मी केलं आहे, पण मग दिवसाचं महत्त्व उगाचच म्हणायचं, असा प्रश्न मनात डोकावला होताच. ऑफिसमध्ये तुमचा वाढदिवस वाटून घेणारे सहकारी असतील तर सेलिब्रेशन होण्याची शक्यता असते. बहुधा तसंच होतं. पण हा मुलगा म्हणतो तसा वाढदिवस आहे हे इतर कुणाला माहिती नसेल तर एकटय़ाने काय करायचं?

एकही मित्र, मैत्रीण वा कुणी ओळखीची व्यक्ती नसेल तर त्या दिवसाचा आनंद वा सेलिब्रेशन कसं करायचं?

सेलिब्रेशन संकल्पना वेगळी असेल, पण आपली माणसं जवळ असणं ही गोष्ट तर समान असते असं दिसतं. वाढदिवसाला आपल्या माणसांपासून दूर असण्याची वेळ तुमच्यावर आली आहे का कधी? ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तिनेच केक आणायचा, तिने एकटय़ाने तो कापायचा आणि एकटय़ानेच खायचा, असं कुणाच्या मनात येत असेल का? अशावेळी एकही माणूस जोडता आला नाही, याची खंत मनात येत असेल का? किंवा आनंद वाटून घेणं मला आवडत नाही, असं मानणारे कुणी तुमच्या पाहण्यात आहेत का?

आपल्या सुख-दु:खाच्या संकल्पनांमध्ये आपल्या जवळच्या माणसांबरोबर त्या वाटून घेणं, हा एक अविभाज्य घटक असतो. त्यात आईवडील, भावंडं, मित्र-मैत्रिणी आणि आपला जोडीदार, आपली मुलं वा आपल्याला जी व्यक्ती जवळची वाटते ती असणं हे काहीसं गृहीत धरलेलं आहे.

वाढदिवसाचा आनंद वाटून घ्यायला कुणीच नाही अशी माणसंही असतील ना जगात? ती कसा साजरा करतात तो दिवस? का साजरा करायचा?

कुणाचा ब्रेकअप झाला, कुणाचे आईवडील वा जोडीदार या जगात नाही किंवा जोडपी विभक्त झालेली आहेत, अशी माणसं जन्मभर कुढत बसतात का? वाढदिवस वा इतर सणवार साजरे करत नाहीत असं दिसतं का? अर्थातच, या प्रश्नाचं उत्तर अशी माणसंही कालांतरानं सेलिब्रेशन करतात हेच आहे. आपलं माणूस नसेल तर नव्या ओळखी, नव्या नात्याचा शोध, नव्या मैत्रीची सुरुवात करायचा प्रयत्न माणसं करतात. नोकरी, व्यवसाय वा इतर कामानिमित्त आयुष्यात येणारी माणसं यांच्याबरोबर ते आनंद वा दु:ख वाटून घेण्याचा प्रयत्न करतात. तसंच काही माणसं एकटं राहूनही आनंदात राहू शकतात, असंही दिसतं. थोडक्यात व्यक्ती कशाप्रकारे एकटेपणाला सामोरे जाते, हा त्या व्यक्तीच्या स्वभावाचा आणि सवयीचा भाग होतो.

आपली माणसं असणं हवंसं असतं. पण माणसं आली की अपेक्षा आल्या, मत-मतांतरे आली. नातं जेवढं जवळचं तेवढं या गुंत्याची तीव्रतासुद्धा जास्त असू शकते. कधी त्याचा त्रासही होऊ शकतो, ते बंधन वाटू लागतं. कुठलीही गोष्ट फार सवयीची झाली की, त्यात वेगळेपण हवं असं मनात यायला लागतं. थोडक्यात एकटेपणाचा वा माणसांचा दोन्हींचा अतिरेक हा आपल्याला नकोसा होतो. माणसं कितीही कामात गढलेली असली तरी या बदलाच्या, वेगळेपणाच्या शोधातही ती असतात. मग अनपेक्षितपणे मिळालेल्या या मुलासारख्या एकटेपणाला एक संधी असंही म्हणता येईल. आयुष्यात काय मिळालं, काय हवं आहे, इतरांसाठी काय करता येईल, अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायला थोडा निवांतपणा मिळाला, असं म्हणूया. काही वाढदिवस स्वत: करता साजरे केले असतील तर असा एखादा वाढदिवस इतरांकरता साजरा करता येईल. मी तर आवर्जून सांगेन की, स्वकेंद्रित वाढदिवसाला अशी अधेमधे सुटी द्या. श्रमदान करून, रक्तदान करून, अनाथ मुलांना वेळ देऊन, वृद्धाश्रमाला मदत करून!

थोडा प्रयत्न केला तर सोशल मीडियामुळे अपरिचित व्यक्तींकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा सहज मिळतात. आनंद वाटून घेणा-या माणसांची कमतरता या जगात नाही. त्याचप्रमाणे जगात अनेक माणसं चार प्रेमाच्या शब्दांसाठी, एका प्रेमळ स्पर्शासाठी आसुसलेली आहेत, हे एकटेपणातून नक्की जाणवतं. ती गरज आपण पूर्ण करू शकतो, हेसुद्धा लक्षात येईलच. इतर दिवशी शक्य नसेल, पण वाढदिवसाच्या दिवशी हे जीवन जिने दिलं त्या आईकरता किमान वेळ काढा. आपली माणसं कोण ते उमजण्याकरता थोडा वेळ घ्या. आपल्या जीवाभावाच्या माणसाचं महत्त्व कधी कधी त्या व्यक्तीपासून दुरावल्यावर कळतं. ते उमजण्यासाठी आयुष्यात असा एखादा वाढदिवस यावा.

1 COMMENT

  1. आवडले. एकटे पानाच्या संधीचा मुद्दा एकदम भावला. स्वत साठी वेळ देणे महत्वाचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version