Home शिकू आनंदे शाळेच्या सुखद आठवणी

शाळेच्या सुखद आठवणी

1

शाळा म्हटलं की, सगळ्या जुन्या आठवणींना एकदम उजाळा येतो व त्या एका चित्राप्रमाणे डोळ्यांसमोर उभ्या राहतात. आज शालेय शिक्षण पूर्ण होऊन जवळ जवळ १५ ते २० वर्षाचा कालावधी उलटून गेला. तरी आठवणी मात्र अगदी ताज्या वाटतात.

आज आमची शाळा म्हणजे एक सात मजल्यांची विस्तीर्ण, मोठी इमारत आहे. पण मी शाळेत असताना ती बैठीच, अगदी घराप्रमाणे होती. चारी बाजूंनी वर्ग होते व मध्ये भले मोठे प्रशस्त मैदान होते की त्या प्रशस्त मैदानात जेव्हा खेळाचे सामने व्हायचे तेव्हा दोन कब्बडीचे, दोन लंगडीचे, एक खो-खोचा सामना, उंच उडी, गोळा फेक असे सामने व्हायचे. इतके मोठे मैदान असलेली जोगेश्वरीतील माझी बाल विकास विद्यामंदिर ही एकमेव शाळा आहे. त्यात त्या मैदानाच्या चारी बाजूंना वर्ग व मोठी झाडे आहेत. त्यामुळे आम्हाला रोज निरनिराळे पक्षीही पाहायला मिळायचे व बदामाची मोठी झाडे असल्यामुळे बदामही खायला मिळायचे. एकदम गावच्या शाळेसारखी माझी शाळा होती. मैदानात दररोज शाळा भरताना प्रथम प्रार्थना व्हायची व नंतर आम्ही सर्व विद्यार्थी शिस्तीने वर्गात प्रवेश करायचो.

आमच्या शाळेत दर शनिवारी चार तास असायचे त्यात योगा, कवायत, डंबेल्स व लेझिम शिकवले जायचे. त्यात वाद्यांच्या सुरात कवायत व लेझिम हे प्रकार व्हायचे. ते नुसते आठवले तरी मन सुखावून जाते. पण खंत वाटते आता बहुतेक कुठल्याच शाळेत ते दिसत नाही. आमच्या वेळेला मधली सुट्टी झाली की,

वदनि कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे।
सहज हवन होते नाम घेता फुकाचे।
जीवन करि जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रम्ह,
उदभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म।  

ही प्रार्थना व्हायची. आजही कामावर जेव्हा मी माझे सहकारी एकत्र जेवण्यास बसलो तरी मला त्या प्रार्थनेची आवर्जून आठवण येते.
शाळेतील खेळाचे सामने असो वा इतर सांस्कृतिक कार्यक्रम, त्यातील मजा व आनंद काही औरच असतो. मीही एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पोवाडय़ात भाग घेतला होता. त्यासाठी लागणारे मावळ्यांचे कपडे व तलवार मिळवताना आमच्या घरच्यांचा अगदी दम निघाला होता. पण माझ्या आईने ते आणले व थोडे कमी करून मला दिले. मग मी पोवाडय़ात भाग घेतला. तो आनंदाचा क्षण मला अजूनही आठवतो. आजही तीच परंपरा आमच्या शाळेनी जपली आहे.

आमच्या शाळेत मुख्याध्यापकांचा एक वेगळाच धाक व शिस्त होती. विद्यार्थी त्यांना शाळेबाहेरही तेवढेच घाबरत होते. तसे आमचे सर्वच शिक्षक विद्यार्थ्यांशी प्रेमाने वागत. जर मस्ती केली व अभ्यास केला नाही तर शिक्षाही करत असत. ती त्यांची एक जबाबदारी होती. कारण याच त्यांच्या शिस्त व कर्तव्यातून उद्याचा एक चांगला नागरिक तयार होणार असतो. सगळेच शिक्षक तत्परतेने व जाणीवपूर्वक विद्यार्थ्यांसाठी करत असतात. त्यात आमचे इंग्रजीचे जाधव सर जरा वेगळेच होते. ते प्रत्येक विद्यार्थ्यांशी मैत्रीपूर्वक वागत. स्वत:हून त्याची चौकशी करत. त्यांना अभ्यासात मदत करत. कधी त्यांच्या तासाला ते एखादी छानशी गोष्टही सांगत. त्यामुळे सगळे विद्यार्थी ताजेतवाने होत असत. आमच्या सगळ्याच विद्यार्थ्यांना आमच्या शिक्षकांबद्दल मान-सन्मान होता व तो आम्ही आजही राखला आहे. आमच्या जवळपास राहणारे शिक्षक आजही भेटले व त्यांची आमची बोलचाल झाली व त्यांना आमची प्रगती कळल्यावर ते आवर्जून म्हणतात. आम्ही शिकविले व तुम्ही शिकलात. म्हणून तुम्ही एवढे मोठे झालात. त्यांनाही आपल्या विद्यार्थ्यांबद्दल आपुलकी व अभिमान वाटतो.

आज आमचे शालेय शिक्षण पूर्ण होऊन १५ ते २० वर्षे उलटली. पण शाळेतल्या आठवणी तशाच आहेत. कारण आपल्या मुलाला एखाद्या प्रसंगावरून जरी एखादी गोष्ट सांगायची झाली की परत त्या आठवणी ताज्या होतात. म्हणून माणूस कितीही मोठा झाला तरी शाळा व शाळेच्या आठवणी तशाच राहतात. त्या विसरता येत नाहीत व त्या सुखद आठवणी कधीही विसरूही नयेत.

1 COMMENT

  1. जवानी का लालच देकर बचपन छीना
    दौलत का लालच देकर जवानी छिनी
    वो क्या दिन हे जो बचपन मे जिये
    जिंदगी के सबसे हसीन पाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version