Home महाराष्ट्र साधनाताई आमटे यांच्या जीवनावर चित्रपट

साधनाताई आमटे यांच्या जीवनावर चित्रपट

0

‘आनंदवनच्या माउली’ म्हणून ओळखल्या जाणा-या कर्मयोगी बाबा आमटे यांच्या अर्धागिनी साधनाताई आमटे यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘समीधा’ हा चित्रपट काढण्यात येणार आहे.
आनंदवन- ‘आनंदवनच्या माउली’ म्हणून ओळखल्या जाणा-या कर्मयोगी बाबा आमटे यांच्या अर्धागिनी साधनाताई आमटे यांच्या आत्मचरित्रावर आधारित ‘समीधा’ हा चित्रपट काढण्यात येणार आहे. बुधवारी साधनाताईंच्या तिस-या स्मृतिदिनी या चित्रपटाचा मुहूर्त आनंदवनातील श्रद्धावनात पार पडला.

चित्रपटाचा मुहूर्त डॉ. विकास आमटे आणि डॉ. भारती आमटे यांच्या हस्ते पार पडला. ‘शेखर नाईक प्रॉडक्शन’ ही संस्था हा चित्रपट काढणार आहे. चित्रपटात १९४६ ते २०११ पर्यंत साधनाताईंचे माहेर, सासर, वरोरा शहर, कसराबाद व आनंदवनातील वास्तव्य दाखविण्यात येणार आहे. आनंदवन हे कुष्ठरोग्यांसाठी आहे, एवढी माहिती अनेकांना आहे. परंतु, आनंदवन याहीपेक्षा वेगळे आहे. हे ‘समीधा’तून दाखविण्यात येणार आहे. ताईंची भूमिका कोण साकारणार, याबाबत चित्रपट निर्माते शेखर नाईक यांना विचारले असता तीन-चार चेहरे समोर आले आहेत. त्यामध्ये साधनाताईंचे व्यक्तिमत्त्व एकदम साधे, सोज्वळ असल्याने अभिनेत्रीची निवड करणे जरा अवघड आहे. परंतु, हे आव्हान स्वीकारले आहे. ते पूर्ण करणार असल्याचा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला.

‘समीधा’ची पटकथा संजय पवार लिहिणार आहेत. कर्मयोगी बाबा आमटे युगपुरुष होते. त्यांच्या यशात साधनाताईंचा मोठा वाटा होता. हेसुद्धा या चित्रपटातून दाखविले जाणार आहे. शेखर नाईक यांनी याआधी ‘उरुस’ हा चित्रपट काढला. या चित्रपटाला दोन राज्यस्तरीय पुरस्कार मिळाले. साधनाताईंच्या स्मृतिदिनापासून ‘समीधा’च्या कामाला प्रारंभ करून ताईंच्या जन्मदिनी म्हणजेच ५ मे रोजी प्रकाशित करण्याचा मानस नाईक यांनी व्यक्त केला.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version