Home महामुंबई शिवाजी मंडईतील कार्यालये वा-यावर

शिवाजी मंडईतील कार्यालये वा-यावर

0

फलटण रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मंडई इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर करत येथील कार्यालये त्वरित रिकामी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नोटिस बजावली.

मुंबई – फलटण रोडवरील छत्रपती शिवाजी महाराज मंडई इमारत अतिधोकादायक म्हणून जाहीर करत येथील कार्यालये त्वरित रिकामी करण्यासाठी महापालिका प्रशासनाने नोटिस बजावली. मात्र येथील सर्व कार्यालयांची व्यवस्था मालमत्ता विभागातर्फे करणे आवश्यक असतानाही, प्रशासनाने सर्व खात्यांच्या प्रमुखांना बोलावून त्यांनीच आपल्या कार्यालयांची व्यवस्था करावी, असा फतवा जारी केला आहे.

अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी हा फतवा जारी करताना शनिवापर्यंतची मुदत दिली असून, जर या खातेप्रमुखांनी आपल्या कार्यालयांची व्यवस्था केली नाही तर त्यादिवशीच या इमारतीचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित केला जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

फलटण रोड येथील छत्रपती शिवाजी मंडईची इमारत महापालिकेने धोकादायक म्हणून जाहीर केली आहे. या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर परवाना विभाग, जकात वसुली कार्यालय, घनकचरा विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय, महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षकांचे कार्यालय, बँक, उपाहारगृह आदी असून, त्यांची दूरवस्था झाली आहे.

महापालिकेने या सर्व कार्यालयांमध्ये सध्या टेकूचा आधार दिला आहे. या टेकूच्या आधाराखाली कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहेत. येथील ५०हून अधिक अशा विविध विभागांच्या कार्यालयांमध्ये सुमारे ६००हून कर्मचारी आहेत. मात्र डॉकयार्ड रोड इमारत दुर्घटनेनंतर ही इमारत त्वरित रिकामी करण्यासाठी नोटिस बजावण्यात आली आहे.

या इमारतीला नोटिस बजावल्यानंतर गुरुवारी अतिरिक्त आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी येथे कार्यालये असलेल्या सर्व कार्यालयांच्या खातेप्रमुखांची बैठक घेऊन त्वरित नव्या जागेचा शोध घेत कार्यालये रिकामी करावीत, अशा सूचना दिल्या. महापालिकेच्या कार्यालयांना स्थलांतर करण्याचे काम हे मालमत्ता विभागाकडे असले तरी या विभागावर जबाबदारी न टाकता संबंधित खात्यांनी आपल्या कार्यालयांची व्यवस्था करून शनिवापर्यंत ती रिकामी करावीत, अशी सूचना देण्यात आली.

त्यामुळे सर्व खात्यांची चांगलीच पंचाईत झाली आहे. या इमारतीत मालमत्ता विभाग असल्यामुळे त्यांनी हिंदू कॉलनीतील जागा पकडून स्वत:ची व्यवस्था केली. मात्र इतरांना आपल्या अन्य इमारती कुठे रिकाम्या आहेत, याचीच माहिती नसल्यामुळे त्यांचा गोंधळ उडाला आहे.

बंद शाळांचा आधार
या इमारतीतून कार्यालये हलवण्यात आल्यामुळे अन्य इमारतींचा शोध घेणे कठीण असल्यामुळे काही कार्यालयांनी बंद पडलेल्या शाळांचा आधार घेण्याचा निर्धार केला आहे. त्यामुळे जिथे शाळा बंद पडलेल्या आहेत, तिथे आपले बस्तान बसवण्याचा निर्णय घेतला असल्याचे काही कार्यालयांच्या खातेप्रमुखांनी सांगितले. शाळांसोबतच इतरही मालमत्तांची माहिती मिळवून त्याला अतिरिक्त आयुक्तांकडून मंजुरी घेत तिथे कार्यालय स्थलांतर केले जाईल, असेही वरिष्ठ अधिका-यांनी स्पष्ट केले.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version