Home महामुंबई शाळा परिसरात सर्रास होतेय धुम्रमान

शाळा परिसरात सर्रास होतेय धुम्रमान

0

अविचारी वय, जाहिरात माध्यमांचा प्रभाव, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सहजपणे होणारी तंबाखुजन्य पदार्थाची विक्री आणि एकदा चव घेण्याचा मोह या कारणांमुळे  गुटखा, पानमसाला व सिगारेटच्या व्यसनाचे प्रमाण वाढल्याचे एका स्वयंसेवी संस्थेला आढळले आहे.

मुंबई- अविचारी वय, जाहिरात माध्यमांचा प्रभाव, शैक्षणिक संस्थांच्या परिसरात सहजपणे होणारी तंबाखुजन्य पदार्थाची विक्री, संगतीचा परिणाम व एकदा चव घेण्याचा मोह आदी कारणांमुळे १० ते १६ वयोगटातील शाळकरी मुलांमध्ये तंबाखू, गुटखा, पानमसाला व सिगारेटच्या व्यसनाचे प्रमाण वाढल्याचे एका स्वयंसेवी संस्थेला आढळले आहे.

तर, कोवळ्या वयात अशा व्यसनांच्या आहारी गेल्यामुळे वयाच्या तिशीत व पस्तीशीतील कॅन्सर पेशंटच्या संख्येत वाढ झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञ डॉक्टरांनी नोंदवले आहे.

शाळांच्या शंभर मीटर परिसरात तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीस बंदी आहे. तरीही अनेक शाळा व कॉलेजांच्या परिसरात तंबाखू व सिगारेटची सर्रास विक्री सुरू आहे.

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांमध्ये तंबाखुमुक्तीची मोहीम राबवणाऱ्या ‘प्रिव्हेंट अ‍ॅडिक्शन थ्रू चिल्ड्रन्स एज्युकेशन’ (पेस) या संस्थेने आधी पुण्यातील शाळांमध्ये जाऊन जनजागृती मोहीम सुरू केली.

आता मुंबईतही ही मोहीम राबवली जात असून कुर्ला परिसरातील शाळांपासून तिला सुरुवात झाली आहे. खासकरून सातवी ते दहावीर्पयच्या विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती केली जात आहे. त्यांना तंबाखूच्या दुष्परिणामांची जाणीव करून दिली जात आहे. या मोहिमेदरम्यान, अनेक विद्यार्थ्यांना तंबाखुजन्य पदार्थाचे व्यसन लागल्याचे आढळले.

गरीब-मध्यमवर्गीय विद्यार्थ्यांना तंबाखू, गुटखा, सुगंधी पानमसाला यांचे तर उच्च मध्यमवर्गीय आणि श्रीमंत शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये सिगारेटचे व्यसन मोठया प्रमाणावर असल्याचे निदर्शनास आले. त्यामागे मित्रांची संगत तसेच तंबाखुजन्य पदार्थाची सहजपणे उपलब्धता ही कारणे आहेत, असे निरीक्षण ‘पेस’ने नोंदवले आहे.

शाळकरी मुले सुरुवातीला सहजपणे गंमत म्हणून याकडे वळतात. नंतर, व्यसने ही त्यांची गरज होते. कालांतराने हे विद्यार्थी व्यसनांच्या पूर्णपणे आहारी जातात. ‘इंटरनॅशनल टोबॅको कंट्रोल पॉलिसी इव्हॅल्युएशन प्रोजेक्ट’ अंतर्गत मध्यंतरी एक अहवाल प्रसिद्ध झाला होता.

एकदा तंबाखू किंवा सिगारेटचे व्यसन लागले तर ७२ ते ९४ टक्के व्यक्ती तंबाखू सोडण्यास तयार नसतात, असे त्यात नमूद होते. या पार्श्वभूमीवर ही मोहीम अधिक तीव्र करण्याचा पेसचा विचार आहे. धुम्रपान व तंबाखूच्या व्यसनांपासून विद्यार्थ्यांचे रक्षण करण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. कोवळ्या वयात तंबाखूचे व्यसन जडल्यामुळे ३० ते ३५ वयोगटातील युवकांना कॅन्सर झाल्याचे आढळून आले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version