Home टॉप स्टोरी संसदेत ‘काँग्रेसमुक्त विदर्भ’

संसदेत ‘काँग्रेसमुक्त विदर्भ’

0

राज्यातून राज्यसभेवर निवडून द्यायच्या ६ आणि विधान परिषदेच्या १० जागांची निवडणूक वेगळ्याच कारणाने गाजत आहे. या निवडणुकांमध्ये सा-याच राजकीय पक्षांनी केलेले तिकीटवाटप धक्के देऊन गेले.

मीडियासम्राट विजय दर्डा आणि राष्ट्रीय सचिव अविनाश पांडे हे काँग्रेसचे राज्यसभा सदस्य निवृत्त होत आहेत. दर्डा गेली १८ वर्षे राज्यसभेवर होते. पांडे यांची पहिलीच टर्म होती. दोघांचाही पत्ता काटला. त्या ऐवजी ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांची वर्णी लागली. चिदंबरम हे तामिळनाडूचे आहेत. तिथे काँग्रेस औषधालाही शिल्लक नाही. मग कुणाला निवडून आणण्याची गोष्टच वेगळी. म्हणून चिदंबरम यांची महाराष्ट्रातून वर्णी लावण्यात आली. राज्यसभेत सुब्रमण्यम स्वामी या सारख्या बडबडय़ा माणसाला रोखण्यासाठी अभ्यासू नेत्याची गरज होती. काँग्रेसने ती पूर्ण केली. काँग्रेसची सोय झाली. मात्र संसदेतले विदर्भाचे अस्तित्व पूर्णपणे पुसले गेले आहे. नरेंद्र मोदी हा देश काँग्रेसमुक्त करू इच्छितात. ते त्यांना शक्य नाही. संसदेत मात्र विदर्भ कॉंग्रससमुक्त झाला आहे.

विदर्भात लोकसभेच्या १० जागा आहेत. लोकसभा निवडणुकीत आलेल्या मोदी लाटेत दहाच्या दहा जागा भाजपा-सेना युतीला मिळाल्या. लोकसभेत विदर्भातून आता काँग्रेसचे कुणीही नाही. राज्यसभेत विजय दर्डा आणि अविनाश पांडे होते. तेही गेले. एकेकाळी एन. के. पी. साळवे, बापूसाहेब साठे, मुकुल वासनिक, विलास मुत्तेमवार, शांताराम पोटदुखे या सारखे एक से एक दिग्गज विदर्भाची शान वाढवत होते. इंदिरा गांधींवर विदर्भाने जीवापाड प्रेम केले. आणीबाणीनंतरच्या पराभवानंतर विदर्भानेच त्यांना नव्याने लढण्याची उर्जा दिली. काँग्रेसच्या नावाने दगडही निवडून येत असे. आता चिदंबरम आले, तसे फार पूर्वी पी. व्ही. नरसिंहराव आंध्रातून रामटेकमध्ये आले होते. रावसाहेबांना सुरक्षित मतदारसंघ हवा होता. इंदिराजींनी त्यांना रामटेकमध्ये पाठवून दिले. रामटेकच्या जनतेने एकदा नव्हे तर दोनदा निवडून दिले. पुढे ते पंतप्रधान झाले. त्या विदर्भात काँग्रेस आज औषधापुरती उरली आहे. विधानसभेतही काँग्रेसचे हाल आहेत. एकूण ६२ जागांपैकी काँग्रेसचे फक्त १० आमदार आहेत. राष्ट्रवादीचा तर फक्त एक आमदार आहे. एकेकाळी काँग्रेसचा किल्ला राहिलेल्या नागपुरात तर कॉंगेस हद्दपार आहे. महापालिका, जिल्हा परिषद गेली १० वर्षे भाजपाच्या ताब्यात आहे. श्रेष्ठींनी विदर्भाला गृहीत धरल्याने आजची परिस्थिती निर्माण झाली. भाजपाचीही काँग्रेस व्हायला सुरुवात झाली आहे. काँग्रेसने केलेल्या चुका आजचा सत्ताधारी भाजपा करतो आहे.

सत्तेत आल्याला अवघी दोन वर्षे होत असताना,‘घरची म्हणते देवा देवा, बाहेरचीला चोळी शिवा.’ विधान परिषदेच्या सात जागांपैकी ५ जागा भाजपाने उप-यांना दिल्या आहेत. त्यामुळे ‘पार्टी विथ डिफरन्स’ म्हणवणा-या भाजपाच्या निष्ठावंतांमध्ये खदखद आहे. पहिल्यांदा देशात भाजपाची सत्ता आली तेव्हा लालकृष्ण अडवाणी पंतप्रधान होणे निश्चित होते. पण ऐनवेळी अटलबिहारी वाजपेयी पुढे आले तेव्हा ‘यांच्यासाठी आम्ही खस्ता खाल्ल्या नव्हत्या’अशी जबरदस्त प्रतिक्रिया संघ स्वयंसेवकांमध्ये उमटली. पुढे अडवाणींना उपपंतप्रधान करावे लागले. बाहेरून आलेल्यांना तिकिटे देण्याची गरज होती का? असा प्रश्न सध्या निष्ठावंतांना पडला आहे. पण सत्तेची धुंदी चढलेले नेते कुणाचे ऐकायच्या मनस्थितीत नाहीत. सामाजिक आणि जातीय समीकरणे जुळवण्याच्या नावाखाली तिकिटे वाटली गेली. यामुळे भाजपाचे संख्याबळ वाढेलही. पण पक्ष वाढेल का? ‘संघाचा निर्णय’ ह्या नावाखाली हा सारा गोरखधंदा खपवला जातो आहे. माधव भंडारी, केशव उपाध्ये गळाले. काँग्रेस सोडून आलेले विदर्भातले दोन दिग्गज बनवारीलाल पुरोहित, दत्ता मेघे भाजपामध्ये फुकट दळण दळत आहेत. यांच्यापैकी एकाला राज्यसभेवर पाठवले जाईल, असा अंदाज होता. दत्ताभौंना राज्यपाल म्हणून पाठवले जाणार असल्याची हवा बरीच जुनी आहे. प्रसिद्ध डॉक्टर विलास डांगरे हे तर जुने संघनिष्ठ. एकेकाळी त्यांचे नाव लोकसभेसाठी चर्चिले जायचे. डोळ्यांचा त्रास काय झाला, संघाने त्यांना बाजूला टाकले. वापरून झालेल्यांना खडय़ासारखे फेकून द्यायचे ही संघाची कामाची पद्धत आहे. सध्याच्या तिकीटवाटपात ती दिसते आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सांगण्यावरून तिकिटे वाटली गेली हे उघड दिसते. ‘आपणही निवडणुका जिंकून देऊ शकतो’ हे देवेंद्र फडणवीस यांना हायकमांडला दाखवून द्यायचे आहे. त्यातूनच त्यांनी अतिशय आक्रमकपणे पक्षाला आखाडय़ात उतरवले आहे.

राजकारणाचा गंध नसलेल्या, भाजपाचा मेंबर नसलेल्या नागपूरच्या पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन मुख्यमंत्र्यांनी सर्वाना आश्चर्याचा धक्का दिला. सव्वा कोटी धनगरांना आणखी जवळ आणण्यासाठी ही खेळी खेळली गेली हे उघड आहे. राष्ट्रीय समाज पक्ष हा भाजपाचा मित्रपक्ष. ह्या पक्षाचे नेते महादेवराव जानकर हे धनगर समाजाचे नेते मानले जातात. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जानकर भाजपाच्या सोबत होते. पण कबूल करूनही मंत्रिपद न दिल्याने त्यांनी आपली नाराजी वेळोवेळी बोलून दाखवली आहे. जानकर वेगळे झाले तर एखादा धनगर नेता शिदोरीला असावा, ह्या हिशोबाने महात्मे यांना ‘नवरदेव’ बनवले आहे. वैद्यकीय क्षेत्र सोडले तर महात्मे हे नाव विदर्भाला फारसे परिचित नव्हते. तीन वर्षापूर्वी त्यांनी नागपूर विधानसभेवर धनगरांचा जंगी मोर्चा काढला आणि ते एकदम प्रकाशझोतात आले. हेतू काहीही असला तरी, भाजपाला या बाबतीत मानले पाहिजे. कल्पना करा. आज काँग्रेसने या जागेसाठी कुणाला तिकीट दिले असते? महात्मे यांना राज्यसभेत पाठवून भाजपने सव्वा कोटी धनगर खिशात टाकले आहेत. ५९ वर्षे वयाच्या ह्या डोळ्यांच्या सर्जनने आतापर्यंत १ लाख ८० हजार शस्त्रक्रिया केल्या. यातल्या ८० हजार शस्त्रक्रिया मोफत केल्या आहेत. गरिबांकडून ते पैसा घेत नाहीत, अशी प्रसिद्धी आहे. त्यांच्या रूपाने, गेल्या ६८ वर्षात प्रथमच धनगर समाजाचा नेता राज्यसभेत बसतो आहे. भाजपावाले धनगर समाजाला आरक्षण मिळवून देतील, ह्या विश्वासाने हा साधूडॉक्टर राजकारणात कुदला आहे. धनगरांचे काय व्हायचे ते होवो, भाजपाने आपला मतलब साधला आहे. ‘धनगरांना आरक्षण मिळाले नाही तर खासदारकीचा राजीनामा देईन’ असे महात्मे यांनी म्हटले आहे. पण उद्याचा काय भरवसा? भाजपा उद्या त्यांचा ‘जानकर’ करणार नाही, याची काय हमी? भाजपाने आतापर्यंत दिलेला कुठला शब्द पाळला? ‘मंदिर वही बनायेंगे’ म्हणाले. आज मंदिराबाबत चकार शब्द बोलायला तयार नाहीत. ‘काळा पैसा परत आणतो’ म्हणाले. आज तोंडाला पट्टी आहे. सत्तेत आलो तर विदर्भ राज्य देऊ असे सांगत नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस फिरले. पण आज आम्ही त्या गावचेच नाही, अशा पद्धतीचे ह्या दोघांचे वागणे आहे. खोटे बोलून भाजपावाले निवडणुका जिंकू शकतील. पण लोकांना कसे जिंकणार?

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version