Home महामुंबई ठाणे संसाराचा गाडा रिक्षाच्या चाकावर

संसाराचा गाडा रिक्षाच्या चाकावर

1

सौदामिनी देशमुख या मराठी महिलेने वैमानिक होऊन गगनभरारी घेऊन विक्रम केला असतानाच ठाण्यातील एका महिलेनेही संसाराचा गाडा हाकण्यासाठी चक्क रिक्षाचे हँडल हाती घेतले आहे.

ठाणे- सौदामिनी देशमुख या मराठी महिलेने वैमानिक होऊन गगनभरारी घेऊन विक्रम केला असतानाच ठाण्यातील एका महिलेनेही संसाराचा गाडा हाकण्यासाठी चक्क रिक्षाचे हँडल हाती घेतले आहे. अनामिका अविनाश भालेराव असे या महिलेचे नाव आहे. त्या जिल्ह्यातील पहिल्या महिला रिक्षाचालक ठरल्या आहेत.

जेमतेम नववीपर्यंत शिक्षण झालेल्या अनामिका यांचा घरात रिक्षाचालक पती, सासरे, दोन लहान मुले असा परिवार आहे. अविनाश यांच्या रिक्षाच्या व्यवसायातून संसाराचा गाडा हाकणे कठीण होऊ लागले. त्यामुळे त्यांनी पतीकडे हट्ट धरून रिक्षा शिकून घेतली. मे महिन्यापूर्वी व्यवस्थित रिक्षा चालवायला येते, असा आत्मविश्वास वाटायला लागल्यानंतर त्या ठाण्यात बिंधास्त रिक्षा चालवतात. त्यांच्या या कर्तुत्वाचे शहरातील संबंध महिला तसेच पुरुषवर्गामधून कौतुक होत आहे. अनामिका सध्या गावदेवी ते वर्तकनगर-शिवाईनगर असा शेअरिंगचा व्यवसाय करत आहेत.

शिवाईनगर-कोकणीपाडा येथे राहणा-या अनामिका यांना शंतनू व दुर्वास अशी दोन मुले आहेत. सकाळी घरातील सर्व कामे आवरून सकाळी साडेनऊ वाजता त्या रिक्षावर बसतात. दुपारी दोन वाजता घरी परततात. पुन्हा घरातील कामे मुलांबरोबर काही वेळ घालवल्यानंतर दुपारी पुन्हा साडेतीन वाजता त्या रिक्षावर बसतात ते रात्री सातपर्यंत. नंतर घरी परतल्यावर कामे उरकून कुटुंबाला वेळ देतात. त्या सध्या भाडय़ाची रिक्षा चालवतात.

दिवसभरात केलेल्या कामाचा मोबदला म्हणून चारशे रुपये मिळतात. त्यातील अडीचशे रुपये रिक्षामालकाला दिल्यानंतरचे पैसे त्यांच्या स्वत:च्या मालकीचे असतात. त्यातून त्या पतीला घर चालवण्यासाठी आधार देतात. विधवा, परित्यक्त्यांना आधार देणारे कोणीच नसते. परिणामी कमी शिकलेल्या महिला स्वयंपाक बनवणे, धुणी-भांडी करणे अशी कामे पत्करतात. त्यामुळे विधवा, परित्यक्त्या महिलांनी या व्यवसायात यावे असा सल्लाही त्या देतात. आरटीओमध्ये परमिट काढायचे असेल, तर कमीत कमी दहावी उत्तीर्ण ही अट टाकण्यात आली आहे.

त्यामुळे माझ्यासारख्या पायावर उभ्या राहणा-या अनेक महिलांची निराशा होत आहे. त्यामुळे परमिटबाबतची अट शिथिल करावी व धुणी-भांडय़ांची कामे सोडून येणा-या स्वाभिमानाने व्यवसायात येणा-या महिलांसाठी वाट मोकळी करून द्यावी, असेही अनामिका म्हणाल्या.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version