Home किलबिल नवरात्रीचं मराठी वैशिष्टय – भोंडला

नवरात्रीचं मराठी वैशिष्टय – भोंडला

2

उद्यापासून नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीत होणारा गरबा तुम्हाला ठाऊक आहे, परंतु भोंडला हे नवरात्रीचं खास मराठी वैशिष्टय असतं. कदाचित तुमच्यापैकी कित्येकांना हा भोंडला म्हणजे काय हे माहीत नसेल. चला तर मग भोंडला म्हणजे काय, हे जाणून घेऊया

नवरात्र म्हणजे नऊ दिवस देवीची आराधना करण्याचा सण! याचदरम्यान पावसाळा संपत आलेला असतो. पिकं तयार झालेली असतात. सूर्य हस्त नक्षत्रातून प्रवेश करत असतो. पाऊस परत जायची वेळ आली असल्याने ढग मोठयाने आवाज करू लागतात. याला ‘हत्तीचा पाऊस’ असं म्हणतात. म्हणूनच हत्तीचं चित्र काढून घटस्थापनेच्या दिवसापासून संध्याकाळी भोंडला खेळला जातो.

भोंडल्याला ‘हादगा’ किंवा ‘भुलाबाई’ असंही म्हटलं जातं. असं असलं तरीही ‘भोंडला’ हे नाव सर्वपरिचित आहे. हा भोंडला मैदानात, हॉलमध्ये, चौकात किंवा गच्चीत खेळला जातो. त्यासाठी देवी बसवण्याचीही गरज नसते. एका पाटावर मधोमध हत्तीच चित्र काढलं जातं. त्याच्या वर चंद्र आणि सूर्याचीही चित्रं काढली जातात. ही सगळी चित्रं तांदळाने भरली जातात. हा पाट मधोमध ठेवला जातो. भोंडला खेळायला येणारी काही मुलं खाऊचे डबे आणतात. आणलेले खाऊचे डबे त्या पाटाभोवती ठेवले जातात. सगळी मुलं एकमेकांचा हात धरून फेर धरतात.

ऐलमा पैलमा गणेश देवा

माझा खेळ मांडून दे करीन तुझी सेवा

माझा खेळ मांडिला वेशीच्या दारी

पारव घुमतंय पारावरी

या गाण्याने भोंडल्याला सुरुवात होते. एकामागून एक गाणी म्हटली जातात. त्यात सगळ्यांचं आवडतं गाणं म्हणजे,

‘एक लिंबू झेलू बाई, दोन लिंबं झेलू,

दोन लिंबं झेलू बाई, तीन लिंबं झेलू.. ’,

असं पाच लिंबांपर्यंत म्हटलं जातं. त्यामुळे हे गाणं म्हणायला मुलांना खूप मजा येते. अगदी जोरजोरात हे गाणं म्हणतात. या दिवसांत कोथिंबीर पिकत नाही. त्यामुळे

कोथिंबिरी बाई गं

आता कधी येशील गं

आता येईल चैत्र महिन्यात..

असं गाणं म्हटलं जातं किंवा ‘हरीच्या नैवेद्याला केली जिलबी बिघडली..’ , ‘अक्कण माती चिक्कण माती’, ‘श्रीकांता कमलकांता असं कसं झालं.. ’, ‘एके दिवशी काऊ आला बाई काऊ आला..’ अशी काही धमाल गाणीही म्हटली जातात. यातल्या काऊच्या गाण्यात ‘काऊ आला’ असं म्हणत एक पाय पुढे टाकला जातो. त्यामुळे मजा येते.

खरं म्हणजे पूर्वीच्या काळी लग्न झाल्यावर मुलींना परत माहेरी येता यायचं नाही. सणावारांच्या निमित्ताने त्या माहेरी यायच्या. त्या काळी मुलींची लग्नंही लवकर व्हायची. सगळ्या मुली लहान वयातल्या. त्यामुळे त्या माहेरी आल्या की, त्याही या भोंडल्यात भाग घ्यायच्या. म्हणूनच त्यांच्या आवडीची किंवा त्यांच्यासाठी काही खास गाणी असायची. उदाहरणार्थ –

यादवराया राणी रुसून बसली कैसी

सासुरवाशीण सून घरासी येईना कैसी

सासूबाई गेल्या समजवायला

चला चला सूनबाई आपुल्या घराला..

सासूपाठोपाठ हळूहळू सासरे, नणंद, दीर, जाऊ समजवायला येतात आणि शेवटी नवरा येतो तेव्हा कुठे ती त्याच्यासोबत जाते, असं सांगितलं आहे. ही मंडळी येताना तिला नवनवीन भेटवस्तू आणतात. पूर्वी त्यात पाटल्या, बांगडया, साडी.. अशी वस्तूंची नावं असायची. पण हल्लीची मुलं इतकी हुशार झाली आहेत की, त्यात काळानुरूप बदल करून फ्रिज, वॉशिंग मशीन, एलइडी, ओव्हन.. अशा सगळ्या महागडया किंवा इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची नावं घेतात. त्यामुळे त्यातलं कोणाला काय सुचतंय हे महत्त्वाचं. मुळात पूर्वी हा भोंडला केवळ मुलीच खेळायच्या. आता मात्र त्यात मुलंही सहभागी होऊ लागली आहेत.

अशी सगळी गाणी झाली की, शेवटच्या गाण्याने भोंडल्याची सांगता केली जाते.

आड बाई अडोळी

आडाचं पाणी कडोळी

आडात पडला अडकित्ता

आमचा भोंडला अत्ता

असं म्हणत आडात सुपारी, कात्री आणि शिंपला पडतो आणि दुपारी, रात्री म्हणत भोंडला संपतो. मग ज्यांचा खाऊ असतो ती मुलं किंवा मुली मधे येतात. बाकीचे सगळे आजूबाजूला बसतात. त्यांचा खाऊ ओळखायचा असतो. तिखट की गोड, अशी विचारणा होते. एकेक पदार्थाची नावं घेत खिरापत ओळखायची चढाओढ सुरू होते. काही काही ठिकाणी पहिल्या दिवशी एकच खाऊ असतो. दुस-या दिवशी दोन, तिसऱ्या दिवशी तीन.. असं करत करत शेवटच्या दिवशी भरपूर मुलांकडे खाऊ असतात. जो मुलगा बरोबर खाऊ ओळखतो त्याच्यापासून ती खिरापत वाटायला सुरुवात केली जाते.

हल्ली हा खेळताना फारसं कुणी दिसत नाही. केवळ काही सार्वजनिक ठिकाणी जिथे नवरात्रोत्सव असतो तिथे दुपारच्या वेळेत भोंडला घेतला जातो. कोणीतरी एक गाणी म्हणतं आणि मुलं फेर धरतात. मुलांनी यावं, त्यांना भोंडला म्हणजे काय हे कळावं यासाठी फॅन्सी ड्रेस भोंडला घेतला जातो.

मग काय या वर्षी तुम्हीही खेळणार ना भोंडला!

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version