Home एक्सक्लूसीव्ह शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास होणार कूल कूल

शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास होणार कूल कूल

1

मुंबईतील शाळकरी मुलांना आता वातानुकूलित बसमधूनही प्रवास करताना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत.

मुंबई- मुंबईतील शाळकरी मुलांना आता वातानुकूलित बसमधूनही प्रवास करताना जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत. विद्यार्थ्यांना बेस्टच्या साध्या बसमधून सवलतीच्या दरात बसभाडे आकारले जाते, त्याचप्रमाणे त्यांना वातानुकूलित बसमधूनही निम्म्या दरात प्रवास करता येणार आहे. बेस्ट समितीने घेतलेल्या निर्णयानंतर महापालिकेच्या सभागृहातही याला मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे १३ वर्षाखालील सर्वच शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास आता कूल कूल होणार आहे.

बेस्टने १९९८ पासून मुंबईत वातानुकूलित बसगाडया सुरू केल्या. रस्त्यांवरील खासगी वाहनांचे वाढलेले प्रमाण नियंत्रणात आणण्यासाठी बेस्टने २३ बस मार्गावर वातानुकूलित बससेवा सुरू केली. परंतु ही सर्व तोटयात असून प्रवाशांचा प्रतिसाद वाढवण्यासाठी कर्मचारी व अधिका-यांकडून सूचना मागवण्यात आल्या होत्या.

त्यामध्ये वातानुकूलित बस मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी मुलांना सवलतीच्या प्रवासभाडयाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. त्यामुळे १३ वर्षाखालील मुलांना सवलतीचे प्रवासभाडे आकारण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. त्याबाबत प्रस्ताव बेस्ट समितीत मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर महापालिका सभागृहात या प्रस्तावाला सोमवारी मान्यता देण्यात आली.

1 COMMENT

  1. वातानुकूलित बस मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी मुलांना सवलतीचे प्रवासभाडे आकारण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घेतला आहे. याबद्दल अभिनंदन ! अशीच सुविधा जेष्ठ नागरिकांना देण्याचा निर्णय बेस्ट उपक्रमाने घ्यावा म्हणजे जेष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर होईल व बेस्टला प्रवाशी संख्या मिळेल .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version