Home संपादकीय अग्रलेख शौर्यदिनाला हिंसाचाराचे गालबोट

शौर्यदिनाला हिंसाचाराचे गालबोट

1

१ जानेवारीला नववर्षाच्या स्वागताबरोबरच पुणे-नगर रस्त्यावरील भीमा-कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी हजारो नागरिक उपस्थित असतात. गेली दोनशे वर्षे हा शिरस्ता पाळण्यात येत आहे. मात्र यंदा या कार्यक्रमाला हिंसाचाराचे गालबोट लागावे आणि त्यात एका युवकाचा मृत्यू व्हावा हे शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा सांगणा-या पुरोगामी महाराष्ट्राला निश्चितच भूषणावह नाही. हे कसले शौर्य, हे तर क्रौर्यच!

या घटनेचा निषेध करावा, तेवढा कमीच आहे. हा हिंसाचार निश्चितच पूर्वनियोजित होता, असे म्हणण्यास बराच वाव आहे. कारण दोन गटात झालेल्या वादाचे पर्यवसान हिंसाचारात झाले. या शौर्यदिनाला पार्श्वभूमी अशी आहे की ब्रिटिशकाळात पेशवे आणि ब्रिटिशांमध्ये झालेल्या लढाईत त्या काळी ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली असलेल्या महार बटालियनने महत्त्वाची भूमिका बजावून पेशव्यांच्या सैन्याचा १ जानेवारी १८१८ रोजी पराभव केला होता. महार बटालियनच्या या शौर्याला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी न चुकता विविध संघटना आणि आंबेडकरी जनता ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री भीमा-कोरेगावला येऊन तेथील शौर्यस्तंभाला अभिवादन करते. यंदा त्या शौर्यदिनाची द्विशतकपूर्ती होती. त्यामुळे येथे मोठी गर्दी होणार हे निश्चित होते. मात्र विजयस्तंभाला मानवंदना करून जनता परतीच्या मार्गाला लागते हे दरवर्षीचे चित्र असल्याने बंदोबस्ताच्या बाबतीत पोलिसांकडून काही प्रमाणात ढिलाई झाली. त्याचाच फायदा समाजविघातक शक्तींनी उठवला आणि या कार्यक्रमात हिंसाचार घडवून आणला. कोणतीही दंगल घडली की ती शांत होण्यासाठी लोकांनी प्रयत्न करायला हवेत, परंतु हाती असलेल्या साधन-सुविधांचा आता समाजात तेढ निर्माण करण्यासाठी गौरवापर होतो आहे. आगीत तेल ओतण्यासारखा हा प्रकार आहे. येथे सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवा पसरवून समाज विघातक शक्तींनी आपला कार्यभाग साधला. सोशल मीडियाच्या वापरकर्त्यांना आपण काय करतो याचे भान राहलेले नाही. समाजस्वास्थ्यासाठी हे भान राखणे महत्त्वाचे आहे. दोन गटात झालेल्या वादाचे परिणाम अशा सार्वजनिक ठिकाणी उमटावेत हे निश्चतच महाराष्ट्रासाठी भूषणावह नाही. भीमा कोरेगाव, सणसवाडी परिसरातील दगडफेक आणि जाळपोळीच्या घटनेचे पडसाद मंगळवारीही राज्यभरात उमटले. मुंबई, ठाणे, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद अशा विविध शहरांमध्ये या घटनेचा निषेध करण्यात आला. सोमवारी नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभाला मानवंदनेचा कार्यक्रम सुरूअसतानाच सणसवाडीत रस्त्यांवरील वाहनांवर अज्ञातांनी दगडफेक केली. या दगडफेकीत काही जण गंभीर जखमी झाले होते. यानंतर पोलीस आणि राज्य राखीव दलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आता सणसवाडीत तणावपूर्ण शांतता असली तरी या घटनेचे पडसाद राज्याच्या सर्वच भागात अजूनही उमटत आहेत. भीमा कोरेगावातील हिंसाचाराच्या निषेधार्थ आंदोलक मुंबईतील चेंबूर रेल्वे स्थानकात रुळावर उतरले होते. त्यामुळे हार्बर रेल्वेसेवा ठप्प झाली आहे. चेंबूर, गोवंडी आणि मुलुंडमधील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. औरंगाबाद शहर आणि ग्रामीण भागात तणावपूर्ण शांतता असून शहरातील पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. पोलिसांनी शहरात जमावबंदीचे आदेशही लागू केले आहेत. या हिंसाचार प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई हायकोर्टाच्या विद्यमान न्यायमूर्तीमार्फत या प्रकरणाची चौकशी केली जाणार आहे. तसेच सोशल मीडियावरून अफवा पसरवणा-यांवरही कठोर कारवाई केली जाणार आहे. समाजकंटकांचा आणि सोशल मीडियाचा वापर करणा-यांचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत त्यांचे डाव उधळून लावले, म्हणूनच परिस्थिती नियंत्रणाखाली राहिली. सोशल मीडिया हा आता संसर्गजन्य रोग होत आहे. त्याला वेळीच अटकाव करण्याची गरज आहे, हे या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. या राज्याला छत्रपती शिवाजी महाराज, शाहू-फुले-आंबेडकर यांचा वारसा लाभला आहे. अशा महान विभूतींनी समाजातील जातीभेद गाडून मानवतेचा धर्म पाळण्याची शिकवण दिली. मात्र त्याच महाराष्ट्रात अफवांवर विश्वास ठेवून लोक दंगे-धोपे घडवून आणतात हे योग्य नाही. समाजात एकाने एक कृत्य केले, की सर्वजण त्याच्याच पावलावर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतात. कोणी एकाने दगड फेकला की दुसरा त्याची रि ओढतो. त्यातून पळापळ होते, चेंगराचेंगरी होते. त्याचे दूरगामी परिणाम होतात, तसे भीमा कोरेगाव प्रकरणी झाले आहे. शौर्यदिनी विजयस्तंभाला अभिवादन करण्याचा, मानवंदना देण्याचा कार्यक्रम गेली दोनशे वर्षे चालू आहे. त्याचा काल झालेल्या हिंसक घटनेशी दुरान्वयेही संबंध नाही. तसे असते तर दोनशे वर्षात एकदा तरी काही विपरीत घडले असते. मात्र या द्विशतकपूर्ती कार्यक्रमात हिंसाचार घडावा हा समाजकंटकांचा हेतू होता, तो साध्य झाला आहे. या घटनेच्या निषेधार्थ लोकांनीही दगडफेक करावी, जाळपोळ करावी म्हणजे समाजकंटकांच्या कृत्यांना खतपाणी घालण्यासारखे आहे. त्यातून हिंसाचाराचा वणवा अधिक भडकत जाईल. आपण सुजाण नागरिक आहोत. योग्य-अयोग्य आपणाला कळते म्हणून लोकांना शांत करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. ते स्वत:पासून आणि आपल्या घरापासून केले पाहिजे, तरच सामाजिक शांतता नांदेल. सामाजिक शांतता निर्माण झाली म्हणजे या प्रकरणाशी संबंधित असलेल्यांवर कारवाई करणे पोलिसांनाही शक्य होईल. जमावाला शांत करण्यात पोलीस गुंतले तर समाजकंटकांचे फावते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या प्रकरणाची नुसती पोलीस चौकशी नव्हे, तर न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मुख्य म्हणजे सोशल मीडियावरून अफवा पसरवणा-यांवर कारवाई करण्याचे त्यांनी जाहीर केले आहे. समाजातील अन्य राजकीय, सामजिक नेत्यांनीही जनतेच्या भावना भडकणार नाहीत याची काळजी घेऊन राज्याची संपूर्ण परिस्थिती पूर्वपदावर कशी येईल, ही जबाबदारी घेण्याची गरज आहे. त्यामुळे डोक्यात राख घालून थयथयाट करण्यापेक्षा, शांततापूर्ण मार्गाने भीमा कोरेगाव येथील हिंसक घटनेचा निषेध नोंदवणे समाजहिताचे ठरेल.

1 COMMENT

  1. Nagrikana mansik ani sharik tyas dewun aandolankartya netyane Kay Sadhya kele aahe?. Vahananchi todfod Karun aarthik jhalele aarthik nuksan bandchi half denarya netyane Karun sarkarne basil Karachi.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version