Home महाराष्ट्र कोकण वालोपे येथील अपघातात १ ठार

वालोपे येथील अपघातात १ ठार

1
संग्रहित छायाचित्र

मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे गणेशवाडी येथे टाटा सुमो गाडी चालकाचा ताबा सुटल्याने गाडी चुकीच्या दिशेने जात शेतात जाऊन कलंडली.

संग्रहित छायाचित्र

चिपळूण- मुंबई-गोवा महामार्गावरील वालोपे गणेशवाडी येथे टाटा सुमो गाडी चालकाचा ताबा सुटल्याने गाडी चुकीच्या दिशेने जात शेतात जाऊन कलंडली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला असून, एक गंभीर तर पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना लाईफकेअर दवाखान्यात उपचारासाठी हलवण्यात आले आहे. हा अपघात बुधवारी सकाळी ६ वाजता घडला. या अपघाताची येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. याबाबतची खबर मारुती साळस्कर (६०, डोंबिवली) यांनी दिली.

यानुसार चालक सुनील शिंदे (३५, रा. डोंबिवली) हे आपल्या ताब्यातील टाटा सुमो गाडीमधून मारुती साळस्कर कुटुंबीयांसह भावकीतील मंडळींना शेरेवाडी वाशीतर्फे संगमेश्वर येथे घेऊन चालला होता.

बुधवारी सकाळी ६ वाजता वालोपे गणेशवाडी येथे आले असता चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने गाडी फरफटत दुस-या दिशेला जाऊन रस्त्याशेजारील शेतात कलंडली व चालक सुनील शिंदे यांचा जागीच मृत्यू झाला. तर मारुती साळस्कर, माधवी साळस्कर, ऋचिता साळस्कर, तृप्ती मेस्त्री हे किरकोळ जखमी झाले आहेत.

योगेश मेस्त्री हा गंभीर जखमी झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. पोलीस उपनिरीक्षक अविनाश मते यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी मयत सुनील यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आला. जखमींना लाईफकेअर दवाखान्यात हलवले. या घटनेची येथील पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. अधिक तपास उपनिरीक्षक अविनाश मते करीत आहेत.


देवळेत कार उलटून सहा जण जखमी

रत्नागिरी- रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावरील देवळे जंगलवाडीनजीक मारुती उलटून झालेल्या अपघातामध्ये एकाच कुटुंबातील सहा जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. जखमी सर्व जण कर्नाटक येथील बेळगाव-देवेंद्रनगर येथील आहेत. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी सकाळी १० वा. १५ मिनिटांनी हा अपघात घडला.

कर्नाटक, बेळगाव येथील मदळी कुटुंबातील सहा जण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आले होते. गणपतीपुळेत देवदर्शन घेऊन कोल्हापूरमार्गे बेळगावला परतत असताना बुधवारी सकाळी १० वा. १५ मि. त्यांच्या गाडीला देवळे, जंगलवाडीनजीक अपघात घडला.

चालक कपिल मदळी याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गाडी पलटी होऊन चारशे फूट फरफटत गेली. या अपघातामध्ये गाडीतील सहा जण जखमी झाले. जखमींमध्ये परशुराम मदळी (६५), चालक कपिल मदळी (३८), कांचन मदळी (३०), पल्लवी मदळी (५५), श्लोक मदळी (८) आणि स्पर्श मदळी (१) असे सहा जण जखमी झाले आहेत. अपघातामध्ये मारुती गाडीचा चक्काचूर झाला.

गाडी चारशे फूट फरफटत गेल्याने गाडीतील प्रवाशांच्या डोक्याला आणि हाताला गंभीर दुखापती झाल्या आहेत. जखमींना पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

1 COMMENT

  1. सुनील शिंदे हा वाहनचालक सुरळीत वाहन चालवायचा. त्याच्या गाडीला मागून कोणत्या तरी गाडी वाल्याने धडकल्या मुले त्याची गाडी कलंडली आणि शेतात जाऊन पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version