Home संपादकीय अग्रलेख ‘आमचो दादा इलो रे’

‘आमचो दादा इलो रे’

3

एवंम गुणविशिष्ट श्री. नारायण राणे यांचे पाऊल विधान परिषदेत पडल्यामुळे सरकारी पक्षातले लोक मनातून हादरून गेलेले आहेत. बाहेरून ते तसे दाखवत नाहीत, पण त्यांची देहबोली त्यांना खोटं बोलू देत नाही. श्री. नारायण राणे निवडून आले, त्यांच्यासोबत ९ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, पण चर्चा नारायण राणे यांच्याच विजयाची जास्त आहे आणि ते स्वाभाविक आहे. 

एवंम गुणविशिष्ट श्री. नारायण राणे यांचे पाऊल विधान परिषदेत पडल्यामुळे सरकारी पक्षातले लोक मनातून हादरून गेलेले आहेत. बाहेरून ते तसे दाखवत नाहीत, पण त्यांची देहबोली त्यांना खोटं बोलू देत नाही. श्री. नारायण राणे निवडून आले, त्यांच्यासोबत ९ उमेदवार बिनविरोध निवडून आलेले आहेत, पण चर्चा नारायण राणे यांच्याच विजयाची जास्त आहे आणि ते स्वाभाविक आहे. अजून नारायण राणे यांचा शपथविधी व्हायचा आहे. १८ जुलै रोजी पावसाळी अधिवेशन सुरू व्हायचे आहे त्यापूर्वी महसूल मंत्र्याची विकेट गेल्यात जमा आहे. एकदा का नारायण राणे सभागृहात आले, प्रत्यक्षात कामकाज सुरू झाले की, ‘आगे क्या होता है’ हे त्याचवेळी दिसेल. आजतरी एवढे नक्की की, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनी योग्य उमेदवाराला उमेदवारी दिली. काँग्रेस पक्षउभारणीत सिंहाचा वाटा उचलणा-या नारायण राणे यांच्या उमेदवारीने महाराष्ट्रातल्या काँग्रेसजनांना आनंद झालेला आहे.

‘काँग्रेसची तोफ दणाणणार’

महाराष्ट्र विधान परिषदेतील दहा उमेदवारांच्या बिनविरोध विजयात सर्वात जास्त अभिनंदन कोणी घेतले असेल तर ते नारायण राणे यांनी. जे काँग्रेसचे नाहीत, जे राजकारणात नाहीत, अशा प्रत्येकाची भावना अगदी मोकळया शब्दांत गेले १८ महिने स्पष्टपणे व्यक्त होत होती की, ‘नारायण राणे हे व्यक्तिमत्व विधानमंडळात असायलाच हवे.’ नारायण राणे बिनविरोध निवडून आले. याचा आनंद विधानमंडळात काँग्रेस कार्यकर्त्यांच्या चेह-यावर ओसंडून वाहतच होता. पण त्यावेळी विधानमंडळातील सगळे अधिकारी, सर्व कर्मचारी अगदी चतुर्थ श्रेणीतले शिपाईसुध्दा. (त्यातले बरेचसे कोकणातले आहेत.) ते एकमेकांना टाळी देऊन सांगत होते की, ‘आमचो दादा इलो रे’ विधानमंडळात शुक्रवारी उपस्थित असलेले सर्व पत्रकार – त्यांनी बातम्या उलटसुलट लिहिल्या तरीसुध्दा – नारायण राणे विधानमंडळात आले, याचा आनंद अतिशय मोकळेपणाने व्यक्त करत होते. ठाण्याचे काँग्रेस कार्यकर्ते मोहन तिवारी यांनी तर भलामोठा पेढा नारायण राणे यांच्या तोंडात भरवला आणि उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘आता काँग्रेसची तोफ कशी धडाडते ते बघा..’ सर्वांची भावना हीच होती आणि आहे. विधानसभा आणि विधान परिषदेत केवळ विरोधाकरिता विरोध म्हणून नव्हे, तर सत्ताधारी पक्षाच्या चुकीच्या धोरणांना अभ्यासपूर्ण भाषणाने उघडे पाडणे, सरकारच्या निर्णयातील विसंगती सभागृहात दाखवून देणे, अर्थसंकल्पातील घोषणांचा फोलपणा सिद्ध करणे, कमी तुटीचे बजेट दाखवून वर्षा अखेरीची तूट किती भयानक असते याची किर्द-खतावणी सादर करणे. प्रश्नोत्तराच्या तासाला मंत्र्यांना कोंडीत पकडणे अशी संसदीय पातळीवरील सगळी आयुधं हाताळणारा धुरंधर संसदपटू काँग्रेसने नारायण राणे यांच्यारूपाने दिला, ही भावना आज विधानमंडळात सामुदायिक चर्चेच्या निमित्ताने सुद्धा जागोजागी व्यक्त होत होती. सभापती रामराजे निंबाळकर यांच्या बिनविरोध विजयानंतर त्यांचे अभिनंदन करायला नारायण राणे गेले तेव्हा त्यांच्या उजव्या हाताला राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील तटकरे आणि त्यांच्या पलीकडे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे बसलेले होते. त्या सर्वांसमोर सभापती रामराजे निंबाळकर आडपडदा न ठेवता अगदी मोकळेपणाने सांगून गेले की, ‘विधान परिषदेत आता सगळा फोकस नारायणराव तुमच्यावर असणार.’

आणि भाजपाचे अवलक्षण

राज्यसभा आणि विधान परिषद या महाराष्ट्रातल्या दोन्ही निवडणुका बिनविरोध झाल्या, ही अतिशय आनंदाची बातमी आहे. राज्यसभेसाठी हात वर करून मतदान होत असल्यामुळे तिथे घोडेबाजाराला वाव नाही. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना ही घटनादुरुस्ती केली गेली. ही घटनादुरुस्ती अर्धसत्य होती. विधान परिषदेसाठी हीच तरतूद करण्यात आली असती तर, घोडेबाजार शब्दाची मग गरज पडली नसती. कोणीही कितीही इन्कार केला तरी, विधान परिषदेच्या निवडणुकीत मतांची खरेदीविक्री होते हे स्पष्ट आहे. राज्यसभा ही बिनविरोध झाली हे चांगलेच झाले. सहाच्या सहा उमेदवार बिनविरोध विजयी झाले. भाजपातर्फे पियुष गोयल, विनय सहस्त्रबुध्दे, डॉ. विकास महात्मे हे तीन. काँग्रेसचे पी. चिदंबरम, राष्ट्रवादी तर्फे प्रफुल्ल पटेल, शिवसेनेतर्फे संजय राऊत अशा सहा उमेदवारांना थेट राज्यसभेत जाता आले. विधानपरिषद निवडणुकीत घोडेबाजार होण्याची शक्यता होती. कारण भाजपानेच पुढाकार घेऊन त्यांच्या पाच जागा निवडून येऊ शकत असताना ७ जणांना उमेदवारी दिली. त्यामुळे संभ्रम भाजपाने निर्माण केला. शक्यतो घोडेबाजार करायचा हा त्यांच्याच डावपेचाचा भाग होता. अन्यथा भाजपाकडे फक्त जास्तीची ८ मते असताना कोणत्याही पक्षाने ७ उमेदवार उभं करण्याचे धारिष्ट केलंच नसतं. भाजपाकडे एकूण १४३ मते. पहिल्या पसंतीची किमान २७ मतं पाच जणांना द्यायची तर, १३५ मतं होतात. म्हणजे ८ मतं जास्तीची राहतात. २ जास्तीचे उमेदवार निवडून आणायचे तर, ५४ मतांची गरज आहे. भाजपाजवळ असलेली अतिरिक्त ८ मते वजा केली तर, ४६ मते भाजपा कुठून आणणार होता? मग जास्तीचे दोन उमेदवार उभे करण्याचा अट्टाहास कशाकरीता होता? सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्त्वाला आणि विधानमंडळ भाजपा पक्ष नेतृत्वाला ही खात्री पटली की, आगाऊपणा करून निवडणूक लढवली तर, जे दोन उमेदवार पडतील ते भाजपाचेच पडतील! मग नाक तळापासून कापले गेले असते. आतापर्यंत महाराष्ट्र विधानमंडळात यापूर्वी कधीही सत्ताधारी पक्षाने जास्तीचे उमेदवार उभे करून त्यांची उमेदवारी मागे घेण्याची नाचक्की विधानमंडळ सत्ताधारी पक्षावर ओढवलेली नव्हती. यावेळी प्रथमच ही नाचक्की झाली. शिवाय जे पाच उमेदवार भाजपातर्फे विजयी झाले, ते कोण कोण आहेत? त्यातला शुध्द शाकाहारी भाजपावाला कोण? तर एकटा सुरजसिंग ठाकूर. बाकी सगळे उपरे. विनायक मेटे आणि भाजपा यांचा काय संबंध? आमदारकीसाठी मेटे राष्ट्रवादीच्या तंबूत घुसले होते. १२ वर्ष आमदारकी मिळवली, मग तिथे जमले नाही मग शिवसंग्रामचं नाटक सुरू झालं, आता भाजपाच्या तंबुत घुसले. मेटे यांच्यासारखे जे राजकीय नेते म्हणवून काम करत असतात त्यांचा राजकीय निष्ठेशी काहीही संबंध नसतो. त्यांचा थेट संबंध पद मिळविण्यात असतो. पदं मिळाली तर निष्ठा पद मिळालं नाही, तर ‘निसटा..’ मेटे या ‘निसटा’ वर्गातले आहेत. दुसरे उमेदवार सदाभाऊ खोत. हे एकदम बांडगुळासारखे. २०१४ च्या निवडणुकीत वर आले, तेही भाजपामध्ये कधीच नव्हते. तिसरे उमेदवार प्रवीण दरेकर. चारित्र्याच्या आणि स्वच्छतेच्या गप्पा करणा-या भाजपाने मनसेच्या या माजी आमदाराला तुळशीपत्राने पाणी शिंपडून शुद्ध करून घेतले. मुंबैं बँकेचा अफरातफरीचा खटला कोर्टात सुरू असताना दरेकर भाजपाचे उमेदवार कधी झाले ते कळले नाही आणि आता बिनविरोध निवडून पण आले. चौथे आर. एन. सिंग. ही उमेदवारी म्हणजे तर चमत्कार आहे. आज वार शनिवार. गेल्या शनिवारी सकाळी आर. एन. सिंग काँग्रेसमध्ये होते. संध्याकाळी ५.३० वाजता कमळाबाईची पावती फाडली. सोमवारी सकाळी तिकीटासाठी अर्ज केला आणि शुक्रवारी भाजपाचे आमदार झाले. या वेगाने आमदारकी मिळविण्याची यादी तयार केली तर, आर. एन. सिंग संसदीय लोकशाहीच्या इतिहासातील कदाचित पहिले असतील. कार्यकर्ता २० – २० वर्ष टाचा घासतो, काम करतो तरी त्याला तालुका पातळीवरचं पद हाताला लागत नाही. पण सात कवडय़ा सुलटय़ा पडणारे आर. एन. सिंग सारखे विरळाच. असे हे भाजपाचे ४ उपरे झटकन आमदार झालेले आहेत. त्यात वर्षानुवर्षे भाजपामध्ये काम करणारे सुरजसिंग ठाकूर हे झाकोळले गेले. बिनविरोध निवड झाल्यावर प्रधान सचिवांच्या मुख्य कार्यालयात पुष्पगुच्छ घेत होते मेटे, दरेकर, आर. एन. सिंग. सुरजसिंग ठाकूर एका कोप-यामध्ये शांतपणे बसले होते. शेजारच्या कार्यकर्त्यांला म्हणाले. ‘जमाने की नौटंकी देख रहा हूँ’

भाजपाच्या पाच जागांखेरीज शिवसेनेच्या दोन जणांचे नशीब फळफळले. दिवाकर रावते आणि सुभाष देसाई यांची सहा वर्षाकरिता बेगमी झाली. राष्ट्रवादीचे विद्यमान विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर आणि विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांचीही बिनविरोध निवड झाली. ज्या दिवशी मुंडे यांची बिनविरोध निवड झाली तो दिवस स्व.गोपीनाथ मुंडे यांच्या दुस-या स्मृतीदिनाचा होता. भाजपामधल्या त्या लढाऊ माणसाची आठवण विधानमंडळात बिनविरोध निवडणुकीचा आनंद व्यक्त होत असतानाच प्रत्येकाच्या मनात दाटून आलेली होती.

3 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version