Home वाचकांचे व्यासपीठ वृक्षछाटणी की कत्तल?

वृक्षछाटणी की कत्तल?

2

पावसाळ्यापूर्वी वृक्षांची छाटणी करण्याची पद्धत असली तरी मुंबईत छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल होत आहे का? 

पावसाळ्यापूर्वी वृक्षांची छाटणी करण्याची पद्धत असली तरी मुंबईत छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल होत आहे का? वृक्षतोड करणा-या कंत्राटदारांकडून योग्य पद्धतीने छाटणी होते का? मुंबईत वृक्षांची संख्या कमी होत असताना अशा पद्धतीने छाटणी व्हावी का? वाट्टेल तशा पद्धतीने छाटणी करण्यास लाकडांचा काळाबाजार कारणीभूत आहे का? या वृक्षतोडीस पालिका अधिकारी व कंत्राटदारांचे संगनमत असावे का?

                                               


वृक्षकत्तल..

पावसाळ्यापूर्वी खबरदारीचे पाऊल म्हणून अनावश्यक फांद्या छाटणीच्या नावाखाली महापालिका कंत्राटदारांनी वृक्षकत्तल करून संपूर्ण शहर विद्रूप केले. खोडापासूनच वृक्ष छाटून मुंबईकरांना आगामी काळात कडकडीत उन्हांचे चटके सोसण्याची पूर्वतयारी कंत्राटदारांनी केली. या वृक्षकत्तलीविरोधात ‘प्रहार’ने वाचा फोडली. त्यामुळे या वृक्षकत्तलीमागील खरा हेतू समोर आला. लाकडाच्या वजनावर पैसे अवलंबून असल्याने कंत्राटदारांनी आपली मनमानी करत संपूर्ण झाडच तोडण्याचे संतापजनक कृत्य केल्याचे लक्षात येताच वाचकांनी कंत्राटदारांचा चांगलाच शब्दांचा चोप दिला. अगोदरच पाऊस कमी, जागतिक तापमानाची झळ अशा परिस्थिथीत केवळ चार पैशांसाठी वृक्षछाटणी करावी, हे कितपत योग्य असा प्रश्न वाचकांनी विचारला. पाणीटंचाईची टांगती तलवार डोक्यावर असताना असे कृत्य करण्याचे धाडस कसे होते, असा प्रश्नांचा सूरही त्यांनी विचारला. मुळात ही कत्तल चुकीच्या पद्धतीने, नियम डावलून केल्याने संबंधित अधिका-यांसह कंत्राटदारांना अद्दल घडवायलाच हवी, अशी मागणी वाचकांनी केली.


कठोर कारवाई करा

कंत्राटदार झाडांच्या फांद्या छाटणीच्या नावाखाली झाडांची कत्तल करीत आहेत. महापालिकेचे संबंधित अधिकारी मात्र जाणूनबुजून वृक्ष छाटणीच्या कामाकडे दुर्लक्ष करीत आहेत. वास्तविक वृक्ष छाटणीच्या वेळी संबंधित अधिका-यांची उपस्थिती बंधनकारक आहे. गेल्या काही दिवसांपासून छाटणीच्या नावाखाली कत्तल केलेल्या झाडांची विक्री मुंबईतील लाकडाच्या वखारी आणि स्मशानभूमीत करून हे कंत्राटदार बक्कळ नफा कमावत आहेत. हे सर्व व्यवहार एकमेकांच्या संगनमताने चालतात. हे संगनमत अबाधित ठेवणारे पालिका अधिकारीच याला जबाबदार आहेत. मुळात वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारी महापालिकेची असताना संबंधित अधिकारी जर दुर्लक्ष करीत असतील तर याची सखोल चौकशी करावयास हवी. त्याचप्रमाणे झाडांची कत्तल करणा-यांवर अजामीनपात्र गुन्हा नोंदविल्यास वृक्ष छाटणीला काही प्रमाणात आळा बसेल. दुसरी गोष्टी म्हणजे वृक्ष प्रेमीनीही याबाबत सदैव दक्ष राहिले पाहिजे.- मधुकर कुबल, बोरिवली (पू)

झाडे वाचवा

मान्सूनपूर्व रस्त्यावर येणा-या झाडांच्या फांद्या, झुकलेली झाडे व वाहतुकीस अडथळा असणारी झाडे दरवर्षी ठेकेदारामार्फत तोडली जातात; परंतु ठेकेदारांचे कर्मचारी फांद्यांच्या छाटणीबरोबर झाडाचीही कत्तल करतात. खोडे कापून मोठ-मोठया फांद्या तोडतात. त्यामुळे झाड बोडके होते. झाडाची लाकडे तोडून सर्रास वखारीत व स्मशानभूमीमध्ये विकली जातात. अशा प्रकारे झाडांची विल्हेवाट लावणे गैर आहे. पालिका वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी लाखो रुपये खर्च करते. परंतु त्यातही भ्रष्टाचार होताना दिसतो. झाडांची अवैधतेने विक्री करणा-या ठेकेदारांना दंड आकारून काळया यादीत अशा ठेकेदारांची नावे टाकावीत, जेणेकरून असे गैरव्यवहार होणार नाहीत. झाडांच्या फक्त फांद्या तोडल्या गेल्या पाहिजेत. झाडांच्या फांद्या तोडल्यानंतर पालापाचोळा त्वरित उचलणे जरुरीचे आहे. अथवा पावसाळयात तो कचरा पाण्याचा निचरा होण्यास अडथळा येऊ शकतो. याकरिता कचरा त्वरित हटवणे ठेकेदाराचे कर्तव्य आहे. झाडांची मुळासकट कत्तल होणार नाही, याकडे सामाजिक संघटना, दक्ष नागरिक यांनी लक्ष्य घालून अशी घटना घडल्यास त्वरित पालिकेला कळवणे गरजेचे आहे.- हरिभाऊ खरनार, उल्हासनगर

पर्यावरणात असमतोलपणा नको

महानगरपालिकेने काढलेला वृक्ष छाटणी हा वटहुकूम राज्यात दुष्काळला आमंत्रण ठरू शकतो. दुष्काळाची काळी सावली राज्यावर असतानाही मुंबईतला कंत्राटदार पैशासाठी आसुसलेला आहे. अहो, पालिका अधिका-यांनो, जरा मुंबईबाहेर जाऊन पाहा काय भीषण परिस्थिती आहे. जून महिना कोरडा गेला. आता कुठेतरी पाऊस पडू लागला आहे. पावसाचा मारा सतत सुरू राहिल्यासच पाणीटंचाईला आपण मात देऊ शकतो. आता पावसाळा आहे, म्हणून उष्णतेची काहीली जास्त जाणवत नाही आहे. उन्हाळ्यात या कंत्राटदारांमुळे मुंबईकर सावलीला मुकणार आहेत. आपला परिसर हिरवाईने सुंदर दिसतो, फळा-फुलांनी बहरतो. पण कंत्राटदारांना काय त्याची? पालिकेला आज समाजाने समज देणे जरुरीचे आहे. आपला देश सुजलाम सुफलाम आहे. परदेश्ी पर्यटक आपला भारत देश पाहण्यासाठी उत्साहाने येतात. मग पालिकेला का असे अवगुण सुचले आहेत? – राजेंद्र सावंत, टिटवाळा (पू.)

वृक्षछाटणीचा काळाबाजार

दिवसेंदिवस वृक्षसंपदा कमी होत चालली आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडल्यामुळे दुष्काळासारखे संकट घोंगावत आहे. अशातच बेकायदा वृक्षछाटणीच्या बातमीने चीड निर्माण होते. पावसाळ्यात झाड कोसळण्याच्या भीतीने खबरदारीचे पाऊल म्हणून झाडाची धोकादायक फांदी छाटणे योग्य आहे, मात्र धोकादायक फांद्याच्या नावाखाली सरसकट झाडावरच कुऱ्हाड फिरवून नको ते संकट आपण ओढावून घेत आहोत. लाकडासाठी हा काळा बाजार केला जातो. त्यावर महानगरपालिका, संबंधित अधिकारी वर्गाने कंत्राटदारांवर संगनमत न करता लक्ष ठेवणे आवश्यक आहे. वनीकरणाच्या क्षेत्रात वाढ करण्याची गरज निर्माण झाली आहे. यासाठी प्रत्येकाने वृक्ष लागवडीची व संवर्धनाची मोहीम हाती घेणे काळाची गरज बनली आहे. अशी परिस्थिती असताना सन २००३ मध्ये पडलेल्या दुष्काळाची परिस्थिती न पहिलेल्या व्यवसायाने अभियंता असणा-या सामाजिक कार्यकर्त्यांनी पुढे येऊन मनाचा निर्धा करून वृक्ष लागवड मोहीम हाती घेऊन योग्य ठिकाणी वृक्ष-झाडे लावून झाडे जगवा आणि देश दुष्काळापासून वाचवा, या हेतूने सर्व सामाजिक संस्थांतील कार्यकर्त्यांनी झाडे लावण्याची मोहीम राबविली पाहिजे.- प्रवीण पाटील, परळ

पालिका अधिका-यांचे डोके ठिकाणावर आणा

वाढत्या प्रदूषणास आपणच हातभार लावत आहोत, याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे सध्या मुंबई महापालिकेकडून झालेली वृक्ष छाटणी! महानगरपालिकेच्या महापौरांनी त्वरित वृक्ष छाटणीवर निर्बंध आणणे जरुरीचे आहे. ज्या वृक्षांची कालमर्यादा खरोखरच संपलेली आहे. अशा वृक्षांची छाटणी करण्याअगोदर कृषी वृक्ष तज्ज्ञांनी सल्लामसलत करावा. रस्त्याच्या दुतर्फा असलेली वृक्षे नीट पाहूनच मार्गात आडव्या येणा-या फांद्यांचीच छाटणी करावी. जाड-जूड फांद्या तोडू नयेत. छाटणी केलेल्या वृक्षांची नोंद ठेवणे जरुरीचे आहे. अन्यथा काळा बाजार होऊ शकतो.- छाया सावंत, टिटवाळा (पू.)

वाचवा हो झाडांना..

पालिका प्रशासन तसेच कंत्राटदारांची सलगी जगजाहीर आहे. या दोहोंनाही पर्यावरणाची काही पडलेली नाही. मानवाला ऑक्सिजन पुरवठा करणा-या झाडांनाच मुळाशी उखडून टाकण्याचा हा प्रकार आहे. शहरातील झाडांची अवस्था पाहिली की, संताप अनावर होतो. महापालिकेच्या प्रत्येक खात्याला भ्रष्टाचाराची कीड लागली आहे. त्यामुळे जनतेच्या तक्रारीला पालिकेत न्याय मिळत नाही. महापालिकेत स्वतंत्र पारदर्शक लोकायुक्त नियुक्त करा. कोणी पालिका कर्मचारी काम करत नसेल तर त्याची दखल लोकायुक्तांना घेऊन अशा कर्मचा-यांचे निलंबन, बडतर्फी, शिक्षा याचा अधिकार असावा. याच मार्गाने स्थानिक स्वराज्य संस्थांतील भ्रष्टाचार आटोक्यात येईल.- प्रभाकर देशपांडे, गोवंडी

पर्यावरणाचा समतोल राखा

वृक्षतोडीची समस्या सर्वच ठिकाणी दिसून येत आहे. झाडांच्या कत्तलीचे दुष्परिणाम अगोदरपासूनच आपल्याला भेडसावत आहेत. घडलेला प्रकार निश्चितच निंदनीय आहे. महापौरांनी स्वत: लक्ष घालून छाटणी केलेल्या वृक्षांची जबाबदारीने पाहणी करावी, तसेच कापलेल्या वृक्षांची, लाकडी संपत्तीचीही तपासणी करावी, देवाश्री वृक्षांची छाटणी त्वरित थांबवावी.- प्राची सावंत, टिटवाळा

जनजागृती हवी

वृक्ष कापताना, ते समूळ नष्ट करता कामा नयेत. शहरभर काँक्रिटचे जंगल उभे राहिल्याने आधीच झाडांची संख्या दररोज कमी होत असून पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. त्यामुळे तापमान वाढणे, ष्टद्धr(7०)तुचक्र बदलणे, पर्जन्यमान घटणे यांसारखे दुष्परिणाम जाणवू लागले असून पाण्याच्या उपलब्धतेची गंभीर समस्या आ वासून उभी आहे. इंधनाच्या भडकलेल्या भावामुळे तोडलेल्या झाडांपासून मिळणा-या सरणाला मागणी वाढत चालली आहे. त्यातून मिळणा-या पैशांवर डोळा ठेवून कंत्राटदार वृक्षछाटणीच्या नावाखाली झाडांची यथेच्छ कत्तल करून मिळणारा पैसा स्वत: लोकप्रतिनिधी वाटून खात आहेत. मात्र त्यापासून होणा-या पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे नागरिकांचे आयुष्य धोक्यात येत आहे. वृक्ष छाटणीच्या नियमाबाबत समाजप्रबोधन करून त्यांना माहितीच्या अधिकाराद्वारे छाटणीवर नियंत्रण ठेवण्यास शिकवावे.- डॉ. कृष्णकांत नाबर, माहीम

‘प्रहार’चे धन्यवाद!

प्रथम ‘वाचकांचे व्यासपीठ’ अंतर्गत ‘वृक्षछाटणी की कत्तल?’ या अतिसंवेदनशील व मनुष्यप्राण्याच्या निगडित विषयाला हात घालून मुंबई महानगरपालिकेचे पितळ उघडे पाडल्याबद्दल ‘प्रहार’चे मन:पूर्वक धन्यवाद! मुंबईत पावसाळ्यात वृक्ष किंवा वृक्षांच्या फांद्या तुटून होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी पालिकेकडून फांद्यांची छाटणी करण्यात येते. मात्र फांद्यांची छाटणी करताना कंत्राटदारांच्या हव्यासापायी संवेदना व भावनांचा अभाव असणारी माणसे झाडांच्या मुळावरच घाव घालतात, ते निषेधार्हच आहे. पाऊसपाण्याची आणि शुद्ध प्राणवायूचा पुरवठा करून मनुष्यप्राण्यांचे जीवन सुसह्य करणा-या वृक्षांचेच अस्तित्व नष्ट करणा-या पाषाणहृदयी अधिका-यांना वठणीवर आणले पाहिजे. अगोदरच टॉवर्स आणि मॉल संस्कृतीने जमिनीच्या लालसेने मागील तीन दशकांत लाखो वृक्षांचा बळी घेतला आहे. मुंबईतील नालेसफाई असो, रस्त्यांची डागडुजी असो, पदपथांची मरम्मत असो तेथे टक्केवारीत पालिका अधिकारी, कंत्राटदार आणि लोकप्रतिनिधी यांची हात की सफाई सारे दक्ष नागरिक जाणून आहेत. हेच अभद्र त्रिकूट वृक्षांची कत्तल करून लाकडाचा काळाबाजार करताना कुणाचीही भीड ठेवत नाहीत हे स्पष्ट दिसते.- दिलीप अक्षेकर, माहीम

‘ई मेल’द्वारा आलेली पत्रे..

वृक्षतोड रोखा

पावसाळा आला की महापालिका रस्त्यांवरील अनावश्यक झाडांच्या फांद्या छाटणीचे काम हाती घेते. रस्त्याच्या मधोमध तसेच पदपथावर पादचा-यांना त्रास होऊ नये किंवा धोकादायक फांद्या छाटणीचे काम पालिकेला नियमानुसार करावे लागते; परंतु ही नियमावली केवळ कागदावरच राहिली आणि मुंबईतील झाडांची बेसुमार कत्तल झाली. ही कत्तल साधीसुधी नव्हे, सरसकट हातात कु-हाड घेऊन झाडांचा निकाल लावला गेला आहे. झाडे कापून उपलब्ध लाकडांच्या विक्रीचा काळाबाजार केला जातो. वृक्षांची कत्तल डोळ्यांसमोर होताना एखाद्या वृक्षप्रेमीने विरोध केल्यास पालिका आदेश असे सांगितले जाते. अर्थात ही छाटणी संबंधित पालिका अधिकारी आणि इतर ‘अर्थ’प्रेमींच्या संगनमताने होते. हे सर्व प्रकार रोखायचे असतील तर महापालिकेने वृक्ष छाटणीच्या पद्धतीत बदल करावा. यापुढे झाडांच्या फांद्या तोडायच्या आहेत त्यांनी गणना अगोदर करावी आणि आवश्यक असल्यासच ती फांदी ठेकेदाराला तोडण्यास सांगावी. म्हणजेच अनधिकृत तोडणीला मोठया प्रमाणावर आळा बसेल.- नरेंद्र कदम, सांताक्रूझ

व्यावसायिकांना, कंत्राटदारांना आवरा

बांधकामात अडथळा बनणा-या मोठमोठया वृक्षांची कत्तल करण्यात बांधकाम व्यावसायिक पटाईत असतात. वृक्षांच्या मुळात, खोडात रसायने टाकून पद्धतशीरपणे कत्तल करून मोठमोठाले वृक्ष कोसळल्याचे चित्र हे व्यावसायिक उभे करतात. त्यामुळे मुंबईतील झाडांची संख्या कमी होत आहे. नवीन झाडे लावणे बांधकाम व्यावसायिकांना बंधनकारक असताना त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जाते. अशातच पावसाळ्या पूर्वीची वृक्षछाटणी मुंबईतील वृक्षसंख्या आणखी कमी करणारीच ठरत आहे. यामागे निश्चितच पालिका अधिकारी आणि कंत्राटदार यांचे साटेलोटे आहे. कारण तोडल्या गेलेल्या वृक्षातून मोठया प्रमाणावर लाकूड उपलब्ध झाले आहे. हेच लाकूड काळ्या बाजारात विकले जाऊ शकते किंबहुना विकले गेले आहे. वृक्षछाटणीचे कंत्राट देताना अनावश्यक वृक्षतोड होणार नाही याची हमी कंत्राटदारांकडून पालिकेने घ्यायला हवी. नवीन झाडे लावता येत नसतील तर निदान आहेत त्या झाडांना तरी वाचवून त्यांना नवसंजीवनी द्या.- दीपक गुंडये, वरळी

‘वृक्ष लावा, वृक्ष जगवा’

गेले दिन वैभवाचे, वैराण ही माळरो।

कृष्ण कृत्य मानवाची, शिवारही वीराने।।

माळरानी पिंपळाची, सळसळही थांबली।

स्तब्ध वारा भोवताली, नि:शब्द सावली।।

हद्दपार रानबोरे, रानजाळी कर्दळी।

शर्थ केली मानवाने, स्वार्थबुद्धी साधली।।

भग्न सारे वृक्षवेली, बळीराजा खुणाविती।

पोरके झालो आम्ही, पोरकी झाली माती।।

आभाळी झेप होती, झेलती पर्णधारा।

नात्याची विण होती, वैभावाचा पसारा।।

वृक्षांच्या संहाराने, आता सारे संपले।

नेम नाही पावसाचा, चराचर बदलले।।- संजय जाधव, सांताक्रूझ (प.)

कु-हाडीचा हात आवरा

वृक्ष छाटणीमुळे आपण शुद्ध हवेला, गारव्याला, सृष्टी सौंदर्याला मुकले जातो, हे लक्षात घ्या. एक झाड चार माणसांना प्राणवायू व शुद्ध हवा देते. झाडांचे महत्त्व जाणूनही महापालिकेकडून नियुक्त होणा-या कंत्राटदारांकडून सर्रासपणे झाडांची कत्तल होणे योग्य नाही. काही उच्चभ्रू वसाहतीतील माणसे केवळ झाडांची संख्या जास्त असल्याने परिसरात मच्छरांचा प्रादुर्भाव वाढतोय, अशी कारणे देत झाडांवर कु-हाड फिरवतात. विकासाच्या नावाने, अमूक-तमूक कारणाने माणूस केवळ झाडांची कत्तलच करत आला आहे. पावसाचे प्रमाण कमी होतेय, याकडे थोडे लक्ष दिल्यास झाडांचे महत्त्व कळून येईल. ऐन पावसातही उकाडयाने जीव जातोय. ष्टद्धr(7०)तूचक्र बिघडतेय आणि आम्ही झाडे कापण्याचा सपाटा सुरू ठेवला आहे. झाडांवर घरटी बांधणा-या पक्ष्यांचीही त्यांना काळजी नाही. माणसाचा स्वार्थी स्वभाव इतक्या टोकाला पोहोचला आहे की निसर्गातील पशूपक्ष्यांविषयी त्याला भूतदयेची भावना नाही. नाजूक किंवा मोडकळीस आलेल्या फांद्या तोडण्याऐवजी सरसकट झाडेच तोडणा-या कंत्राटदारांवर लक्ष ठेवा. बेकायदा वृक्ष छाटणीला आळा घाला. – विनायक वाडेकर, नेरूळ

‘‘..तोवर प्रदूषण मुक्तता कठीण आहे!’’

दिवसेंदिवस प्रदूषणाची समस्या गंभीर स्वरूप धारण करत आहे. हवा बिघडले, समुद्रातील निळाशार पाण्याची जागा भरावांनी घेतली, जमिनीवरील मातीवर सिमेंटच्या लाद्या बसल्या. प्रदूषणाच्या समस्येबाबत मुळात माणसाला काही पडलेलीच नाही. नफेखोर उद्योगी आणि पैशाच्या हव्यासात अडकलेला सामान्य माणूस यातील कोणाही मनुष्यप्राण्यांत निसर्गाविषयी हळहळ नाही. निसर्गाचे काहीही होवो, आपल्याला काय त्याचे? सध्याच्या वृक्ष छाटणीतही असाच काहीसा प्रकार दिसून आला. पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्या छाटण्याचा प्रकार हा सुरक्षिततेच्या उपायाखातर केला जातो. या वृक्ष छाटणीत झाडाचे निरीक्षण केल्यानंतर झाडाची कोणती फांदी कापावी, कितपर्यंत कापावी, याबाबतची शहानिशा करून फांद्या छाटणीचे काम हाती घेतले जाते. मात्र सरसकट वृक्षांचीच कत्तल करणे योग्य नव्हे. ही छाटणी महापालिकेतील संबंधित अधिका-यांच्या ‘अर्थ’पूर्ण सहकार्याने उघडपणे अमलात आणली जात आहे. ही साथ घट्ट पैशाच्या धाग्याने घट्ट विणली गेल्याने ही नाळ जोपर्यंत तुटत नाही तोपर्यंत मुंबईतील वृक्षांचे काही खरे नाही. याबाबत संबंधित महापालिका अधिका-यांचे पितळ अगोदरच उघडे पडले आहे, मात्र कारवाईबाबत महापालिका मौन बाळगून आहे, याचे दु:ख.- मधुकर ताटके, गोरेगाव

पर्यावरणाचा -हास थांबवा

वने आणि वृक्षांच्या होत असलेल्या ऱ्हासामुळे निसर्गाच्या चक्राचे संतुलन बिघडल्याची ओरड सर्वत्रच होत असते. कधी जास्त पाऊस पडला तर कधी अवर्षण झाल्यास सर्वानाच वने, वृक्ष किती महत्त्वाची असतात याची आठवण येते. परंतु  मुंबई महापालिकेतील काही मुठभर अधिका-यांच्या आशीर्वादाने दिवसाढवळ्या याच वृक्षांच्या कत्तली सुरू आहेत. आदेश केवळ फांद्या छाटण्याचे असताना पूर्ण झाडाची छाटणीच्या नावाखाली सर्रासपणे छाटले जात आहेत. वृक्षछाटणीच्या नावाखाली वृक्षांच्या खोडापर्यंत छाटणी करणा-या कंत्राटदार आणि महापालिकेच्या भूमिकेबद्दल आमच्या वाचकांनी असंख्य प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ  कारवाई करून चालणार नाही. तर अशी वृक्षछाटणी करणा-यांवर कायमचा जरब बसेल अशी कारवाई करावी अशा संतप्त प्रतिक्रिया वाचकांच्या पत्रांतून उमटल्या आहेत.

कंत्राटदारांची हातसफाई

वृक्षछाटणी केली की पावसाळ्यात धोकादायक फांद्यांपासून मुक्तता मिळते, असा समज निर्माण करुन कंत्राटदारांनी आपली हातसफाई करुन घेतली. सिमेंट-काँक्रिटच्या जंगलात अगोदरच झाडावरील हिरवे पान पाहणे मुश्किल होऊन बसले आहे. सरसकट झाडे छाटल्यांने केवळ त्याठिकाणी लाकडे उभे केल्यासारखे वाटते. कधीकाळी डेरेदार वृक्ष येथे उभा होता? असा प्रश्न सर्वत्र पडला असून हे खेदजनक चित्र  मुंबई परिसरात सर्वत्र पाहायला मिळत आहे. अगोदरच पर्जन्यवृक्षांचे आयुमान कमी झाल्याने मुंबईवरील हिरवीगार सावली लोप पावली आहे, त्यात वृक्षकत्तलीने ही सावलीच गायब झाली आहे. कंत्राटदारांनी वृक्षछाटणी केल्याचे वाटत नाही. नागरिकांना एखाद्या फांदीचा त्रास होत असेल तर तशी रितसर तक्रार त्यांनी संबंधित महापालिका अधिका-यांना करता येते. मात्र कंत्राटदारांना हव्यातशा वृक्ष छाटणीचा अधिकार नाही. पालिका अधिका-यांनी या प्रकरणी दुर्लक्ष करुन अक्षम्य गुन्हा केला आहे, यावर सर्व वाचकांचे एकमत असावे असे दिसते. यामुळे या गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी. – मयुर  ढोलम, जोंगेश्वरी

वृक्ष हेच मानवाचे सगे सोयरे!
नैसर्गिक आपत्तीला मानव कसे स्वत:हून आमंत्रण देतो, याचे हे ठळक उदाहरण. मुंबईतील झाडांची दुर्दशा पाहून तो दिवस आता दूर नाही असे म्हणावे लागेल. पावसाचा पत्ता नाही. पाऊस कोसळतोय तो पण शहर परिसरात, तलाव क्षेत्रात पावसाने आपली चुणूक दाखवली नाही. पाणीटंचाईबाबत कल्पना देऊनही हवीतशी खबदारी मुंबईकरांनी घेतलेली दिसत नाही. महाराष्ट्र सरकार व प्रामुख्याने मुंबई पालिका प्रशासनाला जलनियोजनाची आखणी किंवा प्रकल्प योजना नव्याने राबवण्याची गरज आहे. ‘झाडे लावा पाऊस पाडा’ हा नवा उपक्रम सरकारने राबवणे गरजेचे आहे. वृक्षांच्या कत्तलीमुळे पाऊस पडत नाही हे विज्ञान सांगत आहे. वृक्ष हेच मानवाचे सगे सोयरे आहेत, हे विसरून चालणार नाही. – नारायण पन्हाळेकर, काळाचौकी

वृक्ष संवर्धन समिती कुठे आहे?
ज्या संस्थेवर वृक्षसंवर्धनाची जबाबदारी आहे, त्या स्थानिक स्वराज्य संस्थेची वृक्षसंवर्धन समिती किंवा यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, हा प्रश्न आहे. फांद्या छाटल्या गेल्या पण सोबत झाडांचाही बळी गेला. या प्रकरणी महापालिका मौन बाळगून आहे, हे जास्त संतापजनक आहे. दरवर्षी झाडांच्या धोकादायक फांद्याची छाटणी होते मात्र अशा पद्धतीची छाटणी याआधी झाली नाही. बेसुमार वृक्षतोडीमुळे होणा-या परिणामांची आपण सारेच किंमत मोजत आहोत. एखाद्या पुढा-याचे, नेत्याचे पोस्टर फाडले किंवा त्यावर काळे फासले की त्या पुढा-याच्या अनुयायांचे पित्त खवळते, हिच भावनिकता झाडांची कत्तल होते. तेव्हा कुठे असते? जी झाडे आपल्याला फुले, फळे, सावली देतात ती केव्हाही पुढां-यापेक्षा श्रेष्ठच ठरतात. ही भावना जेव्हा प्रत्येकाच्या मनात निर्माण होईल, तेव्हा कोणत्याही संवर्धन समितीची गरज भासणार नाही.     – दादासाहेब येंधे, काळाचौकी

एक दिवस मुंबई वृक्षहीन होईल
मुंबईत हिरवाई उरलीच कुठे आहे? पालिकेने शोभेपुरती उद्याने उभारलीत. आज बेसुमार जंगल तोडीमुळे अगोदरच पर्यावरणाच्या ऱ्हासाला हातभार लागत आहे. त्यात या वृक्षकत्तलींची भर कशाला? सामाजिक वनीकरणाच्या मोहिमेखाली वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन व वृक्ष संरक्षणासाठी कसोशीने प्रयत्न होत आहेत. हे प्रयत्न आता शहरात मोठय़ा प्रमाणात राबवायला हवेत. वृक्ष छाटणी करणारे कंत्राटदार लाकडाचा काळा बाजार पालिका अधिका-याच्या संगतमताने करतात. मुंबईतील जुने व टवटवीत दिसणारे वृक्ष कशा प्रकारे त्यांना सुकवून व मारून कशी टाकावीत हे संपूर्ण ज्ञान पालिका अधिकारी बिल्डर लॉबीला देत असतात. अशा पद्धतीने सुद्धा वृक्षाची छाटणी होते. काही वर्षाने मुंबईत आपणास एकही वृक्ष दिसणार नाही यांचे कारण एकच असेल पालिका अधिकारीच असतील!     – रामचंद्र मेस्त्री, घाटलेगाव

नागरिकांनीच आता पुढाकार घ्यावा
एवढय़ा मोठय़ा प्रमाणात वृक्षकत्तल घडताना पालिकेच्या अधिका-यांनी झोपेचे सोंग घेतले. आता कारवाई करून झाडांच्या फांद्या परत येणार आहेत का? आता संबंधिताना कठोर शिक्षा द्या, जेणेकरुन पुढच्या पावसाळ्याअगोदर अशा प्रकारच्या घटनेची पुनरावृत्ती नको. जमल्यास नव्या कंत्राटदारांची नियुक्ती करा. तेच योग्य ठरेल. घडलेली घटना निश्चितच संतापजनक आहे. कारण मुंबईतील सर्वच ठिकाणी छाटलेले वृक्ष पाहताना खरोखरच मन विषण्ण होते. अर्थात अजूनही या बाबतीत महापालिकेने काही ठोस कारवाईचे आश्वासन दिलेले नाही. पालिका कारवाई करेल, याबाबत साशंकता आहे. महापालिकेतील संबंधित अधिका-यांना जाब विचारण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. स्थानिक नगरसेवकांना गाठून त्यांना या प्रश्नाचा जाब विचारा. या बेजबाबदारपणाबाबत नागरिकांनी आता ठोस पावले उचलावीत.     – स्नेहीत कोरगावकर, मालाड

अधिकारी, कंत्राटदारांचे संगनमत
पावसाळय़ापूर्वी झाडांच्या फांद्या छाटणीसाठी महापालिकेच्या २४ विभागांमध्ये कंत्राटदारांची निवड करण्यात आली, मात या कंत्राटदारांकडूनच छाटणीच्या नावाखाली खोडापासूनच झाड कापण्याचा प्रयत्न होत आहे. कामाचा मोबदला फांद्यांच्या वजनावर असल्याने कंत्राटदार केवळ जास्तीत जास्त लाकडे मिळावीत, म्हणून सरसकट वृक्षच कापत आहेत. त्यासाठी त्यांच्यावर दंड आकारला जातो, तरीही कंत्राटदारांनी मुंबईत सर्व भागांमध्ये झाडांची कत्तल करण्याचा सपाटा सुरुच आहे. वृक्षांची छाटणी करताना त्या ठिकाणी वॉर्ड ऑफिसर, वृक्ष प्राधिकरणाने नियुक्त केलेला स्थानिक अधिकारी उपस्थित असणे बंधनकारक असते, मात्र अशा वेळी कोणीही अधिकारी उपस्थित नसल्याचा फायदा घेत कंत्राटदार आपला मनमानी कारभार चालवतात. विनापरवाना झाडांची कत्तल करणे हा गुन्हा आहे. परंतु या सर्व गोष्टींकडे महापालिकेचे दुर्लक्ष होत आहे. या प्रकरणी वृक्ष प्राधिकरणातील संबंधित अधिकारी, स्थानिक नगरसेवकही तितकेच जबाबदार आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे स्थानिकांकडूनही कधी कधी होर्डिगसाठी जागा मिळवण्यासाठी मागणी केली जाते व कंत्राटदार पैशाच्या मोबदल्यात त्यांची मागणी पूर्ण करतात. वृक्ष संरक्षण व संवर्धन कायद्यानुसार महापालिका व नगरपालिका क्षेत्रांतील वृक्षांचे संवर्धन तसेच छाटणी संबंधित तरतूद करण्याचा अधिकार त्या विभागातील वृक्ष प्राधिकरणाला असतो व या प्रकरणी कारवाई करण्याचा अधिकारही त्यांनाच असतो. दोघांमध्ये जर संगनमत असेल तर मुंबईत वृक्षांची संख्या कमीच होताना दिसेल. – पुष्पा ढवळे, पनवेल

लाकडाचा काळा बाजार अशक्य बाब
पावसाळा सुरू असताना अतिवृष्टी, घोंघावणारे वारे आदी कारणामुळे पावसाळय़ात वृक्ष उन्मळून पडतात आणि अपघात घडतात. या अपघातात अनेकजणांचा जीव जातो. म्हणूनच खबरदारीचा उपाय म्हणून फांद्यांची छाटणी करण्याचे काम महानगरपालिका कर्मचारी करतात. तोडलेल्या फांद्या, लाकडे स्मशान भूमीला पाठवून दिल्या जातात. त्यामुळे लाकडाचा काळा बाजार असंभवनीय वाटते. त्यामुळे पालिका कंत्राटदार आणि अधिकारी यांचेमध्ये साटेलोटे असू शकत नाही. कारण मुंबईत गॅसचे जाळे आहे. अगदी नगण्य मुंबईकर स्वयंपाकसाठी लाकडे वापरतात. – हरिष बडेकर, मुंबई

समाजानेच वृक्षांचे संरक्षण करावे
काहीजणांसाठी मुंबईत झाडांची अडचण झाली आहे. काही महाभाग झाड मेले पाहीजे, त्यासाठी इंजेक्शनसारखा वापर करतात. आधीच ग्लोबल वार्मिगने सर्वत्र हाहाकार उडवलाय. राज्यात पाणीटंचाईचे संकट आहे. पाऊस नसेल तर काय होईल, याची कल्पना तुम्हा-आम्हा सर्वाना आहे. त्यामुळे या महाभागांवर करडी नजर ठेवल्यास वृक्ष तोडणी आटोक्यात येईल. अशा लोकांवर कठोर कारवाई करावी. काही झाडांच्या फांद्या छाटतांना पूर्ण झाड तोडतात. झाडांच्या वाढलेल्या फांद्यामुळेही त्यांच्या वजनानेही झाडे उन्मळून पडतात. अशांकडे निदान सामाजिक संस्थांनी व समाजसेवकांनी गांभिर्याने बघून झाडांचे संरक्षण करावे. – सुभाष वाघवणकर, जोगेश्वरी

वृक्ष जगवा मोहीम राबवावी!
वाहतुकीची नाहक कारणे दाखवून पालिका प्रशासन वृक्ष छाटणीसाठी कंत्राटदारांची नियुक्ती करते. कंत्राटदार आणि पालिका अधिकारी यांच्या अभद्र युतीमुळे डेरेदार वृक्षावर कुऱ्हाडीचा वार होत आहे. झाडे छाटण्यामागे फक्त लाकडापासून मिळणारा पैसाच कारणीभूत आहे. कंत्राटदारांबरोबर संगनमत करून आज डेरेदार वृक्ष बोडके केले जात आहेत. त्यामुळे  परिसराचे सुंदरपण हरवत आहे. आज एक झाड तोडले तर दहा रोपे लावण्याची इच्छा कुणाकडे नाही. मग झाडे तोडण्याचा, छाटण्याचा अधिकारी कुणी दिला! त्यामुळे महापालिकेने आता वृक्ष लावा, वृक्ष जगवा आणि पर्यावरणाचा ऱ्हास थांबवा ही मोहीम राबवावी, ही कळकळीची विनंती. – शिवदास शिरोडकर, लालबाग


पाणीटंचाईवर मात करण्यासाठी मोहिमेची आवश्यकता आहे का?

मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांमधील पाणी आटत चालले असून पावसाचाही अद्याप पत्ता नसल्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागत आहे. मुंबईत २००९मध्ये आलेल्या पाणीटंचाईनंतर पुन्हा एकदा मुंबईत पाणीटंचाई निर्माण होत आहे. मात्र, पहिल्या संकटानंतरही महापालिकेचे पालथ्या घडावरच पाणी आहे. मुंबईकरांवर २० टक्के कपात लागू केल्यामुळे मुंबईकरांना कमी प्रमाणात पाणी वापरण्याची सवय लागेल, पाण्याची बचत होईल, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात मुंबईकर पाण्याची बचत करण्यासाठी दक्ष आहेत का? पाण्याचे नियोजन करण्यात महापालिका अपयशी ठरली आहे का? पाऊस पडताच मुंबईकर पाण्याचे महत्त्व विसरून जात आहेत का? पावसाच्या पाण्याची साठवण, सांडपाण्यावरील प्रक्रिया, समुद्राचे पाणी गोड करणे आदी प्रकल्प योग्य वाटतात का? विहिरी ताब्यात घेऊन त्यांचे पाणी लोकांना उपलब्ध करून दिले जावे का? मुंबईकरांनी भविष्यातील धोका ओळखून कशाप्रकारे पाण्याचा वापर करायला हवा

याबद्दल वाचकांनी आपली मते शुक्रवारपर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत.

प्रहार, वन इंडियाबुल्स सेंटर, नववा मजला,

ज्युपिटर मिल्स कंपाउंड,

लोअर परळ, मुंबई – ४०००१३,

फॅक्स : ०२२-४०९६९९००. ०२२- ६१२३९९६६

शब्दमर्यादा : १०० ते १५० शब्द. पाकिटावर ‘वाचकांचे व्यासपीठ’ असा आवर्जून उल्लेख करावा.

आपली मते तुम्ही vyasapith@gmail.com  या ई-मेल आयडीवरही पाठवू शकता.

‘वाचकांचे व्यासपीठ’ ऑनलाइन

ऑनलाइन पत्र लिहा vyasapith@gmail.com वर तसेच ‘प्रहार’च्या संकेतस्थळावर किंवा प्रहारच्या फेसबुक पेजवरही मत नोंदवू शकता.

त्यासाठी लॉग इन करा www.prahaar.in किंवा www.facebook.com/prahaar.in

शब्दमर्यादा १०० ते १५० पर्यंत

2 COMMENTS

  1. जर आपण आपल्या आसपास वृक्ष तोड होताना पाहिले तर कुठे complaint करू शकतो. आता नव्याने पुणे महानगरपालिका मध्ये समाविष्ट होत असणार्‍या गावां मध्ये वृक्ष तोडीचे प्रमाण खूप आहे. कालच आमच्या शेजारी असलेले वीस वर्षे जूने बोरीचे झाड बिल्डर ने तोडले

  2. नालासोपारा पश्चिम ५८ मध्ये पटेल काँप्लेक्स जवळ शुपारॕक मैदान आहे मैदानाच्या ४ बाजूला अशोकाची झाडे आहेत २ झाडे विनाकारण व परवानगी शिवाय महानगर पालिका यांनी मुळातुंन काढून टाकली फोटो काढले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version